चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ जून २०१९

Date : 23 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं :
  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनले आहेत. ब्रिटीश हेराल्ड २०१९ च्या सर्वेक्षणात व्लादिमीर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून मोदींनी बाजी मारली आहे. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी वाचकांचा पोल तयार केला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील २५ प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता. अखेरच्या टप्प्यात समीक्षकांसमोर चार उमेदवारांची नावं ठेवण्यात आली. 

  • या चार जणांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची नावे होती. ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आले आहे.

  • ब्रिटीश हेराल्डने वाचकांना मोस्ट पॉवरफुल पर्सन २०१९ साठी मते नोंदवायला एक ओटीपी दिला होता. ज्यामुळे एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक मते देणं शक्य नव्हतं. शनिवारी मतदानाची प्रक्रिया थांबली. नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून निवड झाल्यानंतर ब्रिटीश हेराल्डच्या कव्हर पेजला मोदींचा फोटो झळकणार आहे. 15 जुलै रोजी ब्रिटीश हेराल्डची पत्रिका प्रकाशित होईल.

देशात ९० टक्के औषधे स्वस्त; राज्यमंत्र्यांचा दावा :
  • महागड्या औषधांच्या किंमतीतून गरीबांना दिलासा देत औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत राज्यमंत्री मनसुखलाल मंडाविया यांनी राज्यसभेत माहिती दिली. १ हजार ३२ महागड्या औषधांच्या किंमती नियंत्रणात आणण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले.

  • सामान्यत: वापरण्यात येणाऱ्या १०३२ आवश्यक औषधांच्या किंमती नियंत्रित करण्यात आल्या आहेत. या औषधांच्या किंमतीत ९० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आल्यामुळेच जन औषधी केंद्रांवर मिळणाऱ्या ५२६ निरनिराळ्या औषधांची किंमत ९० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे मंडाविया यांनी सांगितले.

  • ८० टक्क्यांपेक्षा अधिक महागड्या औषधांना या यादीतून बाहेर ठेवल्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. आवश्यक औषधांची यादी आरोग्य मंत्रालयाने तयार करत असते. यामध्ये सर्वाधिक वापर होणाऱ्या औषधांचा समावेश असतो. या औषधांचे वितरण देशभरात सुरू केलेल्या ५ हजार ३५८ जन औषधी केंद्रांमधून करण्यात येत आहे. औषधांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

  • प्रत्येक जन औषधी केंद्रांमधून ७०० पेक्षा अधिक औषधांचे वितरण होत असल्याची माहिती एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. दरम्यान, दररोज सरासरी २० ट्रक औषधांची वितरण केले जात असून आवश्यक त्या प्रमाणात औषधे उपलब्ध असल्याचेही मंडाविया यांनी सांगितले. या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेमार्फत केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेने इराणवर आक्रमण केल्यास गंभीर परिणाम :
  • इराणविरोधात जर अमेरिकेने कुठलेही आक्रमण केले तर त्याचे प्रादेशिक पातळीवर गंभीर परिणाम होतील,  तसेच मध्यपूर्वेतील अमेरिकी हितसंबंधांना बाधा पोहोचेल, असा इशारा इराणने दिला आहे.

  • इराणचे ब्रिगेडियर जनरल अबोलफजल शेखार्ची यांनी तनसनिम न्यूजला सांगितले की, इराणवर एक गोळी झाडली गेली तरी त्याचे अमेरिका व मित्र देशांच्या हितसंबंधांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. सध्या तरी येथील परिस्थिती इराणच्या फायद्याची आहे. जर अमेरिका किंवा मित्र देशांनी आगळिक करून आक्रमण करून गोळीबार केला तर या प्रदेशात संघर्षांची आग भडकेल.

  • इराणने अमेरिकेचे गुप्तहेर विमान पाडल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचे आदेश दिले होते पण त्यात दीडशे लोक मरतील असे सांगण्यात आल्यानंतर हे आदेश दहा मिनिटांतच मागे घेण्यात आले. अमेरिकेच्या ड्रोन विमानाने हवाई हद्दीचा भंग केला होता असे इराणचे म्हणणे असून अमेरिकेने हा आरोप फेटाळला आहे. याआधी दोन तेल टँकरवर  हल्ले करण्यात आले होते. त्याला इराण जबाबदार असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

आर्थिक सुधारणांवर पंतप्रधानांची तज्ज्ञांशी चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घेतलेल्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ आणि उद्योगतज्ज्ञांच्या बैठकीत अर्थव्यवस्थेच्या स्पर्धात्मकतेत सुधारणा करण्याच्या कल्पना, सरकारच्या प्रमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पन्नवाढ या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.

  • देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आर्थिक सुधारणा करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी ही बैठक बोलावली होती. देशाला उच्च आर्थिक विकास कसा साधता येईल, यावर त्यांनी अर्थतज्ज्ञांशी संवाद साधला. बँकिंग आणि विमा क्षेत्र थेट परकी गुंतवणुकीसाठी खुले करणे, निर्गुतवणुकीची प्रक्रिया वेगवान करणे आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन याही विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • केंद्रीय अर्थसंकल्प जुलैच्या ५ तारखेला सादर होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या संवादसत्रात चाळीसहून अधिक अर्थतज्ज्ञ, उद्योगतज्ज्ञ आणि उद्योगपती सहभागी झाले होते. ज्या आर्थिक सुधारणा राबवायच्या आहेत, त्याबाबतचा आराखडा तयार करण्याची सरकारची योजना आहे.  याशिवाय, अर्थव्यवस्थेच्या स्पर्धात्मकतेत सुधारणा करणे, सरकारच्या प्रमुख योजना अधिक परिणामकारक बनवणे आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पन्न वाढवणे यावरही चर्चा करण्यात आली.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय विधवा दिन / संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.

  • १८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.

  • १९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.

  • १९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.

  • १९७९: इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.

  • १९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.

  • १९९६: शेखहसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी नेमले.

  • १९९८: दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.

  • २०१६: युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.

जन्म 

  • १८७७: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९२९)

  • १९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)

  • १९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९५५)

  • १९१२: इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९५४)

  • १९१६: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)

  • १९३६: ग्रीक पंतप्रधान कॉस्टास सिमिटिस यांचा जन्म.

  • १९७२: फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७६१: बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १७२१)

  • १८९१: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचे निधन.

  • १९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८३८)

  • १९५३: भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०१)

  • १९८०: भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८९४)

  • १९८०: इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९४६)

  • १९८२: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन.

  • १९९०: चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८९८ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

  • १९९५: पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. जोनस साॅक यांचे निधन.

  • १९९६: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९२१)

  • २००५: साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.