चालू घडामोडी - २१ डिसेंबर २०१८

Date : 21 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘यूपीएससी’ची वयोमर्यादा २७ करण्याची शिफारस :
  • नागरी सेवा परीक्षेची वयोमर्यादा सर्वसाधारण वर्गवारीसाठी २०२२-२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने ३० वरून २७ करावी, अशी शिफारस निती आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे.

  • लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये बदल करण्याची आणि अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची फेरमांडणी करण्याची गरजही निती आयोगाने व्यक्त केली आहे. ‘स्ट्रॅटजी फॉर न्यू इंडिया @ ७५’ दस्तऐवज बुधवारी जारी करण्यात आला.

  • नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि निवड परीक्षेमध्ये काही बदल करण्याची गरज निती आयोगाने व्यक्त केली आहे. नवीन अधिकाऱ्यांची विविध विभागांमध्ये त्यांच्या वयानुसार नियुक्ती करावी, असे निती आयोगाचे मत आहे. अधिकारी तरुण, तडफदार असावे, २०२०नंतर भारतामध्ये ६५ टक्के जनतेचे वय ३५ हून कमी असेल.

  • यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे सरासरी वय २५ वर्षे सहा महिने आहे. सध्या यूपीएससीसाठी वयोमर्यादा ३० वर्षे आहे. ही बाब लक्षात घेऊन वयोमर्यादा आणि जागा कमी कराव्या, त्याचप्रमाणे ठरावीक विषयामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना तेथे जागा द्यावी, असेही निती आयोगाचे म्हणणे आहे. त्याप्रमाणेच परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याची शिफारस केली आहे. परीक्षेची वयोमर्यादा २७ करावी, अनुभवी व्यावसायिकांना करार तत्त्वावर अधिकारी म्हणून घ्यावे आदी शिफारशी आयोगाने केल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण पुरस्कारांची घोषणा :
  • मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्यातील ३२ साहित्यिकांना विविध साहित्य प्रकारात हे पुरस्कार घोषित झाले असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

  • यात प्रौढ वाङ्मय पुरस्कार काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार शशिकांत हिंगोणेकर यांना ‘ऋतूपर्व’ पुस्तकासाठी १ लाख रुपये, प्रथम प्रकाशन काव्य प्रकारात अमृत तेलंग यांच्या ‘पुन्हा फुटतो भादवा’ या पुस्तकासाठी ५० हजार रुपये, प्रौढ वाङ्मय नाटक/एकांकिका या प्रकारात आशुतोष पोतदार यांच्या ‘ऋ1/105 आणि सिंधू, ‘सुधाकर, रम आणि इतर’ पुस्तकास १ लाख रुपयांचा राम गणेश गडकरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • प्रौढ वाङ्मय कादंबरी प्रकारात कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीस १ लाख रुपयांचा हरी नारायण आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रथम प्रकाशन-कादंबरी प्रकारात रचना यांच्या ‘एका वाडीची गोष्ट’ या पुस्तकास ५० हजार रुपयांचा श्री.ना. पेंडसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • मधुकर धर्मापुरीकर यांना प्रौढ वाङ्मय-लघुकथा प्रकारात ‘झाली लिहून कथा?’ या पुस्तकास १ लाख रुपयांचा दिवाकर कृष्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याप्रमाणेच, प्रथम प्रकाशन-लघुकथा प्रकारात अविनाश राजाराम यांच्या ‘सेकंड इनिंग’ या पुस्तकास ५० हजार रुपयांचा ग.ल. ठोकळ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रौढ वाङ्मय - ललितगद्य प्रकारात इरावती कर्णिक यांच्या ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत’ पुस्तकास १ लाख रुपयांचा अनंत काणेकर पुरस्कार घोषित झाला आहे. तर प्रथम प्रकाशन - ललितगद्य प्रकारात सुधीर महाबळ यांच्या ‘परतवारी’ पुस्तकास ५० हजार रुपयांचा ताराबाई शिंदे पुरस्कार जाहीर झाला आहे.

