चालू घडामोडी - २० नोव्हेंबर २०१८

Date : 20 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डॉ. जगन्नाथ दीक्षित स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर :
  • मुंबई : स्पेशल डाएट प्लॅनमुळे चर्चेत आलेले लातूरचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना आणखी एक बहुमान प्राप्त झाला आहे. राज्य सरकारने स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून डॉ. दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात दीक्षितांनी सांगितलेली स्वास्थ्यशैली जनमानसात लोकप्रिय झाली असून अनेक जणांनी त्याचं अनुकरण सुरु केलं आहे.

  • डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना सोमवारी नियुक्तीचं पत्र दिलं. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्थूलता नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे. स्थूलतेचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेअंतर्गत डॉ. दीक्षित यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल, अशी आशा शासनाने व्यक्त केली आहे.

  • शारीरिक स्वास्थ्याचं आहाराशी असलेल्या नात्याबाबत संशोधन करुन डॉ. दीक्षित यांनी स्वत:ची पद्धत विकसित केली. डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून 'दीक्षित डाएट प्लॅन' नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.

  • शासनाच्या निर्णयामुळे अत्यंत आनंद झाल्याच्या भावना डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केल्या. गेल्या सहा वर्षांपासून काम सुरु होतं, मात्र शासनाच्या मान्यतेमुळे पुढील मार्ग सोपा झाल्याचं डॉ. दीक्षित म्हणाले. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्य आणि देशात जाऊन ही पद्धत पोहचवणं सुकर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या सहकाऱ्यांना आधार मिळाल्याची प्रतिक्रियाही यावेळी डॉ. दीक्षित यांनी दिली.

मोठ्या वादानंतर केंद्र आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात आज बैठक :
  • नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील सुरू असलेल्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. बैठकीत विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

  • रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा यासाठी काही वर्गाचा दबाव आहे. तरी उर्जित पटेल केंद्रीय बॅंकांचे धोरणं मांडण्याची शक्यता आहे. बैठकीत ते एनपीए संबंधित धोरणांचे समर्थन करु शकतात.

  • एनपीएच्या तरतुदींबाबत गव्हर्नर पटेलांसह चार डेप्युटी गव्हर्नर संयुक्तरित्या बाजू मांडतील, तसेच स्वतंत्र संचालक या मुद्द्यालाही समर्थन देऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. अर्थ मंत्रालय नेमलेले सदस्यांसह काही स्वतंत्र संचालक उर्जित पटेल यांच्यावर निशाना साधू शकतात.

  • सरकार आणि रिझर्व्ह बॅंक, बॅंकात तातडीने सुधारीत उपायांच्या रुपरेषा आणि एमएसएमई क्षेत्राला कर्ज देण्याच्या तरतुदीला शिथिल करण्यासंबधी एकमताने समाधानकारक निर्णयावर पोहचू शकतात.

  • या बैठकीत केंद्र आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यात तोडगा निघाला नाही, तरी येणाऱ्या काही दिवसात सुधारात्मक निर्णंयावर एकमत होऊ शकतं असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे. त्यासोबतच काही बॅंका चालू आर्थिक वर्षअखेरपर्यंत या रुपरेषेच्या आराखड्यातून बाहेर पडू शकतात. सध्या 21 सार्वजनिक बॅंकांमधील 11 बॅंका पीसीएच्या अंतर्गत आहे. ज्यात नवीन कर्ज देण्यासाठी कडक नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत.

  • या बॅंकांमध्ये अलाहाबाद बॅंक, यूनायटेड बॅंक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बॅंक, आयडीबीआय बॅंक, यूको बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओवरसीज बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स, देना बॅंक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे.

गाडी चालवताना मोबाईलवर बोललात तर परवाना रद्द :
  • मुंबई : गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना किंवा मोबाईल हाताळताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द केला जाणार आहे. वाहतूक विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यासोबतच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

  • बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काही लोकांना हा नवा नियम पटलेला नाही. यापूर्वी गाडी चालवताना कोणी मोबाईलवर बोलताना आढळल्यास त्याच्याकडून दंड घेतला जात होता. परंतु या दंडात्मक कारवाईमुळे मोबाईलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले नाही. या नव्या नियमामुळे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून केवळ दंडावर सुटणे कोणालाही शक्य होणार नाही.

  • राज्यात गेल्या वर्षभरात 16 हजार रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 12 हजार 200 जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना आळा बसून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरटीओने सांगितले.

छत्तीसगडमध्ये आज मतदानाचा दुसरा टप्पा :
  • रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मंगळवारी १९ जिल्ह्य़ांमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदान होणार आहे. मतदानासाठी लागणारी सर्व व्यवस्था करण्यात आली असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी एक लाखाहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

  • छत्तीसगड मंत्रिमंडळातील नऊ मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि सत्तारूढ भाजप आणि काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील १८ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

  • छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांपैकी ६५ हून अधिक जागा पटकावून सलग चौथ्या वेळी सरकार स्थापन करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. तर काँग्रेस १५ वर्षांच्या विजनवासातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे.

