चालू घडामोडी - २१ मार्च २०१८

Date : 21 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रपतींच्या हस्ते ४३ मान्यवरांचा 'पद्म' पुरस्काराने सन्मान :
  • नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळा आज राजधानी दिल्लीत पार पडला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून बंग दाम्पत्याला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं.

  • कला, साहित्य, शिक्षा, क्रीडा, संशोधन, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, लोककला, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

  • या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती.

  • यंदा 84 जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून त्यातील 43 मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रातून समाजसेवक डॉ.अभय आणि राणी बंग, साहित्यिक गंगाधर पानतावणे, अरविंद गुप्ता, जेष्ठ अभिनेते मनोज जोशी, उद्योजक रामेश्वरलाल काबरा, मुरलीकांत, शिशिर मिश्रा यांचा पुरस्कार प्रदान केला.(source :abpmajha)

देशातील ६२ विद्यापीठांना स्वायत्त दर्जा :
  • नवी दिल्ली : देशभरातल्या एकूण 62 विद्यापीठ आणि संस्थांना आज (मंगळवार) स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाही समावेश आहे. केंद्रीय विद्यापीठं, राज्य विद्यापीठं आणि महाविद्यालयं अशी विभागणी करण्यात आली.

  • स्वायत्ता देण्यात आलेल्या विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. ग्रेड 1 स्वायत्तता महाविद्यालयं गटातून महाराष्ट्रातली काही संस्था आणि महाविद्यालयांचाही समावेश आहे. स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठं आणि महाविद्यालयांना आता अभ्यासक्रम, प्रवेश प्रकिया, फी यासारखे अनेक निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचे अधिकार प्राप्त होणार आहे.

  • उच्च शैक्षणिक दर्जा राखल्याच्या निकषावर ६२ संस्थांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ६२ स्वायत्त शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली. ज्यात ५ केंद्रीय विद्यापीठे, २१ राज्य विद्यापीठे, २६ खासगी विद्यापीठे आणि १० महाविद्यालयांचा समावेश आहे.

  • ग्रेड १ स्वायत्तता महाविद्यालये या प्रकारात महाराष्ट्रातून काही इतर नावेही आहेत.(source :abpmajha)

जगभरातील रेल्वेगाड्यांना ‘चाकण’चे इंजीन, जर्मनीतील प्रकल्प येणार भारतात :
  • मुंबई : जगभरातील रेल्वेगाड्यांना पुण्याजवळील चाकण येथे तयार होणारी इंजिने लागणार आहेत. भारतातील फोर्स मोटार्स व जर्मन रोल्स रॉइस यांनी मेक इन इंडियाअंतर्गत ३०० कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार मंगळवारी केला. या इंजिनांसाठी रोल्स रॉइस त्यांचा जर्मनीतील प्रकल्प भारतात हलविणार आहे.

  • कार्स व इंजिनाचे उत्पादन करणाऱ्या रोल्स रॉइसचा ‘एमटीयू’ हा इंजिनाचा ब्रॅण्ड आहे. ‘एमटीयू १६००’ मालिकेच्या इंजिनाचा उपयोग ऊर्जा प्रकल्प व रेल्वेगाड्यांसाठी होतो. प्रत्येकी दीड टन वजनाची वर्षाला २००० इंजिने रोल्स रॉइस जर्मनीत तयार करते. फोर्स मोटार्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांनी सांगितले की, मेक इन इंडिया हा या कराराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. रोल्स रॉइसच्या या इंजिनांना जगभरातील विविध रेल्वे कंपन्यांकडून मागणी आहे.

  • भारतासह नेपाळ व श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पातही या इंजिनांचा उपयोग होत आहे. ही इंजिने चाकणच्या प्रकल्पात तयार होऊन जर्मनीला पाठवण्यात येतील. तेथून ती जगभरात जातील. या प्रकल्पासाठी ‘फोर्स एमटीयू पॉवर सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना करण्यात आली.

  • त्यात फोर्सची ५१ व रोल्स रॉइसची ४९ टक्के गुंतवणूक असेल. मे २०१९ पर्यंत हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. ‘बम्बार्डिअर’ ही जर्मनीत मुख्यालय असलेली कॅनडिअन कंपनी रेल्वेगाड्यांची निर्मिती करते. भारतातील मेट्रो व युरोपातील गाड्यांना या इंजिनांचा पुरवठा होईल, असे रोल्स रॉइसचे सीईओ आंद्रेस शेल यांनी सांगितले.(source :lokmat)

अॅट्रॉसिटीमध्ये आता तातडीने अटक नाही : सुप्रीम कोर्ट :
  • नवी दिल्ली : कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा आरोप करुन त्याची थेट अटक आता होणार नाही. सुप्रीम कोर्टाने आज यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण निकाल दिला, ज्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांसह सामान्य व्यक्तींनाही संरक्षण मिळालं आहे.

