चालू घडामोडी - २२ मार्च २०१८

Date : 22 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आधारची गरज का? सरकार सुप्रीम कोर्टात सादरीकरण करणार :
  • नवी दिल्ली : आधारची गरज का आहे ते केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाला आता पॉवर पॉईंट प्रझेंटेशनच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. आधारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीदरम्यान सरकारकडून हा युक्तिवाद करण्यात आला.

  • आधार संबंधित सर्व चिंता दूर करण्यासाठी आधार प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रझेंटेशन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अॅटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी केली. एक तासाच्या प्रझेंटेशनमधून सर्व माहिती देऊ, असं ते म्हणाले.

  • वेणुगोपाल यांच्या या मागणीला मान्यता देत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केलं की, पीठातील इतर न्यायाधीशांसोबत विचार केल्यानंतर या प्रझेंटेशनची वेळ ठरवण्यात येईल.

  • ''आधारमुळे सरकारी योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. अगोदर हजारो कोटी रुपयांवर मध्येच डल्ला मारला जायचा. गोपनियतेचा मुद्दा काही जण पुढे करत आहेत. आधार अनेकांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार देत आहे हे पाहणं गरजेचं आहे,'' असं वेणुगोपाल म्हणाले.

  • आधार कार्डच्या वैधतेबाबतची अंतिम सुनावणी होत नाही, तोपर्यंत आधार लिंक करण्याची गरज नाही, असं गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं. समाज कल्याणच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार जोडण्यावर या निर्णयाचा परिणाम होणार नाही, असं दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने म्हटलं होतं.(source :abpmajha)

देशातील सर्व बँकांची जबाबदारी पंतप्रधान मोदींची नाही - अमित शहा :
  • पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघड होऊन बँकेने गुन्हा दाखल करण्यापूर्वीच नीरव मोदी देशातून बाहेर निघून गेलेला असे स्पष्ट करतानाच देशातील सर्व बँकेची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाही, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांना सुनावले आहे.

  • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यात त्यांनी नीरव मोदी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. नीरव मोदी प्रकरणासाठी भाजपा जबाबदार नाही. भ्रष्टाचाराविरोधात मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी नीरव मोदी प्रकरणावरुन भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. यावर प्रत्युत्तर देताना अमित शहा म्हणतात, राहुल गांधी यांच्या भाषणाची पत्रकार दखल घेतील, पण जनता त्याची दखल घेणार नाही.

  • जनतेला सर्व काही माहित आहे. विरोधकांना मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता आलेले नाही. नीरव मोदी प्रकरणात भाजप नेत्याचा सहभाग असल्याचे राहुल गांधी यांनी सिद्ध करावे, असे आव्हानच त्यांनी दिले. काँग्रेसच्या काळात विरोधकांनी आरोप केले नव्हते.

  • कॅग किंवा अन्य संस्थांच्या तपासातून भ्रष्टाचार उघड झाला होता. कोर्टात जनहित याचिका झाल्याने काही प्रकरण समोर आली होती, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांना इतकच असेल त्यांनी देखील आरोप करण्याऐवजी कोर्टात जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. देशातील प्रत्येक बँकेची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेऊ शकत नाही. यासाठीच प्रत्येक विभागाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.(source :loksatta)

नागपूर विद्यापीठातील गुणवंत सुवर्णपदकाला मुकणार :
  • नागपूर : एखाद्या विद्यापीठातला दीक्षांत समारंभ, तिथं मिळणारं सुवर्ण पदक आणि टाळ्यांच्या कडकडाटात होणारा गौरव... कॉलेज लाईफमधलं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न. पण नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी या प्रकारला आता मुकणार आहेत.

  • ज्या सुवर्णपदकांसाठी चढाओढ असायची, जे मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळायचं, तीच सुवर्णपदकं आता बंद होणार आहेत. 2019 पासून नागपूर विद्यापीठावर ही नामुष्की ओढावणार आहे, त्याचं कारण आहे सुवर्णपदकांसाठी मिळणाऱ्या दानातली आणि व्याजातली घट.

  • नागपुरातील प्रतिष्ठित संत तुकडोजी महाराज विद्यापीठ... 94 वर्षे जुनं... सुरुवातीच्या काळात सुवर्णपदकांसाठी विद्यापीठाला शंभर-दीडशे रुपयांचं दान मिळायचं. त्यावेळी सोन्याच्या भावानुसार दीडशे रुपयांत सुवर्ण पदकं घेणं शक्य होतं. मात्र आता सोन्याचे भावही वधारले आणि दानशूरांचे हातही आखडते झाले.

  • महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, तात्या टोपे, भगत सिंह, पंजाबराव देशमुख, श्रीकांत जिचकार यासारख्या दिग्गजांच्या नावानं तब्बल 400 सुवर्ण पदकांनी विद्यार्थ्यांना गौरवण्यात यायचं. मात्र पुढील वर्षापासून निम्म्याहून अधिक पदकांचं वाटप बंद होणार आहे.(source :abpmajha)

२ एप्रिलपासून सुरू होणार एच1-बी व्हिसासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया :
  • वॉशिंग्टन - अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एच1-बी  व्हिसा महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच1-बी  व्हिसाचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल पासून स्वीकारण्यात येणार आहेत.