  • मायावती यांच्या नेतृत्वाखाली बसपा, माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) आणि भाकप यांच्या आघाडीमुळे निवडणूक रणधुमाळीत रंगत निर्माण झाली आहे. मंगळवारी ७२ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी १०७९ उमेदवार रिंगणात आहेत.

व्यवसाय सुलभतेत पहिल्या ५० देशांमध्ये पोहोचण्याचा मोदींचा निर्धार :
  • जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत भारताच्या क्रमवारीत झालेल्या मोठया सुधारणेचे श्रेय घेतानाच आपल्या सरकारने चार वर्षांच्या कालावधीत देशात १८० डिग्रीचा बदल घडवून आणल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. २०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा व्यवसाय सुलभ १९० देशांच्या यादीत भारत १४२ व्या स्थानावर होता. मागच्या महिन्यात ३१ ऑक्टोंबरला जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत भारताच्या क्रमवारीत तब्बल २३ स्थानांची सुधारणा होऊन भारत ७७ व्या स्थानी पोहोचला आहे.

  • दिल्लीमध्ये व्यवसाय सुलभतेसंबंधी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी अप्रत्यक्षपणे आधीच्या काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर टीका केली. जगातील टॉप १०० देशांमध्ये भारतही स्थान मिळवू शकतो यावर विश्वास ठेवणे काँग्रेसला कठिण जातेय असे मोदी म्हणाले.

  • २०१४ पूर्वी धोरण लकवा आणि धोरणांमध्ये अस्थितरता होती. त्यांना भारत आज पहिल्या १०० देशांमध्ये पोहोचू शकतो यावर विश्वास ठेवणे कठिण जातेय. चारवर्षात देशात १८० डिग्रीचा बदल झालाय. १४२ वरुन ७७ व्या स्थानापर्यंत पोहोचणे हा एक विक्रम आहे असे मोदी म्हणाले.

  • व्यवसाय सुलभ देशांच्या यादीत पहिल्या ५० मध्ये पोहोचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पहिल्या ५० मध्ये पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून एकत्र काम केले पाहिजे. पुढच्या काही दिवसात मी विविध खात्यांबरोबर आढावा बैठका घेणार आहे. त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्यावर्षी दिसेल असे मोदी म्हणाले.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा - वादग्रस्त लढतीत सोनिया विजयी :
  • नवी दिल्ली : भारताच्या सोनिया चहलने ५७ किलो गटाच्या वादग्रस्त लढतीत माजी विश्वविजेत्या स्टॅनिमिरा पेत्रोव्हाला नमवून जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याचप्रमाणे अनुभवी पिंकी जांग्रा आणि सिमरनजीत कौर यांनीसुद्धा उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. मात्र ७५ किलो गटात स्वीटी बुराचे आव्हान संपुष्टात आले आहे.

  • खाशाबा जाधव हॉलमध्ये सुरू असलेल्या या जागतिक स्पर्धेत भारताच्या आठ बॉक्सिंगपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. ८१ किलोहून अधिक गटात सीमाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यामुळे थेट उपांत्यपूर्व फेरी गाठता आली आहे.

  • हरयाणामधील शेतकरीकन्या सोनिया दुसऱ्या फेरीनंतर पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर अंतिम फेरीत तिने जोरदार मुसंडी मारत लढत ३-२ अशा फरकाने जिंकली. पाचही सामनाधिकाऱ्यांनी तिसऱ्या फेरीत भारताच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे २०१४ मध्ये ५४ किलो गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या पेत्रोव्हाने नाराजी प्रकट केली.

  • २०१६ मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणाऱ्या सोनियाने मागील वर्षी सर्बिया चषक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय चालू वर्षांत अहमेट कॉमर्ट बॉक्सिंग स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले होते. सोनियाची उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या अरियास कॅस्टेनाडा येनी मार्सेलाशी गाठ पडणार आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय बाल दिन

महत्वाच्या घटना 

  • १७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

  • १८७७: थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.

  • १९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले.

  • १९९४: भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

  • १९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

  • १९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.

  • १९९९: अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.

  • १९९९: आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.

  • २००८: अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

जन्म 

  • १६०२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.

  • १८५४: कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.

  • १८८९: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५३)

  • १८९२: इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म. (मृत्यू:  १९ जून १९६५)

  • १९०५: संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९९८)

  • १९१०: डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टाॅकम यांचा जन्म.

  • १९२४: फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.

  • १९२७: न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म.

  • १९३९: साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००३ – नाशिक)

  • १९४१: उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.

  • १९६३: इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८५९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १७७९)

  • १९०८: बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी.

  • १९१०: रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८२८)

  • १९५४: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८७९)

  • १९७०: ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १८८४)

  • १९७३: पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)

  • १९८४: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)

  • १९८९: किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०५ – बडोदा)

  • १९९७: स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

  • १९९८: संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी यांचे निधन.

  • १९९९: तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.

  • २००३: सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.