चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ मे २०१९

Date : 21 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पुण्याचा निकाल दुपारी चापर्यंत स्पष्ट होणार :
  • पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी २१ फेऱ्या होणार असून दुपारी चापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटमधील (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) चिठ्ठय़ांची मोजणी होणार असल्याने अंतिम आकडेवारीसह प्रशासनाकडून निकाल जाहीर होण्यास थोडा अधिक कालावधी लागणार आहे.

  • पुणे जिल्ह्य़ातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या गुरुवारी (२३ मे) मतमोजणी होणार आहे. पुणे, बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य गोदाम, तर मावळ आणि शिरूरची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे.

  • मतमोजणीच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, पुणे मतदारसंघाच्या मतमोजणीच्या २१, बारामतीच्या २२, मावळच्या २५ आणि शिरूरच्या २७ फेऱ्या होणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, कर्जत आणि उरण या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधील मतमोजणी देखील बालेवाडी येथेच होणार आहे.

  • मावळच्या मतमोजणीसाठी १०० टेबल, शिरूरसाठी ८४, पुण्यासाठी ९६ आणि बारामतीच्या मतमोजणीसाठी १०६ टेबल असतील. पुण्यात एक हजार ९९७, बारामतीमध्ये दोन हजार ३७२, मावळमध्ये दोन हजार ५०४ आणि शिरूरमध्ये दोन हजार २९६ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदारसंघांच्या मतमोजणीची एक फेरी पूर्ण होण्यासाठी ३५ ते ४० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आणि शहर पोलीस विशेष शाखेचे उपआयुक्त मितेश घट्टे या वेळी उपस्थित होते.

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार महाविद्यालय बदलण्याची संधी :
  • मुंबई : येत्या सन २०१९-२०च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई विभागातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना यासाठी परवानगी द्यावी, असे आदेश मुंबई विभागाचे प्रभारी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिले आहेत.

  • इयत्ता अकरावीतून बारावीत जाताना विविध कारणांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलायची असते. मात्र, महाविद्यालयांकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांवर दबावही टाकला जातो. याबाबत विद्यार्थ्यांकडून शिक्षण विभागाकडे अनेकदा तक्रारीही करण्यात येत असतात.

  • काही विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे महाविद्यालय, शाखा बदलून मिळण्यासाठी परवानगी मागितली होती. या सर्वांची दखल घेत अहिरे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा बदलण्यास मान्यता दिली आहे.

१२ हजार भारतीय हज यात्रेकरूंच्या श्रेणीत बदल :
  • मुंबई : या वर्षी हज यात्रेसाठी नंबर लागलेल्या आणि मक्का मरहमच्या परिसरात निवासस्थान निश्चित झालेल्या जवळपास ११ हजार ९२९ भाविकांचा हज श्रेणीचा (कॅटेगिरी) प्रवास बदलण्यात आला आहे. त्यांना आता नॉन कुकिंग नॉन ट्रॅव्हल्स (एनसीएनटीझेड) श्रेणीतून वगळून त्यांचा समावेश अजेझिया या गटात करण्यात आलेला आहे. मक्कातील धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी आता त्यांना वाहनाचा वापर करावा लागणार आहे.

  • सौदी अरेबियाच्या दूतावासाने मक्का मुकरमा येथे अतिरिक्त घरांची मागणी नामंजूर केल्यामुळे जवळपास १२ हजार जणांची आता थोड्या दूरच्या ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे.

  • इस्लाम धर्मातील प्रमुख पाच तत्त्वांपैकी ‘हज यात्रा’ ही एक असून दरवर्र्षी सौदी अरेबियात भरत असते. त्यासाठी जगभरातील मुस्लीम बांधव लाखोंच्या संख्येने यात्रेत सहभागी होत असतात. भारतातील यात्रेकरूंसाठी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडून नियोजन केले जाते.

  • या वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी हज कमिटीची तयारी अंतिम टप्यात असून ‘एनसीएनटीझेड’ गटातून भरलेल्या १२ हजार यात्रेकरूंची नावे घरांच्या कमतरतेमुळे वगळण्यात आली. रविवारी त्याबाबतची यादी हज कमिटीच्या संकेतस्थळावर जाहीर झाली असून भाविकांनी त्याची दखल घेऊन संभ्रम दूर करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फॉर्म्युला वन चॅम्पिअन निकी लॉडा यांचे निधन :
  • तीन वेळा फॉर्म्युला वन चॅम्पिअन राहिलेले महान खेळाडू निकी लॉडा यांचे सोमवारी (दि.२०) निधन झाल्याचे वृत्त आहे, ते ७० वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते, लॉडा यांच्या कुटुंबियांच्या हवाल्याने एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत वृत दिले आहे.

