चालू घडामोडी - २० ऑक्टोबर २०१८

Date : 20 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरदार पटेलांचा पुतळा ३१ ऑक्टोबरला उद्घाटनासाठी सज्ज :
  • जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं काम पूर्ण झालं आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

  • सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी 3500 कामगार आणि 250 इंजिनिअर दिवस-रात्र मेहनत घेत होते

  • सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रस्तावित १८२ मीटर उंचीचा पुतळा लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणापेक्षा दीडपट तर न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०१३ मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. पुढील चार वर्षांत लॉर्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीला काम करण्यास देण्यात आले. या पुतळ्यासाठी जवळपास तीन हजार कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.

  • पर्यटकांना सरदार सरोवर धरण आणि आजुबाजूचा परिसर पाहण्यासाठी 500 फूट उंचीवर गॅलरी उभारण्यात येणार आहे.

HIV एड्सवर प्रतिबंधात्मक उपाय सापडण्याची चिन्हं :
  • मुंबई : ऑस्ट्रेलियातील हजारो पुरुषांनी निळ्या रंगाच्या अँटीव्हायरल गोळीचं दररोज सेवन केल्यामुळे एचआयव्हीच्या नवीन केसेसमध्ये अभूतपूर्व घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एड्ससारख्या दुर्धर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय सापडण्याची चिन्हं आहेत.

  • एचआयव्हीचं नव्याने निदान झालेल्या गे आणि बायसेक्शुअल पुरुषांच्या संख्येत जवळपास एक तृतीयांशाने घट दिसून आली. एड्सला कारणीभूत ठरणारे विषाणू कमी करण्यासाठी ट्रुवाडा गोळीचा कसा परिणाम होतो, याविषयी अभ्यास करणाऱ्या जगातील पहिल्या संशोधनात ही विक्रमी घट पाहायला मिळाली.

  • निळ्या रंगाची लांबट आकाराची ट्रुवाडा गोळी संशोधनात सहभागी झालेल्या गे आणि बायसेक्शुअल पुरुषांना दररोज दिली जात होती.

  • प्री-एक्स्पोजर प्रोफायलॅक्सिस ही उपचारपद्धती वापरुन एड्सला कारक असणारे विषाणू रोखता येऊ शकतात. 'लँसेट एचआयव्ही' या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. या संशोधनामुळे इतर देशांनाही एचआयव्हीबाबत अधिक अभ्यासासाठी मदत होऊ शकते.

  • 2030 पर्यंत एड्सचा समूळ नायनाट करण्याचं संयुक्त महासंघांचं उद्दिष्ट आहे. जगभरात 1990 पासून दरवर्षी 30 लाखापेक्षा जास्त व्यक्तींना एचआयव्हीची बाधा होत असल्याची नोंद आहे. मात्र 2017 मध्ये ही आकडेवारी 18 लाखांवर आल्याचं संशोधनात म्हटलं आहे. अर्थात हेटरोसेक्शुअल व्यक्तींबाबत हे अनुमान सरसकट लावता येणार नाहीत, असाही उल्लेख आहे.

चीनचा भन्नाट शोध, रस्त्यावरील लाईटसाठी चक्क मानवनिर्मित चंद्राची निर्मिती :
  • बीजिंग: भारताचा शेजारील देश चीन कोणता शोध लावेल हे सांगता येत नाही. सुईपासून विमानापर्यंत, चायनीज फटाक्यांपासून ते घड्याळ-मोबाईलपर्यंत सगळीकडे चीनचा बोलबाला आहे. आता चीनने त्यापुढे मजल मारली आहे. स्ट्रीट लाईट अर्थात रस्त्यावरील वीजेचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी चीनने भन्नाट आयडिया शोधली आहे. आपण विचारही करु शकणार नाही, अशी तयारी चीनने केली आहे.

  • स्ट्रीट लाईट हद्दपार करण्यासाठी चीनने चक्क तीन कृत्रिम चंद्र बनवण्याची तयारी केली आहे. 2020 पर्यंत चीन तीन आर्टिफिशियल मून अर्थात मानवनिर्मित चंद्र लाँच करणार आहे. चीनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतची माहिती देणाऱ्या एका दैनिकाने हे वृत्त दिलं आहे.

  • मानवनिर्मित चंद्र कसे काम करतील - मानवनिर्मित चंद्र हा एकप्रकारचा सॅटेलाईट आहे, त्यामध्ये भले मोठे आरसे असतील, जे सूर्यकिरणं पृथ्वीवर परावर्तित करतील. हे चंद्र 2020 पर्यंत चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगडू इथे जमिनीपासून 80 किमी उंचीवर स्थिरावले जातील. जमिनीपासूनचं अंतर कमी असल्याने मानवनिर्मित चंद्र हे खऱ्याखुऱ्या चंद्रापेक्षा 8 पट जास्त प्रकाशित असतील.

  • त्यामुळे रस्त्याच्या कडेला जे वीजेचे खांब उभारावे लागतात, ती समस्याच दूर होईल. रस्त्यावर प्रकाश देण्याचं काम हे मानवनिर्मित चंद्र करतील. मानवनिर्मित चंद्रामुळे 80 किमी परिसरात प्रकाश पडेल. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रोजेक्टचं काम सुरु असून, ते आता अंतिम टप्प्यात आहे.

