चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जून २०१९

Date : 21 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘टीडीपी’चे सहापैकी चार राज्यसभा सदस्य भाजपमध्ये :
  • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची महाआघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणारे तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांना भाजपने गुरुवारी धक्का दिला. ‘टीडीपी’च्या राज्यसभेतील सहापैकी चार खासदारांनी गुरुवारी सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन टीडीपी संसदीय पक्ष भाजपमध्ये विलीन होत असल्याचे पत्र दिले.

  • राष्ट्रपतींचे अभिभाषण पटलावर ठेवल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिल्लीत राजकीय नाटय़ाला सुरुवात झाली. तेलुगू देसमच्या राज्यसभेतील चार खासदारांनी दुपारी २ च्या सुमारास भाजप प्रवेशाचा निर्णय सभापतींना कळवला. सी. एम. रमेश, वाय. सत्यनारायण चौधरी, टी. जी. व्यंकटेश आणि जी. मोहन राव या खासदारांनी पक्षांतर केले. त्यांनी ‘टीडीपी’ संसदीय पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरणाचे पत्रही सभापतींना दिले.

  • या खासदारांनी भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. दोन-तृतीयांश सदस्यांनी एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे या चारही खासदारांवर पक्षांतरबंदीची कारवाई करता येणार नाही.

  • सर्वाचा विकास करण्याचे भाजपचे धोरण आहे. या खासदारांच्या प्रवेशामुळे आंध्र प्रदेशमध्ये भाजपचा विस्तार करणे शक्य होईल, असे भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकारांना सांगितले. देशाचा कल कोणाकडे आहे, हे लोकसभा निवडणुकीने सिद्ध केले आहे. त्याचा मान राखत आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा खासदार वाय. एस. चौधरी यांनी केला.

जगातील सर्वात बुटक्या महिलेनं केली योगासनं :
  • शुक्रवारी (२१ जून) जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. जगभरातून योग दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या दिवसाचे औचित्य साधत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची नोंद असलेल्या ज्योती आमगे यांनी योगासनं केली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं ज्योती आमगे यांचा योगासनं करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  • ज्येती आमगे यांनी नागपूरमधील एका पार्कमध्ये योग ट्रेनरसोबत योगासनं केली. विविध योग आसने ज्येती यांनी अतिशय सहजतेनी केली. २५ वर्षीय आमगे यांनी सर्वात कमी उंची असल्याने गिनिज बुक रेकॉर्ड केले आहे. ज्योती आमगे योगासनं करताना पार्कमध्ये गर्दी जमली होती. पार्कमधील लोकही ज्योती यांच्यासोबत योगासनं करण्यात दंग झाली होती.

  • कमी उंचीमुळे ज्योतीचे आयुष्य हे सर्वसाधारण व्यक्तीसारखे नाही. तिला सोफ्यावरसुद्धा स्वत:हून बसता येत नाही. कुठेही बाहेर जायचे असेल तर तिला कडेवर घेण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आली असता ती स्वत: मतदान केंद्रावर कुणाचाही आधार न घेता चालत आली होती. ज्योती आज २५ वषार्ंची असून परिवारातील सदस्य तिला बाळासारखे जपत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर ४८ धावांनी दणदणीत विजय :
  • लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज (20 जून) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशवर 48 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरच्या धडाकेबाज 166 धावांच्या खेळीच्या जोरावर बांग्लादेशसमोर 381 धावांचा डोंगर उभा केला होता. 382 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या संघाने निर्धारित 50 षटकात 8 बाद 333 धावांपर्यंतच मजल मारली. बांग्लादेशकडून मुशफिकूर रहीमची (नाबाद 102 धावा) झुंज अपयशी ठरली.

  • कांगारुंचे 382 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांग्लादेशकडून मुशफिकूर रहीमने 9 चौकार आणि एका षटकारासह 97 चेंडूत 102 धावांची खेळी केली. तसेच सलामीवीर तमीम इक्बाल (74 चेंडूत 62) आणि मधल्या फळीत मोहमदुल्लाह (50 चेंडूत 69)या दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या परंतु या तिघांची फलंदाजी बांग्लादेशला विजय मिळवून देऊ शकली नाही.

