चालू घडामोडी - २२ जानेवारी २०१९

Date : 22 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तर भारतातून अन्य देशांना होईल F-16 फायटर विमानांची निर्यात :
  • एफ-१६ फायटर विमान निर्मितीचा प्रकल्प भारतात हलवण्याची तयारी दाखवणाऱ्या लॉकहीड मार्टिन कंपनीची भारतातूनच अन्य देशांना एफ-१६ विमाने निर्यात करण्याची योजना आहे. भारताला एफ-१६ प्रकल्पाचे जागतिक उत्पादन केंद्र बनवून भारतीय हवाई दलासह अन्य बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे असे लॉकहीडच्या रणनिती आणि बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी सांगितले.

  • भारताबाहेर अन्य देशांनी एफ-१६ च्या २०० पेक्षा जास्त विमानांसाठी मागणी नोंदवली आहे. हा सर्व व्यवहार २० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कमेचा आहे असे लाल यांनी सांगितले. एफ-१६ चा उत्पादन प्रकल्प भारतात सुरु झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाला मोठी चालना मिळू शकते. यातून हजारो रोजगार तयार होतील.

  • लॉकहीड मार्टिन भारताकडून सर्वात मोठे ११४ फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत आहे. त्यासाठीच त्यांनी एफ-१६ चा संपूर्ण प्रकल्प भारतात हलवण्याची तयारी दाखवली आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी त्यांची बोईंग एफ/ए १८, साब ग्रिपेन, राफेल, युरोफायटर टायफून आणि रशियन विमान कंपन्यांबरोबर स्पर्धा आहे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताला ४२ स्क्वाड्रनची गरज आहे. म्हणजे ताफ्यात ७५० फायटर विमाने असणे आवश्यक आहे. १९६० च्या दशकातील रशियन बनावटीची मिग-२१ विमाने निवृत्त होत आहेत.

  • एफ-१६ चा प्रकल्प टेक्सास येथे असून तेथे आता पाचव्या पिढीच्या एफ-३५ विमान निर्मितीचे काम चालते. प्रस्तावित एफ-१६ प्रकल्पासाठी लॉकहीडने भारतीय भागीदार म्हणून टाटा अॅडव्हान्स सिस्टिमची निवड केली आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया, कोहलीचं अव्वल स्थान अबाधित :
  • दुबई : ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाने टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीचं आयसीसी क्रमवारीतलं अव्वल स्थान अबाधित राखलं आहे. आयसीसी क्रमवारीत नंबर वनवर असलेल्या टीम इंडियाच्या खात्यात आता सर्वाधिक 116 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-1 अशी जिंकली होती. या विजयाचा फायदा भारतीय संघाला झाला आहे.

  • विराट कोहलीने 922 गुणांसह कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थान राखलं आहे. इंग्लंडमध्ये कोहलीची बॅट चांगलीच तळपली होती. पण तो फॉर्म कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये राखता आला नाही. मात्र तरीही कोहलीने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखलं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर असून, विल्यमसनपेक्षा विराटच्या खात्यात 25 गुण अधिक आहेत.

  • ऑस्ट्रेलियातल्या कसोटी मालिकेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने आयसीसी क्रमवारीत तिसरं स्थान मिळवलं आहे. यष्टीरक्षक रिषभर पंतने फलंदाजांच्या क्रमवारीत सतराव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर गोलंदाजांमध्ये भारताचा रवींद्र जडेजा पाचव्या आणि आर. अश्विन नवव्या स्थानावर आहे.

