चालू घडामोडी - २२ ऑगस्ट २०१८

Date : 22 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दिव्या काकरानला कुस्तीमध्ये कांस्य :
  • पालेमबांग : कुस्तीमध्ये भारतीयांची शानदार कामगिरी मंगळवारीही कायम राहिली. दिव्या काकरानने भारतासाठी शानदार खेळ करताना महिलांच्या ६८ किलो वजनी फ्री स्टाइल गटात कांस्य पदक पटकावले. तिसऱ्या स्थानाच्या प्लेआॅफमध्ये चिनी तैपईच्या चेन वेनलिंगचा पराभव करीत दिव्याने कांस्य पटकावले. यंदाच्या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारी दिव्या तिसरी मल्ल ठरली. याआधी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारतासाठी सुवर्ण कमाई केली होती.

  • कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत २० वर्षीय दिव्याने एकहाती वर्चस्व राखताना तैपईच्या वेनलिंगचा १० - ० असा धुव्वा उडवला. दिव्याने गेल्या वर्षी राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. याआधी चांगली स्पर्धेत चांगली सुरुवात केलेल्या दिव्याला उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या शारखु तुमेंतसेत्सेगविरुद्ध १-११ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता.

  • मात्र, शारखुने आपल्या खेळात कमालीचे सातत्य राखताना उपांत्य लढतीत तैपईच्या वेनलिंगचा १०-० असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे उपांत्यपूर्व फेरीत शारखुकडून पराभूत झालेल्या दिव्याला कांस्य पदकासाठी लढण्याची संधी मिळाली. ही संधी सत्कारणी लावताना दिव्याने कोणतीही चूक न करत लढत एकतर्फी ठरवली आणि वेनलिंगचा सहज पराभव करत भारताच्या खात्यात कांस्य पदकाची भर टाकली.

चंद्रावर आढळले पाणी! भारताच्या चंद्रयान- १ च्या शोधाला नासाचा दुजोरा :
  • वॉशिंग्टन - चंद्राच्या काही भागावर पाणी असल्याच्या दाव्याला आता पुष्टी मिळू लागली आहे. भारताच्या इस्रोने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-1 या यानाने चंद्गाच्या ध्रुवीय प्रदेशात अंधाऱ्या आणि थंड ठिकाणी बर्फाच्या रूपात पाणी गोठलेले असल्याची माहिती आकडेवारीसह दिली होती. दरम्यान, या आकडेवारीच्या आधारावर चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाणी असण्याच्या शक्यतेला अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने दुजोरा दिला आहे. चंद्रयान-1 या यानाचे भारताने दहा वर्षांपूर्वी प्रक्षेपण केले होते.

  •  चंद्राच्या पृष्टभागावर पुरेशा प्रमाणात बर्फ असल्याचे संकेत मिळाल्याने पुढच्या चांद्र मोहिमांमध्ये तसेच भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे. पीएनएस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या प्रबंधामध्ये हा बर्फ इतरत्र विखुरलेला असून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ हा लुनार केटर्सजवळ जमा झालेला असल्याचे या प्रबंधामध्ये म्हटले आहे.

  • चंद्राच्या उत्तर ध्रुवावरही मोठ्या प्रमाणात बर्फ असून, तोही अधिक विखुरलेला आहे. शास्त्रज्ञांनी नासाच्या मून मिनरेलॉजी मॅपर (एम 3) कडून मिळालेल्या आकडेवारीवरून चंद्राच्या पृष्टभागावर बर्फाच्या रूपात पाणी असल्याचे सांगण्यात आले होते. इस्त्रोच्या चंद्रयान-1 सोबत एम 3 हे उपकरण पाठवण्यात आले होते. 

काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचं निधन :
  • नवी दिल्ली: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. आज सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नवी दिल्लीतील चाणक्यपुरी इथल्या प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्याच वर्षी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी आणि पर्यायाने गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळचे असलेले गुरुदास कामत, यांनी मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली.

