चालू घडामोडी - २२ मे २०१७

Date : 22 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेच्या डझनभर हेरांना चीनने मारले :
  • चीनने सन २०१० ते २०१२ या दोन वर्षांत ‘सीआयए’च्या डझनभर खबऱ्यांना ठार करून आणि आणखी सहा ते आठ जणांना अटक करून अमेरिकेचे चीनमधील हेरगिरीचे जाळे पार खिळखिळे करून टाकले असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

  • सीआयए ही अमेरिकेची गुप्तहेर संघटना आहे. याच संघटनेच्या १० आजी आणि माजी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गुप्तचर माहितीशी संबंधित हे प्रकरण गेल्या काही दशकांतील सर्वात गंभीर प्रकरण आहे.

  • अमेरिकी गुप्तचर आणि इतर यंत्रणांनी ही हानी भरून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र याबाबत त्यांच्यात मतभेद असल्याचे दिसते.

  • सीआयएमध्येच कोणीतरी घरभेदी असल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर काहींच्या मते, सीआयए आपल्या विदेशी सूत्रांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेली प्रणालीच चिनी लोकांनी हॅक केली आहे. हा वादविवाद अजूनही थांबलेला नाही.

मुंबई इंडियन्सला आयपीएल १० चे विजेतेपद :
  • आयपीएल १० चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम मुंबईने केला. अंतिम लढतीत मुंबईला पुन्हा एकदा जिंक्स फॅक्टर म्हणजेच अजिंक्य रहाणेचा सामना करावा लागला.

  • बुमराह, मलिंगा, जॉन्सन या तिकडीने अचूक आणि भेदक गोलंदाजीने हा सामना मुंबईच्या बाजूने फिरवला. आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्सच्या पुणे संघाविरोधातील विजयाचा मोठा अडसर ठरला होता तो जिंक्स म्हणजेच अजिंक्य रहाणे. रहाणेने मुंबई विरुद्ध पुणे या सामन्यात नेहमीच मोठी धावसंख्या उभारली होती.

  • तसेच फायनलमध्येही तो मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. मात्र संघाच्या धावगतीने अखेरच्या क्षणात पुण्याचा एका धावेने घात झाला. 

'तेजस' एक्स्प्रेस अत्याधुनिक सुविधांनी सज्ज :
  • ताशी तब्बल २०० किलोमीटर वेगाने धावू शकणारी, देशातील सर्वात वेगवान ट्रेन असे बिरूद मिरवणारी 'तेजस' एक्स्प्रेस अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी दिली.

  • छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे शर्मा आणि अन्य अधिकाऱ्यांनी 'तेजस' एक्स्प्रेसचे (मुंबई-करमळी) निरीक्षण केले. त्या वेळी ते म्हणाले की, 'गेली तीन वर्षे 'तेजस' एक्स्प्रेससाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले आहेत.

  • ' प्रवाशांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

  • मुंबई-करमळी (गोवा) या मार्गावर 'तेजस' एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवताच, मुंबई येथून 'तेजस' करमळीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

  • 'तेजस'मध्ये एक्झिक्युटिव्ह बोगीत ५६ सीट आणि एसी बोगीत ९३६ सीट आहेत. प्रत्येक डब्यात ६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

मोदी सरकार पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्याने दिला इशारा :
  • पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी याबाबत पाकला इशारा दिला. सरकार दहशतवाद आणि पाकिस्तानकडून सीमेवर होत असलेल्या गोळीबाराला उत्तर देण्यासाठी काही निर्णायक पाऊल उचलेल, असे त्यांनी म्हटले.

  • पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यासाठी भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकते.

  • जेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले, तेव्हा आम्ही (माध्यमांना) सांगितलं होतं का? आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर त्याचा गौप्यस्फोट केला. 

  • गुप्तचर संस्थाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या सीमेवर १५ दहशतवादी शिबिरे आणि ४८ लाँचपॅड सक्रिय आहेत. त्याचबरोबर सीमारेषेजवळ ४ ते ५ बॅट कॅम्पही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एलओसीवर ४८ शिबिरे सक्रिय आहेत. सीमेजवळील लाँचपॅडमध्ये सुमारे ३५० दहशतवादी हे घुसखोरीसाठी सज्ज असल्याचे समजते.

भारतीय महिला संघाने जिंकली चौरंगी मालिका :
  • अनुभवी झुल्लन गोस्वामीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेली सुरेख कामगिरी आणि जबरदस्त सूर गवसलेल्या पूनम राऊत आणि कर्णधार मिताली राज यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा १०२ चेंडू आणि आठ गडी राखून पराभव करीत चार देशांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका जिंकली.

  • महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या झुल्लन हिने २२ धावांत ३ बळी घेतले. लेगस्पिनर पूनम यादवने ३२ धावांत ३ व मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेने २३ धावांत २ गडी बाद करीत तिला साथ दिली.

  • तसेच या गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ४०.२ षटकांत १५६ धावांत बाद केले. सलामीवीर पूनम राऊतने ९२ चेंडूंत नाबाद ७० आणि मिताली राज हिने ७९ चेंडूंत नाबाद ६२ धावा करीत आणि तिसऱ्या गड्यासाठी नाबाद 127 धावांची भागीदारी करीत संघाला ३३ षटकांत २ बाद १६० धावांपर्यंत मजल मारू देताना शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा हसन रुहानी :
  • इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी हे सलग दुस-यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत.

  • राष्ट्रपती निवडणुकीत ते विजयी ठरले आहेत. त्यांनी मुख्य प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांचा पराभव केला आहे. मतमोजणीच्या वेळी त्यांनी मोठी आघाडी घेतली होती.

  • दोन कोटी ५९ लाख मतांची मोजणी पूर्ण झाली त्यावेळी रुहानी यांना निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एक कोटी ४६ लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती. त्याचवेळी हसन रुहानी सलग दुस-यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार हे निश्चित झाले होते.

दिनविशेष : 

जन्म, वाढदिवस

  • सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांचा बंगालमध्ये जन्म झाला : २२ मे १७७२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेते श्रीपाद डांगे यांचे निधन : २२ मे १९९१

ठळक घटना

  • ’अग्नी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे ओरिसातील मंडीपूर येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले : २२ मे १९८९

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.