चालू घडामोडी - २१ सप्टेंबर २०१८

Date : 21 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विराट कोहली, मीराबाई चानू यांना 'राजीव गांधी खेलरत्न' जाहीर :
  • नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट आणि मीराबाई यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदाचा 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' जाहीर केला आहे.

  • खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, एशियाड सुवर्णविजेती नेमबाज राही सरनोबत, थाळीफेकपटू नीरज चोप्रा यांचा अर्जुन पुरस्कारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

  • दादू चौगुले यांनी कुस्ती प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात येईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार, 25 सप्टेंबर रोजी खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन, ध्यानचंद या पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल.

  • विराट हा 'खेलरत्न' पटकवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी 1997 साली सचिन तेंडुलकर आणि 2007 साली महेंद्रसिंग धोनी यांना 'खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गेली दोन वर्ष विराटची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येत होती.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेट्रोने प्रवास :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नुकताच मेट्रोन प्रवास केला. नरेंद्र मोदींनी एअरपोर्ट एक्स्प्रेस मेट्रोने प्रवास केला. धौला कुआ ते द्वारकादरम्यान त्यांनी हा प्रवास केला. तिथे त्यांनी इंडिया इंटरनॅशनल कन्वेंशन अॅण्ड एक्स्पो सेंटरचं भूमीपूजन केलं. याआधीही नरेंद्र मोदींनी अनेकदा मेट्रोने प्रवास केला आहे.

  • सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवास १८ मिनिटांचा होता. मेट्रोमध्ये नरेंद्र मोदींना पाहिल्यानंतर प्रवासी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. नरेंद्र मोदींनीही प्रवासादरम्यान काही प्रवाशांसोबत बातचीत केली.

  • याआधीही नरेंद्र मोदींनी अनेकदा मेट्रोने प्रवास केला आहे. याचवर्षी जुलै महिन्यात नोएडा येथे सॅमसंगच्या प्लांटचं उद्धाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी मेट्रोने नोएडाला पोहोचले होते.

  • 14 सप्टेंबरला नरेंद्र मोदींचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता. स्वच्छता श्रमदानासाठी जात असताना जाणाऱ्या मार्गावर कोणतीही विशेष व्यवस्था किंवा बॅरिअर लावले नसल्याने मोदींचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला होता. जाणाऱ्या मार्गावर कोणतीही विशेष व्यवस्था नसतानाही नरेंद्र मोदी ताफ्यासहित स्वच्छता श्रमदानासाठी निघाले होते. त्याआधी सकाळी नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाला सुरुवात केली. वाहतूक कोंडीतून सुटल्यानंतर मोदींनी पहाडगंज येथील बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या आवारात साफसफाई केली होती.

मोदींचं कौशल्य छत्रपती शिवरायांप्रमाणे: योगी आदित्यनाथ :
  • लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. योगींनी सर्जिकल स्ट्राईकची तुलना शिवाजी महाराजांचं युद्धकौशल्य, गनिमीकाव्याशी केली. लखनऊमधील कुर्मी पटेल संमेलनात ते बोलत होते.

  • योगी म्हणाले, “औरंगजेबने उन्माद माजवला होता, त्यावेळी त्याला भारत मातेचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नतमस्तक होण्यास भाग पाडलं होतं. औरंगजेबचा सेनापती अफजल हा अनेकवेळा शिवाजी महाराजांना भेटू इच्छित होता. मात्र त्याचा हेतू शिवाजी महाराजांनी ओळखला होता. तो शिवाजी महाराजांची हत्या करणार होता. मात्र महाराजांनी त्याचा हा डाव उलटवला होता. महाराजांप्रमाणेच मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. चीनही अनेकवेळा घुसखोरी करतंय. पण मोदी सरकारमध्ये त्यांना मागेच हटावं लागतं”

  • यावेळी योगींनी मोदींच्या राजकीय निर्णयांचं स्वागत केलं. “देशाचा संक्रमण काळ सुरु आहे.मोदींच्या नेतृत्त्वात देश आर्थिक महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र त्याचवेळी समाजकंटकांकडून देशात जाती, भाषा, प्रांताच्या आधारे नक्षलवाद आणि माओवादाला चालना देण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशात राजकीय अस्थिरता निर्माण करणाऱ्यांना आपण 2019 ला पुन्हा उत्तर देऊ. आज जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान उंचावली”, असं योगी म्हणाले.

