चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ एप्रिल २०१९

Date : 22 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताला घ्यावी लागणार फ्रान्सच्या दोन सरकारी कंपन्यांची हमी :
  • नवी दिल्ली : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात रिअ‍ॅक्टरच्या उभारणीच्या कामाचे कंत्राट मिळालेली फ्रान्सची कंपनी ईडीएफने म्हटले आहे की, या योजनेच्या आर्थिक मदतीसाठी भारताला फ्रान्सच्या दोन अन्य सरकारी कंपन्यांची सार्वभौम हमी घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील जैतापूरमध्ये ईडीएफचा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प असेल.

  • जैतापूरमधील या प्रकल्पात १६५०- १६५० मेगावॅटचे सहा अणुऊर्जा रिअ‍ॅक्टर असतील. कंपनीने मागील वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय अणुऊर्जा मंडळाला (एनपीसीआयएल) एक प्रस्ताव दिला होता. एनपीसीआयएल ही ऊर्जा विभागाच्या अंतर्गत काम करणारी एक सरकारी कंपनी आहे. ही देशात २० अणू रिअ‍ॅक्टरचे संचलन करते.

  • सूत्रांनी सांगितले की, भारताने अद्यापही कंपनीच्या प्रस्तावावर उत्तर दिले नाही. ईडीएफचे वरिष्ठ उपाध्यक्ष विकास रामने यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, या योजनेचा एकूण खर्च गोपनीय आहे. त्यामुळे तो सार्वजनिक केला जाऊ शकत नाही.

  • या योजनेसाठी ईडीएफ कंपनी केवळ ईपीआर (युरोपीय प्रेसराइज्ड रिअ‍ॅक्टर) तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. ती या कंपनीत गुंतवणूक करणार नाही. रामने यांनी सांगितले की, एनपीसीआयएल आणि अन्य या योजनेसाठी अर्थसाहाय्य करतील.

काँग्रेसकडून लोकांचा विश्वासघात - पंतप्रधान मोदी :
  • देशाच्या वृद्धीची क्षमता आणि त्याची संसाधने यांच्याबाबत अन्याय करून काँग्रेसने लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानमधील निवडणूक प्रचारसभेत केला.

  • स्वातंत्र्यानंतर लोकांनी पाच दशके काँग्रेसवर विश्वास ठेवला, पण या पक्षाने लोकांचा विश्वासघात केला. देशातील संसाधने आणि क्षमता याबाबत अन्याय करण्यात आला. काँग्रेसने मतपेढीचे राजकारण केले आणि सत्तेचा वापर आपली तिजोरी भरण्यासाठी केला, असे राजस्थानच्या चित्तोडगड मतदारसंघातील प्रचारसभेत मोदी म्हणाले.

  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्याच काळात ज्या लहान राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले, त्यांनी भारतापेक्षा बरीच प्रगती केली आहे, असा दावा मोदी यांनी केला. काँग्रेसचे आचरण आणि संस्कृती यांमध्ये तीन गोष्टी आहेत व त्या म्हणजे नामदार परिवार (राजघराण्याचे कुटुंब), भ्रष्टाचार आणि भरपूर खोटी आश्वासने, अशी टीका मोदी यांनी केली.

  • आपल्या सरकारने पाच वर्षांमध्ये यंत्रणा (सिस्टिम) बदलली असून, लोकांसाठी अनेक योजना व कार्यक्रम सुरू करून त्यांची यशस्वी अंमलबजावणीही करण्यात आली आहे आणि त्यांच्यामुळे लोकांना फायदा झाला आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला.

जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत कागदपत्रांचे पाकिस्तानात प्रदर्शन :
  • जालियनवाला बाग हत्याकांडाच्या १०० व्या स्मृतीदिनानिमित्त पाकिस्तानने इतिहासात पहिल्यांदाच या हत्याकांडाबाबतच्या दुर्मीळ कागदपत्रांचे प्रदर्शन भरवले आहे.

  • जालियनवाला बाग नरसंहार आणि पंजाबमध्ये एप्रिल १९१९ मध्ये लागू करण्यात आलेला मार्शल लॉ यांच्याशी संबंधित सुमारे ७० ऐतिहासिक दस्ताऐवज असलेले सहा दिवसांचे हे प्रदर्शन येथील लाहोर हेरिटेज म्युझियममध्ये शनिवारी सुरू झाले. एका वर्षांपूर्वी पाकिस्तानने क्रांतिकारी नेते शहीद भगतसिंग यांच्या खटल्याशी संबंधित पुराभिलेखांचे प्रदर्शन भरवले होते.

  • निरनिराळ्या ऐतिहासिक घटना आणि प्रख्यात व्यक्तिमत्त्वे यांचे पुराभिलेख प्रदर्शित करण्याचे सरकारने ठरवले आहे, जेणेकरून त्या काळात काय घडले हे लोकांना कळावे, असे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतिक सरकारच्या पुराभिलेख विभागाचे संचालक अब्बास चुगताई यांनी पीटीआयला सांगितले.

