चालू घडामोडी - २१ जानेवारी २०१९

Date : 21 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वर्षातील पहिले चंद्रग्रहण २१ जानेवारी रोजी :
  • २०१९ हे वर्ष अवकाशप्रेमींसाठी खास असेल असे म्हटले जात होते. या वर्षात एकूण ५ ग्रहणे असतील. यात ३ सूर्यग्रहणे तर २ चंद्रग्रहणे असतील. यातील पहिले चंद्रग्रहण २१ जानेवारी रोजी सोमवारी आहे. ६ जानेवारी रोजी पहिले सूर्यग्रहण पार पडले त्यानंतर आता हे चंद्रग्रहण होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असून यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका रेषेत असतील. हे ग्रहणही भारतात दिसणार नाही याचे कारण म्हणजे त्यावेळी भारतात दिवस असल्याने प्रकाश असेल. मात्र हे ग्रहण आफ्रीका, युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका याठिकाणी दिसणार आहे.

  • या ग्रहणाला ब्लड मून असे म्हणण्यात आले असून त्याचा भारतीय हवामान आणि वातावरणावर परिणाम होणार आहे. या ग्रहणामुळे देशातील थंडी वाढणार असून उत्तर आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. याआधी अशाप्रकारचे पूर्ण चंद्रग्रहण १७०० वर्षांपूर्वी पडले होते. ग्रहणकाळात काही गोष्टी करु नयेत असा समज भारतीयांमध्ये आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण २० जानेवारी रोजी सकाळपासून २१ जानेवारीच्या पहाटे ३.३० पर्यंत दिसणार आहे.

  • २ आणि ३ जुलैदरम्यान पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. मात्र यावेळी भारतात रात्र असल्याने हे सूर्यग्रहणही भारतीयांना दिसणार नाही. तर याच महिन्याच्या १६ आणि १७ तारखेला अंशिक चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी २ तास ५८ मिनिटे इतका असेल. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका ऑस्ट्रेलियासोबतच आशिया खंडातही दिसणार आहे. त्यामुळे भारतीय नागरिक हे ग्रहण पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. तर २६ डिसेंबर रोजी २०१९ मधील शेवटचे ग्रहण असेल. हे वर्तुळाकार सूर्यग्रहण भारतात दिसेल. देशाच्या दक्षिण भागातून हे ग्रहण जास्त चांगले दिसू शकणार आहे.

जगातील सर्वात वृद्ध पुरूषाचा मृत्यू :
  • जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाझो नोनाका यांचे निधन झाले आहे. वयाच्या ११३ व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जपानमधील ओशोरे येथे ते राहात होते. नोनाका यांचा जन्म २५ जुलै १९०५ मध्ये झाला होता.

  • १० एप्रिल २०१८ रोजी मसाझो यांनी आपल्या वयाची ११२ वर्षे आणि २५९ दिवस पूर्ण केले आणि त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचं प्रमाणपत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलं होते. जपानच्या उत्तरेकडील होकायडो बेटावर नोनाका कुटुंबियासोबत वास्तव्यास होते.

  • मसाझो यांची सात भावंडे, पत्नी आणि पाचपैकी चार मुलांचंही वृद्धापकाळाने यापूर्वीच निधन झालं आहे. मसाझो यांना रविवारी झोपेतच नैसर्गिक मृत्यू आला. वयाच्या ११३ व्या वर्षीही मसाझो गोडं पदार्थ खात होते. त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्यदेखील गोड खाणं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

  • जपान हा देश दीर्घायुषी लोकांसाठी प्रसिद्ध असून तेथील जेरोमॉन किमोरा यांचे २०१३ मध्ये वयाच्या ११६ व्या वर्षी निधन झाले होते. जपानमध्ये शंभरी ओलांडलेले किमान ६८,००० लोक आहेत, असे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार :
  • प्रजासत्ताकदिनी जे राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार दिले जातात त्यात पुरस्कार विजेत्यांची निवड करण्याचे स्वयंसेवी संस्थांना १९५७  पासून देण्यात आलेले काम काढून घेण्यात आले असून सरकार ही निवड स्वत: करणार आहे. बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांची निवड करण्याचे काम भारतीय बाल कल्याण परिषद या स्वयंसेवी संस्थेला देण्यात आले होते,पण अलीकडे या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सरकारने पुरस्कारार्थीची निवड करण्याचे काम त्यांच्याकडून काढून घेतले आहे.

