चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० मे २०१९

Date : 20 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याबद्दल तृणमूलची तक्रार :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ भेटीचे वृत्तवाहिन्यांनी केलेले वार्ताकन  व प्रसारण हे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

  • पंतप्रधान मोदी  यांच्या केदारनाथ व बद्रीनाथ भेटीचे वाहिन्यांनी चित्रण केले तसेच त्यांनी त्यावेळी केलेली वक्तव्येही दाखवली, हे अनैतिक असल्याचे पक्ष प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार १७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता संपला असताना मोदी यांच्या केदारनाथ व बद्रीनाथ यात्रेचे वार्ताकन करण्यात आले. दोन दिवस त्यांचे तेथील कार्यक्रम राष्ट्रीय व स्थानिक वाहिन्यांवरून दाखवण्यात आले. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे तृणमूलने म्हटले आहे.

  • मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या कुहेतूनेच हे प्रसारण करण्यात आले, असा आरोप ओब्रायन यांनी केला असून पंतप्रधान मोदी यांच्यावर निवडणूक आयोग काहीच कारवाई करीत नसल्याचे म्हटले आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना लोकशाही प्रक्रि येतील डोळे व कान असलेल्या निवडणूक आयोगाने अंध व बहिऱ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या केदारनाथ – बद्रीनाथ दौऱ्याच्या अनैतिक प्रक्षेपणाची दखल घेऊन कारवाई करावी, असे ओब्रायन यांनी म्हटले आहे.

भारताकडे विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज :
  • विश्वचषकासाठी निवडण्यात आलेली गोलंदाजांची फळी ही इतर संघांच्या तुलनेत सर्वोत्तम असल्यामुळेच भारताला पुन्हा एकदा जगज्जेतेपद मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे, अशी स्तुतिसुमने माजी भारतीय क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी रविवारी व्यक्त केली.

  • ३० मेपासून इंग्लंड येथे सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी अशा दमदार वेगवान त्रिकुटाचा समावेश असून त्यांना हार्दिक पंडय़ा आणि विजय शंकर या अष्टपैलू खेळाडूंचीदेखील साथ लाभेल. त्याशिवाय कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल आणि रवींद्र जडेजा असे फिरकी त्रिकूटही भारताकडे आहे.

  • ‘‘यंदाच्या विश्वचषकात भारतीय वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट दमदार कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. किंबहुना आपली गोलंदाजांची फळी इतर संघांपेक्षा अधिक बळकट वाटते. त्याशिवाय आपल्याकडे उपलब्ध असलेली अष्टपैलूंची जोडीही प्रतिभावान असल्यामुळे विराट कोहलीचा संघ विश्वचषक उंचावण्यासाठी प्रबळ दावेदार आहे,’’ असे राजपूत म्हणाले.

  • राजपूत सध्या मुंबईत सुरू असलेल्या मुंबई प्रीमियर ट्वेन्टी-२० लीग क्रिकेटमध्ये ट्रिम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट या संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत.

लोकसभा निवडणुकीने वृत्तवाहिन्यांना तारले :
  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) वाहिन्या निवडीचा नवा नियम, आयपीएलचे सामने, उन्हाळ्याची सुट्टी, ऑनलाइन मनोरंजनाचे वाढते पर्याय असे अडथळे असूनही लोकसभा निवडणुकीमुळे वृत्तवाहिन्यांना फायदा झाला आहे. वृत्तवाहिन्यांनी सरासरी प्रेक्षकसंख्या टिकवण्यात यश मिळवले असून २३ मे रोजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी वर्षभरातील आतापर्यंतच्या सर्वाधिक टीआरपीची नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर या दरम्यानच्या घडामोडी, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखांची झालेली घोषणा, तसेच ‘झी अनमोल’, ‘कलर्स रिश्ते’, ‘सोनी पल’, ‘स्टार उत्सव’ या निशुल्क वाहिन्या सशुल्क झाल्यामुळे सरकारी ‘फ्री डीश’वरून त्यांचे प्रक्षेपण बंद होणे या सगळ्याचा फायदा वृत्तवाहिन्यांना झाला आहे. त्याचबरोबर गृहोपयोगी उत्पादनांचे जाहिरातदारही मोठय़ा प्रमाणात वृत्तवाहिन्यांकडे वळले आहेत.

  • ‘ट्राय’च्या नव्या नियमानंतर बऱ्याच वृत्तवाहिन्या निशुल्क झाल्या. याचाही फायदा त्यांना मिळाला आहे. सध्या हिंदी वृत्तवाहिन्यांना सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असून त्याखालोखाल प्रेक्षकांनी प्रादेशिक वृत्तवाहिन्यांना पसंती दिली आहे. चर्चात्मक कार्यक्रम, परिसंवाद, महत्त्वपूर्ण नेत्यांची भाषणे, जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण यामुळे निवडणूक काळात प्रेक्षक वृत्तवाहिन्यांकडे आकर्षित झाले.

  • ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘डी डी इंडिया’, ‘आज तक’, ‘इंडिया टीव्ही’, ‘रिपब्लिक भारत’, ‘न्यूज १८ इंडिया’, ‘एबीपी माझा’, ‘टीव्ही ९ मराठी’ या वाहिन्यांना निवडणूक काळात बातम्यांसाठी प्रेक्षक पसंती मिळाली आहे. इतर भाषांच्या तुलनेत हिंदी भाषांतील वृत्तवाहिन्यांना सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभत असून गृहोपयोगी वस्तूंचे जाहिरातदार हिंदी वृत्तवाहिन्यांनंतर प्रादेशिक भाषांकडे वळत आहेत.

