चालू घडामोडी - २२ जून २०१८

Date : 22 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नोटाबंदीनंतर सर्वाधिक जुन्या नोटा अमित शाह संचालक असलेल्या जिल्हा बँकेत :
  • नोटाबंदीनंतर सर्वाधिक जुन्या नोटा अमित शाह संचालक मंडळावर असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. नोटाबंदीनंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये या बँकेत ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली होती. यानंतर हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदीनंतर १० नोव्हेंबरपासून बँका व पोस्ट कार्यालयातून जुन्या नोटा बदलून नवीन देण्यात येत होत्या, मात्र पाच दिवसांनी देशभरातील जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. या पाच दिवसांच्या काळात जमा झालेल्या नोटा सरकारकडून बदलून देण्यात आल्या.

  • मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकाराअंतर्गत जिल्हा बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटासंदर्भातील माहिती मागवली. यात अहमदाबाद जिल्हा बँकेने सर्वाधिक जुन्या नोटा जमा केल्याचे समोर आले आहे.

  • बँकेत नोटाबंदीच्या काळात ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या. बँकेच्या वेबसाईटवर अमित शाह बँकेच्या संचालक मंडळावर असल्याचे दिसते. २००० साली अमित शाह बँकेच्या अध्यक्षपदी होते. यानंतर राजकोट जिल्हा सहकारी बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेने सुमारे ६९३ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या. या मुद्द्यावरुन विरोधक भाजपावर टीका करण्याची शक्यता आहे.

मोदी सरकार जम्मू- काश्मीरमधील ही परंपराही मोडणार :
  • केंद्रातील मोदी सरकार जम्मू- काश्मीरमधील राज्यपालपदावर राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीला संधी देण्याचा विचार करत आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राजकारणाशी संबंधित व्यक्तीला राज्यपालपदावर संधी देण्याची ही पहिलीच वेळ ठरु शकते. यापूर्वी जम्मू- काश्मीरच्या राज्यपालपदावर सैन्यदल, गुप्तर विभाग किंवा प्रशासकीय सेवेशी संबंधित व्यक्तीलाच संधी देण्यात आली होती. ही परंपरा आता मोदी सरकार मोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • जम्मू- काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीची साथ सोडत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे जम्मू- काश्मीरमध्ये सध्या राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरचे विद्यमान राज्यपाल एन. एन. व्होरा यांचा कार्यकाळ २८ जून रोजी संपणार आहे. अमरनाथ यात्रा संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. अमरनाथ यात्रा २८ जून ते २६ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्यानंतरच राज्यपालपदावर नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे.

  • राज्यपालपदावर सैन्यदलाशी संबंधित व्यक्तीला संधी दिली तर देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकीचा संदेश जाईल, अशी भीती भाजपाला वाटते. त्यामुळे या पदावर कोणाला संधी द्यायची असा पेच आहे. विद्यमान राज्यपाल व्होरा हे पंजाब कॅडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

  • यापूर्वी १९९० ते २००८ या कालावधीत जम्मू- काश्मीरच्या राज्यपालपदावर सैन्यदल किंवा गुप्तचर विभागाशी संबंधित व्यक्तीलाच संधी देण्यात आली होती. त्यामुळे प्रशासकीय सेवेची पार्श्वभूमी असलेले व्होरा हे पहिलेच राज्यपाल ठरले.

कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीप, 'इंटेल'च्या सीईओंचा राजीनामा :
  • सॅन फ्रान्सिस्को : टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनींपैकी एक मानल्या जाणाऱ्या 'इंटेल'मध्ये एक अनोखी गोष्ट पाहायला मिळत आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे 'इंटेल'चे सीईओ ब्रायन क्रेझनिक यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

  • 58 वर्षीय क्रेझनिक हे काही काळापूर्वी एका ज्युनिओरसोबत परस्पर संमतीने रिलेशनशीपमध्ये होते. मात्र या नातेसंबंधांमुळे कंपनीच्या मॅनेजर्ससाठी लागू असलेल्या धोरणांचं उल्लंघन झालं आहे, असं अंतर्गत आणि बाह्य समितीच्या चौकशीत उघड झालं.

  • क्रेझनिक यांचे कुठल्या कर्मचाऱ्याशी नातेसंबंध होते, या रिलेशनशीपचा कालावधी किंवी अन्य कोणताही तपशील उघड करण्यास कंपनीने नकार दिला आहे. चौकशी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती इंटेल'तर्फे देण्यात आली आहे.