  • मंगळवारी अमेरिकन सरकारसीं संबंधित एजन्सी यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस) यासंदर्भातील घोषणा केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी एजन्सीने सर्व एच1-बी व्हिसा अर्जांसाठीची प्रीमियम प्रोसेसिंग स्थगित करण्यात आली आहे. 

  • एच1-बी व्हिसा हा अमेरिकन कंपन्यांना त्यांच्या व्यवसायासाठी परदेशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची परवानगी देतो. अमेरिकेमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या ह्या भारत आणि चीनमधून येणाऱ्या त ज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एच1-बी व्हिसावर अवलंबून असतात.  

  • एच1-बी व्हिसा अर्ज करण्याची नवी घोषणा ही 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरू होणाऱ्या नव्या अमेरिकन आर्थिक वर्षासाठी करण्यात आली आहे. सर्व एच1-बी अर्जांवरील प्रीमियम प्रोसेसिंगवरील स्थगिती 10 सप्टेंबर 2018 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यूएससीआयएसने सांगितले की यादरम्यान ते त्या एच1-बी  अर्जांच्या प्रीमियम प्रोसेसिंगच्या कार्यवाहीला स्वीकार करत राहील, जे 2019च्या आर्थिक वर्षासाठी वरील मर्यादेपासून मुक्त असतील. 

  • यूएससीआयएसचे म्हणणे आहे की, प्रीमियम प्रोसेसिंगला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पण जर कुणी अर्जदार आवश्यक अटींची पूर्तता करत असेल तर तो 2019 च्या आर्थिक वर्षासाठी आपल्या अर्जाच्या प्रक्रियेला गती देण्याचा आग्रह करू शकतो. प्रीमियम प्रोसेसिंगला अस्थायी स्थगिती दिल्याने एच-1बी प्रोसेसिंगची एकूण वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.(source :lokmat)

निसान, टाटा मोटर्सची वाहनं ६० हजार रुपयांपर्यंत महागणार :
  • नवी दिल्ली : पुढच्या महिन्यापासून निसान इंडिया आणि टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. कंपनीनेच याबद्दल माहिती दिली. वाढता खर्च पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 1 एप्रिलपासून वाहनांच्या किंमतीत 60 हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.

  • ‘भाषा’च्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली. कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या श्रेणीत 2.28 लाख रुपयांच्या जेनएक्स नॅनोपासून ते 17.42 लाख रुपयांच्या SUV हेक्साचाही समावेश आहे.

  • वाढता खर्च आणि बाजारातील बदलती परिस्थिती पाहता किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती टाटा मोटर्सचे अध्यक्ष (प्रवासी वाहन) मयंक पारीक यांनी दिली.

  • याचप्रमाणे निसानही भारतात आपल्या वाहनांच्या किंमतीत पुढच्या महिन्यापासून 2 टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. निसानची मायक्रा, सनी आणि टेरानो हे तीन मॉडल सध्या भारतात आहेत. ज्याची किंमत 4.64 लाख रुपयांपासून ते 14.46 लाख रुपयांपर्यंत आहे. तर डॅट्सनच्या गो, गो प्लस आणि रेडी गो या वाहनांची किंमत 2.49 रुपयांपासून ते 5.12 लाख रुपयांपर्यंत आहे.

  • दरम्यान, वाहनांच्या किंमती वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या आठवड्यात ऑडीनेही कारच्या किंमती 1 लाख रुपये ते 9 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. या वाढलेल्या किंमती 1 एप्रिलपासून लागू होतील.(source :abpmajha)

आमचं चुकलंच; ‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरणात मार्क झुकेरबर्गची कबुली :
  • केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने अखेर मौन सोडले आहे. आमच्या हातून काही चुका झाल्या आहेत. पण त्या सुधारण्यासाठी आम्ही उपाययोजना देखील राबवल्या आहेत, असे झुकेरबर्गने म्हटले आहे. पुन्हा असे प्रकार होणार नाही, असे आश्वासनही त्याने युजर्सना दिले आहे.

  • अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीला फेसबुकवरील पाच कोटी युजर्सचा तपशील दिल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी झुकेरबर्गला ब्रिटनच्या संसदीय समितीने समन्सही बजावले आहे.

  • युजर्सच्या परवानगीविना त्यांचा डेटा उघड केल्याने फेसबुकवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर झुकेरबर्गने त्याच्या अधिकृत पेजवरुन केंब्रिज अॅनालिटिका वादावर सविस्तर भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये त्याने चूक झाल्याचे मान्य केले आहे.(source :loksatta)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

  • १९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

  • १९४५: अरब लीगची स्थापना झाली.

  • १९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

  • १९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

जन्म

  • १७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८८८)

  • १९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)

  • १९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)

  • १९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.

  • १९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.

मृत्यू

  • १८३२: जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)

  • १९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.

  • २००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.