चालू घडामोडी - २३ जून २०१८

Date : 23 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीनची रेल्वे येणार काठमांडूमध्ये, दोन्ही देशांची जवळीक वाढली :
  • बीजिंग- चीन आणि नेपाळ यांच्यामधील जवळीक वाढली असून दोन्ही देशांनी 14 विविध करारांवर स्वाक्षरी केली आहे. चीनने आपले रेल्वेचे जाळे काठमांडूपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली सध्या 5 दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत.

  • दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यावर ओली यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 19 जूनपासून सुरु झालेला हा दौरा पाच दिवस चालणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांच्यासह पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि 14 करारांवर स्वाक्षरी केली.

  • काल दोन्ही देशांनी 2.4 अब्ज डॉलर्सच्या करारांना संमती दिली. यामध्ये जलविद्युत प्रकल्प, सिमेंट कारखाने, फळ उत्पादन यांचा समावेश आहे. तिबेट आणि नेपाळ यांना रेल्वेने जोडण्याबद्दलही काल चर्चा झाली. नेपाळची राधानी काठमांडू आणि तिबेटमधील शिगात्से हे शहर जोडण्यात येणार आहे.

  • चीनने रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे याआधीच तिबेटमध्ये तयार  केले आहे. आता रस्ते आणि रेल्वेमार्ग नेपाळपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तिबेटमधील रेल्वेला अभियांत्रिकाचा उत्तम आविष्कार मानले जाते.

गोव्यात २४ असुरक्षित ठिकांणावर ‘नोन-सेल्फी’ झोनचे साइनबोर्ड :
  • पणजी: किनारपट्टीवरील दगडांवर राहून सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमावणचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी सरकार नियुक्त जीवरक्षक एजन्सी ‘दृष्टी मरीन’ने ओळखल्या गेलेल्या 24 असुरक्षित सेल्फी ठिकाणांवर ‘नो-सेल्फी’ झोनचे साइनबोर्ड लावण्याचे ठरविले आहे.

  • यामध्ये उत्तर गोव्यातील बागा नदी, दोनापावला जेटी, सिकेरी किल्ला, हणजूण, वागातोर, मोरजी, आश्वे, हरमल, केरी व बांबोळी आणि शिरडाव तर दक्षिणमधील आंगोद, बोगमालो, होलांत, बायणा, जपानिझ बाग, बेतुळ, कणांगाइणी, पालोले, खोला, काबो द रामा, पोळे, गालजिबाग, ताळपोणा व राजबाग या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणांवर ‘नो-सेल्फी’ संकेत सूचक लावण्याचा विचार ‘दृष्टी मरीन’ने केला आहे.

  • दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर म्हणाले, “काही ठिकाणांवर असलेले साइनबोर्ड अपग्रेड करण्यात आले आहेत. झेंड्यांवर सचित्र निर्देश (पिक्टोरियल इनस्ट्रक्शन), आपातकालीन टोल फ्री क्रमांक व काय करावे आणि काय करू नये या बद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

  • दृष्टी मरीनने 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना व प्रवाशांना समुद्रात न जाण्याचे जारी केलेल्या मार्गदर्शक इशारावजा सूचनाद्वारे कळवण्यात आले आहे. कारण या दिवसात समुद्र व वाऱ्याचे वातावरण पोहण्यासाठी व पाण्यातल्या मनोरंजक उपक्रमांसाठी उपयुक्त नसते. सर्व ‘नॉन-स्विम’ ठिकाणांवर लाल झेंडे रोवण्यात आले आहेत.

दुबईत व्हिसाविना दोन दिवस राहता येणार :
  • नवी दिल्ली: दुबईत पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हीच बाब लक्षात घेत संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) मोठा निर्णय घेतला आहे. युएई सरकारच्या नव्या निर्णयानुसार भारतीय पर्यटकांना दोन दिवसांचा मोफत ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे.

  • यूएई सरकारच्या नव्या निर्णयामुळे दुबई किंवा अबुधाबीवरून प्रवाशांना जगभरात कोठेही जायचे असल्यास त्यांना 48 तास दुबईमध्ये राहण्यासाठी काहीही खर्च येणार नाही. याशिवाय पर्यटकांना जर दोन दिवसांहून अधिक काळ येथे राहायचे असल्यास 50 दिरहॅम अर्थात 1000 रुपयांचे शुल्क देऊन 96 तास म्हणजेच चार दिवस राहता येणार आहे.

  • भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यूएई सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र ही सुविधा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही सूचना अद्याप यूएई सरकारकडून जारी करण्यात आलेली नाही. दुबईतील विमानतळांवर उभारलेल्या 'पासपोर्ट कंट्रोल हॉल'मध्ये यूएईचा ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे.

  • दुबई आणि अबुधाबीमध्ये 2017 मध्ये जवळपास 3.70 लाख भारतीय पर्यटकांनी भेट दिली आणि आता ही संख्या वाढतच जात आहे. यूएईशिवाय इस्राइल, जपान, ओमान आदी देशांनी भारतीय पर्यटकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत.

