चालू घडामोडी - २३ फेब्रुवारी २०१९

Date : 23 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आगामी लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी ठरेल :
  • नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. ही निवडणूक भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातली सर्वात महागडी निवडणूक असेल, असा दावा अमेरिकास्थित तज्ज्ञानं केला. पुढील महिन्यात निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. 

  • पुढील दोन ते तीन महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक जगाच्या इतिहासातील सर्वात महागडी निवडणूक असेल, असा दावा मिलन वैष्णव यांनी केला. वैष्णव कार्गी इन्डॉवमेंट फॉर इंटरनॅशनल थिंक टँकच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक आहेत. '2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी 6.5 बिलियन डॉलर्सचा खर्च आला होता. तर 2014 मध्ये भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आलेला खर्च 5 बिलियन डॉलर्स इतका होता. आगामी लोकसभा निवडणुकीचा खर्च नक्कीच 6.5 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. त्यामुळे ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरेल,' अशी आकडेवारी वैष्णव यांनी सांगितली. 

  • येत्या निवडणुकीत भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टक्कर होईल. सत्ताधारी आणि विरोधरकांमधील संघर्ष अटीतटीचा असेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होईल, असा कयास त्यांनी व्यक्त केला. भारतीय निवडणुकांमध्ये खर्च होणारा पैसा यावर वैष्णव यांचा गाढा अभ्यास आहे.

  • 'येत्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याची कल्पना नाही. मात्र ही निवडणूक जगातील सर्वात महागडी असेल, याबद्दल शंका नाही,' असं वैष्णव म्हणाले. भारतातील राजकीय पक्ष, नेते यांना मिळणाऱ्या निधीचा नेमका आकडा कधीच कळत नाही. कारण निधी मिळणारा पक्ष आणि पैसे देणारी व्यक्ती कधीच याबद्दलची स्पष्ट माहिती जाहीर करत नाही, असं निरीक्षणदेखील त्यांनी नोंदवलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दक्षिण दौऱ्यावर आहेत. आज हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी दिल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.

  • नरेंद्र मोदींनी पुरस्कारासोबत १ कोटी ३० लाखांची रक्कम देण्यात आली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न, नोटाबंदी, वैश्विक शांततेसाठी केलेल्या कार्यासाठी नरेंद्र मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

  • पुरस्कार मिळाल्यानंतर मोदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून सर्व भारतीयांचा आहे. गेल्या पाच वर्षात भारताने जे यश मिळवलं आहे त्याचा सन्मान आहे. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी झाली त्याच वर्षी हा पुरस्कार मिळणं माझं भाग्य आहे’.

मुंबईतील पहिल्या वन डेत भारताकडून इंग्लंडचा धुव्वा, मालिकेत १-० अशी आघाडी :
  • मुंबई : भारतीय महिलांनी इंग्लंडचा अख्खा डाव 41 षटकात अवघ्या 136 धावांत गुंडाळून, मुंबईतल्या पहिल्या वन डेत 66 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारताने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

  • त्याआधी इग्लंडने नाणेफेर जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची मधली फळी कोसळली. त्यामुळे 49.4 षटकात भारताला सर्व बाद 202 धावांचीच मजल मारता आली होती. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्सने 48 आणि कर्णधार मिताली राजने 44 धावांची खेळी उभारली.

  • यानंतर 203 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या. डावखुरी स्पिनर एकता बिश्तने 25 धावांत चार विकेट्स काढून भारतीय महिलांच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. ऑफ स्पिनर दीप्ती शर्मा आणि वेगवान गोलंदाज शिखा पांडेने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून आपली कामगिरी चोख बजावली.

नरेंद्र मोदींचें ५५ महिन्यात ९३ परदेश दौरे, २०२१ कोटी रुपये खर्च :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन नेहमी मोठी चर्चा केली जाते. पंतप्रधान मोदी हे देशात कमी आणि विदेशात जास्त असतात अशी विरोधकांकडून टीका केली जाते. गेल्या सहा महिन्यात मोदींचे विदेश दौरे कमी झाले आहेत. निवडणुका होईपर्यंत ते विदेश दौऱ्यावर जाणार नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, निवडणुकीच्या आधी ते दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुरुवारी दक्षिण कोरियात दाखल झाले. २०१९ च्या लोकसभेपूर्वी पंतप्रधानांचा हा शेवटचा अधिकृत परदेश दौरा आहे. पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांचा हा ५५ महिन्यांतील ९३ वा परदेश दौरा आहे. त्यावर २०२१ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

  • परदेश दौऱ्यात मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची बरोबरी केली आहे. त्यांनी १० वर्षांत ९३ विदेश दौरे केले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षांत ११३ विदेश दौरे केले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ४८ दौरे केले होते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ६८ वेळा विदेश दौरे केले होते.

  • मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यावर २२ कोटी रुपये खर्च झाले तर मनमोहन सिंग यांच्यासाठी २७ कोटी खर्च झाले आहेत. दक्षिण कोरियापूर्वी मोदी यांनी ९२ विदेश दौरे केले आहेत. त्यावर एकूण २०२१ कोटी रुपये खर्च झाले. त्यांच्या एका दौऱ्यावर सरासरी २२ कोटी रुपये खर्च झाले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक दौरे २०१५ मध्ये केले. या वर्षी ते २४ देशांमध्ये गेले. २०१६ व २०१८ मध्ये १८-१८ देशांत गेले. २०१४ मध्ये ते १३ देशांमध्ये गेले होते. मोदी यांनी प्रत्येकी ५ वेळा अमेरिका तर प्रत्येकी ३ वेळा फ्रान्स-जपानचा दौरा केला. मोदींनी पाच वर्षांत एकूण ४९ विदेश दौरे केले. यादरम्यान ते ९३ देशांत गेले. त्यातील ४१ देश असे आहेत, जेथे ते पहिल्यांदा गेले. १० देशांमध्ये ते दोन वेळा गेला. फ्रान्स, जपानमध्ये ३-३ वेळा गेले. चीन-अमेरिकेत ५-५ वेळा गेले. रशिया, सिंगापूर, जर्मनी, नेपाळमध्ये ४-४ वेळा गेले.

पुरुषांमध्ये एअर इंडियाची आणि महिलांमध्ये पेट्रोलियमची बाजी :
  • कुडाळच्या वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे चालू असलेल्या ४७व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतरसंस्था सांघिक पुरुष गटामध्ये एअर इंडियाने, तर महिला गटामध्ये पेट्रोलियम क्रीडा मंडळाने बाजी मारली.

  • रिझव्‍‌र्ह बँकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू झहीर पाशाने एअर इंडियाच्या झैद अहमदला १५-९, २३-१७ असे पराभूत करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती; परंतु एअर इंडियाच्या अनुभवी विश्वविजेत्या आर. एम. शंकरा व राष्ट्रीय विजेत्या एम. नटराज जोडीने रिझव्‍‌र्ह बँकेच्या सूर्यप्रकाश व व्ही. आकाश जोडीला २५-९, २५-१७ असे हरवून सामन्यात अशी बरोबरी साधली. मग तिसऱ्या निर्णायक लढतीत पहिल्यांदाच एअर इंडियाकडून खेळणाऱ्या संदीप दिवेने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला.

  • त्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेविरुद्ध पहिला सेट २५-२ असा सहज जिंकून विजयाकडे आगेकूच केली; परंतु प्रशांतने दुसरा सेट कसाबसा २३-२२ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये संदीपने २५-४ असे प्रशांतला पराभूत करून एअर इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तृतीय क्रमांकाच्या लढतीत जैन इरिगेशनने विजय संपादन केला. त्यांनी बलाढय़ पेट्रोलियम संघाला २-१ असे हरविले.

  • महिलांच्या अंतिम सामन्यात पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या संघाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या संघाने कडवी झुंज दिली. विश्वविजेत्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एस. अपूर्वाने पेट्रोलियमच्या माजी विश्वविजेत्या रश्मी कुमारीला १९-१३, २५-४ असे हरवून संघाला आघाडी मिळवून दिली होती.

  • पेट्रोलियमच्या झ्लावझकीने-परिमला जोडीने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या परिमी निर्मला-दीपाली सिन्हा जोडीविरुद्ध १०-२३ असा पहिला सेट गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट २५-१७, २०-१४ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सामन्यात पेट्रोलियमची आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मेधा मठकरीविरुद्ध विजयासाठी झगडावे लागले. काजलने हा सामना १६-१७, १९-१०, २५-६ असा खिशात घालत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तृतीय क्रमांकासाठीच्या लढतीत जैन इरिगेशनच्या संघाने बीएसएनएलवर २-१ असा विजय मिळवला.

तृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळाची स्थापना :
  • मुंबई : राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

  • सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत.

  • तृतीयपंथीय समुदायातील एक विख्यात व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेचा प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असेल. याशिवाय विविध १४ विभागाचे सह सचिव/उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य तर आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४५५: पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई – अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.

  • १९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.

  • १९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

  • १९९६  कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.

  • १९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.

  • २०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

जन्म 

  • १६३३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १७०३)

  • १८५०: रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९१४ )

  • १९५७: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)

मृत्यू 

  • १७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १७७७)

  • १९०४: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक महेन्द्र लाल सरकार यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८३३ - पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)

  • १९४४: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८६३ – घेन्ट, बेल्जिअम)

  • २०००: वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.

  • २००४: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९१८)

  • २०११: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.