चालू घडामोडी - २० जून २०१८

Date : 20 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुगल देणार ८,००० पत्रकारांना ट्रेनिंग, सहा भाषांमध्ये कार्यशाळा :
  • नवी दिल्ली : चुकीच्या बातम्यांना पत्रकार बळी पडू नयेत यासाठी गुगल इंडिया भारतातील 8000 पत्रकारांना येत्या वर्षभरात प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये इंग्रजीसह इतर सहा भाषांमध्ये पत्रकारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

  • गुगल न्यूज इनिशिएटिव्ह इंडिया ट्रेनिंग नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील प्रमुख शहरांतील 200 पत्रकारांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये पाच दिवसांच्या इंग्रजी आणि सहा इतर भारतीय भाषांकरिता आयोजित केल्या जाणाऱ्या या कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल, या प्रशिक्षणांमध्ये त्यांचे कौशल्य सुधारले जाईल.

  • प्रमाणित प्रशिक्षक या नेटवर्कमाध्यामातून आयोजित दोन-दिवसीय, एक-दिवसीय आणि अर्धवेळ कार्यशाळेत अधिक पत्रकारांना प्रशिक्षण देतील. दरम्यान, गुगल इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी आणि कन्नड या भाषांमध्ये ही प्रशिक्षण कार्यशाळा संपूर्ण भारतात आयोजित केली जाणार आहे. 

  • या प्रशिक्षणाचा एकच उद्देश आहे की, सत्य घटनेची चौकशी आणि ऑनलाइन पडताळणी असा असणार आहे. यासाठी फर्स्ट-ड्राफ्ट, स्टोरीफूल, ऑल्टन्यूज, बुमलाईव्ह, फॅक्टचेकर डॉट इन आणि डेटालाईडच्या तज्ज्ञांनी तयार केलेला अभ्यासक्रम या प्रशिक्षणात वापरण्यात येणार आहे.

  • विश्वसनीय आणि अधिकृत मीडिया स्रोतांचे समर्थन करणे गुगलसाठी प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे भारतामध्ये चुकीच्या माहितीच्या विरोधात त्यांच्या लढ्यात पत्रकारांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इंटरन्यूज, डेटालाईड्स आणि बूमलाईव्ह करत असलेल्या सहयोगचा आम्हाला अभिमान वाटतो, असे गुगलने म्हटले आहे. 

रशियाचा सलग दुसरा विजय, इजिप्तवर ३-१ ने मात :
  • मॉस्को: फिफा विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात रशियाने इजिप्तवर 3-1 ने मात केली. विश्वचषकातील सलग दोन सामने जिंकण्याची रशियाची ही पहिलीच वेळ आहे. या विजयासह 6 गुण कमावत रशिया अ गटात अव्वल स्थानावर आहे.

  • सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मात्र, इजिप्तचा कर्णधार अहमद फतीने 47 व्या मिनिटाला स्वयंगोल केला. त्यामुळे रशियाला 1-0 अशी आघाडी मिळाली.

  • नंतर रशियाच्या डेनिस चेरीशेव्हने 59 व्या मिनिटाला तर आर्टम झ्युबाने 62 व्या मिनिटाला गोल केला. या दोन्ही गोलने रशियाला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

  • या सामन्यात सर्वांचं लक्ष इजिप्तच्या मोहम्मद सलाहकडे लागलं होतं. मात्र त्याला या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही.

  • सलाहने 73 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर पहिला गोल मारला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

  • 1990 नंतर रशिया विश्वचषकात पहिल्यांदाच खेळत आहे. या विश्वचषकात रशियाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला. यापूर्वी रशियाने पहिल्या सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा मोठा विजय मिळवला होता.

केजरीवालांचं धरणं आंदोलन अखेर मागे :
  • नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी धरणं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. गेल्या नऊ दिवसांपासून केजरीवाल नायब राज्यपालांच्या निवासस्थानी आंदोलन करत होते. आयएएस अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्यासह इतर मागण्या केजरीवाल यांच्या होत्या.

  • अरविंद केजरीवाल हे आता नायब राज्यपालांच्या निवासस्थानातून बाहेर पडतील. मात्र हे धरणं आंदोलन नव्हतं, तर आम्ही नायब राज्यपालांच्या भेटीसाठी वाट पाहत होतो, असे मनिष सिसोदिया म्हणाले.

  • “आज अनेक मंत्र्यांनी बोलावल्यानंतर आयएएस अधिकारी आले. आमचं काही कुठल्या आयएएस अधिकाऱ्याशी भांडण नाही. तसेच काही अधिकाऱ्यांनी आज असेही संकेत दिले की, त्यांना वरुनच आदेश होते. अधिकारी आज बैठकीला आले, तसे उद्याही यावे.”, असेही मनिष सिसोदिया म्हणाले.

  • केजरीवालांच्या आंदोलनाचं मूळ - या आंदोलनाचं मूळ आहे 19 फेब्रुवारीला झालेल्या घटनेत. दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना केजरीवाल यांच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये आपच्या दोन आमदारांनी थप्पड लगावल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी मिळून केजरीवाल सरकारविरोधात असहकाराचं कडक पाऊल उचललं आहे. हे अधिकारी मंत्र्यांना आता भेटायलायच नाही म्हणत आहेत.

  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या रुटीन मीटिंगवरही अधिकारी बहिष्कार टाकत आहेत. जे काही थोडंफार काम सुरु आहे ते लेखी कम्युनिकेशनवरच सुरु आहे. गेल्या चार महिन्यांपासून अधिकारी आणि सरकारमधला हा संघर्ष कायम आहे.