  • जालियनवायाला बाग नरसंहाराचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी पुराभिलेखातील कागदपत्रे प्रदर्शित करण्यात आली असून, आगामी काळातही ही प्रथा सुरू राहील. यानंतर रुडयार्ड किपलिंग यांच्या साहित्याशी संबंधत कागदपत्रे प्रदर्शित करण्याचेही नियोजन आम्ही करत आहोत, असे चुगताई म्हणाले.

तिसऱ्या टप्प्यात निम्म्यांपेक्षा जास्त जागा भाजपकडे :
  • तिसऱ्या टप्प्यात येत्या मंगळवारी देशातील ११५ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यापैकी निम्म्यांपेक्षा जास्त म्हणजे ६२ मतदारसंघांत भाजपचे सध्या खासदार आहेत. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकावर भाजपची तर केरळवर काँग्रेसची मदार आहे.

  • लोकसभेच्या १८८ मतदारसंघांत दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात गुजरात (२६) आणि केरळ (२०) एकाच वेळी सर्व मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, आसाम, छत्तीसगड, गोवा, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमध्ये मतदान होत आहे.

  • भाजपची सारी मदार ही गुजरातवर आहे. गेल्या वेळी गुजरातमधील सर्व २६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदाही गुजरातमध्ये गेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याची भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या वेळी मोदी हे बडोदा मतदारसंघातून लढले होते. यंदा लालकृष्ण अडवाणी यांना डावलून भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

  • दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा टक्कर दिली होती. याच धर्तीवर भाजपला रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सौराष्ट्रात काँग्रेसला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले होते. यातूनच सौराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. अगदी विरोधी पक्षनेते परेश धमानी यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

राज्यात १४ जागांसाठी उद्या मतदान :
  • लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या. राज्यातील जालना, बारामती, अहमदनगर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग आदी १४ मतदार संघात तब्बल २४९ उमेदवार आपले राजकीय भाग्य आजमावणार असून मंगळवारी २३ जानेवारी या ठिकाणी मतदान होणार आहे.

  • या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या शक्तिमान नेत्यांचे राजकीय कौशल्य या निवडणुकीत पणाला लागल्याने मुलांच्या लढाईत बापांची परीक्षा म्हणून तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

  • राज्यातील पहिल्या दोन टप्प्यात १७ मतदार संघातील निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील अनेक मतदार संघातील लढती या चुरशीच्या होणार असल्याने मतदानाच्या दिवशी या सर्वच मतदार संघात चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश आयोगाने दिल्याचे सांगितले जात आहे. तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून रविवारी संध्याकाळी तेथील प्रचाराच्या तोफा थंडावल्या.

  • भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे, सुजय विखे पाटील, निलेश राणे निवडणुकीच्या आखाडय़ात उतरल्याने त्यांच्या पालकांचे राजकीय कौशल्य पणाला लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे साम्राज्य खालसा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींनी गेल्या १५ दिवसात प्रचारसभांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र ढवळून काढला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर पश्चिम महाराष्ट्रातच तळ ठोकून आहेत.

  • तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सभांच्या माध्यमातून पंतप्रधान आणि भाजपला लक्ष्य केल्याने पश्चिम महाराष्ट्रात कोण बाजी मारते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच अहमदनगर, हातकणंगले, बारामती, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी- सिंधुदुर्ग या मतदार संघातील मतदान चुरशीचे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

औद्योगिक दुर्घटनांमुळे जगात दरवर्षी २७ लाख लोकांचा मृत्यू- संयुक्त राष्ट्रे :
  • संयुक्त राष्ट्रे : हजारो लोकांना मृत्यूच्या खाईत ढकलणारी १९८४ ची भोपाळ गॅस दुर्घटना जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटनांपैकी एक आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, दरवर्षी औद्योगिक दुर्घटना आणि अशा कामांमुळे होणारे आजार यामुळे २७.८ लाख लोकांचा मृत्यू होतो.

  • संयुक्त राष्ट्रांची कामगार एजन्सी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून (आयएलओ) जारी अहवालात म्हटले आहे की, मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये युनियन कार्बाईडच्या प्रकल्पात मिथाईल आयसोसायनेट गॅस गळतीचा ६ लाखांहून अधिक मजूर आणि आजूबाजूचे लोक यांना फटका बसला.

