चालू घडामोडी - २१ ऑक्टोबर २०१८

Date : 22 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुमीत मलिक उपांत्य फेरीत :
  • जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या सुमीत मलिकने उपांत्य फेरीत धडक मारत त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. मात्र सोनबा गोगानेला पराभव पत्करावा लागला.

  • राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या सुमीतने १२५ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या इन्कार येरमुकांबेत याला ६-१ ने पराभूत केले. त्याआधी त्याने जपानच्या ताइकी यामामोटोवर ४-१ अशी मात केली होती. दरम्यान, राशीदोव्ह गाझीमुरादशीने गोगानेला १०-० असे हरवले.

पोलीस शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान भावूक; राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे केलं उद्घाटन :
  • राष्ट्रीय पोलीस दिवसानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते झाले. यावेळी निमलष्करी दलाच्या जवानांच्या शौर्याची आठवण काढताना ते काही क्षण भावूक झाले. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

  • २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत लडाख येथील हॉट स्प्रिंगमध्ये शहीद झालेल्या आपल्या निमलष्करी दलाच्या १० जवानांच्या आठवणीसाठी पोलीस स्मारक दिवस पाळला जातो. दरम्यान, नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथे राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मोदींनी शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव केला.

  • मोदी म्हणाले, आजचा दिवस त्या साहसी पोलीस जवानांच्या वीरगाथेला स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्या जवानांनी लडाखच्या बर्फाळ डोंगरांमध्ये पहिल्यांदा देशाच्या संरक्षणाचे काम करताना आपले सर्वोच्च बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत कर्तव्याच्या मार्गावर चालणाऱ्या जवानांना माझे नमन.

शबरीमाला वाद आणि #MeToo मोहिमेवर रजनीकांत यांनी प्रतिक्रिया :
  • चेन्नई : प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी शबरीमाला मंदिर वादाबद्दल आणि 'मी टू' मोहिमेबद्दल आपली भूमिका मांडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली शबरीमाला मंदिरातील परंपरांमध्ये कोणीही हस्तक्षेप केला नाही पाहिजे, असं मत रजनीकांत यांनी व्यक्त केलं.

  • शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर जोरदार आंदोलनं होत आहेत. "प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी मिळायला हवी याबद्दल दुमत नाही. जेव्हा आपण एखाद्या मंदिराबाबत विचार करतो, त्यावेळी त्या मंदिराच्या काही चालीरिती, परंपरा असतात. ज्यांचं अनेक वर्षांपासून पालन केलं जात असतं. त्यामुळे अशा कोणत्यांही परंपरांमध्ये कोणीही हस्तक्षेप करायला नको, असं माझं नम्र मत आहे", असं रजनीकांत म्हणाले.

  • सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या शबरीमाला मंदिर प्रवेशाबद्दल दिलेल्या आदेशाचा मान राखला पाहिजे. मात्र दुसरीकडे मंदिराच्या परंपराही राखल्या जाणं गरजेचं असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलं.

  • शबरीमाला मंदिरात विराजमान अयप्पा स्वामी यांना ब्रम्हचारी मानलं जातं. मासिक पाळीमुळे 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात अनेक वर्षांपासून प्रवेश करण्यास मनाई आहे. ही प्रवेशबंदी सर्वोच्च न्यायालयानं उठवली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं होतं आहेत.

तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा :
  • औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामे देत असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी उच्च शिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.

  • मागील तीन वर्षांपासून सतत मागणी करूनही एकाही पदाला मंजुरी दिली नाही. याच वेळी राज्यातील विविध भागांतील अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांनी बाटूची संलग्नता स्वीकारली.

  • सध्या बाटूकडे १०८ महाविद्यालये संलग्न आहेत. मात्र, या महाविद्यालयांना सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेले विभागीय केंद्र, उपकेंद्रांची स्थापना केली नाही. एकाही ठिकाणी जागा मिळालेली नाही. यातच कुलसचिव असलेले डॉ. सुनील भांबरे यांची नियुक्ती पेन येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी केली. तेव्हा डॉ. भांबरे यांच्याकडे प्राचार्य आणि कुलसचिवपदाची जबाबदारी ठेवण्याची विनंती कुलगुरू डॉ. गायकर यांनी उच्च शिक्षण विभागाला केली. मात्र, ही विनंती धुडकावून लावण्यात आली. यामुळे निराश झालेल्या कुलगुरूंनी थेट राजीनामाच दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • बाटू विद्यापीठ नवीन असून, विविध पदांना मंजुरी देण्याची घोषणा उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती, परंतु विद्यमान स्थितीत एकही अधिकारी पूर्णवेळ नाही.

  • मी राजीनामा दिला आहे. माझा कोणावरही आक्षेप नाही. अडचणींचा सामना करीत आतापर्यंत कारभार केला. मात्र, आता शक्य नसल्यामुळे बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

‘आयडॉल’ प्रवेशासाठी ३० आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ :
  • मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेमधील (आयडॉल) प्रवेशप्रक्रियेला यंदा पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार आहे. ‘आयडॉल’ प्रवेशासाठी २० आॅक्टोबर ही शेवटची तारीख विद्यापीठाने जाहीर केली होती. मात्र, काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल उशिराने लागल्यामुळे त्यांनाही प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी आयडॉल प्रवेश निश्चितीसाठी ३० आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • पदवी स्तरावरील बीए, बीकॉम, बीएससी (आयटी), बीएससी (कम्प्युटर सायन्स), एमए, एमए (एज्युकेशन), एमकॉम, एमएससी (गणित, आयटी, कॉम्प्यूटर सायन्स), द्वितीय व तृतीय वर्ष एमसीए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ असेल. आतापर्यंत आयडॉलमध्ये ६२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात हा आकडा ६८,५६८ एवढा होता. म्हणजे यंदा चौथ्यांदा मुदतवाढ देऊनही आयडॉलला अद्याप गेल्या वर्षीचा आकडा गाठता आलेला नाही.

  • ‘निकाल लवकरच जाहीर करणार’ आयडॉलचे बीएससी (आयटी) विषयाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. या परीक्षा आॅगस्टमध्ये झाल्या आहेत. परीक्षा होऊन ६५ दिवस उलटूनही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाशी संपर्क साधला असता, येत्या २ ते ३ दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल, तसेच आवश्यक तेव्हा प्रवेशासाठी आता जाहीर केली, तशी मुदतवाढ देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांनी दिली.

दिनविशेष :
  • भारतीय पोलीस स्मृती दिन

महत्वाच्या घटना 

  • १८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.

  • १९३४: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.

  • १९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.

  • १९४३: सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.

  • १९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

  • १९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.

  • १९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.

  • १९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.

  • १९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

  • १९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

जन्म 

  • १८३३: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)

  • १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)

  • १९१७: गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)

  • १९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १४२२: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)

  • १८३५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १७७५)

  • १९८१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)

  • १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)

  • १९९५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९२५)

  • २०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)

  • २०१२: चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.