चालू घडामोडी - २१ मे २०१८

Date : 21 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दीड लाख विद्यार्थ्यांनी दिली जेईई अ‍ॅडव्हान्स :
  • मुंबई : यंदाच्या जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षेला सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अभियांत्रिकी तसेच आयआयटीसाठीची ही प्रवेश परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. रविवारी सकाळी ९ ते दु. १२ आणि दु. २ ते सायं. ५ अशा दोन सत्रात ही परीक्षा पार पडली.

  • यंदाच्या प्रवेश परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी कानपूरकडे होती. एकूण १,६६,२०४ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन परीक्षा दिली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एकूण ५४ प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, पेपर-१ची गुणसंख्या मात्र १८३ वरून १८० करण्यात आली. आॅनलाइन पद्धतीने परीक्षेसाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात आली.

  • पेपर-१साठी स. ७.३० तर पेपर-२ साठी दु. १२.४५ वाजताच विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. आॅनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडल्याने उत्तराचा पर्याय बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रश्न कठीण असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. आज झालेल्या प्रवेश परीक्षेचे आदर्श उत्तरांची यादी २९ मे रोजी जेईईच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे.

  • अपेक्षेप्रमाणे यंदाची जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षा कठीण होती. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत निराशा व्यक्त केली आहे. नकारात्मक गुणपद्धतीच्या प्रश्नांची संख्या जास्त होती. त्यामुळे जास्त गुण मिळविणे अवघड जाणार आहे. एकूणच यंदाच्या जेईईचा कट आॅफ घसरण्याची शक्यता राव आयआयटीचे कार्यकारी संचालक विनय कुमार यांनी वर्तविली आहे.

हौशी खगोलशास्त्रज्ञांकडून बाह्य़ग्रहाचा शोध :
  • रशियातील कोरोवका ग्रहसंशोधन प्रकल्पातील हौशी खगोलशास्त्रज्ञांनी गुरूसारखा तप्त बाह्य़ग्रह शोधला असून त्याचा परिभ्रमण काळ हा ४० तासांचा आहे. मातृताऱ्याभोवती हा ग्रह ४० तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.

  • कोरोवका ग्रह संशोधन प्रकल्पात हा बाह्य़ग्रह शोधण्यात आला असून त्याचे नामकरण केपीएस १ बी असे करण्यात आले आहे. त्याचे गुणधर्म हे गुरूसारखे आहेत. तो मातृताऱ्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे त्याचे तापमान हे गुरूपेक्षा जास्तच आहे. रशियाच्या उरल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी बाह्य़ग्रहसदृश खगोलीय वस्तूंचे नमुने शोधण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

  • असे नमुने निवडल्यानंतर  त्यांचे वेगवेगळ्या वेधशाळांकडून निरीक्षण केले जाते त्यात रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या स्पेशल अ‍ॅस्ट्रोफिजिकल ऑब्झर्वेटरीचा समावेश आहे. वर्णपंक्तींचा अभ्यास करून सदर बाह्य़ग्रहाचे वस्तुमान काढण्याचे प्रयोग फ्रान्समधील हॉट प्रॉव्हेन्स ऑब्झर्वेटरी येथे केले जातात.

  • संशोधकांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता सध्याचा शोध हा हा महत्त्वाचा असून हौशी खगोलशास्त्रज्ञांनी जमवलेल्या माहितीच्या आधारे उपलब्ध उपकरणांच्या मदतीने ग्रहाचा शोध घेण्यात आला आहे. बेल्जियम, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँडस, तुर्की, पोर्तुगाल, लिथुआनिया, इटली व कॅनडा येथील वैज्ञानिकांचा यात सहभाग होता.

छगन भुजबळ यांची ट्विटरवर एंट्री :
  • मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे. पहिलंवहिलं ट्वीट करत त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे.

  • ''माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली,त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे,'' असं ट्वीट भुजबळांनी केलं आहे.

  • @ChhaganCBhujbal या नावाने भुजबळांचं ट्विटर हँडल आहे. ट्विटरवर त्यांनी आतापर्यंत कुणालाही फॉलो केलेलं नाही.

  • पुण्यात 10 जूनला भाषण - पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे जाहीर भाषण करणार आहेत.

  • छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झाले आहे.

