चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० जून २०१९

Date : 20 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘एक देश, एक निवडणूक’च्या निर्णयासाठी समिती :
  • नवी दिल्ली : देशभर एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या शिफारशींनंतर ‘एक देश एक निवडणूक’ या सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले.

  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास अनेक राजकीय पक्षांचा विरोध असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. लोकसभा आणि राज्यसभेत सदस्य असलेल्या ४० पक्षांच्या प्रमुखांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यापैकी २१ पक्षांचे प्रमुख वा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तीन पक्षांनी पत्राद्वारे मत व्यक्त केले आहे.

  • बहुतांश पक्षांनी एकत्र निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही डाव्या पक्षांचा एकत्र निवडणुकीच्या विचाराला विरोध नाही. प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत मात्र दोन्ही पक्ष साशंक असल्याचा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. सुमारे तीन तास झालेल्या बैठकीनंतर राजनाथ यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर यांची निवड :
  • वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटॉल हिलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले व पहिल्या इराक युद्धाचा अनुभव असलेले माजी लष्करी अधिकारी मार्क एस्पर यांचे नाव संरक्षण मंत्रिपदासाठी निश्चित केले आहे.

  • ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले, की सध्याचे लष्कर सचिव मार्क एस्पर हे हंगामी पातळीवर संरक्षण मंत्री म्हणून काम पाहतील. मार्क यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे, ते संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी चांगली पार पाडू शकतील असा विश्वास वाटतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. एस्पर यांची कायमस्वरूपी संरक्षण मंत्रिपदी नेमणूक करू असेही त्यांनी स्पष्ट केले. एस्पर हे अनुभवी असून अनेक दिवस त्यांच्या नावावर चर्चा सुरू होती.

  • सध्याचे हंगामी संरक्षण मंत्री पॅट्रिक श्ॉनहान यांनी संरक्षणमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून त्यांचे नाव सिनेटकडे पाठवले जाण्यापूर्वीच त्यांनी कौटुंबिक कारणास्तव  पदावर राहणार नाही असे स्पष्ट केले.

  • नवे संरक्षण मंत्री एस्पर यांचा नोव्हेंबर २०१७ मध्ये लष्कर सचिव म्हणून शपथविधी झाला होता. त्याआधी ते रेथिऑन या कंपनीत सरकार- संरक्षण संबंध विषयक  उपाध्यक्ष होते . एस्पर हे एक प्रकारे दबाव गटासाठी काम करीत होते व त्यांनी शेकडो डॉलर्सची कंत्राटे त्या वेळी कंपनीला मिळवून दिली होती.

  • त्यांनी लष्कर सचिव म्हणून काम करताना कुठली कंत्राटे दिलेली नाहीत, पण त्यांच्या पुढील निर्णयांवर मागील पाश्र्वभूमीचा परिणाम होऊ  शकतो.  रेथिऑन व युनायटेड टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रियेवर त्यांच्या पदाचा परिणाम शक्य आहे, अशी टीका क्रू एक्झिक्युटिव्हचे संचालक नोआ बुकबाइंडर यांनी केली आहे.  एस्पर यांनी सिनेटचे नेते बिल फ्रिस्ट यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले होते.

पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय व्हिसा मिळणार :
  • नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे मार्च महिन्यात पार पडलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताने पाकिस्तानच्या 3 नेमबाजांना व्हिसा नाकारला होता. परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने टाकलेल्या दबावानंतर भारत सरकारने आपल्या व्हिसा धोरणांमध्ये बदल करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय व्हिसा मिळवणे शक्य होणार आहे.

  • जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानास्थित दहशतवादी संघटनेनेतील दहशतवाद्यांनी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा परिसरात सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणांमुळे भारताकडून पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारला जात होता. परंतु आता तसे होणार नाही.

  • सर्व पात्र खेळाडूंना भारतात आयोजित होणाऱ्या स्पर्धांसाठी व्हिसा दिला जाईल, असे लिखीत स्वरुपाचे आश्वासन केंद्र सरकारने मंगळवारी (18 जून) भारतीय ऑलिम्पिक संघ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) दिले आहे.

  • आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी मार्च महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने तीन पाकिस्तानी खेळाडूंचा व्हिसा नाकारला होता. परंतु हे पाऊल भारताला चांगलच महागात पडलं होतं.

तज्ज्ञ पथक पाठवण्याबाबत सोमवारी सुनावणी :
  • नवी दिल्ली : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज रुग्णालय तसेच केजरीवाल रुग्णालयात मेंदुज्वराने शंभरहून अधिक मुलांचा मृत्यू झाला असून तेथे या रोगावर उपचार करण्यासाठी केंद्राने तज्ज्ञ पथक स्थापन करून पाठवावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. केंद्र सरकारला तज्ज्ञ पथक स्थापन करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली आहे.

  • सुटीतील न्यायाधीश न्या. दीपक गुप्ता व न्या. सूर्यकांत यांनी याचिकेवर पुढील सोमवारी सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी तातडीने सुनावणीची मागणी केली होती. मेंदुज्वरावर उपचार करण्यासाठी प्रगत वैद्यकीय यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी यात करण्यात आली आहे. वकील मनोहर प्रताप यांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, गेल्या आठवडय़ात १ ते १० वयोगटातील किमान १२६ मुले यात मेंदुज्वराने मृत्युमुखी पडली आहेत.

  • मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. बिहार, उत्तर प्रदेश व भारत सरकार यांच्या निष्कोळजीपणामुळे हे मृत्यू झाले असून दरवर्षी याच रोगाने असे अनेक बळी गेले आहेत. या वर्षी २०१९ मध्ये बिहारमधील मुझफ्फरपूर हे या रोगाचे केंद्र ठरले असून तेथे १२६ मुले मरण पावली आहेत. डॉक्टरांची कमी संख्या, रुग्णालयात सुविधांचा अभाव यामुळे मृतांची संख्या वाढतच आहे.

  • त्यामुळे मुझफ्फरपूर येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समिती पाठवण्याची गरज आहे. केंद्र सरकार व बिहार सरकार यांना ५०० स्थायी व १०० फिरती अतिदक्षता केंद्रे स्थापन करण्याचा आदेश देण्यात यावा असेही याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारच्या बेपवाईने मुले मरण पावली असून त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये भरपाई देण्यात यावी,  अशीही मागणी करण्यात आली आहे.

ट्रम्प यांची निवडणुकीत ‘कीप अमेरिका ग्रेट’ची घोषणा :
  • वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित असून २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला. मंगळवारी फ्लोरिडा येथे त्यांच्या प्रचारसभेला प्रचंड गर्दी झाली होती. या पूर्वी ‘मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन’अशी घोषणा देणाऱ्या ट्रम्प यांनी आता ‘कीप अमेरिका ग्रेट’ अशी नवी घोषणा दिली आहे.

  • ट्रम्प (वय ७३) हे स्थावर मालमत्ता गुंतवणूकदार होते ते नंतर राजकारणात आले. २०१७ मध्ये ते अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष झाले. त्यांनी ओरलँडो येथे सभेत वीस हजार लोकांपुढे असे सांगितले की, आपल्या नेतृत्वाखाली अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली असून आता जगाला त्याचा मत्सर वाटत आहे. तीन वर्षांपूर्वी आपला जो विजय झाला तो अमेरिकी इतिहासातील निर्णायक क्षण होता.  त्यावेळी त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला होता. २०१६ मध्ये त्यांनी प्रचारावेळी जी आश्वासने दिली होती त्याच मार्गाने निर्णय घेतले त्यात त्यांनी कठोर स्थलांतर धोरण लागू केले. संरक्षणाचा खर्चही वाढवला. आपल्या कारकीर्दीत अमेरिकेने लक्षणीय प्रगती केली असून जर पुढील निवडणुकीत पराभव झाला तर अमेरिकेची प्रगतीच धोक्यात येईल.

  • कीप अमेरिका ग्रेट असा नारा देताना त्यांनी ७९ मिनिटांच्या भाषणात सांगितले की, पुढील निवडणूक आपणच जिंकणार आहोत. २०१६ च्या प्रचारात त्यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा दिली होती. ओरलँडोच्या अ‍ॅमवे सेंटर येथे प्रचार सभा झाली त्यावेळी ट्रम्प यांनी सांगितले की, आपण आता पुढेच चालत राहणार आहोत. जिंकतच जाणार आहोत.

  • ट्रम्प यांच्या विरोधात लढण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात किमान डझनाहून अधिक दावेदार आहेत. पुढील वर्षांच्या सुरुवातीला प्राथमिक फेरीत डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार निश्चित होईल.

पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर :
  • पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी (उच्च प्राथमिक) आणि आठवी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्यभरातील पाचवीचे १६ हजार ५७९ आणि आठवीचे १४ हजार ८१५ असे एकूण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

  • परीक्षा परीषदेतर्फे ही माहिती देण्यात आली. राज्यात २४ फेब्रुवारीला दोन्ही परीक्षा घेण्यात आल्या. पाचवीच्या ४ लाख ९५ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी, आठवीच्या ३ लाख ४१ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दोन्ही परीक्षांमध्ये मिळून एकूण १ लाख ७२ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांचे प्रमाण २०.५९ टक्के आहे.

  • पाचवीच्या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण २२.४ टक्के आणि आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण १८.४९ टक्के आहे. यंदा पाचवीच्या परीक्षेतील उत्तीर्णाचे प्रमाण ०.९३ टक्क्य़ांनी घटले आहे, तर आठवीतील उत्तीर्णाचे प्रमाण ५.९२ टक्कय़ांनी वाढले आहे.

  • परीक्षेचा अंतरिम निकाल १६ मे रोजी जाहीर करण्यात आला होता असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अंतिम निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

दिनविशेष :
  • जागतिक शरणार्थी दिन

महत्वाच्या घटना 

  • १८३७: इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.

  • १८४०: सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.

  • १८६३: वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.

  • १८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.

  • १८८७: देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.

  • १८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.

  • १९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.

  • १९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.

  • १९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.

  • २००१: परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.

जन्म 

  • १९१५: चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)

  • १९२०: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)

  • १९३९: जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल१९९८)

  • १९४६: पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जनाना गुस्माव यांचा जन्म.

  • १९४८: नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी यांचा जन्म.

  • १९५२: भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म.

मृत्यू

  • १६६८: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्‍रिच रॉथ यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १६२०)

  • १८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)

  • १९१७: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स यांचे निधन.

  • १९८७: पद्मभूषण डॉं. सलिम अली यांचे निधन.

  • १९९७: मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचे निधन.

  • १९९७: राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन.

  • २००८: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२१)

  • २०१३: भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.