जगभरातील गृहिणींच्या कामाची किंमत ७००,०००,०००,०००,००० रुपयांहून अधिक :
  • ‘तुला नाही कळणार माझ्या कामाची किंमत’ हे वाक्य प्रत्येकाने कधी ना कधी गृहिणी असणाऱ्या आपल्या आईकडून ऐकलेच असेल. मात्र आता जगप्रसिद्ध ‘ऑक्सफॉम’ या संस्थेने गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिलांचे काम किती मोलाचे आहे यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. जगभरामध्ये गृहिणी म्हणून काम करत आपल्या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या स्त्रीयांच्या कामाचे मुल्य दहा ट्रिलियन डॉलर म्हणजेच ७००,०००,०००,०००,००० रुपये इतके आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास ही रक्कम जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅपल कंपनीच्या उत्पन्नाच्या ४३ पट आहे.

  • भारतामध्ये गृहिणी म्हणून काम करुन आपल्या मुलांचा संभाळ करणाऱ्या महिलांच्या कामाचे मुल्य हे देशाच्या जीडीपीच्या ३.१ टक्के इतके आहे. भारतामधील शहरी भागांमधील गृहिणींची रोजची ३१२ मिनिटे म्हणजेच पाच तास १२ मिनिटे घरकाम आणि मुलांना संभाळण्यात जातात. तर ग्रामीण भागात हाच कालावधी दिवसाला २९१ मिनिट म्हणजेच चार तास ५१ मिनिटे इतका आहे. या उलट शहरी भागातील पुरुष घरातील कामांमध्ये दिवसातील २९ मिनिटे घालवतो तर ग्रामीण भागातील पुरुष ३१ मिनिटे वेळ घरकामासाठी देतात.

  • ‘वर्ल्ड इकनॉमिक फोरम’च्या वार्षिक बैठकीमध्ये ‘ऑक्सफॉम’ने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये महिला आणि पुरुषांमधील आर्थिक दरी वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भारतामध्ये महिला आणि पुरुषांमधील आर्थिक दरी मोठी असून देशामध्ये आर्थिक मोबदल्याशिवाय काम करणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही केवळ नऊ महिलांचा समावेश आहे.

  • अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो. भारतामध्ये स्त्री-पुरुषांच्या पगारामधील अंतर हे ३४ टक्के असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. महिलांना कमी पगारात काम करावे लागत असल्याने घरातील कामांची जबाबदारी महिलेचीच असल्याचे भारतामध्ये मानले जाते असंही या अहवालात म्हटले आहे. जात, आर्थिक स्तर, धर्म, वयावरुनही महिलांशी भारतामध्ये दुजाभाव केला जातो.

सीबीआयच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्या; हंगामी संचालक नागेश्वर रावांचा निर्णय :
  • वादाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे. सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांनी २० बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचाही यात समावेश आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून नव्या सीबीआय प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच सीबीआयचे हंगामी संचालक नागेश्वर राव यांनी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. राव यांनी बड्या २० अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. यामध्ये १३ पोलीस अधीक्षक दर्जाचे तर ७ सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे २४ जानेवारी रोजी नव्या सीबीआयच्या प्रमुखांच्या निवडीसाठी बैठक घेणार आहेत.

  • ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये पोलीस अधीक्षक विवेक प्रियदर्शनी यांचाही समावेश आहे. ते 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करीत असून महत्वपूर्ण दिल्ली युनिटची जबाबदारी सांभाळत होते. बदल्या करण्यात आलेल्या इतरांमध्ये एटी दुरईकुमार, प्रेम गौतम, मोहित गुप्ता (राकेश अस्थानांच्या जागेवर यांना इनचार्ज बनवण्यात आले होते) या महत्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

  • दरम्यान, नागरेश्वर राव यांनी केलेल्या बदल्यांविरोधात सीबीआयचे अधिकारी ए. के. बस्सी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. आलोक वर्मा यांनी पुन्हा सीबीआयचे प्रमुखपद स्विकारल्यानंतर त्यांनी केलेल्या बदल्यांचा निर्णय रद्द करण्यात आला होता. यावेळी बस्सी यांची बदली पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली होती.

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा - आनंद कार्लसनसह अग्रस्थानी :
  • विक आन झी (नेदरलँड्स) : पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या विश्वनाथन आनंदने आठव्या फेरीत अझरबैजानच्या शाखरीयार मामेद्यारोव्ह याच्यावर रोमहर्षक विजय मिळवत टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनसह अग्रस्थान पटकावले आहे.