अनुकृती वास ठरली 'मिस इंडिया २०१८' 
  • मुंबई -  तामिळनाडूची सौंदर्यवती अनुकृती वास हिने यंदाच्या मिस इंडिया 2018 चे विजेतेपद पटकावले. अनुकृती हिने   29 प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. गतविजेती आणि मिस वर्ल्ड मनुषी छिल्लर हिने अनुकृतीच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकूट सजवला. या स्पर्धेत हरयाणाची मीनाक्षी चौधरी दुसऱ्या तर आंध्र प्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानावर राहिली. 

  • प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया 2018 ची अंतिम फेरी मंगळवारी रात्री मुंबईतील एनएसईआय, वरळी येथे संपन्न झाली. दिग्गज फिल्मस्टार्सच्या उपस्थितीत झालेल्या रंगलेल्या अंतिम फेरीत देशाच्या विविध भागातून आलेल्या सौंदर्यवतींनी विजेतेपदासाठी आपली दावेदारी सादर केली. अखेरीस अनुकृतीने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जेतेपद पटकावले. 

  • तामिळनाडूतील रहिवासी असलेल्या अनुकृतीचा सांभाळ तिच्या आईने केला आहे. अनुकृती ही पेशाने खेळाडू आणि नृत्यांगना आहे. तसेच आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती फ्रेंच भाषेची पदवी घेत आहे. तसेच तिला दुचाकी चालवण्याचा छंद आहे. भविष्यात सुपर मॉडेल बनण्याचे तिचे स्वप्न आहे.  

कुलकर्णींच्या डीएसके विश्व प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार :
  • पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. कुलकर्णी यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे 31 कोटी 65 लाख रुपये थकवले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने धायरीच्या डीएसके विश्वमधील गहाण ठेवण्यात आलेली मालमत्ता विक्रीस काढली आहे.

  • लिलावात बोली लावण्यासाठी 86 लाख रुपये रक्कम भरावी लागणार आहे. 21 जुलैपर्यंत लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज भरता येणार आहेत. 23 जुलैला डीएसके प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे.

  • गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी डीएसके आणि पत्नी हेमंती हे सध्या अटकेत आहेत. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

  • काय आहे प्रकरण - डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

  • डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.

विजय दर्डा यांची भारताच्या स्वीडनमधील राजदूतांशी चर्चा :
  • स्टॉकहोम : ‘लोकमत’ मीडियाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी भारताच्या स्वीडन व लाटव्हियातील राजदूत मोनिका कपिल मोहता यांची सोमवारी स्टॉकहोममधील इंडिया हाउसमध्ये भेट घेतली. भारतीय राजदूतांचे ते सरकारी निवासस्थान आहे.

  • विजय दर्डा व मोनिका कपिल मोहता यांच्यातील चर्चेचा भर भारत व स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि स्वीडिश व्यवसाय आणि उद्योगांसाठी भारतीय बाजारपेठेचे वाढते महत्त्व या मुद्द्यांवर होता. व्होल्वो, एरिक्सन, स्कॅनिया, साब, टेट्रा, पाक, एबीबी, अ‍ॅटलास कोप्को, एसकेएफ, इलेक्ट्रोलक्स, एच अँड एम, इकिया, सँडविक, अल्फा लावल आदी मोठ्या स्वीडिश कंपन्यांचे भारतात ठळक अस्तित्व आहे.

  • स्वीडन पाश्चिमात्य देशांतील खूप जुना देश भारतात भारतासाठी उत्पादन करतो आणि भारतात तयार केलेली उत्पादने जगभर निर्यात करतो. यातील अनेक कंपन्यांचे उत्पादन पुण्यात होत असते.

  • गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, वाहतूक व मूलभूत सोईसुविधामंत्री नितीन गडकरी व महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वीडनला भेट दिल्याने दोन्ही देशांतील संबंध आणखी बळकट झाले आहेत.

  • स्वीडनने भारताला ऊर्जा, सांडपाणी व्यवस्थापन, सुरक्षा विषयक तंत्रज्ञान व अभियांत्रिकी उत्पादनांतील अभिनव कल्पना या क्षेत्रात भरीव मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. स्वीडनमध्ये प्रगत कल्याणकारी व्यवस्था असून, महिलांना संसद व मंत्रिमंडळात ५० टक्के प्रतिनिधित्व, व्यवसाय व राजकारणात लैंगिक समानता आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर :
  • मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नाही म्हणून अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती. अखेर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेचे दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.

  • 47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता. या परिषदेत अमेरिकेला नुकतंच दीड वर्ष पूर्ण झालं होतं. अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत असं वृत्त काही दिवसांपासून आलं होतं. तेव्हापासूनच अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. याबाबत केवळ अधिकृत घोषणा झाली नव्हती.

  • यापूर्वी अमेरिकेने माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळातही तीन वर्षांसाठी मानवाधिकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले आणि अमेरिका पुन्हा या परिषदेत सहभागी झाला होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा अमेरिकेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

दिनविशेष :
  • जागतिक शरणार्थी दिन

महत्वाच्या घटना

  • १८३७: इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.

  • १८६३: वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.

  • १८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.

  • १८८७: देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.

  • १८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

  • १९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.

  • १९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

जन्म

  • १८६९: किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)

  • १९२०: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)

  • १९३९: जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल१९९८)

  • १९४६: पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जनाना गुस्माव यांचा जन्म.

  • १९४८: नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी यांचा जन्म.

  • १९५२: भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.

मृत्यू

  • १८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)

  • १९१७: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स यांचे निधन.

  • १९८७: पद्मभूषण डॉं. सलिम अली यांचे निधन.

  • १९९७: मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचे निधन.

  • १९९७: राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन.

  • २०१३: भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.