चालू घडामोडी - २० डिसेंबर २०१८

Date : 20 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
२२ वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू :
  • जम्मू-काश्मीरमध्ये आज (बुधवार) राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. यावर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केला. यापूर्वी १९९० ते ऑक्टोबर १९९६ पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती.

  • राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांकडील सर्व आदेश संसदेकडे गेले आहेत. आता कायदा करण्याचे अधिकार संसदेकडे असतील. नियमानुसार राष्ट्रपती राजवटीत अर्थसंकल्पही संसदेतूनच संमत होते.

  • राज्यपाल राजवटीत कायदे करणे आणि अर्थसंकल्प मंजूर करण्याचे अधिकार राज्यपालांकडे असतात. राष्ट्रपती राजवटीत आता राज्यपालांना निर्णय घेण्याचे अधिकारी नसतील. यासाठी त्यांना आता केंद्राची मंजुरी घ्यावी लागेल.

  • भाजपाने पाठिंबा काढल्यानंतर जून महिन्यात मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले होते. राज्यपाल राजवटीची मुदत १९ डिसेंबरला संपणार होती. त्याचदरम्यान मागील महिन्यात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर पीडीपी आणि सज्जाद लोन यांनी यांनी भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आमदारांच्या घोडेबाजाराची शक्यता आणि स्थिर सरकार देता येणार नाही हे कारण पुढे करत राज्यपालांनी २१ नोव्हेंबर रोजी विधानसभा भंग केली होती.

अबब! सर्वात जलद शतक ठोकून महिला क्रिकेटपटूने केला विक्रम :
  • Womens Big Bash League स्पर्धेत ग्रेस हॅरीसने बुधवारी विक्रमी खेळी केली. हॅरीसने ४२ चेंडूत शतक ठोकून या स्पर्धेतील सर्वात जलद शतक करण्याचा केला. ब्रिस्बेन हिट या संघाकडून खेळताना तिने महिला टी२० क्रिकेटच्या इतिहासातही आपले नाव कोरले. महिला टी२० मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले. याआधी वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटीन हिने २०१० साली झालेलय टी२० विश्वचषक स्पर्धेत ३८ चेंडूमध्ये शतक झळकावले होते.

  • हॅरीसने या खेळीत १३ चौकार आणि ६ षटकार लगावले. अर्धशतक ठोकण्यासाठी तिने २३ चेंडू खेळले पण त्यानंतर पुढील ५१ धावा ठोकण्यासाठी तिने केवळ १९ चेंडू घेतले. या डावात तिला नशिबाची साथ लाभली. ९२ धावांवर खेळत असताना तिला जीवदान मिळाले होते. हे तिचे स्पर्धेतील दुसरे शतक ठरले.

  • तिने मेलबर्न स्टार्स संघाविरुद्ध खेळताना नाबाद १०१ धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला दहा गडी राखून विजय मिळवून दिला. तिच्या खेळीच्या जोरावर ब्रिस्बेन हिट संघाने १३३ धावांचे लक्ष्य ११ व्या षटकांत पूर्ण केले. हॅरीस ९५ धावांवर खेळत असताना संघाला विजयासाठी एकच धाव हवी होती. त्यावेळी हॅरिसने षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला आणि विक्रमी शतक झळकावले.

'या' कालावधीतील निवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ :
  • मुंबई : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मवत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2006 ते 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. परंतु थकबाकीपोटी शासनाच्या तिजोरीवर 2204 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

  • या निर्णयाच्या अंमलबाजावणीने दरवर्षी अतिरिक्त 319 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. एकूण 1 लाख 11 हजार 146 सेवानिवृत्तीधारक याचा लाभ मिळणार आहे. तसेच सरकार 2204 कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम एकरकमी देणार आहे.

  • सातवा वेतन आयोग लागू करण्यात थकित सहावा वेतन आयोगाचा निर्णय निकाली काढणे गरजेचे होते. त्याशिवाय सातवा वेतन आयोग लागू करण्यात अडचण येत होती. त्यामुळेच वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

  • सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकित हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, वित्त सचिव नितीन गद्रे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मेगाभरतीद्वारे २३ जानेवारीपर्यंत नेमणूक करणार नाही - राज्य सरकार :
  • मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला आश्वासन दिलं आहे की, 23 जानेवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत कुणालाही नियुक्तीचं पत्र देणार नाही. मुळात राज्य सरकारनं याआधीच हायकोर्टात स्पष्ट केलं आहे की, 70 हजार पदांसाठीची ही मेगाभरती एक मोठी प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. याचाच पुनरूच्चार करताना विशेष सरकारी वकील व्ही.एम. थोरात यांनी स्पष्ट केलंय की, किमान 23 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची तूर्तास तरी कोणतीही चिन्ह नाहीत.

  • मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दावा केला की, राज्य सरकारनं मराठा समाजातील मागास तरूणांना जातीचे दाखले वाटण्यास सुरूवात केली आहे. ज्याचा परिणाम उद्या निश्चित मेगाभरती प्रक्रियेवर होईल.

  • त्यामुळे 50 टक्क्यांच्यावर दिलेलं हे आरक्षण जोपर्यंत हायकोर्टात मंजूर होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाप्रमाणे ही भरती होऊ नये. या मुद्याला विरोध करणाऱ्या इतर याचिकाकर्त्यांनीही री ओढली. अखेरीस राज्य सरकारच्यावतीनं व्ही.एम. थोरात यांनी हायकोर्टात आश्वासन दिलं की, पुढील सुनावणीपर्यंत कुणालाही नियुक्तीचं पत्रक देणार नाही.

भारताला वीस वर्षांत २३०० विमानांची गरज :
  • भारतीय विमान कंपन्यांना येत्या वीस वर्षांत ३२० अब्ज डॉलर्सच्या (२२ लाख कोटी रूपये) २३०० विमानांची गरज आहे, असे बोईंग कंपनीने एका अंदाजात म्हटले आहे. यातील ८५ टक्के विमाने कमी रूंदीची तर बाकीची जास्त रुंदीची असतील. २०१८-२०३७ या काळात विमानांची ही वाढीव गरज निर्माण होणार आहे.

  • बोईंग इंडिया कंपनीने म्हटले आहे की, अरूंद असलेली १९४० विमाने आवश्यक असून रूंद असलेली ३५० विमाने गरजेची आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे २२० अब्ज व १०० अब्ज डॉलर्स आहे. सध्याच्या चलन दरानुसार ३२० अब्ज डॉलर्स म्हणजे २२ लाख कोटी रूपये खर्च  विमानांसाठी येणार आहे. २०१८-२०३७ दरम्यान १ अब्जपेक्षा कमी किमतीची १० जेट विमाने लागणार आहेत. बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी सांगितले,की भारताची वेगाने वाढ होत आहे त्यामुळे आगामी काळात विमानांची गरज वाढणार आहे.

  • भारतातील हवाई वाहतूक बाजारपेठ आव्हानात्मक आहे कारण हवाई वाहतूक कंपन्या नफ्यात नाहीत. गेल्या ऑगस्टमध्ये बोईंगने असे म्हटले होते की, भारताला २९० अब्ज डॉलर्सच्या २१०० व्यावसायिक विमानांची गरज आहे.

  • इंधनक्षमता बघता ७३७ मॅक्स विमाने भारतासाठी उफयुक्त आहेत. भारतात देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ ही लागोपाठ पन्नासाव्या महिन्यात दोन अंकी वाढ नोंदवत आहे. बोईंग विमाने आता इंधन वाचवणारी विमाने तयार करीत असून देशातील लोकांच्या गरजांना अनुसरून निर्मिती करीत आहे.

एअर फोर्सचे सामर्थ्य वाढवणाऱ्या जीसॅट-७ ए चे यशस्वी प्रक्षेपण :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन बुधवारी  जीसॅट-७ ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. नियोजित वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी GSLV-F11 रॉकेट जीसॅट-७ ए उपग्रहाला घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावला. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे. 

  • भारतीय हवाई दलासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचे आहे. कारण जीसॅट-७ ए या दळणवळण उपग्रहामुळे हवाई दलाला जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि अॅवाक्स विमानांचे नेटवर्क परस्परांशी जोडणे शक्य होईल. जीसॅट – ७ ए हा लष्कराचा ३९ वा दळणवळण उपग्रह आहे.