जमाल खाशोगीचा मृत्यू, अमेरिका सौदी अरेबियावर कारवाई करणार :
  • अमेरिका स्थित पत्रकार जमाल खाशोगी यांचा मृत्यू झाल्याचे सौदी अरेबियाने मान्य केले आहे. इस्तानबुलमधील सौदीच्या दूतावासात खाशोगी यांचा मृत्यू झाला. दूतावासात खाशोगी ज्यांना भेटले त्यांच्या बरोबर झालेल्या वादावादीतून हा मृत्यू झाला असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून सौदीच्या १८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. रॉयल कोर्टाचे सल्लागार सौद अल आणि गुप्तचर विभागाचे उपप्रमुख अहमद असीरी यांना पदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

  • खाशोगी यांच्या मृत्यूमुळे पुढच्या काही दिवसात अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये तणाव आणखी वाढणार आहे. खाशोगी हे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जायचे. खाशोगी लवकरच विवाहबंधनात अडकणार होते.

  • त्या संदर्भात कागदपत्र आणण्यासाठी ते २ ऑक्टोंबरला सौदीच्या दूतावासात गेले होते. त्यानंतर ते कोणालाच दिसले नाहीत. त्यांची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त होता. अखेर सौदी अरेबियाने आता कबुली दिली आहे.

  • सौदी अरेबियाने खाशोगी यांचा खून केला असेल तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. खाशोगीचा खून सौदी अरेबियाने केल्याचे दिसून आले तर काय करणार, असा सवाल केला असता ट्रम्प म्हणाले की, अतिशय गंभीर परिणाम होतील. हे वाईट आहे, पण अजून अंतिम चित्र स्पष्ट होण्याची वाट बघू या. अमेरिकेचे नागरिक असलेले खाशोगी हे दी वॉशिंग्टन पोस्टसाठी काम करीत होते. खाशोगी यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

बुध्दिमत्ता आहे, पण पैसा, यंत्रणा नाही - विद्यार्थ्यांना मिळतेय वरवरचे ज्ञान, संशोधनाला मर्यादा :
  • पुणे : जगभरात कृत्रिम बुध्दिमत्ते (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) वर संशोधनाला मोठी गती प्राप्त झाली आहे. भारतातही त्यावर संशोधन होत असले तरी पुरेशी गुंतवणुक, प्रयोगशाळा, संबंधित यंत्रणेच्या अभावामुळे ते कासव गतीने सुरू आहे.

  • अभियांत्रिकी, संगणकशास्त्र अभ्यासक्रमात कृत्रिम बुध्दिमता एका विषयापुरतीच मर्यादीत राहिली आहे. केवळ वरवरचे ज्ञान मिळण्यापलीकडे संशोधनाला फारसा वाव नाही. कृत्रिम बुध्दिमत्तेसाठी पुरक ‘इको सिस्टीम’च नसल्याने शिक्षणासह संशोधन क्षेत्रात त्यासाठी भरीव गुंतवणुक करण्यास कोणीच पुढे येत नाही.

  • अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या खासगी विद्यापीठाने कृत्रिम बुध्दिमतेवर संशोधनासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये विद्यापीठाकडून तब्बल १ अब्ज डॉलर्स एवढी मोठी गुंतवणुक केली जाणार आहे. तसेच जगभरातील विकसित देश संगणकामध्ये मानवी क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

  • भारतातही मागील काही वर्षांपासून याबाबत संशोधन सुरू आहे. पण संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने त्याला मर्यादा आल्या आहेत. याला ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले, भारतात ८० च्या दशकाच्या शेवटीपासून संगणक क्षेत्रातील संशोधनाला सुरूवात झाली. तर ९० च्या दशकात कृत्रिम बुध्दिमतेवर काम सुरू झाले. सी-डॅक संस्था त्यामध्ये मोठे योगदान देत आहे.

  • पण मानवी बुध्दीला पार करणे कठीण असल्याचे त्यावेळी लक्षात आल्यानंतर संशोधनाची गती मंदावली. गेल्या काही वर्षात संशोधनाला पुन्हा गती मिळाली आहे. अनेक परदेशी कंपन्यांचे संशोधन भारतात सुरू आहे. त्यामध्ये आपलेच अभियंते, तज्ज्ञ अधिक आहेत. आयआयटी, विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. पण निधीअभावी त्याला काही मर्यादा आहे. तज्ज्ञ असले तरी संशोधनासाठी प्रयोगशाळा, वातावरण नाही. तुलनेने खासगी क्षेत्रात बºयापैकी संशोधन होत आहे.

दिनविशेष :
  • जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन / जागतिक सांख्यिकी दिन

महत्वाच्या घटना 

  • १९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

  • १९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.

  • १९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

  • १९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.

  • १९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.

  • १९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

  • २००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.

  • २०११: लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.

जन्म 

  • १८५५: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)

  • १८९१: अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९७४)

  • १८९३: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)

  • १९१६: लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)

  • १९२०: भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर २०१०)

  • १९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)

मृत्यू 

  • १८९०: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १९ मार्च१८२१)

  • १९६१: मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा यांचे निधन.

  • १९६४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८७४)

  • १९७४: प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८९८)

  • १९८४: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)

  • २०११: लिबीयाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचे निधन. (जन्म: ७ जून १९४२)

  • २०१२: पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.