चालू घडामोडी - २२ डिसेंबर २०१८

Date : 22 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता तुमचे संगणक आणि मोबाइलही केंद्र सरकारच्या रडारवर :
  • तुमच्या मालकीचा संगणक तुमच्यापाशी आहे, मोबाइल तुमच्यापाशी आहे आणि  त्यावरून तुम्ही काहीही करू शकता, काहीही पोस्ट करू शकता किंवा काहीही लिहू शकता. काय हवे ते करू शकता असे तुम्हाला वाटत असेल तर सावधान! कारण आता तुमचा संगणक आणि मोबाइल केंद्र सरकारच्या रडारवर असणार आहे. पर्सनल कम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाइल या सगळ्याचा यात समावेश आहे.

  • केंद्र सरकारने दहा बड्या एजन्सीजना व्यक्तीगत संगणक आणि मोबाइल्सव नजर ठेवण्यास संमती दिली आहे. एखाद्या गुप्तहेराप्रमाणे या एजन्सी काम करणार आहेत. या एजन्सीज तुमच्या संगणकातला, मोबाइलमधला, लॅपटॉपमधला खासगी डेटा, माहिती कधीही तपासू शकणार आहेत. केंद्र सरकारने या संदर्भातला एक आदेश लागू केला असून ज्या एजन्सीजना हे काम दिले गेले आहे त्यांची नावंही देण्यात आली आहेत.

  • कोण ठेवू शकतं तुमच्या संगणकावर नजर : IB- इंटलिजन्स ब्युरो,  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो,  ED-अंमलबजावणी संचलनालय,  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस,  सीबीआय,  एनआयए,  रॉ,  दिल्ली पोलीस आयुक्त, डायरेक्टरेट ऑफ सिग्नल इंटेलिजन्स (जम्मू काश्मीर, उत्तरपूर्व आणि आसामसाठी)

  • या संमतीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मोदी सरकारला लोकांच्या खासगी गोष्टींवर अतिक्रमण करायचे होते हेच हा निर्णय दाखवतो अशा आशयाचे ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे. राईट टू प्रायव्हसीचा हा भंग आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राजीव गांधींचा ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घ्या, दिल्ली विधानसभेत प्रस्ताव मंजूर :
  • भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र पुरस्कार परत घेण्यात यावा असा प्रस्ताव दिल्लीच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला. आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

  • गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा कारण १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप आप सरकारने केला आहे. याच आरोपामुळे आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

  • दिल्ली सरकारने मंजूर केलेल्या या प्रस्तावावर काँग्रेसने टीका केली आहे. राजीव गांधी यांनी या देशासाठी आपला जीव दिला, मात्र आपने त्यांच्याबाबत जो प्रस्ताव मंजूर केला आहे त्यामुळे आपचा खरा चेहरा जनतेसमोर आला अशीही टीका काँग्रेसने केली आहे. आप ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप अजय माकन यांनी केला आहे.

  • याच आठवड्यात १९८४ च्या शिखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना हजर राहण्याची तंबीही दिली आहे. अशात आपने राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा :
  • अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर राजीनामा दिला आहे. भारत व अमेरिका लष्करी संबंधाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. संघर्षग्रस्त सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयानंतर पेंटॅगॉनमध्ये सर्वानाच धक्का बसला होता. मॅटिस व ट्रम्प यांच्यात समेट न घडून येणारे मतभेद या धोरणबदलांवर झाले होते.

  • ट्रम्प प्रशासनातून सोडून जाणारे मॅटिस हे अलीकडच्या काळातील सर्वात मोठे अधिकारी आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांना पाठवलेल्या पत्रात मॅटिस यांनी म्हटले आहे,की त्यांनी आता त्यांच्या जागतिक दृष्टिकोनाशी सुसंगत अशा व्यक्तीची नेमणूक करावी. मॅटिस यांनी राजीनामा दिल्याचे ट्रम्प यांनी गुरूवारीच दोन ट्विट संदेशातून सूचित केले होते. मॅटिस हे फेब्रुवारीअखेर पद सोडतील असेही त्यांनी त्यात म्हटले होते.

  • मॅटिस (वय६८) हे अमेरिकेतील निवृत्त मरीन कोअर जनरल असून ते गुरूवारी दुपारी ट्रम्प यांना सीरियात सैन्य कायम ठेवण्याची भूमिका पटवून देण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये गेले होते. पण अध्यक्षांनी त्यांची भूमिका फेटाळून लावली, त्या वेळी मॅटिस यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गुरूवारच्या आणखी एका वृत्तानुसार अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प हे अफगाणिस्तानातून सैन्य कमी करण्याच्या विचारात आहेत.

  • जागतिक प्रश्नांवर तुम्हाला सुसंगत मते असलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्यास तुम्ही आता मोकळे आहात, असे मॅटिस यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. पद सोडण्यासाठी मला हीच वेळ योग्य वाटत असून २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत माझी मुदत राहील, तेवढा वेळ उत्तराधिकारी निवडण्यास पुरेसा आहे.

‘पानी फाउंडेशन’च्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेची घोषणा :
  • महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली. राज्यातील जल संवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. हे व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या बैठकीत सामील झाले.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान, किरण राव, पानी फाउंडेशनचे सी.ई.ओ. सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे यामध्ये सहभागी झाले होते.

  • पुढील वर्षी ८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रु., ५० लाख रु. आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या एकूण बक्षिसांची रक्कम रु. ९.१५ कोटी राहणार आहे.