  • हवाई दलाचे तळ जोडण्या इतकेच जीसॅट-७ ए चे कार्य मर्यादीत नाही तर हवाई दलाच्या ड्रोन मोहिमांमध्येही मोठा फायदा होणार आहे. सध्याचे हवाई दलाचे जमिनीवरील जे नियंत्रण कक्ष आहेत ते उपग्रह केंद्रीत नियंत्रण कक्षामध्ये बदलले जातील. जीसॅट-७ ए मुळे मानवरहित ड्रोन विमानांचा पल्ला, टिकण्याची क्षमता आणि लवचिकता मोठया प्रमाणात वाढणार आहे.

  • भारताची अमेरिकेकडून प्रीडेटर-बी आणि सी गार्डीयन ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु असताना जीसॅट-७ ए उपग्रहाचे प्रक्षेपण होत आहे. प्रीडेटर-बी आणि सी गार्डीयन ड्रोन ही उंचावरुन आणि दिर्घकाळ उड्डाण करण्याची क्षमता असलेली उपग्रह नियंत्रित मानवरहित ड्रोन विमाने आहेत. दूर अंतरावरुन शत्रूच्या तळाला अचूक लक्ष्य करण्याची या ड्रोन विमानांची क्षमता आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने याच ड्रोन विमानांच्या मदतीने अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला आहे.

पाकिस्तानला मोठा धक्का, भारताला द्यावे लागणार तब्बल २७०० कोटी : 
  • लंडन : पाकिस्तानला आज सर्वात मोठा धक्का बसला असून त्यांना तब्बल 2700 कोटी रुपये भारताला द्यावे लागणार आहे. आयसीसीने एका खटल्यावर आज निर्णय दिला असून त्यानुसार पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) बीसीसीआय तब्बल 2700 कोटी रुपये दंड स्वरुपात द्यावा लागणार आहे.

  • आयसीसीकडे पीसीबीने बीसीसीआयविरुद्ध एक तक्रार केली होती. ही तक्रार आयसीसीने गंभीरपणे घेत त्यावर सुनावणी करायला सुरुवात केली. आयसीसीने यावेळी दोन्ही देशांचे म्हणणे ऐकून घेतले आणि भारताच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयानंतर बीसीसीआयने पीसीबीविरुद्ध तक्रार दाखल केली. यावर आयसीसीने आज सुनावणी केली.

  • काय आहे प्रकरण : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक करार झाला होता. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिका खेळवण्यात यावा, हे ठरवण्यात आले होते. पण त्यानंतर दोन्ही देशांतील राजकीय संबंध बिघडले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंचीही पाकिस्ताबरोबर द्विदेशीय मालिका खेळण्याची इच्छा नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयानंतच आम्ही पाकिस्तानबरोबर द्विदेशीय मालिका खेळू शकतो, असे बीसीसीआयने स्षट केले होते.

  • भारत आपल्याबरोबर द्विदेशीय मालिका खेळणार नसल्याचे पाकिस्तानला समजले. त्यानंतर त्यांनी भारताला ताकीदही दिली होती. पण भारताने त्यावेळीही न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानने नुकसान भरपाईसाठी आयसीसीचे दार ठोठावले होते. त्यावेळी आयसीसीने हे प्रकरण जाणून घेतले आणि भारताच्या बाजूने निकाल दिला होता.

  • या निर्णयानुसार भारताला कोणताही नुकसान भरपाई पाकिस्तानला द्यावी लागणार नव्हती. पण त्यानंतर बीसीसीआयने पीसीबीवरुद्ध याबाबत अजून एक तक्रार केली. या तक्रारीवर आज सुनावणी करण्यात आली. या सुनावणीनुसार पीसीबीला तब्बल 2700 कोटी रुपये बीसीसीआयला दंड स्वरुपात द्यावे लागणार आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस

महत्वाच्या घटना 

  • १९२४: अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.

  • १९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.

  • १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.

  • १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.

  • १९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.

  • २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)

  • १८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६७)

  • १९०१: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६७)

  • १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०००)

  • १९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म.

  • १९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास यांचा जन्म.

  • १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै २०१०)

मृत्यू 

  • १७३१: बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचे निधन. (जन्म: ४ मे १६४९)

  • १९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन. (जन्म: १२ मे १८६३)

  • १९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचे निधन. (जन्म: २२ मे १८७१)

  • १९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)

  • १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९३)

  • १९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट यांचे निधन.

  • १९९६: अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ – ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.)

  • १९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)

  • १९९८: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)

  • २००१: सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)

  • २०१०: अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)

  • २०१०: लेखक सुभाष भेंडे यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.