चालू घडामोडी - २२ फेब्रुवारी २०१९

Date : 22 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून, सलग ६० तास चालणार संमेलन :
  • नागपूर : 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून नागपुरात सुरु होत आहे. आज  संध्याकाळी 6.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे. या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उदघाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

  • नागपुरात तब्बल 35 वर्षांनंतर नाट्यसंमेलन होत असून नाट्यकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागपूरच्या प्रसिद्ध रेशीमबाग मैदानावर आणि त्याच्याच जवळ असलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.

  • रेशीमबाग मैदानावरील मुख्य कार्यक्रम स्थळाला कै. राम गणेश गडकरी नाट्य नागरी परिसर असे नाव देण्यात आले आहे. तर उद्घाटन सोहळा ज्या मंचावर पार पडणार आहे त्या मंचाला कै. पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच असे नाव देण्यात आले आहे.

  • दुपारी 3 वाजता महाल परिसरातील शिवाजी पुतळ्यापासून नाट्य दिंडी काढली जाणार आहे तर संध्याकाळी उद्घाटनाचा सोहळा  होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या नाट्य संमेलनात अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग नियोजित असून नवोदित कलावंतांच्या एकांकिका  सादर केल्या जाणार आहे.

भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी - सौरव गांगुली :
  • भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने, मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होण्याची चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे. तो नोएडा येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.

  • “गेल्या 6-7 महिन्यांच्या काळात भारतीय संघ चांगला खेळ करतोय. हे पाहता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहेत.

  • संघातल्या प्रत्येक खेळाडूने त्यांच्या क्षमतेला साजेसा खेळ केला आहे.” सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. 5 जूनला साऊदम्पटनच्या मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’, पाणी रोखण्याचा निर्णय :
  • पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशात संतापाची लाट असताना आता केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेणाऱ्या भारत सरकारने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी आता भारत स्वत:साठी वापरणार आहे. पूर्वेकडच्या नद्यांचे पाणी आता जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी वापरणार आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने पाकिस्तानात वाहून जाणारं पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वेकडील नद्यांचं पाणी वळवून त्याचा वापर जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी वापरणार आहोत अशी माहिती ट्विटरद्वारे गडकरी यांनी दिली. तसंच, रावी नदीवर शाहपूर-कानडीचं बांधकाम सुरु झालं आहे. हे सर्व राष्ट्रीय प्रकल्प असल्याचंही गडकरींनी सांगितलं.

  • पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर आणि पंजाबसह इतर राज्यांना होणार आहे.

  • सिंधू नदी खोऱ्याचे दोन भाग आहेत. यापैकी पश्चिम खोऱ्याचं पाणी पाकिस्तानला, तर पूर्व खोऱ्याचं पाणी भारताला मिळतं. व्यास, रावी आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारतातून पाकिस्तानला जाते. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाण्यासाठी वणवण होण्याची शक्यता आहे. तीन नद्यातील पाणी प्रकल्पाद्वारे पाकिस्तान ऐवजी यमुना नदीत सोडले जाईल.

पगारदारांसाठी आनंदाची बातमी, ईपीएफच्या व्याजदरात वाढ :
  • नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनाने (ईपीएफ) प्रॉव्हिडंट फंडच्या (पीएफ) व्याजदरात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्के व्याजदर करण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण साडे पाचकोटी पगारदारांना याचा फायदा होणार आहे.

  • सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. आता चालू वर्षाच्या पीएफवर 8.65 व्याजदर मिळणार आहे. 2016 वर्षानंतर पहिल्यांदाच पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षापर्यंत पीएफवर 8.55 टक्के व्याजदर मिळत होता.

  • कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक पार पडली. व्याजदर वाढीच्यासंदर्भात सीबीटी शिफारस करतो. या शिफारसीवर श्रम मंत्रालय विचार करुन अंतिम रुप देतो. त्यानंतर ईफीएफ बोर्डच्या मंजुरीनंतर या प्रस्तावाला मान्यतेसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येते.

कुस्तीच्या आखाड्यात तिरंगा फडकवणारा मराठमोळा राहुल आवारे ठरला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' :
  • मुंबई : जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर कुणी कितीही तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला, तरी तुमची गुणवत्ता लोकांपुढे आल्यावाचून राहत नाही. कुस्तीच्या आखाड्यात त्याने प्रचंड मेहनत करून घाम गाळला. पण दिल्ली दरबारी त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. पण जेव्हा  २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळण्याची राहुलला संधी मिळाली आणि त्याने भारताला ५७ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकून दिले.

  • ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राहुल आवारेची. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने राहुलचा सन्मान करण्यात येत आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात राहुल आवारेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

  • 'रूस्तम-ए-हिंद' हरिश्चंद्र उर्फ मामा बिराजदार आणि अर्जन पुरस्कारविजेते मल्ल काका पवार यांचा शिष्य असलेल्या राहुलने सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते २००८ मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत. या स्पर्धेत त्याने प्रतिस्पर्ध्यांना सहजपणे नमवून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तेव्हापासून तर मागील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णयशापर्यंतचा विचार करता राहुलने विविध पातळ्यांवर सर्वोच्च यश मिळवले आहे. 

  • राहुलने  २००९ मध्ये धडाकेबाज कामगिरी केली. उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी जर्मन ग्रां-प्रीमध्येही त्याने सर्वोच्च यश संपादन केले. जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत रौप्य आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून राहुलने २००९ हे वर्ष अविस्मरणीय केले. 

सर्जिकल स्ट्राइकच्या हिरोचा राहुल गांधींना 'हात'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी कृती दल स्थापन :
  • नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसनं राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्याकडे या कृती दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. देशासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचं काम हुडा यांच्याकडे असेल. ते सुरक्षेशी संबंधित जाणकारांची मतं विचारात घेऊन एक आराखडा तयार करतील. सर्जिकल स्ट्राइक दरम्यान हुडा नॉर्दन आर्मीचे कमांडर होते.  

  • राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केल्याची माहिती काँग्रेस पक्षानं ट्विटरवर दिली. 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना करण्यासाठी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांची भेट घेतली. हुडा देशासाठी एक कृती आराखडा तयार करतील,' असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसनं सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन केली आहे. काँग्रेसचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. 

  • जम्मू काश्मीरमधील उरीमध्ये 18 सप्टेंबर 2016 रोजी चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये भारतीय लष्कराच्या 19 जवानांना वीरमरण आलं. यानंतर दहा दिवसांनी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक केला. या कारवाईत जवानांनी दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. या कारवाईचा फार गाजावाजा करण्याची आवश्यकता नव्हती, असं मत हुडा यांनी व्यक्त केलं होतं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

  • १९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.

  • १९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.

  • १९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म 

  • १७३२: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)

  • १९०२: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)

  • १९२२: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

  • १९६४: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८१५: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर१७६१)

  • १९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८६९)

  • १९५८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

  • २०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

  • २०००: प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर१९२३)

  • २००९: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९४३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.