चालू घडामोडी - २२ सप्टेंबर २०१८

Date : 22 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तानसोबतची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा भारताकडून रद्द :
  • नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये नियोजित चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि  पाकिस्तानमधील  द्विपक्षीय चर्चेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.  काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलातील जवानांची करण्यात आलेली हत्या आणि दहशतवाद्यांची छायाचित्रे पोष्टाच्या तिकीटावर छापण्याच्या पाकिस्तानने केलेल्या आगावूपणामुळे संतप्त होऊन भारताने पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द केली आहे. 

  • काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना शहीद ठरवून, बुरहान वानी आणि त्यांच्या साथीदारांच्या नावे टपाल तिकिटं काढून त्यांनी आपल्या 'नापाक' वृत्तीचे दर्शन घडवले होते. 

  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, " पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रांचा विचार करून आम्ही द्विपक्षीय चर्चेचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानी पंतप्रधानांनी दहशतवादावरही चर्चेची तयारी दर्शवली होती.

  • मात्र चर्चेमागचा त्यांचा नापाक हेतू आता समोर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच समोर आला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमधील कोणत्याही प्रकारची चर्चा निरर्थक आहे." 

राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं - ओलांद :
  • नवी दिल्ली : राफेल विमान करारावरुन फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या दाव्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राफेल विमान करारासाठी भारत सरकारनेच अनिल अंबानींच्या 'रिलायन्स डिफेन्स'चं नाव सुचवल्याचं फ्रान्सने सांगितलं.

  • भारत सरकारकडून 'रिलायन्स डिफेन्स' हे एकच नाव आल्यामुळे देसॉ एव्हिएशनकडे दुसरा पर्यायच नव्हता, असा दावा फ्रान्स्वा ओलांद यांनी केला आहे. फ्रान्सच्या एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ओलांद यांनी ही बाजू मांडली आहे.

  • यापूर्वी राफेल विमान करार हा दोन खासगी कंपन्यातील करार असून त्यात सरकारची कुठलिही भूमिका नाही, असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. मात्र, ओलांद यांच्या दाव्यानंतर सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाने मात्र ओलांद यांच्या दाव्यातील तथ्य तपासून पाहत असल्याचं म्हटलं आहे.

  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींनी भारतीयांचा विश्वासघात केला असून अनेक जवानांच्या रक्ताचा अवमान केला आहे, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.

भारताकडून बांगलादेशचा ७ विकेट्सनी धुव्वा :
  • अबुधाबी : आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या टीम इंडियाने बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी दिलेलं 174 धावांचं लक्ष्य 37 व्या षटकांत पार केलं.

  • भारताच्या विजयात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी उभारली. त्याने पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 83 धावांची खेळी केली. रोहितने धवनच्या साथीने 61 धावांची सलामी देऊन भारतीय विजयाचा पाया रचला.

  • रोहितने अंबाती रायुडूच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित आणि धोनीने तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचून भारताला विजयी लक्ष्याच्या जवळ नेलं.

  • त्याआधी, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा डाव अवघ्या 173 धावांत गुंडाळला. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याऐवजी भारताच्या वन डे संघात पुनरागमन करणारा रवींद्र जाडेजा कानामागून आला आणि बांगलादेशला तिखट झाला. सौराष्ट्रच्या या डावखुऱ्या स्पिनरनं 29 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा या दोघांनी बांगलादेशच्या प्रत्येकी तीन फलंदाजांच्या विकेट्स काढल्या.

५३ रस्त्यांवर वाहतूकबंदी; ९९ रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ :
  • मुंबई : बाप्पाच्या विसर्जनाला अवघे २४ तास शिल्लक असताना, पालिकेसह आता मुंबई वाहतूक पोलिसांनीही विसर्जनासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, शहरातील ५३ रस्त्यांवर वाहतूकबंदी केली असून, एकूण ९९ मार्गावर वाहन उभे करण्यास बंदी आहे. विसर्जन स्थळांजवळ तर सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी आहे.

  • अनंत चतुर्दशीच्या दिवशी (रविवारी) दुपारी १२ ते दुसऱ्या दिवशी (सोमवार) सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूकबंदीचे नियम लागू आहेत. मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी ५३ रस्त्यांवर वाहतूकबंदी करण्यात आली आहे, तर ५६ रस्त्यांवर एक दिशा वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील प्रमुख १८ रस्त्यांवर मालवाहतूक करणाºया वाहनांवर बंदी असून, एकूण ९९ ठिकाणी दुचाकींसह सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी आहे.

  • वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, गणेश घाट (पवई) या पाच महत्त्वाच्या ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

  • विसर्जन मिरवणूक आणि शहरातील वाहतुकीच्या नियमनासाठी ३ हजार १६१ पोलीस अधिकारी आणि सुमारे १ हजार ५७० वाहतूक मदतनिसांचा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे. याचबरोबर, एन.एस.एस., स्काउट गाइड, वॉटर सेफ्टी पेट्रोल, नागरी संरक्षण दल अशा संस्थांचे कार्यकर्ते-विद्यार्थी वाहतुकीचे नियमन करतील.

शहीद जवानासाठी कायदा बदलणार; कुटुंबाला १ कोटींच्या मदतीसह नोकरीची केजरीवालांची घोषणा :
  • हरयाणातील सोनीपतचे रहिवासी असलेले बीएसएफचे शहीद जवान नरेंद्र सिंह यांचे पाकिस्तानी रेंजर्सने अपहरण करुन त्यांना हलाहल करुन ठार केले. जम्मूमध्ये सीमेनजीक त्यांचा मृतदेह भारतीय जवानांना छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. या जवानाच्या कुटुंबियांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून यासाठी कायद्यात बदल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • नरेंद्र सिंह यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर केजरीवाल म्हणाले, शहीद जवान नरेंद्र सिंह यांच्यासोबत पाकिस्तानच्या सैन्याने जे कृत्य केले आहे. त्याचा कोणत्याही परिस्थितीत बदला घ्यायला हवा. कारण जवान कुठल्याही एका प्रदेशाचा नसतो तर तो संपूर्ण देशाचा असतो.

  • दरम्यान, केजरीवाल यांनी शहीद नरेंद्र सिंह यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील कायदा बदलणार असल्याचे सांगितले. शहीद नरेंद्र यांचे कुटुंबिय दिल्लीमध्ये राहते. त्यामुळे दिल्ली सरकारची त्यांची काळजी घेणे ही जबाबदारी आहे. त्यासाठीच दिल्ली सरकार मंत्रीमंडळाच्या बैठकीत एक विशेष प्रस्ताव आणणार असून त्याद्वारे सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. याद्वारे शहीद नरेंद्र यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची तरतुद करण्यात येईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

  • १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

  • १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.

  • १९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

  • १९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.

  • १९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.

  • १९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.

  • २००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

जन्म

  • १८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)

  • १८८७: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)

  • १९०९: विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)

  • १९१५: मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)

  • १९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.

  • १९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.

मृत्यू

  • १५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन.

  • १५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९)

  • १९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

  • १९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८७७)

  • १९९४: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)

  • २००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.

  • २०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.