  • सरकारी आकड्यांनुसार १५ हजार लोकांचा मृत्यू झाला. विषारी कण आजही आहेत. हजारो पीडित आणि त्यांची पुढील पिढी श्वसनसंबंधी आजारांशी संघर्ष करीत आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, १९१९ नंतर भोपाळ दुर्घटना ही जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनांपैकी एक होती. १९१९ नंतरच्या अन्य मोठ्या औद्योगिक दुर्घटनात चेर्नोबिल आणि फुकुशिमा अणू प्रकल्प दुर्घटना यासह राणा प्लाजा इमारत कोसळल्याची घटना यांचा समावेश आहे. मात्र भोपाळमधील दुर्घटनेचे परिणाम आजही जाणवत आहेत. (वृत्तसंस्था)

  • मृत्यूचे कारण तणाव, कामाचे तास अधिक दरवर्षी या औद्योगिक घटनांशी संबंधित मृत्यूंचे कारण तणाव, कामाचे अधिक तास आणि आजार हे आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मनाल अज्जी यांनी सांगितले की, या अहवालात म्हटले आहे की, ३६ टक्के कामगार खूप तास काम करतात.

झिलीने भारताचे पदकांचे खाते उघडले :
  • भारताच्या झिली दालाबेहेराने आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले. झिलीने ४५ किलो वजनी गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. मात्र माजी विश्वविजेत्या मिराबाई चानूचे ४९ किलो वजनी गटातील कांस्यपदक तांत्रिक नियमामुळे थोडक्यात हुकले.

  • कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या झिलीने या स्पर्धेतदेखील दमदार कामगिरीची नोंद केली. झिलीने स्नॅचमध्ये ७१ किलो तर क्लिन अँड जर्क प्रकारात ९१ किलो असे एकूण १६२ किलो वजन उचलत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. व्हिएतनामच्या व्योंग थी हुयेनने १६८ किलो (७६ किलो स्नॅच आणि ९१ किलो क्लिन अँड जर्क) वजन उचलत सुवर्णपदक तर फिलिपाइन्सच्या मेरी फ्लोर दियाजने १५८ किलो (६९ किलो स्नॅच आणि ८९ किलो क्लिन अँड जर्क) वजन उचलत कांस्यपदक पटकावले.

  • भारताच्या जेरेमीची दमदार कामगिरी- युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील १६ वर्षीय सुवर्णपदक विजेता भारताचा जेरेमी लालरिनुंगाने त्याच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १३४ किलो तर क्लिन अँड जर्कमध्ये १६३ किलो असे एकूण २९७ किलो वजन उचलून दमदार कामगिरीची नोंद केली आहे. या ब-गटात जेरेमीपेक्षा केवळ पाकिस्तानचा तल्हा तालिबने ३०४ किलो (स्नॅच १४० किलो आणि क्लिन अँड जर्क १६४ किलो ) वजन उचलले आहे. आता अ-गटातील स्पर्धक सोमवारी खेळणार असून या दोघांपेक्षा कुणी अधिक वजन उचलले नाही तर भारताच्या जेरेमीचे किमान रौप्यपदक निश्चित होऊ शकणार आहे.

भारताकडील अणुबॉम्ब दिवाळीसाठी राखून ठेवलेला नाही - नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा :
  • जयपूर : पाकिस्तान नेहमी भारताला अणुबॉम्बची धमकी देतो. परंतु भारत आता त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडे असणारा अणुबॉम्ब आम्ही काही दिवाळीसाठी ठेवलेला नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. राजस्थानमधील बाडमेरमध्ये भाजपने एका प्रचारसभेचे आयोजन केले होते. मोदी एका प्रचारसभेत बोलत होते.

  • मोदी यावेळी म्हणाले की, भारताने पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरणे आता सोडून दिले आहे. नाहीतर पूर्वी दररोज आमच्याकडे न्युक्लिअर बटन आहे, या गोष्टीचा पाकिस्तानकडून पुनरुच्चार होत होता. माध्यमं त्यावेळी हेडलाईन लिहायची की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. तर मग आमच्याकडे असलेला अणुबॉम्ब आम्ही दिवाळीसाठी ठेवला आहे का? असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला.

  • दरम्यान गुजरातच्या पाटणमध्ये झालेल्या सभेत मोदींनी विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानने सोडलं नसतं तर ती काळरात्र ठरली असती, असे विधानही केले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.

  • १९४८: अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.

  • १९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

  • १९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.

  • १९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • २००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.

जन्म 

  • १६९८: नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ यांचा जन्म.

  • १७२४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)

  • १८१२: भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)

  • १८७०: रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)

  • १९०४: अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म.  (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)

  • १९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म.  (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)

  • १९२९: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर यांचा जन्म.

  • १९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.

  • १९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९३३: रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८६३)

  • १९८०: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)

  • १९९४: विचारवंत, समाजसुधारक आचार्य सुशीलमुनी महाराज यांचे निधन.

  • १९९४: अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९१३)

  • २००३: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१६ – भटिंडा, पंजाब)

  • २०१३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९३३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.