चालू घडामोडी - २० मार्च २०१८

Date : 20 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय रेल्वेत ९० हजार पदांसाठी भरती प्रक्रिया - रेल्वेमंत्री :
  • मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 90 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरतींपैकी ही एक मानली जात आहे.

  • आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) म्हणजे रेल्वे संरक्षण दलातील 9 हजार 500 उमेदवारांच्या भरतीद्वारे या प्रक्रियेला सुरुवात होईल. यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं.

  • आधीच्या सरकारने उत्तर प्रदेशसोबत भेदभाव केला. राज्यात रेल्वेच्या विकासासाठी कमी गुंतवणूक केली. मात्र एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजे 2014 मध्ये रायबरेलीत रेल्वे कोच निर्मितीला सुरुवात झाली. यावर्षी विक्रमी 700 कोचेस तयार केले जाणार असून पुढील दोन वर्षांत ही संख्या तीन हजारांवर पोहचेल, असा दावाही गोयल यांनी केला.(source :abpmajha)

रशियामध्ये पुन्हा पुतीनराज, जगातील सर्वात मोठ्या देशाचे अध्यक्ष :
  • मॉस्को- आकाराने जगात सर्वात मोठ्या असणाऱ्या देशाच्या प्रमुखपदाची धुरा व्लादिमिर पुतीन यांच्याकडे आली आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीमध्ये पुतीन यांचा विजय झाला असून ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा निवडले गेले आहेत.

  • जवळजवळ २५ वर्षे रशियाची सत्ता सांभळण्याची संधी पुतीन यांना या निमित्ताने मिळाली आहे. २०२४ पर्यंत त्यांची ही नवी टर्म असेल. २०२४ साली ते ७१ वर्षांचे असतील. त्यांच्याआधी जोसेफ स्टॅलिनने रशियाची सत्ता सांभाळली आहे. निवडणुकीतील ७० टक्के मते मोजल्यानंतरच पुतीन विजयी झाल्याचे निश्चित झाले. पुतीन यांना ७५.९ टक्के मते मिळाल्याचे यातून स्पष्ट झाले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी घेतलेल्या निर्णयांवर लोकांनी दाखवलेला विश्वास आहे असा मी या निवडणुकीचा अर्थ लावतो असे रेड स्क्वेअर येथे मतमोजणीनंतर केलेल्या भाषणामध्ये पुतीन यांनी सांगितले.

  • पावशतकापेक्षा अधिक काळ सत्तेत राहाणाऱ्या नेत्यांमध्ये ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोनॉली राखमोन, कॅमेरुनचे पॉल बिय, इक्वेटोरियल गिनीचे तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचा समावेश आहे.

  • सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणारे नेते क्युबा- सर्वाधिक काळ राज्यशकट हाकणाऱ्या यादीत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचा क्रमांक सर्वात वरती लागतो. त्यांनी ४९ वर्षे सत्ता उपभोगली. २००८ साली त्यांनी सत्ता आपला भाऊ राऊल याच्याकडे सोपवली.(source :lokmat)

अमेरिकेच्या आयात शुल्काविरुद्ध भारत उठवणार आवाज :
  • नवी दिल्ली : अमेरिकेने अ‍ॅल्युमिनियम व पोलादाच्या आयात शुल्कात वाढ केल्याविरुद्ध भारत सरकार जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) तक्रार करण्याचा विचारात आहे. या मुद्द्यावर वाणिज्य मंत्रालयात विस्तृत चर्चा झाली आहे. डब्ल्यूटीओशी संबंधित माजी अधिकाऱ्यांशीही विचारविनिमय करण्यात आल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

  • याप्रकरणी भारताला मजबुतीने विरोध करण्यास वाव आहे, असे एका गटाला वाटते. तथापि, भारताने घाई न करता अन्य डब्ल्यूटीओ सदस्यांना हा वाद उपस्थित करू द्यावा. त्यानंतर भारताने त्यात सहभागी व्हावे, असे काहींचे म्हणणे आहे.

  • एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, भारताने सावध राहण्याचीही गरज आहे. अमेरिकेत भारताचे मोठ्या प्रमाणात हितसंबंध गुंतलेले आहेत. अमेरिकेत सॉफ्टवेअर आणि अन्य क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय भारतातून निर्यात होेणाºया सॉफ्टवेअरपैकी ८० टक्के निर्यात अमेरिकेत जाते. अमेरिकी कंपन्या पूर्णत: भारतीय कंपन्या

  • आणि व्यावसायिकांवर अवलंबून आहेत. अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडील काही महिन्यांत भारत आणि चीन यांच्यासह इतर देशांना लक्ष्य बनविल्याने व्यापारी तणाव निर्माण झाला आहे.

