चालू घडामोडी - २२ जुलै २०१८

Date : 22 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘या’ वस्तूंवरील कर कमी करण्याचा जीएसटी कौन्सिलचा निर्णय
  • नवी दिल्ली : सॅनिटरी नॅपकिन जीएसटीच्या कक्षेतून काढून टाकण्यात आले असून, वॉशिंग मशीन, फ्रिज, दागिन्यांचे बॉक्स इत्यादी अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत.

  • जीएसटी कौन्सिलने आजच्या बैठकीत 28 टक्के जीएसटी गटात असणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. दरम्यान जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक 4 ऑगस्टला केरळमध्ये होणार आहे. त्या बैठकीत अजून काय महत्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • दरम्यान, आजच्या बैठकीत ज्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आलं आहे, त्यांची अंमलबजावणी 27 जुलैपासून सुरु केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विटरवर 'मन की बात', चाहत्यांना देताहेत रिप्लाय :
  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे. ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पोप फ्रान्सिस यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.

  • दरम्यान, रविवारी ट्विटरवरील आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदींची आपल्या चाहत्यांसोबत 'ट्विटर पे चर्चा' सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

  • सरकारविरोधी अविश्वास ठराव प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. शुभेच्छांप्रमाणेच काही जणांनी त्यांना सल्लेदेखील देऊ केले आहेत. चाहत्यांनी दिलेल्या या सल्ल्यांची मोदींनी हसत मुखानं नोंद केली आहे.  

  • शिल्पी अग्रवाल नावाच्या एका ट्विटर युजरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थोडंसं आणखी हसण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याला पंतप्रधान मोदींनी 'पॉईंट टेकन' असा स्माईलीसहित रिप्लाय दिला. 

राजस्थानात २२ भाजपा आमदार काँग्रेसच्या संपर्कात :
  • नागपूर : राजस्थानात भाजपाच्या विरोधात जनमत आहे. वसुंधरा राजे सरकार सत्तेतून जाणार हे अटळ आहे. लवकरच भाजपामध्ये मोठी फूट पडू शकते. तेथील २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अ. भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना शनिवारी केला.

  • पांडे यांची अ. भा. काँग्रेस कार्यसमितीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर ते नागपुरात आल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पांडे म्हणाले, राजस्थानमध्ये साडेचार वर्षात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या सहा जागांवर पोटनिवडणूक झाली. यापैकी दोन्ही लोकसभा व चार विधानसभेच्या जागा काँग्रेसने सहज जिंकल्या. येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर तर भाजपा भुईसपाट झालेली दिसेल.

  • ‘आघाडी’बाबत प्रदेशला अहवाल मागितला - २०० जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीय स्तरावर कुणाशी आघाडी करण्याचा निर्णय झाला तर त्याला प्रदेश काँग्रेसही सहकार्य करेल. भाजपा विरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे, अशी आपली भावना आहे. मात्र, वस्तुस्थिती काय आहे, याचा अहवाल आपण

  • ५ आॅगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला मागितला आहे, असेही पांडे यानी सांगितले.

  • नागपुरातून लढणार नाही : नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही. आपल्यावर पक्षाने राजस्थानची जबाबदारी सोपविली आहे. ती पूर्ण ताकदीने पार पाडू. नागपुरात पक्षाकडे अनेक सक्षम चेहरे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

तिरंदाजी विश्वचषक - भारतीय महिला संघाला रौप्यपदक :
  • बर्लिन : भारतीय महिला कम्पाउंड संघाला अंतिम फेरीचा अडथळा पार करण्यात पुन्हा एकदा अपयश आले आहे. तिरंदाजी विश्वचषकात चौथ्या आणि अंतिम फेरीत संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. फ्रान्सने एका गुणाच्या आघाडीने सुवर्णपदक पटकावले.

  • विश्व चषक सर्किटमध्ये पहिल्या सुवर्णपदकाची आशा असलेल्या ज्योती सुरेखा वेनाम, मुस्कान किरार आणि तृषा देब यांनी ५९-५७ अशी आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या सेटमध्ये त्या मागे पडल्या आणि फ्रान्सच्या संघाने २२९-२२८ असे गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले.

  • सोफी डोडेमोंट, एमेली सेनसेनोट आणि सांड्रा हर्वे यांनी सलग पाचवेळा अचूक १० गुण मिळवले. त्यामुळे दुसºया सेटमध्ये त्यांनी ११६-११६ अशी बरोबरी मिळवली. तिसºया सेटमध्ये भारतीय संघावर दबाव वाढला. त्यांनी सहा आणि आठमध्ये पुन्हा खराब सुरुवात केली.

