चालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१८

Date : 21 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत, रशियामध्ये ५०० दशलक्ष डॉलरचा युद्धनौकाबांधणी करार :
  • भारत आणि रशिया यांच्यात मंगळवारी दोन युद्धनौकाबांधणीसाठी ५०० दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला. या नौकांची बांधणी गोवा येथील नौदल गोदीत करण्यात येणार आहे. तसेच रशिया त्यांच्या बांधणीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.

  • गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) आणि रशियाची रोझोबोरॉनएक्स्पोर्ट यांच्यात हा ५०० दशलक्ष डॉलरचा करार झाला. त्यानुसार रशिया भारताला दोन युद्धनौकाबांधणीसाठी तंत्रज्ञान आणि सामग्री पुरवणार आहे, असे जीएसएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर मित्तल यांनी सांगितले.

  • या नौकांच्या बांधणीला २०२० मध्ये सुरुवात होईल. त्यातील पहिली युद्धनौका २०२६ साली आणि दुसरी नौका २०२७ साली तयार होईल. या तलवारवर्गातील स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित फ्रिगेट प्रकारच्या युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे बसवण्यात येतील.

दुसऱ्या टप्प्यात ७२ टक्के विक्रमी मतदान :
  • रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान शांततेत पार पडलं. दुसऱ्या टप्प्यात एकूण 71.93 टक्के मतदान झालं आहे. 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

  • दुसऱ्या टप्प्यात एकूण 19 जिल्ह्यांतील 72 जागांसाठी मतदान पार पडलं. एक हजारापेक्षा जास्त उमेदवार यावेळी रिंगणात आहे. छत्तीसगडच्या सत्तारुढ भाजप मंत्रिमंडळातील नऊ मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं आहे.

  • 72 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी 72 उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय आप (68), जनता काँग्रेस (अजित जोगी) (47), आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) (40), बसप (27), इतर (229), अपक्ष (493) उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 1 हजार 79 उमेदवार रिंगणात असून यामध्ये 111 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

  • पहिल्या टप्प्यात 90 पैकी 18 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. नक्षलग्रस्त भागातील आठ जिल्ह्यात मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह 190 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.

अमेरिकेचा पाकला दणका, १.६ अब्ज डॉलरची मदत रोखली :
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले असतानाच अमेरिकेने पाकची आर्थिक कोंडी केली आहे. पाकिस्तानला सुरक्षेसाठी दिली जाणारी १.६ अब्ज डॉलरची मदत थांबवण्यात आल्याची माहिती पेंटागॉनने दिली आहे.

  • काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओसामा बिन लादेनवरुन त्यांनी पाकला फटकारले होते. लादेन हा पाकिस्तानमध्ये होता. पाकिस्तानमधील लष्करी अकादमीच्या बाजूलाच लादेन राहायचा. तो पाकमध्ये असल्याचे बहुधा सर्वांनाच माहित असावे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. आम्ही पाकिस्तानला वर्षाला १.३ अब्ज डॉलरची मदत केली. पण ही मदत आम्ही बंद केली असून पाकिस्तान आमच्यासाठी काहीच करत नाही, अशी टीका ट्रम्प यांनी केली होती.

  • या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेतील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल रॉब मॅनिंग यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, पाकिस्तानला दिली जाणारी १.६ अब्ज डॉलरची मदत थांबवण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील त्यांनी दिलेला नाही.

  • ओबामा यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मध्य आशिया या विभागात कार्यरत असलेले डेव्हिड सिडनी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यातून अमेरिका किती वैतागली आहे हे दिसते. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतलेली नाही. अमेरिकेसाठी हीच चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानचे नेते सहकार्याचे आश्वासन देतात. पण आश्वासनापलीकडे ते काहीच करत नाही. त्यामुळेच ट्रम्प आणि अमेरिकेचे नागरिक आता वैतागले आहेत, असे त्यांनी सांगितले.

