चालू घडामोडी - २२ ऑक्टोबर २०१८

Date : 22 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गोंदियात लवकरच शासकीय सेंद्रिय धान्य खरेदी-विक्री केंद्र :
  • गोंदिया : धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दोन वर्षांपासून अनेक प्रयत्न केले. याचे सकारात्मक परिणामही पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं सेंद्रिय धान्य विक्री करताना अडचण येऊ नये, तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी लवकरच शासकीय सेंद्रिय तांदूळ आणि धान्य खरेदी केंद्र सुरु केलं जाणार आहे.

  • अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याबाबत माहिती दिली. ते गोंदिया, भंडारा जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदी केंद्र आणि राईस मिलर्सच्या बैठकीसाठी आले असताना बोलत होते.

  • पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकट्या गोंदिया जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर शेत जमिनीवर खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली जाते. मात्र जिल्ह्यात धान पिकाचं विक्रमी उत्पादन होऊनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जशास तशी आहे. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेती तज्ञ अशी ओळख असलेले गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकरी अभिमन्यू काळे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा सल्ला दिला.

  • सदृढ आरोग्य, जैवविविधतेचं संवर्धन आणि पशुपक्षांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय शेती करून आर्थिक नफा कमवण्याचा सल्ला अभिमन्यू काळे यांनी दिला होता. सोबतच जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने धान पिकाची लागवड करतील अशा शेतकऱ्यांसाठी ‘आत्मा’च्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात 51 गट तयार करण्यात आले आहेत.

गुवाहाटी वनडे - भारताकडून विडींजचा 8 विकेट्सने धुव्वा :
  • गुवाहाटी : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या दमदार शतकांच्या जोरावर टीम इंडियानं गुवाहाटी वन डेत विंडीजचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. विंडीजनं दिलेलं 323 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियानं 42.1 षटकांत पार केलं. पाच सामन्याच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

  • विराट कोहलीनं कर्णधाराला साजेशी खेळी करताना 107 चेंडूत 140 धावांची खेळी केली. त्यात 21 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मानंही आपल्या वन डे कारकीर्दीतलं 20वं शतक साजरं केलं. त्यानं 117 चेंडूत 152 धावांची नाबाद खेळी केली. त्यात 15 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. या दोघांनी दुसऱ्या विकेसाठी 246 धावांची भागीदारी रचली.

  • टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली. मात्र शिमरॉन हेतमायरनं झळकावलेल्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजनं गुवाहाटीच्या पहिल्या वन डेत भारतासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • विंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिमरॉन हेतमायरनं आपल्या कारकीर्दीतलं तिसरं शतक साजरं केलं. त्याने 78 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 106 धावांची खेळी उभारली. सलामीवीर कायरन पॉवेलनही 39 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावांचं योगदान दिलं.

३४ हजार शहीद पोलिसांचे राष्ट्रीय स्मारक देशाला अर्पण :
  • नवी दिल्ली: स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कर्तव्य बजावत असताना देशासाठी प्राणाहुती दिलेल्या केंद्रीय व राज्यांच्या पोलीस दलांमधील ३४,८४४ कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने उभारलेले राष्ट्रीय पोलीस स्मारक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले.

  • सन १९५९ मध्ये लडाखमध्ये हॉट स्प्रिंग येथे आक्रमक चिनी सैनिकांशी दोन हात करताना बलिदान दिलेल्या पोलिसांच्या स्मृत्यर्थ २१ आॅक्टोबर हा दिवस दरवर्षी देशभर पौलीस शौर्य दिवस म्हणून पाळला जातो. त्याचे औचित्य साधून पंतप्रधानांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उद््घाटन केले. मोदींनी पुष्पचक्र वाहून शहिदांना आदंरांजली दिली व हॉट स्प्रिंग घटनेतील जिवंत पोलिसांचा सत्कारही केला.

