चालू घडामोडी - २२ नोव्हेंबर २०१८

Date : 22 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात 'त्याची' वापसी, भारताला टेंशन :
  • सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताला चार धावांनी पराभूत करताना दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. तीन सामन्यांच्या मालिकेत कांगारूंनी 1-0 अशी आघाडी घेतली आणि पुढील सामन्यांसाठी त्यांचे मनोबल उंचावले आहे.

  • ट्वेंटी-20 मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारीही ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरू केली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या परतीचे मार्ग बंद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आणखी एक प्रमुख अस्त्र समोर आणले आहे. त्यामुळे भारतीय संघाचे टेंशन वाढले आहे.

  • क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा 14 सदस्यीय संघ जाहीर केला. या मालिकेतील पहिला सामना 6 डिसेंबरला अॅडलेड ओव्हल येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या या संघात उस्मान ख्वाजाचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीतून सावरलेला ख्वाजा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्याशिवाय संघ व्यवस्थापनाने मार्कस हॅरिसला पदार्पणाची संधी दिली आहे. पाकिस्तान दौऱ्यातील संघात समावेश नसलेला पीटर हँड्सकोम्बही पुनरागमन करणार आहे. 

  • व्हिक्टोरीया क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅरिसने शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 250 धावांची नाबाद खेळी करून निडव समितिचे लक्ष वेधले. त्याने 87.40 च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. ''या संघात युवा फलंदाज व गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी शेफिल्ड शिल्डमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. कसोटी सामन्यासाठी आम्ही अंतिम 12 जणांची निवड करणार आहोत. उर्वरित दोन खेळाडूंना शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली जाईल,'' असे निवड समितीच्या ट्रॅव्हर होन्स यांनी सांगितले. 

देशातील निम्मी ‘एटीएम’ मार्चअखेर बंद होणार :
  • मुंबई : नियामक संस्थांनी लागू केलेल्या निर्बंधांच्या पालनासाठी करावी लागणारी जास्तीची गुंतवणूक परवडणारी नसल्याने देशातील २.३८ लाखपैकी १ लाख १३ हजार एटीएम मार्चअखेर बंद करावी लागतील, असा इशारा ‘कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्री’ने बुधवारी दिला.

  • आमचा उद्योग आता न परवडण्याच्या अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, असा दावा करत संघटनेने म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या संख्येने ‘एटीएम’ बंद झाली तर त्याचा रोजगारावरही विपरित परिणाम होईल. शिवाय बंद होऊ शकणारी बहुतांश ‘एटीएम’ बिगरशहरी भागातील असल्याने विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींची गैरसोय होईल.

  • हे लाभार्थी थेट बँकेत जमा झालेल्या अनुदानाची रक्कम काढण्यासाठी ‘एटीएम’चा वापर करतात. परिणामी या लोकांनाही बँकिंगमध्ये सामावून घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाही खीळ बसेल. महासंघाने असा दावा केला की, नोटाबंदीच्या फटक्यातून ‘एटीएम’सेवा पुरवठादार सावरले नसतानाच नव्या नियामक निर्बंधांमुळे करावा लागणारा जादा खर्च परवडणारा नाही.

काश्मीरबाबत भाजपा आमदारांची तातडीची बैठक, लवकरच निवडणुका होणार :
  • श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपीने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वेगाने घडामोडी घडत आहेत. तर जम्मू आणि काश्मीरमधील भाजप आमदारांची आज तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकांसोबतच जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे भाजपाचेप्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांनी म्हटले आहे. 

  • जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं पत्र पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिलं. मात्र, पीडीपीचे आमदार इमरान अन्सारीदेखील राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. आपल्यासोबत 18 आमदार असल्याचा दावा अन्सारी यांनी केला आहे. 

  • दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांनी सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र लिहिल्यावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा आदेश दिला आहे. मुफ्ती यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. यासाठीचं पत्र राज्यपालांना पाठवत असल्याची माहिती मुफ्ती यांनी ट्विटरवरुन दिली. मात्र, त्यापूर्वीच राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यानंतर, आता लवकरच निवडणूक घेण्याची मागणी जम्मू आणि काश्मीरमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी केली आहे. 

  • मार्च 2015 मध्ये भाजपा आणि पीडीपीनं जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं होतं. मात्र, यंदाच्या जून महिन्यात भाजपानं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर जवळपास सहा महिने राज्यात राज्यपाल राजवट लागू आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

पाकिस्तानने दिला ३८०० भारतीयांना व्हिसा :
  • नवी दिल्ली : गुरुनानक यांच्या ५४९ व्या जयंती कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लाहोरजवळच्या नानकाना साहिबला भेट देण्यासाठी पाकिस्तानने ३,८०० पेक्षा जास्त भारतीयांना व्हिसा दिला आहे. हा कार्यक्रम २१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल.

  • पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गेल्या काही वर्षांत शीख भाविकांना एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच व्हिसा दिल्याचे म्हटले. महमूद म्हणाले की, शीख धर्माच्या संस्थापकांशी संबंधित शीख स्थळांना भेट देण्याची इच्छा असलेल्या शीख यात्रेकरूंबाबत ही आमची विशेष भावना आहे.

  • गेल्या जून महिन्यात भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना इस्लामाबादजवळच्या गुरुद्वारा पंजा साहीबमध्ये प्रवेश करण्यास रोखल्याबद्दल वाद निर्माण झाला होता. तथापि, पाकिस्तानने मंगळवारी म्हटले की, सगळ्या पवित्र ठिकाणांचे संवर्धन करण्यास आणि भेटीसाठी येणाऱ्या सर्व धर्मांच्या यात्रेकरूंना सर्व शक्य ते साह्य करण्यास आम्ही बांधील आहोत.

सायना, कश्यप यांची मोदी बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी :
  • लखनौ : ‘फुलराणी’ सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी सहज विजयासह सय्यद मोदी विश्व सुपर बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी आश्वासक सुरुवात केली. विद्यमान चॅम्पियन प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांची जोडी मिश्र दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली.

  • प्रणव- सिक्की या जोडीला केवळ ३१ मिनिटांत चीनच्या रेन झियांगू- झोऊ चाओमिन यांनी १४-२१,११-२१ पराभूत केले. तीन वेळेची चॅम्पियन सायनाने मॉरिशसच्या केट फू कून हिचा २१-१०, २१-१० असा पराभव केला. कश्यपने थायलंडचा तानोंगसाक सेनसोबुन्स्कला २१-१४, २१-१२ असे नमविले.

  • सायनाला पुढील फेरीत भारताच्याच अमोलिकासिंग सिसोदिया व कश्यपला इंडोनेशियाचा फरमान अब्दुल खोलिकविरुद्ध खेळावे लागेल. बी साईप्रणित यानेही पहिला अडथळा सहज पार केला. त्याने रशियाचा सर्गेई सिरांतवर २१-१२, २१-१० ने विजय नोंदविला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

  • १९४३: लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.

  • १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  • १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

  • १९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

  • १९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

  • २००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

  • २०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

जन्म 

  • १८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)

  • १८८५: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९५१)

  • १८९०: फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)

  • १९०९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)

  • १९१३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)

  • १९१५: चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)

  • १९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

  • १९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.

  • १९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.

  • १९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

  • १९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२०: कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.

  • १९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.

  • १९५७: नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)

  • १९६३: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

  • १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. (जन्म: २९ मे १९१७)

  • २००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

  • २००८: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)

  • २०१२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

  • २०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.