चालू घडामोडी - २३ ऑगस्ट २०१८

Date : 23 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंडोनेशियात तिरंगा फडकवणारी ‘लेडी’ एकलव्य :
  • पैलवान विनेश फोगाटपाठोपाठ महाराष्ट्राच्या, आपल्या कोल्हापूरच्या राही सरनोबतने जकार्ता-पालेमबान्ग एशियाडमध्ये नवा इतिहास घडवला. एशियाडच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारी विनेश फोगाट ही पहिली भारतीय महिला पैलवान ठरली होती. राही सरनोबतने एशियाडचं सोनं जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरण्याचा मान मिळवला.

  • राही सरनोबतने जकार्ता-पालेमबान्ग एशियाडमध्ये 25 मीटर्स रॅपिड पिस्टलच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. या सुवर्णपदकासाठी राही सरनोबत आणि थायलंडची नाफास्वान या दोघींमध्ये झालेला शूटऑफ हा त्यांच्या एकाग्रतेची, चिकाटीची आणि प्रचंड दडपणाखाली अचूक लक्ष्यवेधाची परीक्षा पाहणारा ठरला. त्या कठोर परिक्षेत राहीने बाजी मारली. म्हणूनच पालेमबान्गच्या एशियाड रणांगणात भारतीय तिरंगा डौलाने फडकला.

  • एशियाडच्या इतिहासात आजवर रणधीरसिंग, जसपाल राणा, रंजन सोधी, जीतू राय आणि यंदा सौरभ चौधरी या पाच पुरुष नेमबाजांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. त्या पंक्तीत दाखल होणारी राही सरनोबत ही सहावी भारतीय आणि पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.

  • राही सरनोबतने नेमबाजीच्या दुनियेत सर्वोत्तम कामगिरी बजावण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. 2010 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने 25 मीटर्स पिस्टल दुहेरीचं सुवर्ण आणि एकेरीचं रौप्यपदक पटकावलं होतं. 2014 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही ती 25 मीटर्स पिस्टलच्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये तिचा भारताच्या कांस्यविजेत्या चमूत सहभाग होता. पण त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2013 साली राहीला कारकीर्दीतलं मोठं यश लाभलं. दक्षिण कोरियातल्या जागतिक नेमबाजीत तिने 25 मीटर्स स्पोर्टस पिस्टलचं सुवर्णपदक जिंकलं.

अकाऊंटंटच्या ८० जागांसाठी ८००० परीक्षार्थी, सर्वच्या सर्व नापास :
  • पणजी : गोवा सरकारकडून अकाऊंटंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सर्वच्या सर्व परीक्षार्थी नापास झाले आहेत. एकूण 80 जागांसाठी तब्बल 8 हजार जणांनी परीक्षा दिली होती. यातील सर्वच्या सर्व म्हणजे 8 हजार परीक्षार्थी परीक्षेत नापास झाले.

  • विशेष म्हणजे, या सर्व परीक्षार्थींनी पदवीचे शिक्षण घेतलेले होते. गोवा सरकारने घेतलेल्या अकाऊंटंट परीक्षेत परीक्षार्थींना पास होण्यासाठी 100 पैकी किमान 50 गुण मिळवणे बंधनकारक होते.

  • लेखापाल संचालनालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, “अकऊंटंटच्या जागांवरील भरतीसाठी यंदा 7 जानेवारीला परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत एकही परीक्षार्थी पास झाला नाही.”

  • लेखापाल संचालनालयाने अकाऊंटंटच्या 80 जागांसाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जाहिरात देण्यात आली होती. 7 जानेवारीला परीक्षा पार पडली. 100 गुणांची परीक्षा होती. इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अकाऊंटशी संबंधित प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आले होते. यासाठी पाच तासांचा अवधी देण्यात आला होता.

  • या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींची मुलाखत घेऊन, त्यातून अंतिम 80 जणांची अकाऊंटंट पदासाठी निवड केली जाणार होती.

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन :
  • नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये काल रात्री कुलदीप नय्यर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक दशकं कुलदीप नय्यर हे पत्रकारितेत सक्रीय होते. तसेच त्यांनी अनेक पुस्तकं लिहून देशाच्या विचारविश्वातही बहुमूल्य योगदान दिलं.