  • स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या वतीने ‘पाणलोट विकासा’चे प्रशिक्षण लोकांना देण्यात येते. ४५ दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत ‘श्रमदान’, पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील. ज्यामुळे जमीनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक महसूली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे.

तुमचं जुनं मॅगस्ट्राईप डेबिट/क्रेडिट कार्ड ३१ डिसेंबरपूर्वी बदला :
  • मुंबई : जर तुम्ही जुनं मॅगस्ट्राईप डेबिट (एटीएम) किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला ते तातडीने बदलून घ्यावं लागणार आहे. जुनी मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि क्रेडिट कार्ड 31 डिसेंबरला बंद होणार असून ग्राहकांना ते बदलून घेण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

  • जुनी कार्ड बदलण्याची प्रक्रिया 31 डिसेंबरपूर्वीच करण्यात यावी, असं सांगण्यात आलं आहे. यानंतर मॅग्नेटिक स्ट्राइप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 27 ऑगस्ट 2015 रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.

  • सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांचे मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि क्रेडिट कार्ड बदलून ईएमव्ही (EMV) म्हणजेच युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा चिप बेस्ड कार्ड द्यावे, असं सांगण्यात आलं होतं. अद्याप जर तुम्ही ईएमव्ही चिप बेस्ड कार्डसाठी अर्ज केला नसेल, तर 31 डिसेंबरपूर्वी करणं अनिवार्य आहे.

  • मुदतीपूर्वी आपलं जुनं मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून घेतलं नाही, तर ग्राहकांना त्यांचे एटीएम व्यवहार करता येणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे ईएमव्ही बेस्ड कार्डसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलले :
  • प्रश्न : व्हिसा मुलाखतीसाठी फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलल्याचे ऐकले. मला फिंगरप्रिंट्स रजिस्टर करावे लागेल का? याचे नवीन ठिकाण कुठे आहे?

  • उत्तर - हो, 14 वर्षांखालील किंवा 79 वर्षांवरील अर्जदार वगळता सर्व व्हिसा अर्जदारांना व्हिसा मुलाखतीपूर्वी फिंगरप्रिंट रजिस्टर करणे आवश्यक आहे. Tourist Visa, Student Visa किंवा Immigrant Visa यांसारख्या Nonimmigrant Visaसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला  व्हिसा मुलाखतीपूर्वी फिंगरप्रिंट रजिस्टर करणे आवश्यक आहे.  

  • यासाठी तुम्हाला Biometrics Appointment ची वेळ निश्चित करावी लागेल, या भेटीत तुमचे फिंगरप्रिंट्स रजिस्टर आणि डिजिटल पद्धतीनं फोटो घेतला जाईल. www.usatraveldocs.com/in या संकेतस्थळावर यासंदर्भातील अपॉइंटमेंट नियोजित केल्या जाऊ शकतील.

शिक्षक बनण्यासाठी इच्छुक दीड लाखांवर उमेदवार राहणार बेकार :
  • रत्नागिरी : डीएड, बीएड केले म्हणजे शिक्षक झालो असे वाटते. मात्र आता हा विचार बदलावा लागेल. भारत देश सध्या विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल करीत आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याची आवड, त्यांना घडविण्याची असेल अशाच मंडळींना संधी आहे. शासनाच्या पवित्र पोर्टलवर १ लाख ७८ हजार विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र आता होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये केवळ १८ ते २० हजार उमेदवारांनाच नोकरी मिळणार आहे. उर्वरित एक लाख ५८ हजार शिक्षकांना नोकºया मिळणार नाहीत, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तावडे यांनी स्पष्टपणे सांगितले.

  • महाविद्यालयील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, परीक्षा पध्दती, त्यातील बदल याबाबतचे विचार जाणून घेण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात थेट संवाद आयोजित केला होता. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील ४६ महाविद्यालयातील ४५०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तावडे यांनी उत्तरे दिली.

  • खेळाडूंसाठी नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण असून क्रिडा, कला प्रकाराची आवड असणाºया विद्यार्थ्यांसाठी ओपन बोर्ड सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीएडचा अभ्यासक्रम शंभर टक्के कालबाह्य असून केंद्रीय मनुष्यबळ खात्याला विकसित शिक्षक घडविणारा शिक्षक तयार करण्याचा अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना करण्यात येईल.

  • परेदशात ३० लाख रूपये खर्च करून शिकण्यापेक्षा भारतात १० लाखात शिकता येईल, यासाठी परदेशी विद्यापीठांशी समन्वय करून स्काईपव्दारे लेक्चर देण्याचा प्रयत्न राहिल. आतापर्यत ६५ विद्यापिठांशी टायप करण्यात आले आहे. बाहेरच्या ३८ विद्यापिठात आपले अभ्यासक्रम शिकविले जात असून इस्त्रायलमध्ये मराठी शिकविण्यासाठी आपल्याकडील प्राध्यापक जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दिनविशेष :
  • राष्ट्रीय गणित दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

  • १८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.

  • १९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.

  • १९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

जन्म 

  • १६६६: शिखांचे १० वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १७०८)

  • १८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०)

  • १८८७: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)

  • १९२९: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.

  • १९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य पाटील यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)

  • १९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२)

  • १९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०६)

  • १९९६: संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन.

  • १९९७: भावगीत लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९१४)

  • २००२: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन.

  • २०११: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.