  • शीतज्वराचा त्रास होऊ लागल्याने या वर्षी जानेवारी महिन्यात १० दिवसांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते किडनीच्या आजाराने अधिकच त्रस्त होते दरम्यान, सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • फॉर्म्युला वन (F1) स्पर्धेमध्ये त्यांनी तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. फेरारीसाठी १९७५, १९७७ आणि मॅकलॅरेनसाठी त्यांनी १९८४ मध्ये विजेतेपद पटकावले होते. १९७६मध्ये स्पर्धेदरम्यान लॉडा यांच्या कारला मोठा अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर मात्र, ते एअरलाइन आंत्रप्रन्युअर म्हणून नावारुपाला आले.

निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब :
  • लोकसभा निवडणुका संपताच वादग्रस्त ‘नमो टीव्ही’ हे चॅनल दूरचित्रवाणीवरुन गायब झालं आहे. ‘नमो टीव्ही’वरून केवळ भाजपाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जात होते. या चॅनलला भाजपाकडून निधी पुरवठा होत असल्याचा आरोप सातत्याने झाला होता. मात्र, लोकसभा  निवडणुकीचा प्रचार थांबताच या चॅनचलं प्रसारण देखील बंद झालं आहे.

  • लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हणजे २६ मार्च रोजी अचानक सुरू झालेलं हे चॅनल सुरूवातीपासूनच वादात अडकलं होतं. नमो टीव्हीवर केवळ भाजपाशी संबंधित कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणे व सभा दाखवल्या जात होत्या.

  • एप्रिल महिन्यात आयोगाने प्रचार थांबल्यावर म्हणजे मतदानाच्या ४८ तास आधी नमो टीव्हीवर रेकॉर्डेड शो दाखविण्यास मनाई केली. मात्र नमो टीव्हीला निवडणुकीचं थेट प्रक्षेपण दाखविण्यास परवानगी दिली होती. नमो टीव्हीवरील प्रसारणावर आयोगाने राज्य निवडणूक आयुक्तांना लक्ष ठेवण्याचे आदेशही दिले होते. तसेच या चॅनलेचे मॉनिटरींग करण्याचेही आदेश देण्यात आले होते. यापूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी विना परवानगी कोणताही कार्यक्रम नमो टीव्हीवर दाखविण्यास मनाई केली होती.

  • नमो टीव्ही भाजपा चालवत असून त्यामुळे या टीव्हीवरील सर्व रेकॉर्डेड कार्यक्रम विना परवानगी दाखविता येणार नाही, असं आयुक्तांनी म्हटलं होतं. परवानगी शिवाय दाखविण्यात येणारा सर्व कंटेन्ट या चॅनलवरून हटविण्याचे आदेशही देण्यात आले होते. याशिवाय काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे चॅनल बंद करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर आयोगाने नमो टीव्हीवरुन मंत्रालयाकडे अहवाल मागून एक नोटीस जारी केली होती. मात्र मतदान झाल्यानंतर हे चॅनल लगेचच अचानक गायब झाल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे.

राजीव गांधींची आज पुण्यतिथी; मोदींनी वाहिली श्रद्धांजली :
  • माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (दि.२१) पुण्यतिथी असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीर भूमी येथे जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

  • त्याचबरोबर युपीएच्या अध्यक्षा आणि राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, रॉबर्ट वढेरा तसेच इतर दिग्गज नेत्यांनीही राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८८१: वॉशिंग्टन (डी. सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली.

  • १९०४: पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना झाली.

  • १९२७: चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्याने जगातील पहिले  न थांबता अटलांटिक महासागर पार करणारे उड्डाण पूर्ण केले.

  • १९३२: अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

  • १९९१: पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली.

  • १९९४: ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

  • १९९६: सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

जन्म 

  • १९१६: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९७)

  • १९२३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २००३)

  • १९२८: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

  • १९३१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९१)

  • १९५८: भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर नइम खान यांचा जन्म.

  • १९६०: दक्षिण भारतीय अभिनेता मोहनलाल यांचा जन्म.

मृत्यू 

  • १४७१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १४२१)

  • १६८६: वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२)

  • १९७९: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९३)

  • १९९१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या. (जन्म: २० ऑगस्ट १९४४)

  • २०००: हर्बालाइफ कंपनी चे स्थापक मार्क आर. ह्यूजेस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९५६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.