  • गेल्या फेरीत रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला हरवल्यानंतर या स्पर्धेचे पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या आनंदने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत मामेद्यारोव्हचा पराभव केला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मामेद्यारोव्हला हरवतानाच आनंदने ५.५ गुणांनिशी कार्लसनसह अव्वल स्थान पटकावले आहे. कार्लसनने अप्रतिम कामगिरी करत हंगेरीच्या रिचर्ड रॅपोर्टला पराभूत केले.

  • रशियाचा इयान नेपोमनियाची, चीनचा डिंग लिरेन तसेच नेदरलँड्सचा अनिश गिरी हे विजेतेपदाच्या शर्यतीत असून प्रत्येकी ५ गुणानिशी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. अझरबैजानचा तेमौर रादजाबोव्ह ४.५ गुणांसह सहाव्या तर भारताचा विदिथ गुजराती ४ गुणांसह सातव्या स्थानी आहे. अद्याप पाच फेऱ्यांचा खेळ शिल्लक असून विजेतेपद पटकावण्यासाठी आनंदला कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे.

  • मामेद्यारोव्हने कारो कान बचाव पद्धतीने डावाची सुरुवात केल्यानंतर आनंदनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र १२व्या चालीत मामेद्यारोव्हला खेळात सातत्य राखता न आल्यामुळे आनंदला डावावर वर्चस्व मिळवण्याची संधी मिळाली. आनंदने त्यानंतर प्यादाचा बळी देत डावावर भक्कम पकड मिळवली. आनंदने आपला हत्ती पटाच्या मध्यभागी आणला. त्याचा फायदा उठवत आनंदने  विजय साकारला.

लिंगायत धर्माचे श्रद्धास्थान शिवकुमार स्वामीजींचं १११ व्या वर्षी निधन :
  • बंगळुरु : लिंगायत धर्माचं श्रद्धास्थान असलेल्या शिवकुमार स्वामीजी यांचं निधन झालं. कर्नाटकातील तुमकूरमध्ये असलेल्या सिद्धगंगा मठात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवकुमार स्वामीजी 111 वर्षांचे होते.

  • शिवकुमार स्वामीजी यांचं निधन आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी झालं. स्वामीजींवर दोन महिन्यांपूर्वी मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.

  • स्वामीजी निवर्तल्याने अवघ्या कर्नाटकावर शोककळा पसरली आहे. शिवकुमार स्वामीजींना 'देवाचा चालता बोलता अवतार' मानलं जात होतं.

  • मठाच्या वेबसाईटनुसार शिवकुमार स्वामीजी यांचा जन्म कर्नाटकातील वीरापुरा गावात एक एप्रिल 1908 रोजी झाला होता. स्वामीजींनी सिद्धगंगा शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. शिवकुमार स्वामीजी यांना पद्मभूषण आणि कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

  • कर्नाटकात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून पुढचे तीन दिवस दुखवटा पाळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी सांगितलं. स्वामीजींनी अनेकांची आयुष्य घडवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

  • १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.

  • १९४७: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.

  • १९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

  • १९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

  • २००१: आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.

  • २०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.

जन्म 

  • १५६१: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)

  • १८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.

  • १९०९: संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)

  • १९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.

  • १९१६: गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)

  • १९१६: बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९९३)

  • १९२०: संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.

  • १९३४: हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)

मृत्यू 

  • १६६६: ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन. (जन्म: ५ जानेवारी१५९२)

  • १६८२: समर्थ रामदास स्वामी यांचे निधन.

  • १७९९: ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.

  • १९०१: ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे निधन. (जन्म: २४ मे १८१९)

  • १९२२: शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.

  • १९६७: क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)

  • १९७२: राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

  • १९७३: अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

  • १९७५: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)

  • १९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.