  • ऑस्ट्रिलयाकडून मॉर्कस स्टॉयनिस (54 धावात 2 बळी), मिचेल स्टार्क (55 धावात 2 बळी)आणि नॅथन कुल्टर नाईल (58 धावात 2 बळी) या तिघांनी ठरावीक अंतराने बांग्लादेशच्या फलंदाजांना बाद करत सामन्यावर शेवटपर्यंत पकड ठेवली होती. परिणामी बांग्लादेशचा डाव 333 धावांवर थांबला.

अमेरिकेला जाणे स्वप्नच राहणार; H1B व्हिसावर मर्यादा येणार :
  • अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच 1 बी व्हिसा देण्यावर मर्यादा घालण्याच्या विचारात आहे. जर यावर मर्यादा घालण्यात आली तर एच 1 बी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टॅरिफ आणि ट्रेड वॉरमुळे अशा प्रकारचे पाऊल उचलण्यात येत आहे. दरम्यान, या निर्णयाला अमेरिकन काँग्रेसची मंजुरी घ्यावी लागू शकते. परंतु ही मंजुरी मिळणे कठिण असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.

  • दरम्यान, परदेशी कंपन्यांना आपला डेटा भारतातच ठेवण्यास सांगितले जाते. कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची पावले उचलली जातात. यामुळेच अमेरिकेतील काही कंपन्या भारतात व्यापार करण्याच्या पद्धतींवर नाराज असल्याचे सांगण्यात येते. तसेच यापूर्वी मास्टरकार्डनेही डेटा साठवून ठेवण्याच्या नियमावर आक्षेप घेतला होता. तसेच रविवारी भारताने अमेरिकेच्या अनेक वस्तूंवर अधिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेने भारताला दिलेली सुट रद्द केल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला होता. त्याच्याच विरोधात अमेरिकेने असे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

  • अमेरिकेच्या एच 1 बी व्हिसाच्या मर्यादा ठरवण्याबाबत गेल्या आठवड्यात माहिती देण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच दरवर्षी भारतीयांसाठी 10 ते 15 टक्क्यांदरम्यान कोटा ठेवण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली होती.

  • अमेरिका दरवर्षी 85 हजार लोकांना व्हिसा देते. ज्यापैकी 70 टक्के व्हिसा भारतीयांना देण्यात येतो. तसेच ट्रम्प प्रशासनाने एच 4 व्हिसा धारकांना काम करण्याची देण्यात येणारी अनुमती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला अद्यापही अंतिम रूप देण्यात आले नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एच 1 बी व्हिसा धारकांच्या पतीला अथवा पत्नीला एच 4 व्हिसा देण्यात येतो.

दिनविशेष :
  • जागतिक योग दिन

महत्वाच्या घटना 

  • १७८८: न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

  • १९४८: चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले.

  • १९४९: राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १९५७: एलेन फेअरक्लो यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

  • १९८९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती आणि वाचा स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.

  • १९९१: पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान.

  • १९९५: पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील द युनिटी इन योग इंटरनॅशनल या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.

  • १९९८: फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने फ्रिट्झ-५ या संगणकाचा पराभव केला.

  • १९९९: विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ हा चौथा खेळाडू ठरला.

  • २००६: नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे निक्स व हायड्रा असे नामकरण करण्यात आले.

  • २०१५: जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.

जन्म 

  • १७८१: फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सिमिओन-डेनिसपॉइसॉन यांचा जन्म.

  • १९१२: भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म.(मृत्यू: ११ एप्रिल २००९)

  • १९२३: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म.

  • १९५३: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा जन्म.

  • १९५८:  भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१७)

मृत्यू 

  • १८७४: स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ अँडर्सयोनास अँग्स्ट्रॉम यांचे निधन.

  • १८९३: अमेरिकन उद्योगपती तसेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संस्थापक लिलँड स्टॅनफोर्ड यांचे निधन.

  • १९२८: सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८८२)

  • १९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८८९)

  • १९५७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ योहानेस श्टार्क यांचे निधन.

  • १९७०: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचे निधन. (जन्म: ६ जून १९०१)

  • २००३: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.