चालू घडामोडी - २३ डिसेंबर २०१७

Date : 23 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींच्या पहिल्या २ वर्षांत करदाता वृद्धी मंदावली :
  • नवी दिल्ली : विविध करसवलती व मध्यम वेतनवाढी यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या दोन वर्षांच्या काळात थेट करदात्यांच्या संख्येतील वृद्धी मंदावल्याचे समोर आले आहे. नोटाबंदीनंतर मात्र करदाता आधार (टॅक्सपेअर बेस) वाढण्याचे दिसून आले आहे.

  • प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१२-१३मध्ये ५४ लाख करदात्यांची भर पडली होती. तेथून पुढे सलग चार वर्षे वैयक्तिक करदात्यांची संख्या वाढतच होती.

  • त्यानंतरच ही गती मंदावली. मोदी सरकार सत्तेवर येण्याआधीच्या वर्षी म्हणजेच २०१३-१४मध्ये वैयक्तिक करदात्यांची संख्या ५.४ कोटी होती. ती २०१५-१६मध्ये ५३ लाखांनी वाढून ५.९३ कोटी झाली.(source :lokmat)

यूएनमधील पराभवानंतर अमेरिका मदत बंद करेल :
  • वॉशिंग्टन : जेरुसलेमला इस्त्राएलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरोधातील ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोठ्या बहुमताने संमत झाल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अतिशय संतापले आहेत.

  • या ठरावाला पाठिंबा देणाºया देशांच्या आर्थिक मदत आम्ही थांबवू, अशी धमकी त्यांनी आमसभेच्या आधी दिली होती. ती धमकी ते अंमलात आणणार का, याकडे सर्र्वाचे लक्ष लागले आहे. आमसभेत अमेरिकेच्या निर्णयाला विरोध करणारा ठराव मंजूर झाला, तेव्हा अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅली यांनीही अशीच धमकी दिली होती.

  • जी राष्ट्रे आमच्याविरोधात ठराव करू पाहत आहेत, त्यांच्या नावाची यादी आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे देणार आहोत, असे त्या म्हणाल्या होत्या.

  • या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या १९३ पैकी १२८ सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा दिला होता, तर ३५ राष्ट्रांच्या सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. तसेच २१ राष्ट्रांचे सदस्य त्यावेळी गैरहजर राहिले आणि केवळ ९ सदस्यांनी अमेरिकेच्या बाजूने मतदान केले. विरोधी मतदान करणाºयांत भारतासह ब्रिटन, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका यांचाही समावेश होता.(source :lokmat)

भारताची श्रीलंकेवर ८८ धावांनी मात, टी-२० मालिका २-० ने खिशात :
  • युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी आज पुन्हा एकदा शरणागती पत्करली. इंदूरच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दिलेलं २६१ धावांचं आव्हान श्रीलंकेच्या फलंदाजांना पेलवलं नाही.

  • आघाडीचे ३ फलंदाज वगळता एकाही फलंदाजाने भारतीय गोलंदाजांचा सामना केला नाही. दुसऱ्या विकेटसाठी उपुल थरंगा आणि कुशल परेरा जोडीमध्ये १०९ धावांची भागीदारी होत असताना भारतीय गोटात काहीकाळ चिंतेचं वातावरण होतं.

  • मात्र पहिल्या षटकांमध्ये महागडे ठरलेल्या चहल आणि यादव या फिरकीपटूंनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना एकामागोमाग एक हादरे देत भारताचा विजय सुनिश्चीत केला. टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-० अशा विजयी आघाडीवर आहे.

  • याआधी कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर २६१ धावांचं आव्हान उभं केलं. रोहित शर्माने आजच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कसोटी, वन-डे आणि टी-२० मालिका जिंकल्यानंतर आता २०१७ वर्षातल्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय हे पहावं लागणार आहे.(source :loksatta)

मेट्रो प्रकल्पांतून ५० हजार नोकऱ्या :
  • १५७ कि.मी.च्या प्रकल्पासाठी ६३ हजार कोटींचा खर्च : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रवाशांना अत्याधुनिक व आरामदायी साधन उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू केले असून लवकरच सात मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येत आहे.

  • यासाठी तब्बल ६२ हजार ९४३ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे १० हजार अभियंते व ४० हजार कुशल-अकुशल कामगारांना रोजगार मिळणार आहे.

  • एमएमआरडीएतर्फे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या १८.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-७ या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ६२०८ कोटी रुपये खर्च होणार असून त्यावर १७ स्थानके असतील. त्याचबरोबर दहिसर ते डी. एन. नगर या १६.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-२ अ या प्रकल्पाचे कामही सुरू आहे. त्यासाठी ६४१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

  • याचबरोबर डी. एन. नगर ते मंडाले या २३.५ किलोमीटर लांबीची मेट्रो-२ ब, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या ३२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-४ आणि स्वामी समर्थ नगर-विक्रोळी या १४.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-६ या तीन प्रकल्पांसाठी एकूण ३१ हजार १०१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.(source :loksatta)

मल्टिबॅरल गायडेड रॉकेट सिस्टीम : ८० किमीपर्यंत मारक क्षमता, पिनाका करणार लक्ष्याचा पाठलाग :
  • पुणे - कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय बनावटीची ‘पिनाका मल्टिबॅरल रॉकेट सिस्टीम’ जवळपास ८० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करून त्याचा वेध घेण्यास सक्षम होणार आहे.

  • पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटतर्फे गायडेड पिनाकाचे नवे डिझाईन तयार करण्यात आले असून, सरकारी आणि खासगी कंपन्यांतर्फे त्याचा विकास करण्यात येत आहे. या शस्त्राच्या काही चाचण्या यशस्वी झाल्या असून, आणखी काही चाचण्यांनंतर ते लष्करात दाखल होणार आहे.

  • युद्धकाळात वेगवान हालचाली करून शत्रूची ठिकाणे काही क्षणांत नष्ट करण्यासाठी वेगवान रॉकेट लाँचर सिस्टीमची मागणी लष्कराने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)कडे केली होती.

  • त्यानुसार, याआधी पिनाका मार्क वन आणि मार्क टू या मल्टिबॅरल रॉकेट सिस्टीमची निर्मिती पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, टाटा पॉवर आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांतर्फे विकसित करण्यात आले आहे. फक्त ४४ सेकंदांत १२ रॉकेट डागण्याची या शस्त्रात क्षमता आहे.(source :lokmat)

नऊ बँका बंद होण्याच्या त्या अफवेवर विश्वास ठेऊ नका: आरबीआय :
  • रिझर्व्ह बँकेकडून बँक ऑफ इंडियाबरोबर इतर काही बँका बंद केल्या जाणार असल्याची अफवा सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र समाज माध्यमांवरील या अफवांवर विश्वास ठेऊ नका अशा संदर्भातील स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे.

  • बँक ऑफ इंडियासहीत इतर नऊ सरकारी बँकांना ‘प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शन’च्या यादीत टाकण्यात आले आहे. यामुळे संबंधित बँकांच्या रोजच्या व्यवहारांवर काहीच परिणाम होणार नसल्याने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे.

  • आरबीआयला समाज माध्यमे तसेच इतर माध्यमांमधून काही चुकीची माहिती पसरत असल्याचे समजले असून त्याच संदर्भात हे स्पष्टीकरण असल्याचे आरबीयाने सांगितले. या व्हायरल होत असलेल्या चुकीच्या माहितीनुसार काही सरकारी बँक बंद केल्या जाणार असल्याचे मेसेजस फॉरवर्ड केले जात आहेत.

  • प्रॉम्ट करेक्टिव अॅक्शनचा संदर्भ देऊन ही माहिती पसरवण्यात येत असली तरी या माहितीमध्ये काहीच तथ्य नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.(source :loksatta)

विजय रुपाणी दुसऱ्यांदा घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ :
  • भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांचीच पुन्हा नियुक्ती केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा मिळवत बहुमत मिळवले आणि सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन करण्याचा दावा केला.

  • गुजरातचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उलटसुलट चर्चा होत होत्या, परंतु केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा केली आणि चर्चांना विराम दिला.

  • विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचीच नव्याने मुख्यमंत्रीपदी नेमणूक होईल अशी अटकळ होती. परंतु, गेल्या निवडणुकीच्या ११६ जागांच्या तुलनेत यंदा कमी जागा आल्या, तसेच अमित शाह यांनी ठेवलेले १५० जागांचे लक्ष्यही फारच दूर राहिले या पार्श्वभूमीवर रुपाणींना बगल देऊन अन्य कुणाला संधी दिली जाते की काय अशी अटकळ व्यक्त होत होती.

  • सुरुवातीला अमित शाह यांनी १५० जागांहून मोठे लक्ष्य ठेवण्याचा म्हणजे शिवधनुष्य पेलू पाहण्याचाच प्रयत्न केला होता. गुजरातमध्ये २२ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर भाजपाला सत्ताधाऱ्यांविरोधातील असंतोषाला सामोरे जावे लागेल अशी शक्यता होती. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन.

  • १९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

  • १९४७: अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रॅन्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली.

  • १९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.

  • २०००: कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी

  • २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

  • २०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.

जन्म 

  • १६९०: मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.

  • १८५४: ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेन्‍री बी. गुप्पी यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)

  • १८९७: ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालिचरण पटनाईक यांचा जन्म.

  • १९०२: भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९८७)

मृत्य

  • १९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या. (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)

  • १९६५: नट व गायक, गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन. (जन्म: २ जुलै १८८०)

  • १९९८: स्वातंत्र्यसैनिक रत्‍नाप्पा कुंभार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ – निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)

  • २०००: मलिका-ए-तरन्नुम म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)

  • २००४: भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२१)

  • २००८: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १९३१)

  • २०१०: केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री, युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक के. करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९१६)

  • २०१३: एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९१९)

  • २०१३: भारतीय कवी आणि शिक्षक जी. एस. शिवारुद्रप्पा यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.