चालू घडामोडी - २३ जुलै २०१८

Date : 23 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताच्या लक्ष्य सेनला आशिया ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक :
  • मुंबई : भारताच्या लक्ष्य सेननं आशिया ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यानं या स्पर्धेत अंतिम सामन्यात लक्ष्यनं इंडोनेशियाच्या वितिद सरनचा दोन सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला.

  • लक्ष्यने हा सामना 21-19, 21-14 असा जिंकत तब्बल 53 वर्षानंतर भारताला पुरुष गटाचं सुवर्णपदक मिळवून दिलं. आशिया ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा लक्ष्य सेन आजवरचा केवळ तिसरा भारतीय बॅडमिंटनपटू ठरलाय.

  • याआधी 1965 साली गौरव ठक्कर आणि 2012 साली पी व्ही सिंधूनं सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती.

राजस्थान - मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा वसुंधरा राजेंना संधी :
  • जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्त्वात लढली जाईल आणि त्या पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल आणि 2019 ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होती, असा दावाही त्यांनी केला.

  • काँग्रेसकडून खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याची टीका अमित शाहांनी केली. त्यांच्या पक्षात आता फक्त भ्रष्टाचारी नेते उरले असल्याचं ते म्हणाले. शिवाय पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक जोपर्यंत जिंकणार नाही, तोपर्यंत विजय अपूर्ण आहे, असंही अमित शाहांनी सांगितलं.

  • वसुंधरा राजेंच्या नावाला महत्त्व कशामुळे - राजस्थानमध्ये यावेळी वसुंधरा राजे यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाईल, असं बोललं जात होतं. मात्र अमित शाहांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला. अमित शाहांनी यातून कार्यकर्ते, आमदार आणि खासदार यांना एक संदेश दिला आहे. तरीही पक्षातला वाद संपुष्टात येईल, याची काही शक्यता नाही.

  • राजस्थानमध्ये विजय फक्त पंतप्रधान मोदींमुळे मिळाला, असं काही दिवसांपूर्वी कृषी आणि कल्याण मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले होते. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे वसुंधरा राजेंवर निशाणा साधला होता. अध्यक्षपदावरुन वुसंधरा राजे आणि शेखावत यांच्यात वाद झाला होता.

स्वप्न सत्यात! मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती :
  • मैत्री, भांडण, प्रेम, वाद, विरोध, विविधांगी टास्क आणि आठवड्याच्या शेवटी रंगणारा विकेंडचा डाव, ‘बा’चा टीव्ही अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रीय शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. 

  • अखेर तो क्षण आलाच. आपल्या असण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जान’ आणणारी मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. पुष्कर जोग याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

  • स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, सई लोकूर, आस्ताद काळे, यांना मात देत मेघा धाडे हिने ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आज रंगलेल्या अंतिम फेरित शर्मिष्ठा राऊत प्रथम बाद झाली. 

  • पाठोपाठ आस्ताद काळे आणि सई लोकूर अंतिम फेरितून बाहेर पडले. यानंतर उरलेत ते केवळ मेघा, पुष्कर अन् स्मिता. या तिघांमध्ये चुरस होती. विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. अखेर तो क्षण आला आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून मेघाचे नाव जाहिर करण्यात आले.

  • मेघाने ‘बिग बॉस मराठी’चा पिहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात होती. किंबहुना शो जिंकायचाच याच महत्त्वाकांक्षेने मेघा या घरात आली होती. सुरुवातीपासूनच या दूरदृष्टीने मेघाचा खेळ सुरू होता. ‘बिग बॉस’च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. 

टिळक आणि आझादांचे आदर्श अनुसरावे :
  • आपली मातृभूमी या महान सुपुत्रांप्रति आभारी आहे. त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अतूट कटिबद्धता दर्शविली. दोघेही स्वातंत्र्यलढ्याचे नायक असून स्वांतत्र्यसंग्रामाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे. सर्व भारतीयांनी या महान देशभक्तांकडून प्रेरणा घ्यायला हवी. आजच्या युवकांनी त्यांच्याकडून स्वदेशभक्तीची शिकवण घ्यावी. नव्या भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी त्यांचे आदर्श अवलंबत अनुसरण करायला हवे.

  • टिळक हे ओजस्वी देशभक्त होते. त्यांनी भाषण, लेखन आणि कार्याच्या माध्यमातून राष्टÑीय चेतना जागविली. ऐक्य आणि राष्टÑीय स्वाभिमानाच्या अभावी देश विदेशी शक्तींच्या अधीन झाला, असा त्यांचा दृढ विश्वास होता. चंद्रशेखर आझाद यांचे जीवन देशाच्या स्वातंत्र्याची महागाथा असून देशासाठी सर्वोच्च बलिदानाची भावना प्रकट करते.