  • या वेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी कायदा व सुव्यवस्था राखताना, दहशतवाद्यांशी मुकाबला करताना व देशाचे रक्षण करताना प्राणांीच आहुती देणाºया बहाद्दर पोलिसांच्या शौर्याचे व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. हे राष्ट्रीय स्मारक देशभरातील पोलीस दलांची यशोगाथा चिरंतन ठेवेल व भावी पिढ्यांना स्फूर्ती देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चंद्रावरील उल्काखंडाचा ६ लाख डॉलरला लिलाव :
  • वॉशिंग्टन : चंद्रावरून पृथ्वीवर आलेल्या सुमारे साडेपाच किलो वजनाच्या उल्काखंडाची अमेरिकेतील ‘आरआर आॅक्शन’ या कंपनीने शनिवारी आयोजित केलेल्या लिलावात सहा लाख १२ हजार ५०० डॉलरना विक्री झाली.

  • हा उल्काखंड एकूण सहा तुकड्यांचा मिळून बनलेला असून हे सहा तुकडे एकमेकांमध्ये घट्ट अडकलेले आहेत. वायव्य आफ्रिकेतील वाळवंटात गेल्या वर्षी मिळालेला हा उल्काखंड ‘एनडब्ल्यूए ११७८९’ या संकेत क्रमांकाने अधिकृतपणे ओळखला जातो; पण व्यवहारात त्याचे आफ्रिकी भाषेतील ‘बुगाबा’ (चांद्रिय कोडे) हे टोपणनाव रुढ आहे.

  • कित्येक हजार वर्षांपूर्वी अन्य एका मोठ्या उल्केने चंद्राला धडक दिली तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागाचा हा तुकडा निखळून वेगळा झाला व सुमारे अडीच लाख किमी प्रवास करून पृथ्वीवर पोहोचला, असे मानले जाते. मात्र, तुलनेने खूपच लहान असलेला हा उल्काखंड येताना वातावरणाच्या घर्षणाने जळून खाक कसा झाला नाही, हे मात्र न सुटलेले कोडे आहे. 

  • ६.१२ लाख डॉलरची व्हिएतनामची बोली ‘आरआर आॅक्शन’ने दिलेल्या माहितीनुसार उल्काखंडासाठी ६.१२ लाख डॉलरची सर्वोच्च बोली व्हिएतनामच्या हा नाम प्रांतातील ताम चुक पॅगोडाच्या व्यवस्थापनाकडून आली. तेथे हा उल्काखंड वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

देशातील ‘या’ राज्यात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग :
  • सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य त्रस्त असतानाच ओडिशामध्ये पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. भारतात पेट्रोलच्या तुलनेत डिझेल नेहमीच स्वस्त असते पण ओडिशा हे एकमेव राज्य अपवाद ठरले आहे. ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दल आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने डिझेलच्या या दरवाढीसाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरले आहे.

  • आजही देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात झाली आहे. पण ओडिशातील भुवनेश्वरमध्ये पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर डिझेलसाठी १३ पैसे जास्त मोजावे लागत आहे. सोमवारी भुवनेश्वरमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८०.२७ पैसे आहे तर प्रतिलिटर डिझेलसाठी ८०.४० पैसे मोजावे लागत आहेत.

  • ओडिशामध्ये पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे असे उत्कल पेट्रोलियम डिलर्स असोशिएशनचे सरचिटणीस संजय लाथ यांनी सांगितले. अन्य राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलसाठी व्हॅटचे दर वेगवेगळे आहेत पण ओडिशामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर एकच २६ टक्के व्हॅट आकारला जातो. इंधनाच्या या वाढत्या किंमतीमुळे ओडिशात डिझेलच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

  • डिझेलच्या किंमती वाढल्या तर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढतात. त्यामुळे डिझेलच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रत्येक सरकारचा प्रयत्न असतो. आतापर्यंत १३ राज्यांनी व्हॅटचे दर कमी केले आहेत. ओदिशाने अद्यापपर्यंत व्हॅटचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

‘आयएनएफ’ करारातून अमेरिका बाहेर :
  • शीतयुद्धाच्या काळापासून रशियाबरोबर करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र नियंत्रण करारातून अमेरिकेने माघार घेण्याचे ठरवले आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. या करारानुसार दोन्ही देशांकडे किती क्षेपणास्त्रे असावीत यावर काही मर्यादा होत्या, पण रशियाने या कराराचे पालन केले नाही असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