  • गेल्याच आठवड्यात अमेरिकेने भारताच्या अर्धा डझन निर्यात प्रोत्साहन योजनांना डब्ल्यूटीओमध्ये आक्षेप घेतला आहे. या योजनांद्वारे सबसिडी दिली जात असल्याने अमेरिकेतील व्यवसाय व कामगारांवर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारतातून होणारी पोलाद व अ‍ॅल्युमिनियमची स्वस्त आयात रोखण्यासाठी अमेरिकेने या धातूंवरचा कर वाढवला आहे.(source :abpmajha)

पोटनिवडणुकीतील पराभवाचे मंथन करणार भाजपा, मोदी घेणार नेत्यांचा क्लास :
  • नवी दिल्ली - ईशान्येतील तीन राज्यांमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपाला नव्याने चढलेली विजयाची धुंदी बुधवारी 14 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या निकालामुळे पुरती उतरली होती.

  • उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बुधवारी भाजपाला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाचे मंथन करण्यासाठी भाजपाने शुक्रवारी बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी स्वत: हजर असणार आहे. लोकसभेतील पराभवावर चर्चा केली जाणार आहे. पराभव का झाला यावर चर्चा होणार आहे.  

  • नवी दिल्ली येथे शुक्रवारी दीनदयाल उपाध्याय रोडवर नव्या कार्यालयामध्ये ही बैठक बोलवली आहे. या बौठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहे.

  • यावेळी पंतप्रधान नेत्यांना काही सुचना करण्याची शक्यता आहे. यामध्ये लोकांमध्ये जाऊन काम करा आणि सरकारी योजना सर्वसामन्य लोकांपर्यत कशा पोहचतील याची माहिती लोकांना द्या अशा सुचना नेत्यांना दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. 

  • आधिकवेशन सुरु असताना प्रत्येक मंगळवारी पार्टीची बैठक संसदेत होते. पण ही बैठक भाजपासाठी महत्वाची मानली जात आहे. कारण 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची रणरनीतीही यावेळी ठरवली जाण्याची शक्यता आहे. 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाची दिशा काय असणार याबैठकीनंतर ठरणार आहे. या बैठकीत पक्षअध्यक्ष अमित शाहही उपस्थित राहणार आहे. (source :lokmat)

महाराष्ट्रातील ५ नद्या करणार प्रदूषणमुक्त; गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा, मुळा-मुठाचा समावेश :
  • नवी दिल्ली : प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात (एनआरसीपी) १४ राज्यांतील ३२ नद्यांचा समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. मात्र, असे असले तरी या कामासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये राज्याला केंद्राकडून एक रुपयाही मिळालेला नाही.

  • पर्यावरण-वन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशभरातील ७६ शहरांतील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी ४,५८० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यात महाराष्टÑातील योजनांसाठी ११८३ कोटी खर्च येईल, असा अंदाज आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्टÑात होणारा खर्च सर्वाधिक आहे. या प्रकल्पानुसार प्रतिदिन २६० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारले आहेत.

  • विविध योजनांसाठी राज्यांना २,२३७ कोटी रुपयांची केंद्रीय मदत देण्यात आली आहे. यामुळे देशभरात अशा संयंत्राची क्षमता २४४६.४३ एमएलडीपर्यंत गेली आहे.

  • -राज्यातील तीन शहरांत सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांची क्षमता १२७ एमएलडी करण्यात आली आहे.

  • कृष्णा नदीतील प्रदूषण कमी करण्यास कराड आणि सांगली येथे सांडपाणी नदीत सोडण्यापासून पायबंद घालणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी २८.७४ कोटी रुपये खर्च करून ५५ एमएलडीचे संयंत्र उभारण्यात आले आहेत.(source :lokmat)

व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचं निधन :
  • चेन्नई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचं मंगळवारी रात्री निधन झाले. ते  76 वर्षांचे होते.

  • एम. नटराजन यांच्यावर चेन्नईतील ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या रविवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एम. नटराजन यांची प्रकृती खालवल्याने त्यांना सोमवारी दुपारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देऊ न शकल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

  • ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, अनेक अवयव निकामी झाल्याने एम. नटराजन यांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. 

  • दरम्यान, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी व्ही. के. शशिकला यांना न्यायालयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या त्या बंगळुरुमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. (source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.

  • १८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.

  • १७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.

  • १९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.

  • १९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.

  • १९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • २०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.

जन्म

  • १८२८: नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९०६)

  • १९०८: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९८५)

  • १९२०: नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

  • १९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.

मृत्यू

  • १७२६: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञसर आयझॅक न्युटन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १६४२)

  • १९२५:ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५९)

  • १९५६: मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९०९)

  • २०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.