चालू घडामोडी - २१ जून २०१८

Date : 21 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मंडलिक व योग इन्स्टिट्यूटला पंतप्रधान पुरस्कार जाहीर :
  • नवी दिल्ली : नाशिकचे योगतज्ज्ञ विश्वास मंडलिक व मुंबईतील योग इन्स्टिट्यूट या संस्थेला योगविद्येच्या प्रसार व विकासासात भरीव कामगिरीबाबत यंदाचे पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाले. मानचिन्ह, मानपत्र व प्रत्येकी २५ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

  • २१ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी देशभरातून विविध गटांत १८६ नामांकने प्राप्त झाली होती. या नावांची छाननी दोन समित्यांकडून करण्यात आली.

  • आयुष्य मंत्रालयाने सांगितले की, प्राचीन ग्रंथांचे अध्ययन करुन विश्वास मंडलिक यांनी पतंजली व हटयोगाचे उत्तम ज्ञान मिळवले. १९७८ साली योग धाम विद्या या संस्थेची पहिली शाखा त्यांनी सुरु केली. आता या संस्थेच्या देशात १६० शाखा आहेत. त्यानंतर योगविद्या शिकविण्यासाठी मंडलिक यांनी १९८३ साली योग विद्या गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली. योगविद्येवर त्यांनी ४२ पुस्तके लिहिली असून, या विषयाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ३०० सीडी त्यांनी तयार केल्या आहेत.

  • मुंबईतील योग इन्स्टिट्युट ही १९१८मध्ये योगेंद्रजी यांनी स्थापन केली. यंदा या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली. या संस्थेने आजवर ५० हजारपेक्षा अधिक योगविद्या शिक्षक तयार केले आहेत तसेच योगविद्येबद्दल ५००हून अधिक पुस्तके योग इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केली आहेत.

फ्रान्समध्ये महायुद्धातील शहीद भारतीयांचे स्मारक :
  • पॅरिस : पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढताना फ्रान्समधील विलेर्स ग्युसलेन येथील लढाईत शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारत सरकार तेथे स्मारक बांधणार आहे, असे दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.

  • विलेर्स ग्युसलेन हे ठिकाण पॅरिसपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. पहिल्या महायुद्धात नोव्हेंबर व डिसेंबर १९१७ मध्ये येथे झालेल्या लढाईत ब्रिटिश सैन्यातील भारतीय घोडदळ फौजेने मोछा पराक्रम गाजवला होता. या लढाईत जेभारतीय सैनिक शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ आताच्या भारतीय लष्करातील जुन्या घोडदळ तुकड्या दरवर्षी ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर हे दिवस ‘कॅम्बराय डे’ म्हणून साजरा करतात.

  • ९वी हॉडसन घोडतळ तुकडी, रॉयल डेक्कन हॉर्स (आताची ९वी डेक्कन हॉर्स), ३४ वी पूना हॉर्स (आताची १७ पूना हॉर्स), ३८ वी सेंट्रल इंडिया हॉर्स (आता सेंट्रल इंडिया हॉर्स) व १८ कॅव्हलरी या घोडतळ तुकड्यांमधील सैनिकांनी या युद्धात प्राणांची बाजी लावली होती.

  • धारातीर्थी प्राणाहुती देणाºया भारतीय सैनिकांचे भारताबाहेर बांधले जाणारे हे अशा प्रकारचे दुसरे स्मारक असेल. पहिले स्मारक फ्रान्समध्येच पॅस-द-कॅलेस येथे आहे. पहिल्या महायुद्धात तेथे झालेल्या लढाईत कामी आलेल्या ४,७४२ भारतीय सैनिकांच्या गौरवार्थ ते बांधण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात - शरद पवार :
  • मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात आलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या कार्यक्रमात बोलत होते.

  • गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड झालं त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. धक्कादायक म्हणजे दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाल्याचं चित्र होतं, असंही पवार म्हणाले.

  • दरम्यान गोळवरकर गुरुजींनी आंबेडकरांच्या संविधानाबाबत एका पुस्तकाच्या माध्यमातून टीका केली होती. त्यांच्या विचारांवर चालणारा भाजप पक्ष आह. त्यामुळे संविधानाबाबत भाजपकडून कितीही चांगली वक्तव्यं होत असली तरी ती धादांत खोटी असल्याची टीका पवारांनी केली. यावेळी इंदिरा गांधींचा दाखला देत मोदींनाही नागरिक धडा शिकवतील असा इशारा पवारांनी दिला.

  • इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप कामं केली, पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच नागरिकांनी इंदिरा गांधीसारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. त्यामुळे मोदींनाही जनता धडा शिकवेल, असं पवार म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधानांचा देहरादूनमध्ये तर मुख्यमंत्र्यांचा मुंबईत योगा :
  • मुबई :  जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहरादूनमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगासने करुन योग दिन साजरा केला.

  • देहरादूनच्या वन संशोधन संस्थेत योग दिनानिमित्त देशातील सर्वात मोठा कार्यक्रम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमात जवळजवळ 55 हजार जणांचा सहभाग झाला आहे. तसेच जगातला प्रत्येक नागरिक योगाला आपलंसं करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली.

  • याशिवाय योगदिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रम होणार आहेत. राजस्थानच्या कोटामध्ये योगगुरू बाबा रामदेव २ लाख नागरिकांसोबत योग करणार आहेत. यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील उपस्थितीत होत्या. 2 लाख जण एकत्रित योगा करत असल्याची ही पहिलीच वेळ असल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीमही या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

  • आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा या भारताच्या मागणीला संयुक्त राष्ट्रानं 2014 मध्ये मान्यता दिली. त्यानंतर 2015 पासून 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो. भारतातही सर्वसामान्यांसह राजकीय नेतेही योग दिन साजरा करतात. याशिवाय भारतीय दूतावासांच्या समन्वयातून 150 देशांमध्येही योगदिनाचे कार्यक्रम राबवले जात आहेत.

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन पदावरुन पायउतार :
  • नवी दिल्लीमाजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर आता आणखी एका अर्थतज्ज्ञाने मोदी सरकारला रामराम केला आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली. अरविंद सुब्रमण्यन हे कौटुंबीक कारणामुळे अमेरिकेला परतणार आहेत. त्यामुळे आपल्याला पदमुक्त करावं, अशी विनंती त्यांनी केली होती. कौटुंबीक कारण पुढे केल्याने आपल्याकडे पर्याय नव्हता, असं अरुण जेटली यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्याशी चर्चा केली होती. त्याचवेळी त्यांनी कौटुंबीक जबाबदाऱ्यांमुळे अमेरिकेला परतणार असल्याचं म्हटलं होतं, असं जेटलींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • अरविंद सुब्रमण्यन यांना 16 ऑक्टोबर 2014 रोजी तीन वर्षांसाठी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही मोदी सरकारने त्यांना विनंती करत, 1 वर्षांसाठी त्यांना मुदतवाढ दिली होती.

  • अरविंद सुब्रमण्यन हे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे जवळचे मानले जात होते. कोणतीही आर्थिक धोरणं ठरवताना ते सुब्रमण्यन यांचे सल्ला घेत असत. फेसबुकच्या पोस्टच्या शेवटी जेटली म्हणाले, “वैयक्तिकरित्या मला सुब्रमण्यन यांची बौद्धिक क्षमता, गतीशीलता, ऊर्जा आणि कल्पकतेची कमतरता जाणवेल.

जागतिक संगीत दिन; लोकल ‘म्युझिक कल्चर’ बनतेय ग्लोबल :
  • नागपूर : ‘ए आई मला झोप येत नाहीये गाणे म्हण’ अशी आर्त हाक देणाऱ्या मुलाला प्रेमाची थपकी देताना आई जेव्हा अंगाईगीत गाते तेव्हा त्यातला गोडवा, लय आणि त्यातला जिव्हाळा, या संगमातून बाळ केव्हा झोपी जाते, हे दोघांनाही समजत नाही. त्या बाळाला संगीत म्हणजे काय, हे माहितीही नसेल, पण त्यातील स्वरलहरींनी तो सुखावतो. संगीताच हे असच असते.

  • आपल्याला संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही संबंध नाही, असे म्हणणारा एकही माणूस या पृथ्वीतलावर शोधूनही सापडणार नाही. तसं पाहिलं तर आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. त्यामुळे दूरवरच्या फ्रान्सने रुजविलेला ‘संगीत दिन’ जगभरात स्वीकारला गेला.

