चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ मे २०१९

Date : 22 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टीम इंडिया विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना :
  • ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. ५ जून रोजी भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असा आत्मविश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंनी एअरपोर्टवर वेळ घालवला.

  • इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी, संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी रवी शास्त्री यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. रवी शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधरही हजर होते. यावेळी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी तिघांनीही साईबाबांकडे प्रार्थना केली.

  • दरम्यान, World Cup २०१९ हा सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक विश्वचषक असेल. कारण हा एकदिवसीय विश्वचषक आहे. आतापर्यंत मी जे एकदिवसीय विश्वचषक खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे, असे वक्तव्य टीम इंडियाचा कर्णधार विराट याने केले. यंदाचा विश्वचषक हा इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी प्रयाण करण्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. या वेळी प्रशिक्षक रवी शास्त्री हेदेखील उपस्थित होते.

इस्रोकडून ‘रीसॅट-२बी’ उपग्रहाचे प्रक्षेपण; ‘पीएसएलव्हीसी ४६’ मोहिम यशस्वी :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने बुधवारी पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘पीएसएलव्हीसी ४६’ चे यशस्वी प्रक्षेपण केले. तसेच, ‘पीएसएलव्हीसी ४६’ ने भारतीय रडार पृथ्वीची पाहणी करणारा ‘रीसॅट-२बी’ या उपग्रहास देखील ५५५ किलोमीटर उंच असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या नेऊन ठेवले.

  • ‘पीएसएलव्हीसी’ ची ही ४८ वी भरारी आहे. तर रीसॅट-बी हा उपग्रह मालिकेतील चैाथा उपग्रह आहे. या उपग्रहाची गुप्त पाहणी, कृषि, वन व आपत्ती व्यवस्थापनात मदत होणार आहे. या उपग्रहाचे वजन ६१५ किलो असून प्रक्षेपणानंतर केवळ १५ मिनीटातच त्याने पृथ्वीची पहिली कक्षा ओलांडली. रीसॅट-बी बरोबर सिंथेटिक अपर्चर रडार (सार) इमेजर देखील पाठवले आहे. यामुळे संचार सेवा कायम राहिल.

  • या अगोदर मंळवारी इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी तिरूपती व तिरूमला मंदिरात जाऊन इस्रोच्या परंपरेनुसार भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली होती. आज या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांनी सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.

किलोग्रॅमसह चार एककांच्या व्याख्यात बदल :
  • जगभरात किलोग्रॅम, केल्विन, मोल, अ‍ॅम्पियर यांच्या व्याख्या बदलण्यात आल्या असून त्याबाबत करण्यात आलेला जागतिक ठराव भारताने मान्य केल्याने आता देशातील क्रमिक पुस्तकात त्यांच्या व्याख्या बदलण्यात येणार आहेत, प्रत्यक्ष व्यवहारात त्याचे कुठलेही फार मोठे परिणाम जाणवणार नाहीत पण जिथे अगदी सूक्ष्म पातळीवरचे मापन महत्त्वाचे ठरते, अशा संशोधनात त्यामुळे मोठा फरक पडणार आहे.

  • एकूण १०० देशांनी मापनाची मेट्रिक पद्धती मान्य केली असून ती १८८९ पासून अमलात आहे, याचा अर्थ १३० वर्षांनी या मापनांमध्ये बदल करण्यात आला आहे. सेकंद, मीटर व कँडेला ही वेळ, लांबी, प्रकाशाची तीव्रता यांची मापन एकके आहेत. त्यांच्या व्याख्या आधीच बदलण्यात आल्या आहेत.

  • हे स्वीकारण्यात आलेले बदल आता ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी , नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर शैक्षणिक संस्थांना कळवण्यात आले आहेत.

अधिकृत निवडणूक निकालाला मध्यरात्र होणार :
  • नागपूर : निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ ते १८ तास लागणार असल्याने लोकसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र किंवा त्याही पेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिरापर्यंत जाहीर निकालाच्या कलावरूनच कोण जिंकणार, याबाबत अंदाज बांधावा लागणार आहे. दरम्यान, होणारा विलंब कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे.