तीन पुरस्कारांसाठी शिफारसच नाही : प्रथम प्रकाशन - नाटक/ एकांकिका प्रकारासाठी विजय तेंडुलकर पुरस्कार
(५० हजार रुपये), प्रौढ वाङ्मय - विनोद प्रकारासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार (१ लाख रुपये) आणि प्रथम प्रकाशन - समीक्षा सौंदर्यशास्त्र प्रकारासाठी रा. भा. पाटणकर पुरस्कार (५० हजार रुपये) या तिन्ही पुरस्कारांसाठी शिफारस आली नसल्याने हे पुरस्कार जाहीर केलेले नाहीत.

भारताची चीनला ५०० टन तांदुळाची निर्यात :
  • भारतीय निर्यातदारांनी चीनला तांदळाची (बासमती सोडून) निर्यात कऱण्याचे ठरवले असून त्याअंतर्गत ५०० टन तांदूळ पाठवणार असल्याचे निश्चित झाले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, हा तांदूळ पुढील आठवड्यात आशियायी देशांमध्ये पोहोचेल. सरकार आणि बाजार विषयातील अधिकारी यांच्यात बिजिंगमध्ये नोव्हेंबरमध्ये याबाबतची बैठक यश्स्वीपणे पार पडली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

  • भारतात पिकणाऱ्या तांदळाला जागतिक पातळीवर मागणी वाढावी यासाठी भारतीय तज्ज्ञांनी चीनमध्ये जाऊन मागणीचा अंदाज घेतला होता, त्यानंतर ५०० टन तांदूळ निर्यात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता हा आकडा ५०० टन असला तरीही या आर्थिक वर्षाच्या अखेरीस १० हजार टन तांदूळ निर्यात केला जाईल अशी माहिती टिकर मार्केटद्वारे देण्यात आली आहे.

  • यातील पहिल्या १०० टन तांदळाची वाहतूक सप्टेंबर महिन्यात केली जाईल असे समजले आहे. या तांदूळ निर्यातीमध्ये भारताचा निश्चितच फायदा होणार आहे. परंतु आपल्या देशात येणाऱ्या मालाचा दर्जा चांगला आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी चीनच्या शिष्टमंडळाने भारतात येऊन भाताच्या पिकांची आणि इतर गोष्टींची पाहणी केली होती. या तांदळाची निर्यात करण्यासाठी चीन भारतात आणखी ५ गिरण्या उभारणार आहे.

  • त्यामुळे चीनच्या भारतातील गिरण्यांची संख्या २४ वर पोहोचणार आहे. तांदळाच्या निर्मितीत चीन हा जगातील सर्वात उच्च पातळीवरचा उत्पादनकर्ता आणि आयात करणारा देश आहे. अशाप्रकारे चीनला तांदूळ निर्यात करणाऱ्यांना सरकारकडून ५ टक्के भत्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद :
  • सोलापूरच्या अजय कश्यपला ‘भरत’ तर, उस्मानाबादच्या अमृता जगतापला ‘ईला’ पुरस्कार

  • राष्ट्रीय किशोर खो-खो स्पर्धा - उत्तराखंड येथे झालेल्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजेतेपदाला गवसणी घातली. किशोर गटात सोलापूरच्या अजय कश्यपने ‘भरत’, तर किशोरी गटात उस्मानाबादच्या अमृता जगतापने ‘ईला’ पुरस्कारावर नाव कोरले.

  • किशोर गटातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावातील दोन गुणांची पिछाडी भरून काढत अतिरिक्त डावात तेलंगणवर (५-७, ६-४, ६-५) १७-१६ अशी १ गुणाने मात केली. महाराष्ट्रासाठी अजय कश्यपशिवाय विवेक ब्राह्मणे (१.२० मि., १.२० मि., १.४० मि. व १ गडी), सचिन पवार (१.१० मि. नाबाद व ४ गडी), रवि वसावे (१.१० मि., १.३० मि., १.३० मि. व ३ गडी) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.

  • किशोरी विभागातील अंतिम लढतीत बलाढय़ महाराष्ट्राने ओदिशाचा (७-२, ०-४) ७-६ असा १ डाव व १ गुणाने दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राच्या अमृता जगताप (३ मि. नाबाद), प्रीती काळे (२.५० मि. व १ गडी), मनीषा पडेर (२.३० मि.), ललिता गोबाले (३ गडी) व अर्चना व्हनमाने (१.३० मि., १ मि. व ३ गडी) यांनी प्रशंसनीय कामगिरी केली.