सातव्या टप्प्यात ६१ टक्के मतदान :
  • लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात ५९ जागांसाठी ६१ टक्क्यांवर मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातही हिंसाचाराच्या घटना घडल्या. तसेच पंजाबमध्ये अकाली-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. या घटना वगळता उर्वरित मतदान शांततेत झाले. मतदान पूर्ण झाल्यावर आता २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष आहे.

  • सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ९१८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. रविवारच्या मतदानानंतर आता देशभरातील ५४२ जागांवर आठ हजार उमेदवारांचे भवितव्य निश्चित झाले. रविवारी पंजाबमधील सर्व तेरा तसेच उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहार व मध्य प्रदेशातील प्रत्येकी ८, हिमाचल प्रदेशातील ४, झारखंडमधील तीन व छत्तीसगढच्या एका जागेचा समावेश आहे.

  • उत्तर प्रदेशात सायंकाळी ५५.५२ टक्के मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात ५३.५८ टक्के मतदान झाले, तर गोरखपूरमध्ये ५६.४७ टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशातील चंडोली मतदारसंघात भाजप व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. येथून भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे रिंगणात आहेत.

‘अ‍ॅटलांटिक निनो’चा भारतीय मोसमी पावसावर परिणाम :
  • अ‍ॅटलांटिक सागरातील पृष्ठीय तापमानातील असंगतता व भारतातील उन्हाळी मोसमी पाऊस यांचा संबंध आहे, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे भारतातील मोसमी पावसाचा अचूक अंदाज करण्यात मदत होणार आहे असे एका अभ्यासात म्हटले आहे.

  • अबुधाबी येथील भारतीय हवामान वैज्ञानिक अजय रवींद्रन यांनी म्हटले आहे की, भारतातील उन्हाळी मोसमी पाऊस व अ‍ॅटलांटिक निनो म्हणजेच एझेडएम यांचा दुरान्वयाने संबंध आहे.  सेंटर फॉर प्रोटोटाइप मॉडेलिंग ऑफ न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी अबुधाबी (एनवाययुएडी) या संस्थेच्या या अभ्यासानुसार पूर्व उष्णकटीबंधीय अ‍ॅटलांटिक महासागरात जागतिक तापमानवाढीमुळे पृष्ठीय तापमानात नेहमी चढउतार होत असतात व काही वेळा सागराचे पृष्ठीय तापमान जास्त असते त्यावेळी एझेडएम म्हणजे अ‍ॅटलांटिक निनोशी संबंधित हवामान परिणाम दिसतात.

  • त्यात पृथ्वीच्या विषुवृत्तीय वातावरणानजिक केल्विन तरंग तयार होतात. त्याचा परिणाम हिंदी महासागरात होत असतो. याचा अर्थ एझेडएम म्हणजे अ‍ॅटलांटिक निनोमुळे भारतीय मोसमी पावसावरही परिणाम होत असतो. एझेडएममधील थंड टप्पे हे मोसमी पावसाला अनुकूल असतात, तर जेव्हा तापमान वाढते तेव्हा मोसमी पाऊस कमी होऊ शकतो.

  • जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे भारतीय मोसमी पावसाबाबत अधिक अचूक अंदाज करता येऊ शकतात, असा दावा रवींद्रन यांनी केला आहे.

दिनविशेष :
  • जागतिक हवामान विज्ञान दिन

महत्वाच्या घटना 

  • १५४०: छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी थॅट्रम ऑरबिस टेरारम हा पहिला आधुनिक अॅटलास प्रकाशित केला.

  • १८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्स चे पेटंट घेतले.

  • १८९१: थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले

  • १९४८: चिआंग काई शेक चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.

  • १९९६: देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द’इयर हा पुरस्कार जाहीर.

  • २०००: राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी लोकसभेचे सभापती जी. एम. सी. बालयोगी यांची एकमताने निवड झाली.

  • २००१: चित्रपट निर्माते व लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८१८: अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनी चे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट१८८१)

  • १८५०: केसरी चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १८८२)

  • १८५१: ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक एमिल बर्लिनर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९२९)

  • १८६०: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१७)

  • १८८४: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर१९२२)

  • १९००: छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर १९७७)

  • १९१३: हेव्हलेट-पॅकार्ड चे सहसंस्थापक विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००१)

  • १९१५: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९८१)

  • १९४४: रेड बुल चे सहसंस्थापक डीट्रिख मत्थेकित्झ यांचा जन्म.

  • १९५२: कॅमेरुनचा फूटबॉलपटू रॉजर मिला यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५७१: राघवचैतन्यांचे विख्यात शिष्य व संत तुकारामांचे गुरु, केशवचैतन्य ऊर्फ बाबाचैतन्य यांनी जुन्‍नरजवळील ओतूर येथे समाधी घेतली.

  • १७६६: इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १६९३)

  • १८७८: समाजसुधारक व संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.

  • १९३२: लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)

  • १९९२: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगांवकर यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)

  • १९९४: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. ब्रम्हानंद रेड्डी यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०९)

  • १९९७: इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचे निधन.

  • २०१२: भारतीय मानववंशशास्त्रज्ञ लीला दुबे यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.