चालू घडामोडी - २२ मे २०१८

Date : 22 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगभ्रमंती करुन सहा महिला नौदल अधिकारी गोव्यात दाखल :
  • पणजी : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सहा महिला नौदल अधिकाऱ्यांसह जगभ्रमंतीला निघालेली ‘आयएनएसव्ही तारिणी’ ही शिडाची बोट गोव्यात परतली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा समुद्रकन्यांचं स्वागत केलं.

  • महिला अधिकाऱ्यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता.

  • आशियाई महिलांनी समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलीच वेळ होती. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सहा जणींनी तयारी केली होती.

  • दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचं बंदर होतं. त्यानंतर मार्चमध्ये ही बोट परतीच्या प्रवासाला निघाली. या प्रवासात महिला नौदल अधिकाऱ्यांनी 21 हजार 600 सागरी मैल अंतर पार केलं.

  • जगभ्रमंती करताना अनेकवेळा त्यांच्या शिडाला वाईट हवामानाला तोंड द्यावं लागलं. सात मीटर उंची पर्यंतच्या लाटा आणि ताशी 60 किलोमीटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला.

यूपीएससीचे नियम बदलणार :
  • नवी दिल्ली : मोदी सरकारकडून देशभरात होणाऱ्या लोकसेवा परीक्षांच्या नियमांमध्ये अमूलाग्र बदल केला जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत नोकरी आणि केडर निवडण्यासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचं पुस्तकी ज्ञानासह व्यवहारिक ज्ञानही तपासलं जाणार आहे. परीक्षेच्या निकालानंतर होणाऱ्या प्रशिक्षणाच्या आधारवर ते कोणत्या सेवेत जाण्यासाठी पात्र आहे, हे ठरवंल जाईल.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर हे नवे बदल याच वर्षी लागू होतील, असं म्हटलं जात आहे. या नव्या सिस्टमनुसार अशी शक्यताही आहे की, ट्रेनिंगमधील सुमार कामगिरीमुळे परीक्षेतील टॉपरला आयएएस केडर मिळू शकणार नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या उमेदवाराने  ट्रेनिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर तो आयएएस बनू शकतो.

  • कसा ठरणार रँक?

  • नवे बदल का?

  • मोदी सरकार आल्यावर प्रशिक्षणात बदल

  • सध्या कसं होतं प्रशिक्षण?

  • अग्रवाल समितीच्या शिफारशी यंदाच लागू होणार! (source :abpmajha)

कर्नाटकात होणार दोन उपमुख्यमंत्री :
  • नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस व जनता दलाचे संयुक्त सरकार बनवण्यासाठीचा मसुदा तयार झाला असून, त्यांसंदर्भात भावी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते बुधवारी संध्याकाळी ४ वाजता बंगळुरूमध्ये होणाऱ्या शपथविधीला हजर राहणार आहेत.

  • काँग्रेस नेत्यांशी कुमारस्वामी यांची जी चर्चा झाली, त्यात बहुजन समाज पक्षाच्या एकमेव आमदाराला मंत्रिमंडळात घेण्यावर निर्णय झाला. काँग्रेसने दोन उपमुख्यमंत्री असावेत, असा प्रस्ताव कुमारस्वामी यांच्यापुढे ठेवला आहे. तसेच काही महत्त्वाची खाती काँग्रेसला द्यावीत, असेही त्यांना सुचवण्यात आले आहे. त्यावर मंगळवारी अंतिम निर्णय होईल. राहुल यांची कुमारस्वामींनी भेट घेतली, तेव्हा खा. के. सी. वेणुगोपालही हजर होते.

  • उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने जी. परमेश्वर यांचे नाव नक्की केले आहे. त्याशिवाय भाजपापुढे अडचणी निर्माण करण्यात व काँग्रेस आमदारांना एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डी. के. शिवकुमार यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

  • आता मंगळवारी बंगळुरूत होणाºया चर्चेत स्वत: एच. डी देवेगौडा तसेच काँग्रेसतर्फे के. सी. वेणुगोपाळ, सिद्धरामय्या व शिवकुमार सहभागी होतील. त्यात जो निर्णय होईल, तो राहुल गांधी यांना कळवून त्यांचा होकार घेतला जाईल. काँग्रेसला २0 ते २२ मंत्री असावेत, असाही प्रस्ताव आहे.

औरंगाबादच्या प्राध्यापिकेकडून एव्हरेस्ट शिखर सर :
  • औरंगाबाद : औरंगाबादच्या प्राध्यापिकेने अवघड एव्हरेस्ट मोहीम यशस्वीरित्या सर केली आहे. मनिषा वाघमारे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं.

  • मनिषा वाघमारेंनी 2017 मध्येही एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. प्रकृती ठणठणीत असूनही शिखरमाथा अवघ्या 170 मीटर अंतरावर असताना मनिषा यांना निसर्गाच्या अवकृपेमुळे माघारी फिरावं लागलं होतं.

  • मनिषा यांनी त्यानंतरही अजिबात न खचता पुन्हा एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम आखली. इंडियन कॅडेट फोर्स (आयसीएफ)ची स्वयंसेवक आणि महिला महाविद्यालयाची शारीरिक शिक्षण विभाग संचालक असलेल्या मनिषा यांनी एव्हरेस्ट परिसरातील शिखरांवर आपला सराव सुरु ठेवला होता.

