चालू घडामोडी - २० नोव्हेंबर २०१७

Date : 20 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी पुरस्कार, जगात भारताची मान केली ताठ :
  • नवी दिल्ली : शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणा-या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली आहे.

  • ‘इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार जाहीर केला जातो. सन २००४ ते सन २०१४ अशी सलग १० वर्षे पंतप्रधान राहून भारताची शान जगात उंचावल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाने डॉ. मनमोहन सिंग यांची निवड केल्याचे, ट्रस्टचे चिटणीस सुमन दुबे यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले.

  • `१० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आर्थिक-सामाजिक विकासात दिलेले भरीव योगदान, जगात भारताची प्रतिष्ठा उंचावणे, शेजारी व जगातील इतर महत्त्वाच्या देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि धर्म, जात, भाषा वा पंथ यांचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांच्या ख्यालीखुशाली व सुरक्षेसाठी सतत झटणे यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना गौरविण्यात येत असल्याचे ट्रस्टने म्हटले.

झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना पायउतार करून अध्यक्षपदी म्नानगावा यांची नियुक्ती :
  • हरारे : झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना सत्ताधारी झेएएनयू-पीएफ पक्षाने रविवारी पदावरून दूर करून त्यांच्या जागी उपाध्यक्ष एमर्सन म्नानगावा यांची नियुक्ती केली, असे पक्षाने सांगितले. मुगाबे यांना पदावरून दूर करण्याचा आणि उपाध्यक्षांना अध्यक्ष करण्याचा ठराव संमत करण्यात आला, असे पक्षाने अधिक तपशील न देता सांगितले.

  • तत्पूर्वी, हरारे यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी लाखो नागरिक राजधानी हरारेत जमले होते. दोन आठवड्यांपूर्वी उपाध्यक्षांची मुगाबे यांनी हकालपट्टी केली होती व त्यानंतरच लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली.

  • मुगाबे जर पदावरून स्वत:हून दूर झाले नाहीत, तर त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू होणार होती. लष्कराने बंड केल्याचे आरोप होऊ नयेत व मुगाबे यांनी पदावरून दूर व्हावे यासाठी लष्कराचे कमांडर कॉन्स्टंटिनो चिवेंगा यांनी मुगाबे यांच्याशी चर्चा केली.

श्रीलंकेविरोधात सलग पाच दिवस फलंदाजी करत चेतेश्वर पुजाराचा नवा रेकॉर्ड, ठरला तिसरा भारतीय फलंदाज :
  • कोलकाता - श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजाराने फलंदाजीसाठी मैदानात उतरताच एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. कसोटी सामन्यात पाचही दिवशी फलंदाजी करणारा चेतेश्वर पुजारा जगातील नववा तर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. चेतेश्वर पुजाराच्या आधी एम एल जयसिम्हा आणि रवी शास्त्री यांनी हा रेकॉर्ड केला आहे.

  • योगायोगाची गोष्ट म्हणजे जयसिम्हा यांनीही कोलकातामध्येच हा रेकॉर्ड केला होता. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना त्यांनी पाचही दिवशी फलंदाजी केली होती. दुसरीकडे रवी शास्त्री यांनी 1984 मध्ये इडन गार्डन्स मैदानावर इंग्लंडविरोधात खेळताना पाचही दिवस फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले होते. 

  • श्रीलंकेविरोधात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या चौथा दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला होता.

  • शिखर धवन 94 धावांवर आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानावर आला होता. चेतेश्वर पुजारा दोन धावा करत नाबाद राहिला होता. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा भारताकडून सर्वात जास्ता धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने 52 धावा केल्या होत्या. 

'ज्योतिषाची भविष्यवाणी आहे की, नरेंद्र मोदी 2019 पर्यंत पंतप्रधान राहणार नाहीत'
  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्ष आधीच लोकसभा निवडणुका घेतील असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पक्षाच्या एका बैठकीदरम्यान सांगितलं की, 'मोदी 2019 च्या आधीच 2018 मध्ये लोकसभा निवडणूक घेण्याची शक्यता आहे'.

  • पुढे बोलताना लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं की, 'एका ज्योतिषाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 पर्यंत आपला कार्यकाळ पुर्ण करु शकणार नाही अशी भविष्यवाणी केली आहे.

  • हे सरकार जास्त काळ चालणार नाही कारण ठरलेल्या वेळेआधीच त्यांना निवडणूक लढण्याची तयारी करावी लागणार आहे'. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी लोकसभा निवडणूक झाल्यास विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाचा पराभव करतील असा विश्वास व्यक्त केला. 

  • लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी सरकावर निशाणा साधतना म्हटलं की, आधी लोक वाघाला घाबरायचे, पण आता गाईला घाबरतात. याचं कारण देशातील जिकडे तिकडे पसरलेले गोरक्षक आहेत. 'आधी लोक वाघाला घाबरत होते, आता गाईला घाबरतात. हे मोदी सरकारचं देणं आहे', असा टोला लालूंनी लगावला. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय बाल दिन

महत्वाच्या घटना

  • १८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.

  • १९४५: न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.

  • १९५९: युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.

  • १९९४: भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

  • १९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

  • १९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.

  • १९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.

  • १९९९: आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.

  • २००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

जन्म

  • १६०२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.

  • १८५४: कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.

  • १८८९: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५३)

  • १८९२: इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म. (मृत्यू:  १९ जून १९६५)

  • १९०५: संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे१९९८)

  • १९२४: फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.

  • १९२७: न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म.

  • १९३९: साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००३ – नाशिक)

  • १९४१: उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.

  • १९६३: इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.

मृत्यु

  • १९१०: रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८२८)

  • १९५४: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर१८७९)

  • १९७३: पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)

  • १९८४: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी१९११)

  • १९९७: स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

  • १९९८: संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी यांचे निधन.

  • १९९९: तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.

  • २००३: सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

  • २००७: रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.