चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ एप्रिल २०१९

Date : 23 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरन्यायाधीशांची नियमांनुसार चौकशी व्हावी; वकिलांच्या संघटनांची मागणी :
  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात सूर उमटत आहेत. आपल्याविरुद्धच्या आरोपांची स्वत: सरन्यायाधीशांनी सुनावणी करणे योग्य नसून, या आरोपांची ‘कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार’ चौकशी व्हावी अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या दोन संघटनांनी घेतली आहे.

  • सरन्यायाधीशांविरुद्ध आरोप झाल्यानंतर त्यांच्याच अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याबाबतची सुनावणी करणे हे ‘कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे उल्लंघन असल्याचे’ सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने सोमवारी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने (फुल कोर्ट) अशा प्रकरणांमध्ये कायद्याने ठरवून दिलेली आवश्यक ती पावले उचलावीत, अशी विनंतीही संघटनेने केली. तर कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मात्र सरन्यायाधीशांना पाठिंबा दिला आहे.

  • वरीलप्रमाणे चौकशी सुरू करण्यात आल्यास, इलेक्ट्रॉनिक, मुद्रित, समाजमाध्यम आणि इतर उपलब्ध स्रोतांद्वारे करण्यात आलेल्या आरोपांची पूर्णपीठाने पडताळणी करावी आणि त्यावर पुढील बैठकीत विचार करावा, असे संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.

  • सरन्यायाधीशांवर करण्यात आलेल्या आरोपांच्या प्रकरणी २० एप्रिलला न्यायालयात सुनावणीसाठी ज्या प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला, ते कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचेही उल्लंघन करणारे आहे, असा ठराव सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत संमत करण्यात आल्याचे संघटनेचे सचिव विक्रांत यादव यांनी सांगितले.

देशभरात ११६ जागांसाठी मतकौल :
  • लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज, मंगळवारी राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून सुमारे अडीच कोटी मतदार २४९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानयंत्रात बंद करणार आहेत. देशभरात ११६ जागांसाठी मतकौल दिला जाणार आहे.

  • तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, या वेळी अनेक मतदारसंघांत अटीतटीच्या लढती होणार असल्याने ४०० हून अधिक संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात २८ हजार ६९१ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून २४९ उमेदवारांमध्ये १९ महिला उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत, तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी ३१ उमेदवार असून सर्वात कमी ९ उमेदवार सातारा मतदारसंघात भाग्य अजमावत आहेत.

  • जळगावमध्ये १४, रावेरला १२, जालन्यात २०, औरंगाबादला २३, रायगडमध्ये १६, बारामतीला १८, अहमदनगरमध्ये १९, सांगलीत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये १२, कोल्हापुरात १५ व हातकणंगलेमध्ये १७ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

  • तिसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने अहमदनगर, बारामती, माढा, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग आदी मतदारसंघांत चुरशीच्या लढती होत आहेत. राज्यातील विविध मतदारसंघांतील ४०० हून अधिक मतदान केंद्रे संवेदनशील क्रिटिकल म्हणून जाहीर करण्यात आली असून त्यात पुण्यात सर्वाधिक ९१ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. औरंगाबादमध्ये ६६, तर कोल्हापूरमध्ये ३४ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या ठिकाणी अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून मतदानावर लक्ष राहणार आहे.

भारताने इराणकडून तेल आयात करू नये -अमेरिका :
  • निर्बंधांचा मान राखून  भारताने  इराणकडून तेल आयात करू नये असे अमेरिकेने म्हटले आहे. भारत व चीनसह इतर पाच देशांना अमेरिकेने इराणकडून तेल आयातीवर बंदी घालण्यास सांगितले असून अणुकरारातून एक वर्षांपूर्वी बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध लागू केले होते.

  • गेल्या वर्षी भारत, चीन, जपान यांच्यासह आठ देशांना अमेरिकेने इराणकडून तेल आयात करण्यास १८० दिवसांच्या काळासाठी परवानगी कायम ठेवली होती, पण आता अमेरिकेने इराणवर दबाव वाढवण्यासाठी या देशांना इराणकडून तेल आयात करू नये असा इशारा दिला आहे.  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी २ मे नंतर कुठल्याच देशाला इराणकडून तेल खरेदी करता येणार नाही असे संकेत दिले आहेत. ओमानच्या आखातात छाबहार बंदर बांधण्यासाठी भारताने सहकार्य केले होते त्याबदल्यात अमेरिकेने इराणकडून तेल  खरेदीची भारताला काही दिवस सवलत दिली होती.