  • मनिषा यांनी 8 हजार 848 मीटरवर सोमवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी समिट गाठल्याची माहिती आयसीएफच्या जगदीश खैरनार यांनी दिली. अशाप्रकारे मनिषा यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.

IPL च्या अंतिम सामन्याचं मराठीत समालोचन :
  • मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील अंतिम फेरीचे दावेदार कोण ठरणार आणि कोणता संघ विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणार याची प्रचंड उत्सुकता क्रीडा रसिकांना आहे. क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांना 27 मे रोजी या सामन्याचं मराठी समालोचन पाहता येणार आहे, तेसुद्धा अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत.

  • मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना मराठी समालोचनासह पाहता येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर VIVO IPLचा 27 मे रोजी होणारा अंतिम सामना पाहता येणार आहे.

  • विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार आहेत. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल. संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार आहे.

  • मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. IPL 2018 च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्यामुळे त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मराठी माणसांना पहिल्यांदा क्रिकेट सामन्याचं समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी मिळणार आहे. क्रिकेट आणि मराठी भाषेच्या जल्लोषात प्रेक्षकही नक्की सहभागी होतील, अशी खात्री स्वप्नील जोशीनं व्यक्त केली.

भारत-रशियाची विशेष व्यूहात्मक भागीदारी :
  • सोची : भारत आणि रशियाचे संबंध आता विशेष व्यूहात्मक भागीदारीच्या स्तरावर पोहोचले आहेत आणि हे मोठे यश आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशांच्या मैत्रीचे वर्णन केले. मोदी रशिया दौऱ्यावर गेले असून सोमवारी त्यांनी सोची येथे रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले.

  • सोची येथे दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वी पुतिन यांनी मोदींचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी अनौपचारिक चर्चा केली. दोन्ही देशांतील मैत्री आणि विश्वासाचा वापर करून जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर एकमत तयार करणे हे या भेटीचे उद्दिष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • मोदींच्या भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांना उजाळा मिळेल. उभय देशांच्या संरक्षण मंत्रालयांमध्ये उत्तम सहकार्य आहे. त्यातून आपली उच्च स्तरावरील व्यूहात्मक भागीदारी दिसून येते, असे पुतिन म्हणाले.

  • संयुक्त राष्ट्रे, ब्रिक्स संघटना आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये दोन्ही देशांच्या कार्याचे पुतिन यांनी कौतुक केले. तसेच भारत आणि रशियामधील वाढत्या व्यापाराचाही उल्लेख केला.

चार महिन्यांत चार डीजी होणार निवृत्त :
  • मुंबई : पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांबाबत गृहविभागाकडून विलंब होत असला, तरी पुढील चार महिन्यांत खात्यात वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. येत्या ३१ मे पासून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह तब्बल चार महासंचालक दर्जाचे अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. पहिली ‘रिटायरमेंट’ येत्या ३१ मे रोजी पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे प्रमुख व्ही. डी. मिश्रा यांच्यापासून होत आहे.

  • अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयांची प्रथमच एवढ्या सलग दिवसांत निवृत्ती होत आहे. त्यामुळे त्यांच्या पदावरील नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या विचारपूर्वक कराव्या लागणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरणार आहे.

  • राज्यात डीजी दर्जाची सध्या आठ पदे मंजूर आहेत. त्यापैकी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) वगळता, अन्य ठिकाणी अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी निवृत्तीची सुरुवात व्ही. डी. मिश्रा यांच्यापासून होईल. १९८५च्या आयपीएस बॅचचे अधिकारी मिश्रा दोन वर्षांपासून पोलीस गृहनिर्माण विभागात आहेत.

  • त्यांच्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे, ३० जूनला पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त होत आहेत. ते १९८१च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्यानंतर दोन महिन्यांत ३१ आॅगस्टला मुंबई पोलीस दलाचे प्रमुख दत्ता पडसलगीकर यांची निवृत्ती आहे. ते १९८२च्या बॅचचे अधिकारी असून सव्वा दोन वर्षांपासून आयुक्त आहेत. त्यानंतर, न्यायवैधक व तंत्रज्ञचे प्रमुख एस. पी. यादव ३० सप्टेंबरला निवृत्त होतील.

दिनविशेष :
  • जागतिक जैवविविधता दिन

महत्वाच्या घटना 

  • १९२७: चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.

  • १९६०: ग्रेट चिलीयन भूकंप हा ९.५ तीव्रतेचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.

  • १९६१: हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.

  • १९७२: सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.

  • २००४: भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.

  • २०१५: आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.

जन्म 

  • १७७२: समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)

  • १७८३: विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८५०)

  • १८१३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १८८३)

  • १८५९: स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९३०)

  • १९०५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक बोडो वॉन बोररी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९५६)

  • १९४०: भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.

  • १९८४: फेसबुकचे सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८०२: अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २ जून १७३१)

  • १९९१: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)

  • १९९५: चित्रकार व शिल्पकार रविंद्र बाबुराव मेस्त्री यांचे निधन.

  • १९९८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.