  • मात्र फ्रान्सच्या खेळाडूंनी आपली लय कायम राखत १७४-१६९ असा स्कोअर केला.चौथ्या सेटमध्ये भारतीय संघाने ६० पैकी ५९ गुण मिळवले आणि फ्रान्सचा संघ एका गुणाच्या फरकाने विजयी झाला. विश्वचषकाच्या अंताल्या सत्रात भारतीय संघ (ज्योती, मुस्कान आणि दिव्या) चीनी तायपेकडून तीन गुणांनी पराभूत झाला होता.

‘कॅट्सा’ निर्बंधमाफीचा प्रस्ताव :
  • अमेरिकेने काउंटरिंग अमेरिकाज अ‍ॅडव्हरसरिज थ्रू सँक्शन्स अ‍ॅक्ट म्हणजे ‘कॅट्सा’ कायद्यानुसार रशियाकडून लष्करी सामग्री खरेदी करणाऱ्या देशांवर काही अप्रत्यक्ष निर्बंध लादले असले तरी या देशांनी खरेदीसाठी रशियावरील अवलंबित्व कमी करून अमेरिकेकडे वळावे यासाठी त्यांच्यावरील निर्बंधमाफ करावेत, असा प्रस्ताव अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी मांडला असून त्याचा फायदा भारतालाही होणार आहे.

  • मॅटिस यांनी याबाबत केलेल्या निवेदनात भारताचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी कॅटसा कायद्यामुळे भारतावर आलेले निर्बंधत्यामुळे शिथिल होण्याची शक्यता आहे. हा कायदा रशियाला लक्ष्य करण्यासाठी केलेला असला तरी त्याचा फटका रशियाकडून एस ४०० ट्रायम्फ या प्रकारातील पाच प्रणाली विकत घेण्याचे भारताचे मनसुबे अडचणीत आले आहेत. या प्रणालींची किंमत ४.५ अब्ज डॉलर्स आहे.

  • मॅटिस यांनी अलिकडेच सिनेटच्या लष्कर विषयक समितीचे अध्यक्ष सिनेटर जॉन मॅक्केन यांना एक पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, रशियाविरोधात कॅटसा कायद्यामुळे इतर काही देशांवर जे निर्बंधलादले आहेत ते शिथिल करण्याचे अधिकार परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांना देण्यात यावेत.

  • रशियाला त्यांच्या आक्रमक व मुजोर वर्तनासाठी शिक्षा झाली पाहिजे, त्यांनी युक्रेनचा भागही बळकावला आहे. पण हे करताना इतर देशांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काही देशांवरचे निर्बंधमाफ केले तर ते अमेरिकेच्या जवळ येऊ शकतात व त्यांचे रशियन लष्करी सामग्रीवरचे अवलंबित्व कमी करता येईल. आपणच त्यांना रशियाकडे वळण्यावाचून पर्याय ठेवलेला नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९०८: देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.

  • १९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला.

  • १९३३: विली पोस्ट या वैमानिकाने ७ दिवस १८ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

  • १९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.

  • १९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.

  • १९४६: इर्गुनया दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्ब हल्ला केला. त्यात ९० ठार.

  • १९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.

  • १९९३: वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.

  • २००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ३ मि. ४०.१७ सेकंदांत जिंकली.

जन्म

  • १८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव लुडविग हर्ट्झ यांचा जन्म.

  • १८९८: शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)

  • १९१५: भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २०००)

  • १९२३: हिंदी चित्रपट पार्श्वगायक मुकेश चंदमाथूर तथा मुकेश यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)

  • १९२५: पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.

  • १९३७: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)

  • १९७०: महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म.

  • १९९२: अमेरिकन गायक व अभिनेत्री सेलेना गोमेझ यांचा जन्म.

मृत्यू

  • १५४०: हंगेरीचा राजा जॉन झापोल्या यांचे निधन.

  • १८२६: इटालियन खगोलशास्त्रज्ञ ज्युसेप्पे पियाझी यांचे निधन.

  • १९१८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इंदरलाल रॉय यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८९८)

  • १९८४: साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ यांचे निधन.

  • १९९५: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)

  • २००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९६५)

  • २००३: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचे निधन. (जन्म: १७ मे १९६६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.