मेरी कोमची बॉक्सिंग विश्वावर 'सत्ता' :
  • नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमची बॉक्सिंग विश्वावर 'सत्ता' असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सध्या महिला विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा सुरु आहे आणि या स्पर्धेत मेरीने आपल्या नावावर पदक निश्चित केले आहे. या स्पर्धेतील हे मेरीचे आतापर्यंचे सातवे पदक ठरणार आहे.

  • मेरीने ४८ किलो वजनी गटामध्ये विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील मेरीचे पदक पक्के झाले आहे.

  • विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत मेरीने आतापर्यंत तब्बल पाच वेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मेरीने कांस्यपदक पटकावले होते.

सुश्मिता सेनला प्राप्तिकर प्रकरणात दिलासा; न्यायाधिकरणाचा निवाडा :
  • मुंबई : एखाद्या व्यक्तीस लैंगिक छळाबद्दल मिळालेली भरपाईची रक्कम उत्पन्नात मोडत नाही. त्यामुळे अशा रकमेवर प्राप्तिकरही लागू होत नाही, असा निवाडा देत प्राप्तिकर अपिली न्यायाधिकरणाने चित्रपट अभिनेत्री व मॉडेल सुश्मिता सेन हिला गेली १५ वर्षे सुरु असलेल्या वादात दिलासा दिला आहे.

  • सन २००२-०३ मध्ये सुश्मिता सेनला कोका कोला कंपनीकडून १.४५ कोटी मिळाले. पुढील वर्षाचे प्राप्तिकराचे रिटर्न भरताना सुश्मिताने ५० लाख रुपये उत्पन्नात दाखविले. कर निर्धारण अधिकाऱ्याने रिटर्न अमान्य करून प्राप्तिकर भरायला सांगण्याखेरीज सुश्मिताला ३५ लाखांचा दंडही लावला.

  • याविरुद्ध सुश्मिताने केलेल्या अपिलावर प्राप्तिकर अपिली न्यायाधीकरणाच्या शक्तिजीत डे व मनोज कुमार अगरवाल यांच्या खंडपीठाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला. संबंधित वर्षातील जास्तीची करआकारणी व दंड रद्द केला.

  • १.५० कोटीपैकी एक कोटी दिल्यावर तिने कराराचे पालन करत नसल्याचा आरोप करून कंपनीने करार एकतर्फी रद्द केला. एक कोटी रुपये परत करण्याची मागणी केली. सुश्मिताने प्रमोशनचे काम करताना कोका कोला कंपनीच्या अधिका-याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला व यामुळेच काम बंद केल्याचे सांगितले. कालांतराने दोघांत समेट झाला. कंपनीने तिला दिलेले एक कोटी परत मागण्याऐवजी उलट तिलाच १.४५ कोटी देऊन प्रकरण मिटवले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली करू शकतो दोन पराक्रम, जाणून घ्या :
  • ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे घट्ट समिकरण बनलेलं आहे. कोहलीने एखादी खेळी केली अन् विक्रम झाला नाही तर नवल. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला अपयश आले असले तरी कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे.

  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही चाहत्यांना कोहलीकडून दमदार फटकेबाजीची अपेक्षा आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर कोहली कोणते विक्रम करतो हे मालिका संपल्यानंतर कळेलच, परंतु त्याला दोन मोठे पराक्रम करण्याची संधी आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना आज ब्रिस्बेन येथे होणार आहे. 

  • या दौऱ्यात कोहली सर्वात जलद 19000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज बनू शकतो. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोऱ्याने धावा केल्या आहेत. याची प्रचिती आफ्रिका व इंग्लंड दौऱ्यावर आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 19000 धावा करण्यासाठी 335 धावांची गरज आहे. त्याने हा पल्ला सर केला, तर सर्वात जलद 19000 धावा करण्याची विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल. अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतरचा तिसरा भारतीय, तर एकंदर 12 वा फलंदाज ठरणार आहे.

  • वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत कोहलीने सर्वात जलद वन डेतील 10000 धावांचा विक्रम केला होता. त्याने तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. याशिवाय कोहलीच्या नावावर सर्वात जलद 15000, 16000, 17000 आणि 18000 आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम आहे. 