  • सरकारने या संस्थेपासून काडीमोड घेतला असून बालशौर्य पुरस्कार निवडीची प्रक्रिया बदलली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार असे त्याचे नामकरण करून त्यात काही नवीन निकष समाविष्ट केले आहेत. सरकारने निवडीचे अधिकार स्वत:कडे घेतले असून त्यासाठी ऑगस्टमध्ये जाहिरात देण्यात आली होती. भारतीय बाल कल्याण परिषद या संस्थेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ यांनी  म्हटले आहे की, आमची संस्था साठ वर्षांची आहे. आम्ही अनेक वर्षे मुलांची निवड करीत होतो, पण आता हे काम आमच्याकडून काढून घेतले याचे वाईट वाटते. १९५७पासून आम्ही बाल शौर्य पुरस्कारार्थीची निवड करीत होतो, त्यात ९०० मुलांची आतापर्यंत निवड करण्यात आली.

  • यावर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जाणार असून त्यात नवनिर्मिती सहा, बुद्धिमत्ता तीन, समाजसेवा तीन, कला व संस्कृ ती पाच, क्रीडा सहा, शौर्य तीन याप्रमाणे पुरस्कार २०१९ मध्ये दिले जाणार आहेत.

लोकसभेसाठी काँग्रेसकडून करिना कपूरला उमेदवारी :
  • मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयाचा फायदा लोकसभा निवडणुकीतही उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. अशातच काँग्रेसच्या काही आमदारांनी भोपाळच्या लोकसभा जागेवर विजयाचा फॉर्म्युला शोधला आहे. भोपाळमधून कोणा राजकारण्याला उमेदवारी न देता बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानला उमेदवारी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे.

  • ‘भोपाळच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर करिना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपाच्या बालेकिल्ल्याला हादरा देऊ शकतो. याशिवाय, करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून झालीये, परिणामी जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल’, असं काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील नेते गुडडू चौहान आणि अनीस खान यांचं म्हणणं आहे. लवकरच या मागणीसाठी हे नेते मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेटही घेणार आहेत. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचं वृत्त दिलंय.

  • पतौडी कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून भोपाळमध्ये स्थायिक आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर आणि सोहा अली खान अनेकदा भोपाळला येऊन देखील गेले आहेत. मात्र, मंसुर अली खान पतौडी यांनी १९९१ मध्ये भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, करिना आता काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार का आणि आपल्या नेत्यांच्या मागणीला काँग्रेस पक्ष कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • दुसरीकडे, काँग्रेस नेत्यांच्या या मागणीवर भाजपाच्या नेत्यांनी टोला लगावला आहे. काँग्रेसकडे नेते उरले नाहीत त्यामुळे त्यांना आता अभिनेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे, अशी टीका भोपाळमधून भाजपाचे खासदार आलोक संजय यांनी केली आहे.

इंदिरा नुई जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत :
  • न्यूयॉर्क - जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी पेप्सिकोच्या माजी सीईओ इंदिरा नुई यांचे नाव चर्चेत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार व्हाइट हाऊसकडून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी इंदिरा नुई यांच्या नावाचा विचार होत आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी ते फेब्रुवारी महिन्यात आपले पद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नव्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. 

  •  न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका यांनी इंदिरा नुई यांचा उल्लेख प्रशासनिक सहाकारी तसेच मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत असा केला आहे. ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. 

  • जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीशी संबंधित असलेल्यांच्या निकटवर्तींय सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. सर्वसाधारणपणे अशा महत्त्वपूर्ण पदासाठीच्या नामांकनाबाबत अंतिम निर्णय होऊपर्यंत सुरुवातीचे दावेदार स्पर्धेतून बाद होत असतात.  मात्र या पदासाठी नामांकन झाल्यास इंदिरा नुई या हे पद स्वीकारणार की नाही, याबाबत काही स्पष्ट होऊ शकलेले नाही.  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

  • १७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

  • १८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

  • १८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.

  • १९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.

  • १९७२: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

  • २०००: फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

जन्म 

  • १८८२: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९४३)

  • १८९४: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)

  • १९१०: गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७५)

  • १९२४: माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)

  • १९५३: मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक पॉल अ‍ॅलन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९३: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)

  • १९०१: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३५)

  • १९२४: रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८७०)

  • १९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)

  • १९४५: क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन. (जन्म: २५ मे १८८६)

  • १९५०: इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन. (जन्म: २५ जून १९०३)

  • १९५९: दिगदर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते सेसिल बी. डी. मिल यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८१)

  • १९६५: अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.

  • १९९८: भारताचे ९ वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन. (जन्म: २१ जून १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.