चालू घडामोडी - २३ मार्च २०१८

Date : 23 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नेमबाज इलावेनिलचा विश्वविक्रमी ‘सुवर्णवेध’, अर्जुन बाबूताला कांस्य :
  • सिडनी : भारताची नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने मोसमातील पहिल्याच ज्युनियर विश्वचषकात महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकून पात्रता फेरीत विश्वविक्रम नोंदविला. इलावेनिलने श्रेया अग्रवाल तसेच जिना खट्टा यांच्यासोबत सांघिक प्रकारातही सुवर्णाची कमाई करून दिली. पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बाबूता याला कांस्यवर समाधान मानावे लागले.

  • १८ वर्षांच्या इलावेनिलची अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती. तिने २४९.८ गुणांसह सुवर्ण जिंकले. त्याआधी पात्रता फेरीत ६३१.४ गुणांची नोंद केली. हा नवा विश्वविक्रम आहे.

  • विजयानंतर इलावेनिल म्हणाली,‘ मी आपल्या कामगिरीवर आनंदी आहे. सुवर्ण जिंकण्याची मला खात्री होती. हे पदक आईवडिलांना समर्पित करते.यासाठी मेहनत घेणारे गगनसर आणि जीएफजीतील कोचेसचे आभार.’ इलावेनिल ही आॅलिम्पिक कांस्य विजेता गगन नारंग यांच्या ‘गन फॉर ग्लोरी’ अकादमीत सराव करते.

  • या प्रकारात चीनी तैपईची लिन यिंग शिन हिने रौप्य आणि चीनची वानग जेरू हिने कांस्य पदक जिंकले. श्रेया व जिना अनुक्रमे सहाव्या, सातव्या स्थानी घसरल्या. सांघिक गटात भारताने सुवर्ण जिंकले तर चायनीज तायपेईला रौप्य व चीनला कांस्य मिळाले. गतवर्षी आशियाई चॅम्पियनशिपचा सुवर्ण विजेता बाबूताला कांस्य मिळाले.(source :lokmat)

पंतप्रधान कार्यालयाने मागवले एनसीसी कॅडेट्सचे ई-मेल आणि मोबाईल क्रमांक :
  • जगातील सर्वात मोठी तरुण स्वयंसेवकांची संघटना असलेल्या राष्ट्रीय कॅडेट कोअर (एनसीसी) या संघटनेच्या कॅडेट्सकडून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्यात येत आहे. सरकारकडून हे काम सुरु असून यामध्ये १३ लाख कॅडेट्सचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल मागवण्यात आले असून ही संपूर्ण माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. या माहितीद्वारे पंतप्रधान या कॅडेट्सशी संवाद साधणार आहेत.

  • सध्या ९ लाख कॅडेट्सकडून अशा स्वरुपाची माहिती एनसीसीने गोळा केली असून ही संपूर्ण प्रक्रिया याच पंधरवड्यात पूर्ण करायची आहे. मात्र, पंतप्रधानांसोबत या विद्यार्थ्यांशी संवादाची तारीख अद्याप निश्चित करण्यता आलेली नाही. पंतप्रधानांच्या वेळे आणि सोयीनुसार ही तारिख निश्चित होणार आहे.

  • यासंदर्भात २३ फेब्रुवारी २०१८ रोजी लेफ्टनंट जनरल बी. एस. सहरावत (एनसीसी) यांनी सर्व राज्यातील विभागीय कार्यालयांना अधिकृत पत्र पाठवून सूचना देण्यात आल्या आहेत. या माहितीमध्ये कॅडेट्सचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल यांसारखी माहिती मागवण्यात आली आहे.

  • त्याचबरोबर जर एखाद्या कॅडेटकडे मोबाईल क्रमांक नसेल तर त्याच्या पालकांचा क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये तो मोबाईल क्रमांक कोणाचा आहे याचा उल्लेखही करावा लागणार आहे. तसेच जर ई-मेल आयडी उपलब्ध नसेल तर एनसीसी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो तयार करण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे.(source :loksatta)

७ राज्‍यांमध्ये २६ जागांसाठी मतदानाला सुरुवात :
  • नवी दिल्ली -  राज्यसभेच्या एकूण 59 जागांसाठी देशभरात आज निवडणूक होत आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. यातील  6 जागा महाराष्ट्रातून आहेत. ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्र आणि बिहारमधील 6, मध्य प्रदेशातील 5 आणि आंध्र, ओडिशा, तेलंगणा तथा राजस्थानच्या तीन-तीन जागा, झारखंड 2, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल, हरियाणा आणि केरळसाठी प्रत्येकी एक-एक अशा जागा आहेत.

  • राज्यसभेच्या 26 जागांसाठी आज मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगाणा आणि केरळ या 7 राज्यात सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानला सुरुवात होत आहे.

  • राज्यसभेसाठी एकूण 59 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 33 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यामुळे आता 26 जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक होती. ती बिनविरोध झाली आहे.

  • महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून जात आहेत.(source :abpmajha)

आजपासून दिल्लीत अण्णा हजारेंचे आंदोलन, मोदी सरकारच्या अडचणी वाढणार :
  • जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. रामलीला मैदानात होणाऱ्या या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हजारे यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी भाजपा सरकारने प्रयत्न देखील केले. मात्र, त्यानंतरही अण्णा हजारे आंदोलनावर ठाम आहेत.

  • शुक्रवारपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरु करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही. लोकपालची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशी विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. या आंदोलनामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

  • भाजपा सरकारच्या प्रयत्नांना अपयश - अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून सुरु होणारे आंदोलन थांबवावे, यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची मदत घेत अण्णा हजारेंना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. महाजन यांनी सोमवारी हजारेंची भेटही घेतली होती.

  • देशात चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसताना आता पोकळ आश्वासनांचा काय उपयोग, असे सुनावत हजारेंनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले होते.(source :loksatta)

चिनने पाकिस्तानला विकले मिसाईल ट्रॅकिंग सिस्टिम, भारत सावध :
  • बीजिंग -  भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी बनलेल्या पाकिस्तानचे चीनशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. भारताला घेरण्यासाठी हे दोन्ही शेजारी नेहमीच कारवाया करत असतात. आता या दोन्ही देशांमधील मैत्री आर्थिक क्षेत्रामधून सामरिक क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे.

  • याचाच एक भाग म्हणजे चीनने एक आश्चर्यकारक पाऊल उचलत पाकिस्तानला मिसाईट ट्रॅकिंग सिस्टिमची विक्री केली आहे. भारताने गुरुवारी केलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, चीन आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या या करारावर भारत करडी नजर ठेवून आहे.

  •  या करारामुळे पाकिस्तानला आपला बहुआयामी अण्वस्त्रवाहून क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा कार्यक्रम पुढे रेटता येणार आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार पाकिस्तान आणि चीनमध्ये झालेल्या या कराराच्या रकमेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

  • पाकिस्तानी सैन्याने या सिस्टिमचा वापर आपल्या एका फायरिंग रेंजजवळ करण्यासा सुरुवात केली आहे. तसेच त्यामाध्यमातून पाकिस्तानी सैन्य क्षेपणास्त्राला विकसित करण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली आहे. चायनिज इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या रिसर्चरमधून ही माहिती समोर आली आहे. सिचुआन प्रांताचे सीएएस इंस्टिट्युचे रिसर्चर जेंग मेंगवेई यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टकडे या कराराला दुजोरा दिला आहे.(source :lokmat)

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला ‘गर्व’ वाटेल अशी कामगिरी करा- राजनाथ सिंग :
  • वी दिल्ली: विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. २२२ भारतीय खेळाडू स्पर्धेत सहभागी होत असून २०१० च्या राष्टÑकुलनंतर हे सर्वांत मोठे पथक आहे.

  • यंदा जलतरण, अ‍ॅथ्लेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, हाौकी, लॉन बॉल्स, नेमबाजी, स्क्वॅश, टेबल टेनिस, भारोत्तोलन, कुस्ती आणि पॅरालिम्पिक अशा १५ प्रकारात भारतीय खेळाडूंचा समावेश असेल. अ‍ॅथलेटिक्स, लॉन बॉल्स, बॉक्सिंग, भारोत्तोलन, बास्केटबॉल हे संघ आधीच गोल्ड कोस्टमध्ये दाखल झाले आहेत.

  • केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी विदेशात आम्हाला नाचक्की झेलावी लागेल, असे काहीही न करण्याचे खेळाडूंना आवाहन केले.

  • भारताने २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल स्पर्धेत ३८ सुवर्णांसह १०१ पदके जिंकली होती. त्यानंतर २०१४ मध्ये १५ सुवर्णांसह ६४ पदके जिंकली. विदेशी भूमीत भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी मॅन्चेस्टर स्पर्धेत राहिली. त्यावेळी ३० सुवर्णांसह एकूण ६९ पदकांची कमाई झाली होती. भारत त्यावेळी चौथ्या स्थानावर होता.(source :lokmat)

दिनविशेष :
  • जागतिक हवामान दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

  • १८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.

  • १९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

  • १९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.

  • १९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

  • १९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.

  • १९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

  • १९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.

  • १९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.

जन्म

  • १७४९: फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दि लाप्लास यांचा जन्म.

  • १८८१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म.

  • १८८१: नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टॉडिंगर यांचा जन्म.

  • १८९३: भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९७४)

  • १९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६७)

  • १९१२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.

  • १९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

  • १९२३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)

  • १९३१: रशियन बुद्धीबळपटू व्हिक्टर कॉर्चनॉय यांचा जन्म.

  • १९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९३१: क्रांतिकारक भगत सिंग यांना फाशी. (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)

  • १९३१: क्रांतिकारक सुखदेव थापर यांना फाशी. (जन्म: १५ मे १९०७)

  • १९३१: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांना फाशी. (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)

  • १९९१: व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९१३)

  • २००७: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.

  • २००८: मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.

  • २०११: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.