१५४ उपनिरीक्षकांना अखेर नियुक्ती मिळाली :
  • मुंबई : सरळ सेवेतून उत्तीर्ण होऊन, नऊ महिने प्रशिक्षण घेऊनही मूळपदावर गेलेले राज्यातील 154 मागासवर्गीय पोलीस उपनिरीक्षक मानाने सेवेत परतले आहेत. गृहविभागाच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांना नियुक्तीपत्र दिलं आहे. लवकरच ते नियुक्तीस्थळी रुजू होतील. त्यामुळे या 154 मागासवर्गीय पीएसआयना अखेर पद आणि प्रतिष्ठा मिळाली आहे.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण - 5 ऑक्टोबर रोजी या सगळ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पासिंग आऊट परेडही पार पडली. परंतु पदोन्नतीमधील आरक्षण बेकायदेशीर असल्याचं सांगत शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मॅटने या 154 पीएसआयची नियुक्ती रोखून त्यांना मूळपदावर पाठवलं होतं.

  • यानंतर संबंधित 154 जणांनी मॅटमध्ये फेरविचार याचिका दाखल केली. यावर पुन्हा सुनावणी घेत मॅटने 6 नोव्हेंबर रोजी 154 पीएसआयना दिलासा दिला आणि त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देणारी याचिका फेटाळली. त्यामुळे या 154 जणांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र तरीही या पीएसआयच्या नियुक्तीमध्ये अडथळे येत होते. अखेर जवळपास दीड महिन्यांच्या प्रयत्नांनंतर त्यांना नियुक्ती मिळाली आहे.

  • मॅटचा निर्णय - सर्वोच्च न्यायालयाच्या 26 सप्टेंबर 2018 रोजी जर्नेल सिंह केस आणि इंद्रा श्वानी प्रकरणात दिलेल्या आदेशाचा दाखला देत, सरकारी नोकरीतील एससी/एसटीच्या घटनात्मक आरक्षणाला बाधा पोहोचवता येणार नाही, असं सांगत मॅटने विरोधी याचिका फेटाळली.

  • "सरकारच्या म्हणण्यानुसार संबंधित परीक्षेसाठी फक्त 828 जागा मंजूर आहेत. त्यातील राखीव 154 जागांऐवजी, खुल्या प्रवर्गातील आणि याचिकाकर्त्यांपेक्षा जास्त गुण असलेले 154 उमेदवार आधीच प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. 154 राखीव प्रवर्गातील उमेदवारांना याचिकाकर्त्यांपेक्षा कमी गुण जरी असले तरी त्यांची नियुक्ती राखीव प्रवर्गातून झाली आहे. म्हणूनच 154 राखीव जागेवरील उमेदवार कमी केल्यानंतरही त्यांच्या जागा भरण्यासाठी आवश्यक 154 उमेदवार आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा संबंधित जागेसाठी विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचिकाकर्त्यांनी त्यांना विचारात घेऊन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्त करुन ट्रेनिंगला पाठवण्यासाठी केलेली मागणी ही मुळातच काल्पनिक आणि तथ्यहीन आहे," असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

  • "सुप्रीम कोर्टाच्या 29 सप्टेंबर 2018 च्या आदेशाआधी या 154 जणांवर अनिश्चिततेचं सावट होतं, परंतु जर्नेल सिंह प्रकरणात दिलेल्या आदेशामुळे ही अस्थिरताही आता राहिलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने जर्नेल सिंह प्रकरणातील आदेशाला बांधील राहून पावलं उचलावीत," असे निर्देशही मॅटने दिले होते.

दिनविशेष :
  • जागतिक टेलीव्हिजन दिन

महत्वाच्या घटना 

  • १८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

  • १९११: संसदेच्या निवडणुकीत  उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

  • १९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

  • १९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

  • १९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

  • १९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

  • १९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.

  • १९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

जन्म 

  • १६९४: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १७७८)

  • १८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)

  • १९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

  • १९२६: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)

  • १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)

  • १९८७: भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

  • १९६३: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२)

  • १९७०: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)

  • १९९६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)

  • १९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

  • २०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.