  • क्रेझनिक यांनी 1982 मध्ये इंटेल' कंपनी जॉईन केली होती. मे 2013 पासून पाच वर्ष त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची धुरा सांभाळली आहे. क्रेझनिक पायउतार झाल्यानंतर रॉबर्ट स्वॉन यांना अंतरिम सीईओपद देण्यात आलं आहे.

पदावर असताना प्रसुत होणाऱ्या न्यूझीलंडच्या पहिल्या पंतप्रधान :
  • वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी नुकतंच गोंडस बाळाला जन्म दिला. पदावर असताना प्रसुत होणाऱ्या त्या न्यूझीलंडच्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत.

  • ऑकलंडमध्ये असलेल्या देशातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयात आर्डर्न यांनी मुलीला जन्म दिला. यावेळी त्यांचे पती आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर क्लार्क गेफोर्डही सोबत होते.

  • गेल्या वर्षी पदाची सूत्रं हाती घेताना 37 वर्षीय आर्डर्न या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या देशाच्या सर्वात तरुण व्यक्ती ठरल्या होत्या. पंतप्रधानपद काबीज करण्याच्या अवघ्या सहाच दिवस आधी त्यांना आपण गरोदर असल्याचं समजलं होतं. आता, पदावर असताना प्रसुत होणाऱ्याही त्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या आहेत.

  • आर्डर्न मातृत्व रजेवर असेपर्यंत उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स पुढील सहा महिन्यांसाठी देशाचा कारभार सांभाळतील. न्यूझीलंडमध्ये 1893 साली महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. आर्डर्न या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.

  • ऑगस्टच्या सुरुवातीला आपण कार्यालयात परत येऊ. त्यानंतर पती बाळाची काळजी घेतील. देशाबाहेर कामानिमित्त जावं लागलं, तरी पती बाळाचा सांभाळ करतील, असं आर्डर्न यांनी सांगितलं. यापूर्वी 1990 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी पदावर असताना बाळाला जन्म दिला होता.

‘पनामा पेपर्स’मध्ये पुन्हा एकदा भारतातील बडी नावे उघड :
  • मुंबई जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘पनामा’ प्रकरणात पुन्हा एकदा नवी कागदपत्रे समोर आली आहेत. या कागदपत्रांमध्ये बनावट कंपन्यांद्वारे पैशाचा फेरफार करणाऱ्या अनेक मोठ्या भारतीय उद्योगपतींचीही नावे उघड झाली आहेत.

  • ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील शोधपत्रकारांनी यासंदर्भातील 12 लाख नव्या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे, ज्यातील 12 हजार पाने करचुकव्या भारतीय व्यवसायिकांशी संबंधित आहेत. तसेच नव्या कागदपत्रांमुळे या प्रकरणात अगोदर उघड झालेल्या व्यक्तींच्या करचुकवेगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

  • नव्या कागदपत्रांत कोणाकोणाचे नाव - उघड झालेल्या नव्या कागदपत्रांत भारतातील दिग्गज उद्योगपतींची नावे समोर आली आहेत. यामध्ये पीव्हीआरचे मालक अजय बिजली आणि त्यांचे कुटुंबीय, हाईक मेसेंजरचा सीईओ आणि सुनील मित्तल यांचा मुलगा कवीन मित्तल, एशियन पेंट्सचे सीईओ अश्विन दानींचा मुलगा जलज दानी यांचा समावेश आहे.

बाबा रामदेव यांच्या योगाची गिनीज बुकात नोंद :
  • कोटा: आंतरराष्ट्रीय योग दिनी योगगुरु बाबा रामदेव यांनी एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या कोटामध्ये २ लाखांहून अधिक लोकांसोबत एकाच वेळी योग करत विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. या प्रसंगी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंदरा राजेही उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं हे चौथं वर्ष असून २०१५मध्ये पहिल्यांदा योग दिन साजरा करण्यात आला होता.

  • राजस्थान सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राजस्थान सरकारनं या कार्यक्रमासाठी रामदेव बाबांना निमंत्रण दिलं होतं.यावेळी कार्यक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीमदेखील उपस्थित होती. एकाच वेळी दोन लाखांहून अधिक लोकांनी योगासनं केल्यानं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

  • आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगासनासाठी २ लाखांहून अधिक लोक कोटा येथे जमले होते. हजारो विद्यार्थी योग शिबिरात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त करण्यासाठी योग सर्वात योग्य पद्धत आहे, असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.