  • अफगाणिस्तानातील संघर्षांत छाबहार बंदराचे मोठे सामरिक महत्त्व आहे. चीन व भारत हे इराणच्या तेलाचे सर्वात मोठे आयातदार असून जर त्यांनी आता ट्रम्प यांच्या आदेशानुसार तेलाची आयात थांबवली नाही, तर द्विपक्षीय संबंधावर त्याचे परिणाम होऊ शकतात.

  • भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशात इराक व सौदी अरेबियानंतर इराण तिसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात इराणने भारताला १८.४ दशलक्ष टन तेलाची निर्यात केली होती. दक्षिण कोरिया व जपान हे देश तुलनेने इराणच्या तेलावर कमी प्रमाणात अवलंबून आहेत. त्यांचा इराणशी असलेला तेल व्यापार कमी झाला आहे.

व्होटर आयडी हे दहशतवाद्यांच्या IED पेक्षा जास्त शक्तिशाली - मोदी :
  • दहशतवाद्यांचे प्रमुख शस्त्र आयईडी असते, तर लोकशाहीत व्होटर आयडी हे प्रभावी शस्त्र असते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, आज देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकशाहीतील या पवित्र पर्वात सहभागी होण्याची मला संधी मिळाली.

  • कुंभमेळ्यात गंगास्नान केल्यावर पवित्रतेचा अनुभव येतो. तसेच लोकशाहीत मतदान करुन पवित्रतेचा अनुभव येतो. देशातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी उत्साहाने या मतदान प्रकियेत सहभागी व्हावे. भारतीय मतदार हा समजूतदार आहे. त्याला खरे आणि खोटे समजते, असेही त्यांनी नमूद केले.

बॉक्सर विजेंदर सिंह निवडणुकीच्या रिंगणात - दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर लढणार :
  • नवी दिल्ली: काँग्रेसनं बॉक्सर विजेंदर सिंहला दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिल्लीतल्या सातही जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. काल सकाळी काँग्रसनं दिल्लीतल्या सहा जागांवरील उमेदवार निश्चित केले होते. पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोठिया, नवी दिल्लीमधून अजय माकन, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, उत्तर पूर्व दिल्लीतून शीला दीक्षित आणि चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल यांना तिकीट देण्यात आलं आहे. 

  • दक्षिण दिल्लीत विजेंदरसमोर भाजपाच्या रमेश बिधुडी आणि आम आदमी पार्टीच्या राघव चड्ढा यांचं आव्हान असेल. दिल्लीत 12 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसनं दक्षिण दिल्लीतून तिकीट दिल्यानंतर विजेंदरनं ट्विट केलं.

  • '20 पेक्षा जास्त वर्षांच्या बॉक्सिंग करिअरमध्ये मी कायम देशाला सन्मान मिळवून दिला. आता देशवासीयांसाठी काहीतरी करुन दाखवायची वेळ आली आहे. त्यांची सेवा करायची आहे. मी ही सेवेची संधी स्वीकारतो आहे. यासाठी मी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा आभारी आहे,' असं विजेंदरनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं, अमित शहा यांनी बजावला मतदानाचा हक्क :
  • लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान होणार आहे.

  • भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भाजपची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माकप, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.

दिनविशेष :
  • जागतिक पुस्तक दिन / इंग्रजी भाषा दिन (यूएन)

महत्वाच्या घटना 

  • १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.

  • १८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.

  • १९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९९५: जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

  • २००५: मी अॅट द झू  हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

जन्म

  • १५६४: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म. (निधन: २३ एप्रिल  १६१६)

  • १७९१: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८६८)

  • १८५८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९४७)

  • १८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

  • १८७३: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९४४)

  • १८९७: नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे १४ वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर१९७२)

  • १९३८: शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.

  • १९७७: भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६१६: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १५६४)

  • १८५०: काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १७७०)

  • १९२६: ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १८५४)

  • १९५८: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८७१)

  • १९६८: पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९०२)

  • १९८६: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

  • १९९७: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१८)

  • २०००: ४० वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचे निधन.

  • २००१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१)

  • २००७: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.