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असेल तरच सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अटकेची कारवाई करता येईल. न्यायमूर्ती उदय ललित आणि ए. के. गोयल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

  • विशेष म्हणजे केवळ सरकारी नोकरच नव्हे, तर इतर सामान्य व्यक्तींनाही अशाच प्रकारचं संरक्षण देण्यात आलं आहे. एसएसपी (senior superintendent of police)  दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी त्यासाठी बंधनकारक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या स्तरावर अशा प्रकरणाची प्राथमिक चौकशी होईल, त्यातून केवळ अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून अडकवण्याचा तर हा प्रकार नाही ना, हे सिद्ध झाल्यावरच पुढची कारवाई करता येणार आहे.

  • अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर वाढू नये, त्यातून चुकीच्या लोकांना शिक्षा होऊ नये, यासाठी अशा पद्धतीची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुभाष काशीनाथ महाजन यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.

  • दरम्यान, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचा ठराव राजकीय पदाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. मागासवर्गीय निधी खर्च न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. सुधाकर शिंदे आणि सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत आहेत. काही दिवसांपूर्वीच आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशाराही भाजपने दिला होता.(source :abpmajha)

चीन एक इंचही जमीन सोडणार नाही; रक्तरंजित संघर्षासाठी तयार- क्षी जिनपिंग :
  • बीजिंग: चीन स्वत:च्या एक इंच जमिनीवरचाही हक्क सोडणार नाही. वेळ पडल्यास त्यासाठी आम्ही रक्तरंजित संघर्षाला तयार आहोत, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी चीनच्या संसदेत भाषण केले. काही दिवसांपूर्वीच घटनेतील दुरुस्तीमुळे क्षी जिनपिंग यांचा तहहयात चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

  • त्यानंतर आज क्षी जिनपिंग यांनी संसदेत भाषण केले. त्यांच्या या भाषणात पुरेपूर राष्ट्रवाद भरला होता. त्यांनी म्हटले की, नव्या काळाच्या प्रारंभापासून चीनचे पुनरुज्जीवन हे आपले सर्वात मोठे स्वप्न आहे.

  • चीनमधील जनता आणि संपूर्ण राष्ट्राची एका गोष्टीवर ठाम श्रद्धा आहे की, भविष्यात आणि आत्ताही आपल्या मालकीची एक इंचही जमीन हिसकावून घेतली जाणार नाही. परंतु, जिनपिंग यांनी सीमावर्ती परिसरात विविध देशांशी सुरु असलेल्या वादांचा कोणताही थेट उल्लेख केला नाही. 

  • काही दिवसांपूर्वीच डोकलाम परिसरात भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ हा वाद सुरू होता. अखेर या प्रदेशातून दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली होती. याशिवाय, पूर्व चीन समुद्रातील एका बेटावरून चीनचा जपानशी वाद सुरू आहे.(source :lokmat)

रेखा यांच्या जागेवर अक्षयकुमार जाणार राज्यसभेवर :
  • कला, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातून राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून नेमण्यात येणाऱ्या १२ पैकी तीन सदस्यांचा कार्यकाल एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार आहे. विशेष म्हणजे हे तीनही खासदार मुंबईतून येतात.

  • उद्योगपती अनु आगा, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना राष्ट्रपतींनी नियुक्त केले होते. आता त्यांच्या जागेवर नियुक्ती मिळवण्यासाठी चित्रपटसृष्टी आणि लेखकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. परंतु, सध्या अक्षयकुमारचे नाव यात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.

  • सभागृहात सर्वांत कमी उपस्थिती असल्याचा विक्रम रेखा यांच्या नावे आहेत. त्या अवघ्या साडेचार टक्केच सभागृहात उपस्थित होत्या. त्यामुळे मोठ्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागले. रेखा यांच्या जागेवर चित्रपटसृष्टीतील कोणत्या कलाकाराला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • भाजपातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेतील रिक्त जागेवर वर्णी लागावी म्हणून अनेकांनी पक्षाच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे, असे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.

  • सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, सध्या तरी अक्षयकुमार, जुही चावला आणि गजेंद्र चौहान यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर सलमान खानचे वडील सलीम खान, विवेक ओबेरॉय याचे वडील सुरेश ओबेरॉय, ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ, वहिदा रहेमान, आशा पारेख, मधूर भांडारकर आणि अनुपम खेर यांची शिफारसही सरकारकडे गेल्याचे सांगण्यात येते.(source :loksatta)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.

  • १८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.

  • १८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

  • १९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.

  • १९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

  • १९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

  • १९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • २०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

  • २००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.

  • २००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

जन्म

  • १७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०)

  • १८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)

  • १८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९५४)

  • १९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)

  • १९७८: अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८९१)

  • १९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • १९८५: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन. (जन्म: २० मार्च १९०८)

  • २००१: दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१५)

  • २००३: भारतीय लेखक शिवानी यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९२३)

  • २००५: चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर१९१५)

  • २०१०: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २९ मार्च१९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.