  • बाबा रामदेव यांनी मागील वर्षी २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं होतं. त्यावेळी त्यांनी ५४,५२२ लोकांसोबत योगा केला होता. त्याआधी त्यांनी ३५,९८४ लोकांसोबत एकत्र योग अभ्यास केला होता. या योग शिबिरात पंतप्रधानही सहभागी झाले होते.

अमेरिकेतील वैद्यकीय योजनेची सूत्रे डॉ. अतुल गावंडे यांच्याकडे :
  • बोस्टन : अमेझॉन, बर्कशायर हॅथवे व जेपी मॉर्गन या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीची धुरा डॉ. अतुल गावंडे या ५२ वर्षांच्या मराठी व्यक्तीकडे सोपविली आहे. अतुल गावंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. या तिन्ही कंपन्यांनी बुधवारी गावंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

  • अमेरिकेतील लोकांना अत्यल्प दरात उत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने या तिन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. तसे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीरच केले. या नव्या कंपनीचे मुख्यालय बोस्टनमध्ये असेल. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे एंडोक्राइन सर्जन आहेत. ते हार्वर्ड टीएन चान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थमध्ये आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागात प्राध्यापक असून, हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरीचे प्राध्यापक आहेत.

  • कमी खर्चात चांगल्या आरोग्य व वैद्यकीय सेवा देणे शक्य आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे ना नफा तत्त्वावर आम्ही ही कंपनी सुरू करीत आहोत, असे बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे यांनी स्पष्ट केले. डॉ. गावंडे या कामात आम्हाला यश मिळवून देतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

  • डॉ. अतुल गावंडे अनेक वर्षे अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी काम करीत असून, अमेरिकेतील वैद्यकीय उपचार, आरोग्य व त्यावरील खर्च यावर त्यांनी अनेकदा सडकून टीकाही केली आहे. अतुल गावंडे जसे डॉक्टर म्हणून प्रख्यात आहेत, तसेच आरोग्यविषयक वृत्तपत्र लिखाण व अन्य संशोधन यामुळे त्यांच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आहेत.

  • डॉ. गावंडे यांचे आई-वडील अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. अतुल यांचा जन्मही अमेरिकेतीलच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय वंशाचे अमेरिकन म्हणता येईल.

पुलित्झर पुरस्कार विजेते स्तंभलेखक चार्ल्स क्रॉथम्मर यांचं निधन :
  • वॉशिंग्टन- पुलित्झर पुरस्कार विजेते स्तंभलेखक चार्ल्स क्रॉथम्मर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरातल्या 400हून अधिक प्रकाशनांनी चार्ल्स क्रॉथम्मर यांचे लेख छापले होते. अनेक वर्षांपासून क्रॉथम्मर यांना कर्करोगानं पछाडलं होतं.

  • दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पोटातून कर्करोगाची गाठ काढण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी रक्त तपासणी केली असता कर्करोगानं पुन्हा डोकं वर काढल्याचं त्यांना समजलं. तसेच कर्करोग शरीरात वेगानं पसरत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

  • 8 जून रोजी क्रॉथम्मर डॉक्टरांकडे नियमित तपासणीकरिता गेले असता डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून तुमच्याकडे फक्त आठवड्याभराचा वेळ असल्याचं त्यांना सांगितलं. मृत्यूपूर्वी त्यांनी एक विधानही केलं होतं. हा अंतिम निर्णय आहे. माझा लढा आता संपला आहे, असं म्हणत त्यांनी प्राण सोडले आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६३३: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

  • १८९७: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  • १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.

  • १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.

  • १९७८: जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

  • १९८४: व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली.

  • १९८६: अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला.

  • १९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण.

  • २००७: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९४ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.

  •  

जन्म 

  • १८०५: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८७२)

  • १८८७:  ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

  • १८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांचा जन्म.

  • १८९९: मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९८०)

  • १९०८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९९८)

  • १९२७: भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो यांचा जन्म.  (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५)

  • १९३२: आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार अमरीश पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी २००५ – मुंबई, महाराष्ट्र)

  •  

मृत्यू 

  • १९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)

  • १९९३: चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन.

  • १९९४: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९०८)

  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता रामा नारायणन यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९४९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.