  • स्वातंत्र्यपूर्व काळात 14 ऑगस्ट 1923 रोजी पंजाब प्रांतातील सियालकोट येथे कुलदीप नय्यर यांचा जन्म झाला. आता सियालकोट पाकिस्तानचा भाग आहे.

  • लाहोरमधील फोरमन खिश्चन कॉलेजमधून बीए (ऑनर्स) पदवी मिळवून, पुढे लाहोरमधीलच लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी संपादित केली. नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीतून नय्यर यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं.

  • उर्दू प्रेस रिपोर्टर म्हणून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे ‘द स्टेट्समन’चे संपादक झाले. डेक्कन हेरॉल्ड, द डेली स्टार, द संडे गार्डियन, द न्यू, द स्टेट्समन, द एक्स्प्रेस ट्रिब्युन पाकिस्तान, द डॉन यांसारख्या 80 हून अधिक वृत्तपत्रात 14 भाषांमधून कुलदीप नय्यर यांनी स्तंभलेखन केले आहे. तब्बल 25 वर्षे ते ‘द टाईम्स’ या लंडनमधील वृत्तपत्राचे प्रतिनिधीही ते राहिले.

  • पत्रकारितेसह ते सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही सक्रिय राहिले. आणीबाणीच्या शेवटच्या काळात कुलदीप नय्यर यांना अटकही झाली होती.

Apple ची भारतात बंपर भरती, 5 हजार कर्मचाऱ्यांची करणार नियुक्ती :
  • तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी अॅपलने भारतात तरुणांसाठी बंपर भरती काढली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील अॅपलच्या कार्यालयात देशातील प्रतिभावंत तरुणांना नोकरी मिळण्याची संधी आहे. कंपनीने येथील आपल्या कार्यालयात नुकतीच ३ हजार ५०० जणांची नियुक्ती केली असून ही संख्या ५ हजारापर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे.

  • तेलंगणा सरकारमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. अॅपलने तेलंगणामधील कार्यालयात ३ हजार ५०० जणांची नियुक्ती केली आहे, लवकरच ही संख्या ५ हजार करण्याचा कंपनीचा विचार आहे, त्यामुळे अजून दीडहजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे होईल, असं या अधिकाऱ्याने सांगितलं. पण, ही भरती केव्हापर्यंत होणार याबाबत कंपनीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

  • गेल्या वर्षी मे महिन्यात अॅपल कंपनीने तेलंगणामध्ये विकास केंद्राची स्थापना केली होती. त्यावेळी या विकास केंद्रामुळे ४ हजार जणांना रोजगार मिळू शकतो, असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. या केंद्रामध्ये कंपनीकडून आयफोन, आयपॅड, मॅक आणि अॅपल वॉच या उत्पादनांवर काम केलं जातं.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन

महत्वाच्या घटना

  • १८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

  • १९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.

  • १९६६: लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.

  • १९९०: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

  • १९९१: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

  • १९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.

  • २००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

  • २०११: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.

जन्म

  • १७५४: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १७९३)

  • १८५२: भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१८)

  • १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९५७)

  • १८९०: न्यूज-डे चे सहसंस्थापक हॅरी फ्रँक गग्नेहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७१)

  • १९१८: श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म. (मृत्यू: १४ मार्च २०१०)

  • १९४४: चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म.

  • १९५१: जॉर्डनची राणी नूर यांचा जन्म.

  • १९७३: मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा खान यांचा जन्म.

मृत्यू

  • १३६३: डहाण राजवटीचे संस्थापक चेन ओंलियांग यांचे निधन.

  • १८०६: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचे निधन. (जन्म: १४ जून १७३६)

  • १८९२: ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८२७)

  • १९७१: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४)

  • १९७४: मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)

  • १९७५: नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते पं. विनायकराव पटवर्धन यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १८९८)

  • १९९४: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)

  • १९९७: ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान एरिक गेयरी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९२२)

  • २०१३: आर.जे. कॉमन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक रिचर्ड जे. कॉर्मन यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९५५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.