  • ‘दी इंटरमिजिएट रेंज न्यूक्लियर फोर्सेस ट्रीटी ’ म्हणजे आयएनएफ करार हा शस्त्रास्त्र नियंत्रण करारापैकी एक असून तो दोन वर्षांत संपुष्टात येत आहे. १९८७ मध्ये करण्यात आलेल्या या करारात अमेरिका व त्याच्या युरोप तसेच अतिपूर्वेकडील मित्रदेशांच्या संरक्षणाचा हेतू होता. या करारानुसार अमेरिका व रशिया यांना ३०० ते ३४०० मैल पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करणे, त्याची चाचणी करणे, ती बाळगणे यावर प्रतिबंध होता.

  • ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले, की या करारातून आम्ही माघार घेत आहोत. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी याआधीच तीस वर्षांच्या या करारातून अमेरिका  बाहेर पडणार असल्याचे सूचित केले होते.

  • ट्रम्प यांनी सांगितले, की त्या करारात प्रतिबंधित असलेली क्षेपणास्त्रे आम्ही विकसित करणार आहोत. आयएनएफ करार हा अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन रीगन व रशियाचे समपदस्थ मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यात १९८७ मध्ये झाला होता.

  • त्यात आंतरखंडीय व इतर क्षेपणास्त्रे नष्ट करण्याचे ठरले होते. पेंटॅगॉन म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आयएनएफ करारातून माघार घेण्यास अनुकूलता दर्शवली असून, रशियाने नोव्हाटर क्षेपणास्त्र मागे घेतले नाही तर अमेरिकेला या करारात सहभागी राहता येणार नाही असे अमेरिकी संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांनी नाटो मंत्र्यांच्या बैठकीत या महिन्यात सांगितले होते.

शिमला शहराचेही नामांतर होणार :
  • भारतातील नावे बदललेल्या शहरांच्या यादीत लवकरच शिमल्याचाही क्रमांक लागण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमला शहराचे नाव ‘श्यामला’ करण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी भाजप सरकार विचार करत आहे.

  • हिमाचल प्रदेशच्या राजधानीचे नामांतर करावे, अशी मागणी करणारी मोहीम काही उजव्या विचारांच्या हिंदू संघटनांनी सुरू केली आहे. त्यावर, नाव बदलण्याच्या मागणीबाबत सरकार जनतेच्या भावना जाणून घेणार असल्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीर केले आहे.

  • देशाच्या निरनिराळ्या भागांतील अनेक शहरांना त्यांची ऐतिहासिक नावे होती, मात्र ती बदलण्यात आली. त्यामुळे त्यांना त्यांची जुनी नावे पुन्हा देण्यात काही हरकत नाही. त्यामुळे शिमल्याच्या लोकांना शहराचे नाव बदलून ‘श्यामला’ हवे असेल, तर या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो, असे भाजपचे नेते व राज्याचे आरोग्यमंत्री विपिन सिंह परमार यांनी सांगितले.

  • शहराचे नाव बदलल्यास शहरातील रिज, स्कँडल पॉइंट, पीटरहॉप, डलहौसी इ. ठिकाणांची नावेही बदलली जाऊ शकतात. शिमला शहराचे नाव बदलण्याची मागणी विश्व हिंदू परिषद गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन / आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन

महत्वाच्या घटना 

  • १६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.

  • १७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.

  • १९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.

  • १९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.

  • १९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

  • १९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.

  • १९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.

  • २००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.

  • २००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले.

जन्म 

  • १६८९: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १७५०)

  • १८७३: अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९०६)

  • १९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

  • १९४२: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघूवीर सिंह यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)

  • १९४७: भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक दीपक चोप्रा यांचा जन्म.

  • १९४८: इंग्लंडचा गोलंदाज माईक हेंड्रिक यांचा जन्म.

  • १९८८: भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१७: इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.

  • १९३३: थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)

  • १९७८: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)

  • १९९१: देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी यांचे निधन.

  • १९९८: हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९२२)

  • २०००: अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.

  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.