चालू घडामोडी - २० सप्टेंबर २०१८

Date : 20 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेला मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था :
  • नवी दिल्ली : जागतिक आर्थिक आणि रणनीतिक सत्ताकेंद्र हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. जगातील चार मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी तीन अर्थव्यवस्था आशिया-प्रशांत क्षेत्रातील आहेत. २०२५ पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी दोनतृतीयांश लोकसंख्या याच क्षेत्रात राहील. या क्षेत्रात भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून, २०५० पर्यंत ती अमेरिकेलाही मागे टाकील, असे एका अहवालात म्हटले आहे.

  • लोयी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, अमेरिकेची शक्ती क्षीण होत असली तरी, आशिया-प्रशांत विभागात अजूनही अमेरिकेचा प्रचंड प्रभाव आहे. या विभागात एकूण २५ प्रभावशाली देश आहेत ज्यात भारत चौथ्या तर पाकिस्तान १४ व्या स्थानी आहे.

  • सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत व चीन यांच्यात असलेली मोठी दरी भरून काढणे भारताला नजीकच्या काळात तरी शक्य होणार नाही. पण आगामी ११ वर्षांत भारत अमेरिकेच्या जवळ पोहोचलेला असेल. २०५० सालापर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल.

  • मात्र भारताच्या मार्गात काही अडथळे आहेत. उत्पादन क्षमता, संशोधन व विकास या मापदंडांत भारत खूपच मागे पडत आहे. साधने आणि मनुष्यबळ यांचा पूर्ण वापर करणे भारताला शक्य होताना दिसत नाही, असे अहवालात म्हटले आहे.

भारत-पाक चर्चेसाठी इम्रान खान यांनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र :
  • नवी दिल्ली -  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याचं समजत आहे.

  • भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न आणि इतर काही प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजेत अशी विनंती इम्रान खान यांनी मोदींना पत्रात केल्याची माहिती मिळत आहे. 

  • भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांकडे आग्रह धरल्याची माहिती मिळत आहे.  

  • पुढच्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण बैठक होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एकमेकांना भेटणार नाहीत अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. मात्र इम्रान खान यांच्या पत्रामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती प्रस्ताव सुरू करण्याच्या दृष्टीने आता पाऊल टाकल्याचं म्हटलं जातं आहे. 

भारताचा पाकिस्तानवर आठ विकेट्स राखून एकतर्फी विजय :
  • दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीत सलग दुसरा विजय साजरा केला. भारताने या विजयासह अ गटात अव्वल स्थान राखलं.

  • दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवरच्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 163 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने अवघ्या 29 षटकांत ते लक्ष्य गाठून पाकिस्तानची खाशी जिरवली.

  • रोहित शर्मा आणि शिखर धवनने 86 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाचा पाया रचला. मग अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोहित शर्माने 39 चेंडूंमध्ये 52, तर शिखर धवनने 54 चेंडूत 46 धावांची खेळी केली.

  • भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला. जसप्रीत बुमराने दोन आणि कुलदीप यादवने एक विकेट काढली.

  • भुवनेश्वरने गोलंदाजीची आक्रमक सुरुवात करत पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. जबरदस्त फॉर्मात असलेल्या फखर जमानला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर इतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणलं.

तिहेरी तलाक दिल्यास तुरुंगवास, मंत्रिमंडळाकडून अध्यादेशाला मंजुरी :
  • नवी दिल्ली : मुस्लीम महिलांना तीन तलाकच्या कचाट्यातून मुक्ती मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन तलाकच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. याआधी तीन तलाक संदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं, मात्र राज्यसभेत प्रलंबित होतं.

  • आता केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन तलाकविरोधातील अध्यादेशाला मंजुरी दिल्याने, केवळ राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे. राष्ट्रापतींची स्वाक्षरी झाल्यावर तीन तलाकविरोधातील या अध्यादेशाचं रुपांतर कायद्यात होईल. संसदेत विधेयक मंजूर होईपर्यंत सहा महिने अध्यादेशाची अंमलबजावणी केली जाईल.

  • संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसात तलाकसंदर्भातील जे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले, त्याच विधेयकाचं रुपांतार अध्यादेशात करण्यात आले आहे. याआधी सरकारने लोकसभेत विधेयक मांडून मंजूरही केले होते. मात्र राज्यसभेतील गोंधळामुळे विधेयक प्रलंबित आहे.

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा, उत्तराखंड विधानसभेत प्रस्तावाला मंजुरी :
  • गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव बुधवारी उत्तराखंड विधानसभेने मंजूर केला. सर्वसहमतीने हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती आहे. विधानसभेच्या मंजुरीनंतर आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. असा प्रस्ताव आणणारे उत्तराखंड देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

  • उत्तराखंडच्या पशुपालन मंत्री रेखा आर्य यांनी हा प्रस्ताव मांडला होता. प्रस्ताव सभागृहासमोर ठेवताना, भारत सरकारने गायीला राष्ट्रमाता घोषीत करावं असं रेखा आर्य म्हणाल्या. त्यानंतर या प्रस्तावावर चर्चा झाली आणि चर्चेनंतर विधानसभाध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांनी हा प्रस्ताव पास केल्याची घोषणा केली.

  • यावेळी विरोधीपक्ष नेत्या इंदिरा हृदयेश म्हणाल्या, गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यास आमचा आक्षेप नाही, पण हा दर्जा मिळाल्यानंतर तरी किमान गायीचा अपमान होणार नाही, भूकेने तडफडत फिरणारी गाय कुठे दिसणार नाही याची काळजी घेतली जावी असं त्या म्हणाल्या.

हिंदी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष साहित्यिक विष्णू खरे यांचे निधन :
  • हिंदीचे प्रतिष्ठित लेखक, कवी आणि निवेदक यांचे बुधवारी दीर्घकालिन आजाराने निधन झाले. दिल्लीतील जी.बी. पंत हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. ब्रेन हॅमरेजचा त्रास असल्याने त्यांना मागील काही दिवसांपासून दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • हिंदी अकादमीचे उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होते. मागील आठवड्यात ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांचा डावा भाग पॅरालाईज झाला होता. ते आपल्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये राहत होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची मुलगी प्रीती खरे बॉलीवूड कलाकार असून देवदासमध्ये तिने शाहरुख खानच्या वहीनीची भूमिका केली आहे.

  • खरे यांचा जन्म ९ फेब्रुवारी रोजी झाली. हिंदीचे शिक्षण घेतलेल्या खरे यांनी याच भाषेत करीयर करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. तसेच समीक्षक, कवी आणि निवेदक म्हणूनही त्यांनी अतिशय कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली.

  • त्यांनी लिहीलेला ‘आलोचना की पहली किताब’ या ग्रंथावर बरीच चर्चा झाली. त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे त्यांना साहित्यिक योगदान पुरस्कार, रघुवीर सहाय्य स्मृती पुरस्कार, भवानी प्रसाद मिश्र स्मृती पुरस्कार आणि मध्य प्रदेश शिखर सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.

  • १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

  • १९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.

  • १९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.

  • १९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.

  • १९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • २००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म

  • १८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०)

  • १८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)

  • १९०९: गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.

  • १९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)

  • १९१३: कवी वा. रा. कांत यांचा जन्म.

  • १९२२: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.

  • १९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)

  • १९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

  • १९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.

मृत्यू

  • १८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.

  • १९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)

  • १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.

  • १९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)

  • १९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.

  • १९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.

  • २०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.