अंतिम लढतीत भारत कोरियाकडून पराभूत :
  • डोंगाई सिटी (कोरिया) : भारतीय महिला हॉकी संघाला जेतेपद राखण्यात अखेर अपयश आले. पाचव्या महिला आशियाई चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत रविवारी भारताला दक्षिण कोरियाविरुद्ध ०-१ ने पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण कोरियाने बचाव अभेद्य राखला. त्यांच्यातर्फे योंगसिल लीने २४ व्या मिनिटाला नोंदवलेला मैदानी गोल अखेर निर्णायक ठरला.

  • दक्षिण कोरियाने भारतीय बचाव फळीची सुरुवातीला चांगली परीक्षा घेतली. त्यांनी मधल्या फळीत चेंडूवर नियंत्रण राखत भारतावर दडपण आणले. भारतानेही त्यांना चोख उत्तर दिले. दक्षिण कोरियाला काही चांगल्या संधी मिळाल्या, पण सुरुवातीच्या १५ मिनिटांमध्ये गोलफलक कोराच होता.

  • कोरियाने त्यानंतर वर्चस्व गाजवत दोन मिनिटांमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले. भारतीय गोलकिपर सविताने चांगली कामगिरी करीत संघावरील संकट टाळले. कोरियाला अखेर २४ व्या मिनिटाला गोल नोंदवण्यात यश आले. मी ह्यून पार्कने उजव्या बाजूने बेसलाईनपासून चेंडूवर नियंत्रण राखत आगेकूच केली. तिने भारतीय गोलक्षेत्रात पास दिला आणि लीने दिशा देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला.

  • पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने लय गमावली. भारताने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण कोरियन खेळाडूंनी चांगला बचाव केला. कोरियाला ४३ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवण्याची संधी होती, पण मी ह्यून पार्कच्या फटक्यावर सविताने चांगला बचाव केला. कोरियाने त्याने एक मिनिटाने चौथा पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण सविताने त्यांना आघाडी वाढविण्याची संधी दिली नाही.

विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान :
  • विधानपरिषद निवडणूक - मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे.

  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक,  लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा समावेश आहे.

  • बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत - लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.

  • या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली.

  • त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला.

थॉमस, उबेर कपमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात :
  • बँकॉक : भारताला पुरुष व महिला विभागात युवा खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे रविवारी थॉमस व उबेर कप बॅडमिंटनमध्ये अनुक्रमे फ्रान्स व कॅनडाविरुद्ध १-४ अशा समान फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

  • त्यामुळे भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. भारतीय पुरुष संघाला जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील एच. एस. प्रणय आणि मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी न खेळण्याचा फटका बसला. भारताच्या युवा व अनुभवहीन संघाचा फ्रान्सच्या कमी मानांकन असलेल्या खेळाडूंविरुद्ध टिकाव लागला नाही. जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या बी. साई प्रणीतने ब्राईस लेवरडेजचा २१-७, २१-१८ ने पराभव करीत भारताला सकारात्मक सुरुवात करून दिली; पण अन्य खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दिवसाच्या दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेल्या एम. आर. अर्जुन

  • व रामचंद्र श्लोक यांना पुरुष दुहेरीमध्ये दडपण झुगारता आले नाही. त्यांना बास्टियान कारसौडी व ज्युलियन माइयो या जागतिक क्रमवारीतील ४७ व्या क्रमांकावरील जोडीविरुद्ध १३-२१, १६-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.

  • स्वीस ओपन चॅम्पियन समीर वर्मावर त्यानंतर भारताला पुनरागमन करून देण्याची जबाबदारी होती; पण जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानावर असलेला हा खेळाडू एकेरीच्या दुसºया लढतीत ४३ व्या स्थानावर असलेल्या लुकास कोर्वीविरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत १८-२१, २२-२०, १८-२१ ने पराभूत झाला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.

  • १९३२: अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

  • १९९१: पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली.

  • १९९४: ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

  • १९९६: सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

जन्म 

  • १९२३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २००३)

  • १९२८: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

  • १९३१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९१)

मृत्यू 

  • १९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९३)

  • १९९१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या. (जन्म: २० ऑगस्ट १९४४)

  • २०००: हर्बालाइफ कंपनी चे स्थापक मार्क आर. ह्यूजेस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९५६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.