  • जिल्ह्य़ातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना बाजार समितीच्या परिसरात होणार आहे. याबाबतच्या तयारीची माहिती आज मंगळवारी जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्ट्राँगरूमधून मतदान यंत्र बाहेर काढण्यापासून तर ते मतमोजणीच्या टेबलवर नेईपर्यंत आणि व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठय़ांची मोजणी करेपर्यंतच्या सर्व प्रक्रियांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

  • प्रत्येक फेरीला किमान ५० मिनिटे ते एक तासाचा वेळ लागणार आहे. सरासरी १७ ते १८ फे ऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा निर्धारित वेळ लक्षात घेता अधिकृत निकाल जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

  • सकाळी ८ वाजतापासून टपाल मतपत्रिकांच्या मोजणीने मतमोजणीस सुरुवात होईल व सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठय़ा मोजण्यात येतील. साधारणपणे ९ वाजतापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. पहिली फेरी साधारणपणे एक तासाने म्हणजे १० वाजता जाहीर होईल. त्यानंतर प्रत्येक फेरीला साधारणपणे ५० मिनिटे ते एक तासाचा वेळ लागेल, असे मुद्गल म्हणाले.

सर्व ईव्हीएम मशीन्स स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण :
  • नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या 'स्ट्राँगरुम'मधील ईव्हीएम मशीन्ससोबत झेडछाड आणि गडबडी झाल्याचा आरोप महाआघाडीचे (बसपा-सपा) उमेदवार अफझल अन्सारी यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

  • सोशल मीडियावर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. मतदानानंतर प्रत्येक ईव्हीएम मशीन तेथील उमेदवारांसमोर सील करण्यात आल्या होत्या. त्याचं व्हिडीओ शूटिंगही करण्यात आलं आहे. याशिवाय ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही उपस्थित होते. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबडी झाल्याचे आरोप चुकीचे असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

  • देशातील विविध भागातून ईव्हीएमसोबत छेडछाड झाल्याबाबत विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. या प्रत्येक आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील आरोपांबाबत निवडणूक आयोगाने म्हटलं की, ईव्हीएमवरील आरोपांबाबतचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने गाझीपूर व्यतिरिक्त चंदौली, डुमरियागंज आणि झांसी येथील घटनांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. यासाठी निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचीही मदत घेतला.

  • ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरुमच्या सुरक्षेसाठी त्याठिकाणी 24 तास सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांचे प्रतिनिधीही तेथे थांबू शकतात, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

मेरी कोम उपांत्य फेरीत :
  • सहा वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरी कोमची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या निखात झरीनशी इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेच्या ५१ किलो गटाच्या उपांत्य फेरीत गाठ पडणार आहे.

  • कर्मवीर नवीन चंद्रा बोडरेली बंदिस्त स्टेडियमवर चालू असलेल्या या स्पर्धेत मंजू राणी, मोनिका आणि एस. कलैयवाणी यांनीसुद्धा ४८ किलो गटाची उपांत्य फेरी गाठून दुसऱ्या दिवशी भारताची पाच पदके निश्चित केली आहेत. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताला एकूण १५ पदके मिळण्याची शक्यता आहे.

  • लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमपुढे नेपाळच्या माला रायचा निभाव लागला नाही. मेरीने ५-० असा विजय मिळवला. निखातनेही अनामिकाला ५-० अशी सहज धूळ चारली.

दिनविशेष :
  • जागतिक जैवविविधता दिन

महत्वाच्या घटना 

  • १७६२: स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.

  • १९०६: राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.

  • १९२७: चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.

  • १९६०: ग्रेट चिलीयन भूकंप हा ९.५ तीव्रतेचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.

  • १९६१: हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.

  • १९७२: सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.

  • २००४: भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.

  • २०१५: आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.

जन्म 

  • १७७२: समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)

  • १७८३: विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८५०)

  • १८१३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १८८३)

  • १८५९: स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९३०)

  • १८७१: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९३३)

  • १९०७: ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै १९८९)

  • १९४०: भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.

  • १९५९: भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म.

  • १९८४: फेसबुकचे सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५४५: भारतीय शासक शेरशाह सूरी यांचे निधन.

  • १८८५: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी१८०२)

  • १९९१: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)

  • १९९८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.