पीएफ खात्यातून केवळ ६० टक्केच रक्कम काढता येणार :
  • नवी दिल्ली : भविष्यात कदाचित तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून केवळ 60 टक्केच रक्कम काढता येऊ शकते. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा प्रस्ताव दिला आहे. 26 जून रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो. नोकरी गमावलेल्या किंवा बेरोजगारांनाही हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.

  • नव्या निर्णयामागचं कारण काय - ईपीएफओ खात्यातून खातेधारक मोठ्या प्रमाणात निधी काढत आहेत. त्यामुळे संघटनेच्या निधीमध्ये कपात होण्याची चिंता सतावत आहे. याशिवाय नोकरी गमावल्यानंतर किंवा बेरोजगार असताना खातेधारक संपूर्ण रक्कम काढू शकणार नाही, याच्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

  • सध्याच्या नियमानुसार, नोकरी सोडल्यानंतर किंवा बेरोजगार असताना दोन महिन्यांनंतर पीएफ खातेधारक संपूर्ण रक्कम काढू शकतो. मात्र ईपीएफओचा प्रस्ताव मान्य झाल्यास या काळातही कर्मचाऱ्यांना आपल्या एकूण जमा रकमेपैकी केवळ 60 टक्केच रक्कम काढता येईल.

  • पीएफ खातेधारकाला सध्या मुलांचं लग्न, घर बांधणी किंवा आजाराच्या खर्चासाठी पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची तरतूद आहे. मात्र ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कदाचित कर्मचाऱ्यांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

  • दरम्यान, ईपीएफओचा हा प्रस्ताव मंजूर होणं एवढं सोपं नाही आणि या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होण्याचीही शक्यता आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान :
  • नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. विधानसभेच्या सदस्यांनी निवडून दिलेल्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०१७ रोजी संपत आहे.

  • त्यात जयदेवराव मारुतीराव गायकवाड, विजय विठ्ठल गिरकर, माणिकराव गोविंदराव ठाकरे, संजय सतीशचंद्र दत्त, अनिल दत्तात्रय परब, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अमरसिंग शिवाजीराव पंडित, शरद नामदेव रणपिसे, सुनील दत्तात्रय तटकरे, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील यांचा समावेश आहे.

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ९ जुलै असेल. मतदान व मतमोजणी एकाच दिवशी १६ जुलैला होईल.

बेळगाव सीमाप्रश्नाचा लढा देणारे सत्याग्रही मनोहर भातकांडे यांचे निधन :
  • महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, ज्येष्ठ सीमा सत्याग्रही मनोहर महादेवराव भातकांडे यांचे निधन झाले आहे. भातकांडे ९२ वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना-जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. बेळगाव सीमा प्रश्न सोडवण्यासाठी विलंब होत असल्याने शेवटचा श्वास महाराष्ट्रात घ्यायचा अशी त्यांची इच्छा होती.

  • महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या महाराष्ट्राच्या शिनोळी गावात त्यांनी घर घेतले होते. त्यांचे इतर कुटुंबीय बेळगावात राहात होते. मात्र मनोहर भातकांडे बेळगावात राहात होते. त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना बेळगावात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. हे उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले त्यामुळे महाराष्ट्रात अखेरचा श्वास घेण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.

  • १९५६ पासून त्यांनी सीमा प्रश्न सोडवण्याच्या लढ्यात सहभाग घेतला होता. मुंबई, दिल्ली या ठिकाणी जे मोर्चे काढण्यात आले होते त्यातही भातकांडेंची भूमिका महत्त्वाची ठरली. समितीच्या कोणत्याही आंदोलनात मनोहर भातकांडे भगवा फेटा परिधान करून घोषणा देत आघाडीवर असत. मनोहर भातकांडे यांच्या पार्थिवावर सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अशीही माहिती मिळते आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय विधवा दिन / संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.

  • १८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.

  • १९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.

  • १९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.

  • १९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट झाल्यमुळे ३२९ प्रवासी लोक ठार झाले.

  • १९९६: शेखहसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.

  • १९९८: दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.

  • २०१६: युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.

जन्म 

  • १८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९)

  • १९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९५५)

  • १९१२: इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९५४)

  • १९१६: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)

  • १९३५: मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म.

  • १९३६: ग्रीक पंतप्रधान कॉस्टास सिमिटिस यांचा जन्म.

  • १९४२: दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७६१: बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७२१)

  • १८३६: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १७७३)

  • १९५३: भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०१)

  • १९७५: भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचे निधन.

  • १९८०: इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९४६)

  • १९८२: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.

  • १९९०: चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८९८ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

  • १९९४: नाटककार, साहित्यिक वसंतशांताराम देसाई यांचे निधन.

  • १९९५: पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. जोनस साॅक यांचे निधन.

  • २०१५: भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक निर्मला जोशी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.