चालू घडामोडी - २३ जानेवारी २०१८

Date : 23 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी स्वित्झर्लंडला रवाना, शाहरुख, अंबानी, अदाणीही हजर राहणार :
  • नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आर्थिक मंच अर्थात डब्ल्यूईएफच्या बैठकीसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले आहेत. आज सकाळी 9 वाजता रवाना झालेले मोदी संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान ते दावोसमध्ये दाखल होतील.

  • पाच दिवस चालणाऱ्या या 48 व्या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि नागरिकांशी संबंधित अनेकविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.  ज्यात भारताकडून जवळपास 130 हून अधिकजण प्रतिनिधित्व करणार आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती जगभरातील प्रतिनिधींना देतील.

  • दरम्यान 20 वर्षांनंतर अशा बैठकीला उपस्थिती लावणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1997 मध्ये देवेगौडा यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.

  • सोमवारी मोदी जगभरातल्या कंपन्यांच्या सीईओंसोबत डिनर करणार आहेत, तर मंगळवारी उद्घाटनसत्रात मोदी संबोधित करणार आहेत.

  • याच कार्यक्रमात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा सन्मान केला जाणार आहे. शाहरुखसह ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री केट ब्लेन्चेट आणि संगीतकार एल्टन जॉन यांचाही सन्मान होणार आहे. (source :abpmajha)

नेट परीक्षा ८ जुलैला! ६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज :
  • मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणा-या यूजीसी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) रविवार, ८ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या परीक्षेसाठी ६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरू शकतील, अशी माहिती सीबीएसईतर्फे देण्यात आली.

  • महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी सीबीएसईतर्फे राष्ट्रीय पातळीवर परीक्षा घेण्यात येते. यंदा यूजीसी नेटची परीक्षा ८ जुलैला होणार आहे. परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येतील. दोन्ही पेपर १०० गुणांचे असतील. ही परीक्षा देण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी वाढविली आहे. ३० वर्षे वयापर्यंतचे उमेदवार परीक्षा देऊ शकतील. 

  •  http://cbsenet.nic.in या संकेतस्थळावर १ फेब्रुवारीला यूजीसी नेट परीक्षेसंदर्भातील अधिसूचना जाहीर होईल. उमेदवारांना ६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरता येतील. परीक्षार्थी ५ एप्रिलपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येतील. तर, ६ एप्रिलपर्यंत शुल्क भरायचे आहे.(source :Lokmat)

दलित शब्दाचा वापर बंद करा, मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश :
  • भोपाळ : मध्य प्रदेश हायकोर्टाच्या ग्वालियर खंडपीठाने दलित या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाच्या ग्वालियर खंडपीठाने हा आदेश दिला.

  • डॉ. मोहन लाल माहौर यांनी दलित या शब्दावर आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. घटनेत या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही, असा दावा त्यांनी आपल्या याचिकेतून केला होता.

  • या वर्गातील लोकांना अनुसूचित जाती किंवा जमाती असं संबोधलं जातं. मात्र सरकारी कागदपत्र आणि इतर ठिकाणी घटनेच्या विरोधात दलित या शब्दाचा वापर केला जातो, असं मोहन लाल माहौर यांनी म्हटलं होतं.

  • सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात कुठेही दलित या शब्दाचा वापर केला जाणार नाही, असा आदेश हायकोर्टाने दिला. त्याऐवजी घटनेत तरतूद असलेल्या शब्दाचाच वापर करावा, असंही कोर्टाने सांगितलं.

  • हा आदेश संपूर्ण मध्य प्रदेश राज्यासाठी लागू होईल, अशी माहिती याचिकाकर्त्याच्या वकिलाने दिली.(source :abpmajha)

सीमा शुल्क काढा, ‘४ जी’ स्वस्त करा, मोबाइल सेवा प्रदाता संघटनेची मागणी :
  • मुंबई : देशात ‘४ जी’ सेवांच्या पूर्ण विस्तारासाठी व त्या स्वस्त होण्यासाठी सामग्रींवरील सीमा शुल्क काढा, अशी मागणी सेल्युलर आॅपरेटर असोसिएशन आॅफ इंडिया (सीओएआय) या मोबाइल सेवा प्रदाता संघटनेने केली आहे. येत्या अर्थसंकल्पात याविषयी निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

  • मोबाइल इंटरनेट वेगात भारत अद्यापही खूप मागे आहे. अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार, भारत मोबाइल इंटरनेट वेगात जगात १०६वा तर ब्रॉडबॅण्ड वेगात ७६वा आहे. मोबाइलचा हा इंटरनेट वेग वाढविण्यात ‘४ जी’ नेटवर्कची महत्त्वाची भूमिका आहे.