पतंजली उद्योग समूह लवकरच चीनमध्ये रोवणार झेंडा - रामदेवबाबा :
  • मुंबई : योगगुरू रामदेवबाबा यांचा पतंजली आयुर्वेद उद्योग समूह लवकरच ग्लोबल होणार आहे. रामदेवबाबा यांनी सांगितले की, येत्या मार्चमध्ये पतंजली जागतिक बाजारात उतरणार आहे. चीनमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी चीन सरकारने कंपनीला १० हजार एकर जमीन आणि भांडवली साह्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

  • रामदेवबाबा यांनी सांगितले की, नैसर्गिक उत्पादनांत आपला ठसा उमटविण्यात बहुराष्ट्रीय एफएमसीजी कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. याउलट पतंजलीने या क्षेत्रात प्रचंड काम केले आहे. दरम्यान, आयकर विभागासोबतच्या वादात दिल्ली हायकोर्टाने पतंजलीची याचिका फेटाळून कंपनीला झटका दिला आहे.

  • २०१०-११ या आढावा वर्षाचे ‘स्पेशल आॅडिट’ करण्यासाठी आयकर विभागास सहकार्य करा, असे निर्देशही कोर्टाने दिले. पतंजली समूहाने स्पेशल आॅडिटला कोर्टात आव्हान दिले होते.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - सागर, आशिष, वेताळ, जोतिबा सुवर्णपदकाचे मानकरी :
  • जालना : महाराष्ट्राच्या मातीतली प्रसिद्ध महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला जालन्याच्या आझाद मैदानावर कालपासून सुरुवात झाली आहे. कालच्या दिवशी राज्य कुस्ती विजेतेपदासाठीच्या 57 आणि 79 किलो वजनी गटाच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या. महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार आता चांगलाच रंगात आला असून राज्य विजेतेपदाच्या कुस्तीत पुण्याच्या सागर मारकडला माती विभागाचं तर मॅट विभागात आशिष वावरेला सुवर्णपदक मिळालं आहे.

  • सागर मारकडला 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक - महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सध्या जालन्याच्या आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेत राज्य कुस्ती विजेतेपदाच्या लढतीत पुण्याच्या सागर मारकडने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सागरनं माती विभागात कोल्हापूरच्या संतोष हिरगुडेला पराभवाची धूळ चारली. सागरनं अंतिम लढतीत कोल्हापूरच्या संतोष हिरगुडेचा 10-0 असा धुव्वा उडवला.

  • सोलापूरच्या वेताळ शेळकेला 79 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक - राज्य विजेतेपद कुस्तीत माती विभागात सोलापूरच्या वेताळ शेळकेनं 79 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक पटकावलं. तर सोलापूरच्याच जोतिबा अटकळेनं मॅट विभागातल्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. वेताळ शेळकेनं अंतिम फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या हनुमंत पुरीला चीतपट केलं. तर जोतिबा अटकळेनं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातला त्याचाच सहकारी साताऱ्याच्या प्रदीप सूळवर 4-1 अशी मात केली.

  • आशिष वावरेचं मॅट विभागात 79 किलो वजनी गटात सुवर्णपदक - सोलापूरच्या आशिष वावरेनं मॅट विभागातल्या 79 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. आशिषनं पुण्याचा पैलवान अक्षय चोरगेचा 10-2 असा धुव्वा उडवला. आशीष वावरेनं गतवर्षी 74 किलो वजनी गटात तिसरं स्थान पटकावलं होतं. आशीष हा सोलापूरच्या माळशेज तालुक्यातील मोरोशी गावचा पैलवान आहे. तिथे तो वस्ताद महादेव ठोरेंच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.

  • १९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.

  • १९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.

  • १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म 

  • १८०४: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८१)

  • १९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचा जन्म.

  • १९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)

  • १९४२: चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचा जन्म.

  • १९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.

  • १९५९: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९८)

  • १९७२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२४: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध  करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १७५५)

  • १९७९: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९३)

  • १९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी यांचे निधन.

  • १९९७: सनईवादक पं. प्रभाशंकर गायकवाड यांचे निधन.

  • २००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)

  • २००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन. (जन्म:  १९ फेब्रुवारी १९४०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.