  • देशाच्या स्वातंत्र्यलढ्यावर नजर टाकली तर थोरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वेगवेगळा दृष्टिकोन ठेवल्याचे दिसून येते, मात्र देशाप्रति दुर्दम्य कटिबद्धता, राष्टÑीय स्वाभिमान निर्माण करण्याची भावना ही त्यांच्यातील समान बाब होती. त्यामुळेच देश यशस्वी स्वतंत्र राष्ट्र म्हणून विकसित होऊ शकले. देशाच्या सातत्यपूर्ण विकासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरते. प्रत्येक भारतीयाने विशेषत: आपल्या लोकसंख्येत महत्त्वपूर्ण वाटा असलेल्या युवकांनी आझादांप्रमाणे निडर क्रांतिकारीचा जोश अंगिकारत देशाच्या विविध आघाड्यांवरील आव्हानांचा सामना करण्याची तसेच टिळकांप्रमाणे कटिबद्धता दर्शवत राष्टÑवादाचा अवलंब करण्याची वेळ आली आहे.

  • गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य प्रत्येक नागरिकाला लाभावे. शेतकऱ्यांच्या जीवनातून तणाव दूर व्हावा, झोपडपट्टीवासीयांचा त्रास कमी व्हावा, प्रत्येक ठिकाणी मूलभूत गरजा प्रदान केल्या जाव्या. तसेच धर्म, क्षेत्र आणि जाती- समुदायाच्या आधारावर होणारा भेदभाव दूर करण्यासाठी ते आवश्यक आहे.

जीएसटीच्या २८ टक्के कर श्रेणीत आता केवळ ३५ वस्तूंचा समावेश :
  • नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराच्या सर्वाधिक म्हणजे २८ टक्के दराच्या प्रवर्गात आता केवळ ३५ वस्तू राहिल्या आहेत, यात सध्या १९१ वस्तू होत्या, त्यात अनेक वस्तूंवरील कर कपात केल्याने केवळ वातानुकूलन यंत्रे, डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डर, डिशवॉशर मशीन, वाहने यांसारख्या ३५ वस्तूच त्यात राहिल्या आहेत. १ जुलै २०१७ रोजी वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी करप्रणाली सुरू झाली, तेव्हा २८ टक्के कराच्या गटात २२६ वस्तू होत्या. गेल्या वर्षभरात काही वस्तूंवरचे कर कमी करण्यात आले.

  • अर्थमंत्री व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत १९१ वस्तूंवरचा कर कमी करण्याचा निर्णय झाल्याचा हा परिणाम होता. आता २७ जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होत असून त्यात २८ टक्के कराच्या गटात सिमेंट, स्वयंचलित वाहने, त्यांचे सुटे भाग, टायर, मोटर वाहने, याट, विमाने, फसफसणारी पेये, बेटिंग, तंबाखू व सिगारेट तसेच पानमसाला यांचा समावेश आहे. महसुलाचे स्थिरीकरण झाल्यानंतर अतिशय चैनीच्या वस्तूच या गटात ठेवण्याचा विचार करता येईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • डेलॉइट इंडियाचे भागीदार एम. एस. मणी यांनी सांगितले, की आधीच्या कपातीनंतर पुढील काळातच सर्व आकाराचे टीव्ही, डिशवॉशर, डिजिटल कॅमेरा, वातानुकूलक हे १८ टक्के कराच्या गटात आणता येतील.

  • त्यातून पुढे जीएसटी दराच्या कमीत कमी श्रेणी ठेवता येतील. आताच्या कपातीनंतर २८ टक्के कराच्या श्रेणीत केवळ ३५ वस्तू उरल्या आहेत. जीएसटी मंडळाची बैठक २१ जुलै रोजी झाली, त्यात करकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. यात १५ वस्तूंवरचा कर २८ टक्क्य़ांवरून १८टक्के केला.

ज्युनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या पैलवानाला कांस्य :
  • नवी दिल्ली : ज्युनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान सुरज उर्फ नामदेव कोकाटेनं कांस्यपदक पटकावलं. नवी दिल्लीमध्ये सुरु असेलल्या या स्पर्धेत सुरजनं 61 किलो फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्यपदकाची कमाई केली.

  • कांस्यपदकासाठी झालेल्या कुस्तीत सुरजनं जपानच्या युटो त्सुचियाचा 16-8 असा पराभव केला. सुरज हा मूळचा बारामती जिल्ह्यातील सराटी गावचा सुपुत्र आहे. त्यानं यापूर्वी अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकून महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर उंचावलं आहे.

  • सुरज पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्याकडे सराव करतो.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.

  • १९२७: मुंबईत रेडिओक्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.

  • १९८२: इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

  • १९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.

  • १९९९: केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

जन्म 

  • १८५६: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

  • १९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)

  • १९१७: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.

  • १९२५: बांगलादेशचे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)

  • १९२७: जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म.

  • १९४७: अभिनेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेते आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.

  • १९७६: हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८२२)

  • १९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.

  • १९९९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)

  • २००४: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेमूद यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

  • २०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.