  • अशावेळी हा वेग वाढविण्यासाठी टॉवर्स आणि अन्य विविध प्रकारची विदेशातून मागवावी लागते. या सामग्रीवर केंद्र सरकार १० टक्के सीमा शुल्क आकारत आहे. यामुळे वेग वाढवायचा असल्यास मोबाइल सेवा महाग करण्याशिवाय प्रदाता कंपन्यांकडे अन्य पर्याय नाही. यासाठीच येत्या अर्थसंकल्पात हे सीमा शुल्क कमी करावे अथवा रद्द करावे, असे सीओएआयचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांचे म्हणणे आहे.

  • मोबाइल कंपन्या नेटवर्कसाठी शहर तसेच ग्रामीण भागात टॉवर्सची उभारणी करतात. त्यापोटी ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडे शुल्क भरतात. मात्र या शुल्काच्या रकमेवर स्थानिक स्वराज्य संस्था कुठलाही कर भरत नाहीत. त्याउलट त्यांच्याकडून अन्य करांसाठी मोबाइल कंपन्यांवर वारंवार दबाव येत असतो. यामुळेच अशा प्रकारच्या शुल्काचा थेट जीएसटीमध्ये समावेश करता येईल का? याबाबतही येत्या अर्थसंकल्पात विचार व्हावा, असे सीओएआयचे म्हणणे आहे.(source :lokmat)

पंतप्रधान नरेंद्र मोदी डाव्होसमध्ये दाखल, जगाला दाखवणार भारताची आर्थिक ताकद :
  • डाव्होस -  जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचे 130 सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ डाव्होसला (स्वित्झर्लंड) येथे दाखल झाले आहे. आज पंतप्रधान मोदी त्यामध्ये भारताची आर्थिक भूमिका मांडतील.

  • जागतिक आर्थिक फोरमची (डब्ल्यूइएफ) 48 वी बैठक आल्प्स गिरीशिखरांच्या कुशीत वसलेल्या डाव्होसमधील एका रिसॉर्टमध्ये होत आहे.  पाच दिवस चालणा-या या परिषदेत पंतप्रधान आज आपला विषय मांडतील.  स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेरसेत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा व दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत करण्यासंदर्भातही चर्चा केली. दरम्यान, डब्ल्यूइएफच्या परिषदेसाठी जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एच.डी. देवेगौडा यांच्यानंतरचे पहिलेच पंतप्रधान आहेत.

  • पंतप्रधान मोदी यांनी या भेटीसंदर्भातील ट्विटदेखील केली आहे. ''डाव्होसमध्ये पोहोचल्यानंतर मी  स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेरसेत यांच्यासोबत संवाद साधला. आम्ही द्विपक्षीय सहकार्याच्या शक्यतांचा आढावा घेतला व संबंध अधिक बळकट करण्याबद्दल चर्चा केली'', असे ट्विट मोदींनी केले आहे.  

  • यानंतर पंतप्रधान मोदी यांनी काही जागतिक कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांचीही भेटे घेतील. मोदी हे डाव्होसमध्ये जागतिक आर्थिक फोरमच्या कार्यक्रमात भाषणदेखील देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर भारतीय अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि आपल्या धोरणांबाबत येथे माहिती मांडणार आहेत. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठकीचा पंतप्रधान मोदींचा नियोजित कार्यक्रम आहे.

शिक्षकांसाठी मध्यस्थी करणार, शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत शरद पवारांचे आश्वासन :
  • कर्वेनगर : राज्यातील शिक्षकांच्या बदल्या आणि पेन्शनचा प्रश्न मुख्यंमंत्र्याबरोबर शिक्षक संघाची बैठक घेऊन सोडविला जाईल, असे आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या पुणे येथील शिक्षण परिषदेत बोलताना दिल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

  • पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचा रौप्य महोत्सव व शिक्षण परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. शरद पवार यांच्या हस्ते शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील अध्यक्षस्थानी होते.

  • खासदार वंदना चव्हाण, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष

  • जालिंदर कामठे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, रोहित पवार, दिगंबर दुर्गाडे, दीपक मानकर, चेतन तुपे, अतुल बेनके, रणजित शिवतरे, संभाजीराव थोरात, शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्यासह जिल्हाभरातील पाच हजारांहून अधिक शिक्षक उपस्थित होते.

  • पवार म्हणाले, ‘‘मागील चाळीस वर्षांमध्ये राज्यभरातील प्राथमिक शिक्षण दर्जेदार होण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न वेळोवेळी सोडविले आहेत. पुणे जिल्हा संघाच्या शैक्षणिक संकुलामधील नव्याने केलेले बदलामुळे संस्थेचा नावलौकिक भविष्यात आणखी वाढेल.’’

  • दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. एकीकडे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करायची व दुसरीकडे शाळा बंद करायच्या हा विरोधाभास आहे, असे सांगून जिल्हा शिक्षक संघाने संकुलाचे ‘पद्मभूषण शरचंद्रजी पवार शैक्षणिक संकुल’ असे नामकरण केल्याबद्दल समाधान व्यक्त करून वळसे-पाटील यांनी जिल्हा बँकेतून शिक्षकांना ५ लाख रुपये कॅश क्रेडिट देण्याची घोषणा केली.(source :Lokmat)

‘आधार’ नसल्याने तो झाला ‘निराधार’ :
  • आधार कार्ड बनविणारी केंद्रे शहरात मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध, तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना आधार कार्ड बनविणे अतिशय अवघड ठरत आहे. त्यातच कित्येकांनी आपले आधार कार्ड बनविले. त्याच्या पावत्याही त्यांच्याकडे आहेत, परंतु प्रत्यक्ष आधार कार्ड मात्र तयार झाले नाही, ते रद्द झाले असल्याचे चौकशीला गेल्यावर सांगितले जात आहे.

  • तळवडे येथील नितीन भालेकर या तरुणाने आजपर्यंत आधार कार्ड काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत, नितीन याने जवळपास आठ ते नऊ वेळा वेगवेगळ्या आधार केंद्रावरून आपले आधार बनविले आहे, त्याच्याकडे प्रत्येक वेळेस काढलेली नवीन एनरॉलमेंट स्लिप आहे. पहिल्यांदा त्याने आपल्या कुटुंबीयांच्या सोबत आधार कार्ड काढले, कुटुंबातील सर्वांची आधार कार्ड आली. परंतु नितीनचे आधार आलेच नाही.

  • त्यानंतर चौकशी केली असता तुमचे आधार कार्ड रिजेक्ट केले आहे पुन्हा आधार कार्ड बनवा असा सल्ला आधार कार्ड केंद्रातून मिळाला, त्यानंतर नितीन याने सात ते आठ वेळा आधार कार्ड काढण्यासाठी प्रयत्न केले; परंतु आधार कार्ड आले नाही. तुमच्याकडे हाताचे ठसे जुळत नाहीत, डोळ्यांचे नमुने येत नाहीत, प्रत्येक वेळेस आधार रिजेक्ट होते.

  • आपले आधार का तयार होत नाही यासाठी त्याने नवनवीन आधार केंद्रावर चौकशी केली, त्यानंतर त्याने आधार हेल्पलाईनशी संपर्क केला. प्रत्येक वेळेस सबंधितांनी वेळ मारून नेत नवीन कारण सांगितल्याचा अनुभव नितीनला आला आहे. यासाठी कोणाकडे जावे, काय करावे, आधार क्रमांक मिळणार का, असे प्रश्न पडले आहेत.

यंदाच्या आयपीएलचा मुहूर्त ठरला, सामन्यांच्या वेळेतही बदल :
  • नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमाची सुरुवात यावर्षी 7 एप्रिल रोजी मुंबईतून होईल, तर अंतिम सामना मुंबईतच 27 मे रोजी खेळवला जाईल. उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना मुंबईत होणार आहे.

  • आयपीएलच्या प्रशासकीय समितीने वेळापत्रकासोबतच यावर्षी सामन्याच्या वेळेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दुपारी चार वाजता आणि रात्री आठ वाजता सामना सुरु व्हायचा, त्यात आता बदल करण्यात आला आहे.

  • प्रसारकांनी सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा आग्रह धरला होता आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीने तो आग्रह मान्य केला आहे, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली.

  • आठ वाजता सुरु होणाऱ्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आता सात वाजता सुरु होईल आणि दुपारी चार वाजता सुरु होणाऱ्या सामन्याचं प्रक्षेपण सायंकाळी साडे पाच वाजता होईल, असं राजीव शुक्ला यांनी सांगितलं.

  • किंग्ज इलेव्हन पंजाब आपले चार सामने मोहालीत, तर तीन सामने इंदूरमध्ये खेळणार आहे. दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडबाबतचा निर्णय राजस्थान हायकोर्टाच्या 24 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर घेतला जाईल.

  • यंदाच्या आयपीएलसाठी 27 आणि 28 जानेवारी रोजी लिलाव होणार आहे, ज्यात 360 भारतीयांसह 378 खेळाडूंवर बोली लावली जाईल.

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर.

  • १७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.

  • १८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.

  • १९३२: प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.

  • १९४३: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर जिंकले.

  • १९६८: शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.

  • १९७३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.

  • १९९७: मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.

  • २००२: वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण.

जन्म

  • १८१४: भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३)

  • १८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)

  • १८९८: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)

  • १९१५: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म. (मृत्यू: १ मे१९७२)

  • १९२०: व्यासंगी लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म.

  • १९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)

  • १९३४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)

  • १९४७: इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मेगावती सुकार्नोपुत्री यांचा जन्म.

मृत्यू

  • १६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन. (जन्म: १८ मार्च १५९४)

  • १९१९: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन. (जन्म: २६ मे १८८५)

  • १९३१: द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अ‍ॅना पाव्हलोव्हा यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)

  • १९५९: शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर यांचे निधन.

  • १९८९: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचे निधन. (जन्म: ११ मे १९०४)

  • १९९२: भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.

  • २०१०: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.