  • गुरुदास कामत 2017 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमन दिव या राज्यांची जबाबदारी होती. शिवाय ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात त्यांचे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे वाद समोर आले होते.

  • या वादानंतर, त्यांनी आपल्याला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, असं सांगत या सर्व पदांचा राजीनामा राहुल गांधींकडे दिला होता.

चंद्रावर बर्फ, इस्रोच्या दाव्याला नासाचा दुजोरा :
  • नवी दिल्ली : इस्रोच्या ‘चंद्रयान-1’ मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. चंद्रावर बर्फाच्या स्वरुपात पाणी असल्याच्या संशोधनाला अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दुजोरा दिला आहे.

  • चंद्राच्या काही भागात पाणी असल्याच्या दाव्याला ‘नासा’ने पुष्टी दिली आहे. इस्रोने चंद्रावर पाठवलेल्या ‘चंद्रयान-1’ या यानाने चंद्गाच्या ध्रुवीय प्रदेशात बर्फाच्या रुपात पाणी गोठलेले असल्याची माहिती दिली होती. या माहितीला आता नासानेही दुजोरा दिला आहे.

  • चंद्राच्या पृष्ठभागावर पुरेशा प्रमाणात बर्फ असल्याचे संकेत मिळाल्याने पुढच्या चंद्र मोहिमांमध्ये, तसेच भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

  • ‘पीएनएस’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ आढळलंय. मात्र ते एकाच ठिकाणी नसून, सर्वत्र विखुरलं आहे. दक्षिण ध्रुवावरील ल्युनर क्रेटर्सजवळ बर्फ गोळा झालंय. चंद्रावर बर्फ असल्याचे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी मिनरेलॉजी मॅपरच्या (M3) आकड्यांचा आधार घेतला आहे.

भारतात व्हॉट्सअॅपचं कार्यालय सुरू करा, केंद्र सरकारची मागणी :
  • नवी दिल्ली : भारताच्या दौऱ्यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकारनं व्हॉट्सअॅपच्या सीईओंना तीन सूचना केल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. भारतात व्हॉट्सअॅपचं कार्यालय सुरु करावं ही प्रमुख सूचना असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणाले.

  • व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला तंबी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या अफवांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून या अफवांवर ठोस नियंत्रण मिळवणं गरजेचे असल्याचे सरकारनं स्पष्ट केलं आहे.

  • व्हॉट्सअॅपवरून झपाट्यानं व्हायरल होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवा रोखण्यासाठी प्रभावी तांत्रिक उपाय शोधावे, भारतात व्हॉट्सअॅपचं स्थानिक कार्यालय स्थापन करावं, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक उपाय शोधावे आणि तक्रार निवारण करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी या प्रमुख सूचना रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना दिल्या आहेत.

  • गेल्या काही दिवसात देशात व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे देशातील अनेक भागात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. जमावाकडून हत्या आणि मारहाणीच्या काही घटना समोर आल्या होत्या. या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना दिल्या आहेत.

दिनविशेष :
  • मद्रास दिन

महत्वाच्या घटना

  • १६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

  • १८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

  • १९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.

  • १९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

  • १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.

  • १९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

जन्म

  • १६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३)

  • १८४८: शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९)

  • १८९३: अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म.

  • १९०४: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

  • १९१५: बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९९७)

  • १९१५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार जेम्स हिलियर यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २००७)

  • १९१९: हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९४)

  • १९१८: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै २००४)

  • १९२०: हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली यांचा जन्म.

  • १९३५: कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)

मृत्यू

  • १६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन.

  • १८१८: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १७३२)

  • १९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३)

  • १९७८: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९३)

  • १९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)

  • १९८०: मॅकडोनेल विमानाचे  निर्माते जेम्स स्मिथ मॅकडोनेल यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९९)

  • १९८२: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

  • १९८९: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९३)

  • २०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.