  • गायकांच्या सुरांशी जेव्हा अनेक वाद्यांचा मिलाप होतो तेव्हा कलावंत आणि रसिक या दोघांनाही नादसमाधीची अवस्था प्राप्त होते. विज्ञानानेही हे संगीताचे अध्यात्म मान्य केले आहे. सप्तसुरांच्या स्पर्शाने आपले नागपूरही आनंदले आहे. काही वर्षाआधी संगीत कला क्षेत्रावर एक मरगळ आली होती. मात्र काही कलावंतांच्या सततच्या प्रयत्नांनी संगीताची मैफल पुन्हा बहरू लागली आहे.

  • अनेक नवीन गायक-वादक कलावंतांनी आपले कौशल्य सिद्ध केले असून त्यांच्या प्रतिभेचे सूर सर्वत्र निनादत आहेत. अनेकांनी संगीत क्षेत्रात व्यावसायिक यश मिळविले आहे तर अनेकजण छंद म्हणून या संगीत संस्कृतीला समृद्ध करू पाहत आहेत. अशा संगीत साधकांच्या मनोगतातून त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा :
  • नवी दिल्ली : राष्ट्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी आपली मुदत संपण्यापूर्वीच व्यक्तिगत कारणास्तव पदाचा राजीनामा दिला असून, ते पुन्हा अमेरिकेत जाऊ न संशोधन व लिखाण करणार आहेत. त्यांची मुदत आॅक्टोबरमध्ये संपणार होती. मात्र त्याआधीच पीटरसन इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे फेलो असणाऱ्या सुब्रमण्यन यांनी परतण्याचा निर्णय घेतला.

  • रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन व पंतप्रधान मोदी यांचे नोटाबंदीवरून मतभेद झाले होते. त्यानंतर ते अमेरिकेत गेले. त्यांच्यापाठोपाठ निती आयोगातून बाहेर पडण्याचा निर्णय अरविंद पनगढिया यांनी घेतला. त्यांनी सोडू नये, असे प्रयत्न करणाºया मोदींनी त्यांचे कौतुकही केले होते. पण तेही अमेरिकेत निघून गेले.

  • सुब्रमण्यन यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे अरुण जेटली यांच्या फेसबुक पोस्टमुळेच समजले. ते बुधवारी जेटली यांच्या घरी गेले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सने आपला निर्णय सांगितला. जेटली यांनी सुब्रमण्यन यांच्या आठवणीही या निमित्ताने पोस्ट केल्या आहेत. सुब्रमण्यन अनेकदा माझ्या कार्यालयात येत, ते मला नेहमी मिनिस्टर असे म्हणत आणि बहुधा काही तरी चांगली बातमी सांगत. मी त्यांचा आभारी आहे, ते जाण्याची मला खंत आहे.

  • मोदी, गोयल गप्पच पंतप्रधान नरेंद्र मोदी वा हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मात्र सुब्रमण्यन यांच्या जाण्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मोदी त्यांच्यावर फारसे खूश नव्हते. नोटाबंदीचा आर्थिक विकास दरावर परिणाम झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. मोदी यांच्या विकासाच्या गुजरात मॉडेलविषयीही ते साशंक होते.

दिनविशेष :
  • जागतिक योग दिन

महत्वाच्या घटना 

  • १७८८: न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

  • १९४९: राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

  • १९६१: अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे यंत्र विकसित केले.

  • १९९१: पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान.

  • १९९२: डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर.

  • १९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

  • १९९९: विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ हा चौथा खेळाडू ठरला.

  • २००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.

  • २०१५: जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.

जन्म 

  • १७८१: फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन यांचा जन्म.

  • १९१२: भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.(मृत्यू: ११ एप्रिल २००९)

  • १९२३: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म.

  • १९४१: भारतीय बिशप अलॉयसियस पॉल डिसोझा यांचा जन्म.

  • १९५३: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा जन्म.

  • १९६७: ईबे (eBay) चे स्थापक पियरे ओमिदार यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९३: अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड यांचे निधन.

  • १९२८: सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८८२)

  • १९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८८९)

  • १९५७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ योहानेस श्टार्क यांचे निधन.

  • १९७०: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचे निधन. (जन्म: ६ जून १९०१)

  • १९८४: मराठी चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)

  • २०१३: भारतीय पत्रकार डिकी रुतनागुर यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.