  • दरम्यान, योगींनी कुर्मी पटेल संमेलनात काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेसने सरदार पटेलांचा अपमान केला, तर भाजपने त्यांचा सन्मान केला असं योगी म्हणाले.

भारतासह पाच देशांत ५९% दहशतवादी हल्ले, अमेरिकेचा अहवाल :
  • वॉशिंग्टन : जगभरात २०१७ साली झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे आशियातील भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, फिलिपाईन्स या पाच देशांमध्ये झाले. मात्र, २०१७ मध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले असून, त्यामुळे हल्ल्यांतील बळींचे प्रमाणही घटले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

  • अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या दहशतवादविरोधी विभागाने गेल्या वर्षी जगभरात झालेल्या दहशतवादी कारवायांसंदर्भातअहवाल तयार केला आहे. त्या विभागाचे प्रवक्ते नाथन सॅलेस यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जगातील १०० देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले.

  • या हल्ल्यांतील ७० टक्के बळी हे अफगाणिस्तान, इराक, नायजेरिया, सोमालिया, सिरिया या पाच देशांमध्ये गेले आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी लढा सुरू ठेवला असला तरी इसिस, अल कायदा व त्यांच्याशी संलग्न गट, संघटना यांचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य झालेले नाही.

  • इसिसपासून प्रेरणा घेऊन; पण कधीही सिरिया किंवा इराकमध्ये न जाताही विविध ठिकाणचे तरुण दहशतवादाकडे वळत आहेत. बर्लिन, बार्सिलोना, लंडन, मारावी, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी अशी उदाहरणे २०१७ साली पाहायला मिळाली, असे अहवाल म्हणतो.

  • दहशतवादाविरोधात कठोर कारवाईबद्दल भारताची अमेरिकेने प्रशंसा केली. दहशतवादी पाकिस्तानी भूमीचा वापर करून भारतात हल्ले करीत आहेत. त्यांना रोखण्यासाठी भारताने अमेरिका व समविचारी देशांची मदत घेतली आहे. भारतातील नक्षलग्रस्त भाग, जम्मू-काश्मीर व ईशान्येकडील राज्यांत दहशतवादी कारवाया सुरूच असतात, असा उल्लेख आहे.

दिनविशेष :
  • जागतिक अल्झेमर्स दिन / आंतरराष्ट्रीय शांतता दिन

महत्वाच्या घटना

  • १९६४: माल्टा हा देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.

  • १९६५: गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

  • १९६८: रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.

  • १९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

  • १९७६: सेशेल्स देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

  • १९८१: बेलिझे देश युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाला.

  • १९८४: ब्रुनेई देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

  • १९९१: आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.

जन्म

  • १८६६: विज्ञान कथा इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६)

  • १८८२: भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९५३)

  • १९०२: पेंग्विन बुक्स चे संस्थापक ऍलन लेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७०)

  • १९०९: घाना देशाचे पहिले अध्यक्ष घवानी एनक्रमाह यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९७२)

  • १९२९: शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)

  • १९३९: भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचा जन्म.

  • १९४४: चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म.

  • १९६३: वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रोस यांचा जन्म.

  • १९७९: जमैकाचा क्रिकेटपटू ख्रिस गेल यांचा जन्म.

मृत्यू

  • १७४३: जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)

  • १९८२: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन. (जन्म: २१ जून १९२३)

  • १९९८: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९५९)

  • २०१२: पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.