चालू घडामोडी - २३ मे २०१८

Date : 23 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मलेशियात भारतीय वंशाची शीख व्यक्ती पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदी : 
  • क्वालालंपूर-  मलेशियात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीची निवड झाली आहे. गोविंद सिंग देव असे त्यांचे नाव असून मलेशियातील अल्पसंख्याक समुदायातील मंत्री होणारे ते पहिलेच मंत्री आहेत.

  • देव हे 45 वर्षांचे असून त्यांच्याकडे कम्युनिकेशन आणि मल्टिमीडिया हे खाते देण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच नव्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या आणखी एका व्यक्तीची मंत्रिमंडळात निवड झाली आहे. एम. कुलसेहरन हे डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीचे सदस्य असून त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले आहे.

  • गोविंद सिंग देव पुचोंग मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्त्व करतात. त्यांचे वडिल करपाल सिंग हे मलेशियात वकिल आणि राजकीय नेते होते. देव यांना काल नॅशनल पॅलेस येथे शपथ देण्यात आली. या सोहळ्य़ात जगातील निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध नेते म्हणून ओळखले जाणारे आणि मलेशियाचे नवे पंतप्रधान महाथिर मोहम्मद आणि इतर कॅबिनेट सदस्यांनीही शपथ घेतली.

  • 2008 साली देव पहिल्यांदा मलेशियाच्या संसदेत खासदार झाले. त्यानंतर वाढीव मताधिक्याने 2013 साली ते पुन्हा निवडून गेले. आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते 47 हजार 635 मतांनी विजयी झाले आहेत. देव यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पंजाबी समुदायाने आनंद व्यक्त केला आहे. मलेशियात साधारणपणे 1 लाख शीख लोक राहातात.

गुगल, फेसबुक, याहू, मायक्रोसॉफ्ट, व्हाटस्अ‍ॅपला प्रत्येकी १ लाख दंड :
  • मुंबई : आॅनलाईन बालअश्लीलता कमी करण्यासाठी काय पावले उचलली, याची ठोस माहिती न्यायालयात सादर न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आॅनलाईन सेवापुरवठादारांना प्रत्येकी १ लाख रुपये दंड भरण्याचा आदेश दिला. मार्च २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सामूहिक बलात्कार, बालअश्लीलतेचे व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध होऊ नयेत यादृष्टीने काय कारवाई करावी, यावर सल्ला देण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती.

  • सर्व सेवापुरवठादारांनी या समितीच्या शिफारशी मान्य केल्या. १६ एप्रिलच्या सुनावणीवेळी न्यायालयाने या शिफारशींच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा प्रगती अहवाल द्यावा, असा आदेश दिला होता; मात्र गुगल, फेसबुक, याहू, मायक्रोसॉफ्ट व्हॉटस्अ‍ॅप यापैकी कोणीही अहवाल दिला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ लाख रुपये भरून १५ जूनपूर्वी प्रगतीबद्दल शपथपत्र दाखल करण्याचा आदेश दिला.

  • शासनानेदेखील यात कारवाईसाठी खूप वेळ घेतला असल्याचे नमूद करून आॅनलाईन सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलचे काम पूर्ण करून ३० जूनपर्यंत सुरू करावे, असाही आदेश दिला. या प्रकरणात आता २ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

  • दोन व्हिडीओंची तक्रार - जानेवारी २०१७ मध्ये एका एनजीओने माजी सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्याकडे यूट्यूबवरील बलात्काराच्या २ व्हिडीओंसह तक्रार केली. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन पत्र याचिका म्हणून स्वीकारली. मार्च २०१७ मध्ये न्यायालयास सल्ला देण्यासाठी समितीची स्थापना.

जी. परमेश्वर होणार कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री आज शपथविधी :
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी. परमेश्वर उद्या शपथ घेणार आहेत. कुमारस्वामी यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत मंत्रीमंडळ स्थापनेबाबत चर्चा झाली. यामध्ये एकूण ३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसला तर मुख्यमंत्रीपदासह १२ खाती जेडीएसला देण्याबाबत निर्णय झाला. तसेच २४ मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप केले जाईल, असे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

  • परमेश्वर हे काँग्रेसचे दलित नेते असून काँग्रेसचेच रोशन बेग यांच्या नावाची यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होती. तत्पूर्वी उपमुख्यमंत्रीपद हे लिंगायत समाजाच्या आमदाराला देण्यात यावे अशी मागणी लिंगायत संघटनांनी केली होती. त्यानंतर काही मुस्लिम संघटनांनी हे पद मुस्लिम समाजाच्या आमदाराला देण्याची मागणी केली होती.

  • मात्र, संध्याकाळी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्रीपदासाठी जी. परमेश्वर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच काँग्रेसचे आमदार के. आर. सुरेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. उद्या, बुधवारी या तीन महत्वाच्या पदांसह मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीच्या कार्यक्रमाला देशातील अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.

पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे :
  • मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. कर्नाटकमध्ये प्रचार संपतो ना संपतो तोच, इकडे तोटा भरुन काढण्याच्या नावाखाली पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो.

  • त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.

  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे आणि रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळे इंधन दर भारतात वाढले आहेत. मात्र दरवाढीला कारणीभूत यापेक्षाही महत्त्वाचं कारण आहे, केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी आणि विविध राज्यांमध्ये लागणारे कर आणि सेस.

  • दिल्ली सरकारने लावलेले सर्व कर काढून टाकले, तर दिल्लीत पेट्रोलचे दर निम्म्यापेक्षाही खाली येतील.

चेन्नईची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा पराभव :
  • मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जनं सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करून आयपीएलच्या क्लालिफायर वनचा सामना जिंकला. या विजयानं चेन्नईला आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवून दिलं आहे.

  • चेन्नईच्या या विजयात फॅफ ड्यू प्लेसीची नाबाद 67 धावांची खेळी निर्णायक ठरली. ड्यू प्लेसीनं 42 चेंडूंमधली ही खेळी पाच चौकार आणि चार षटकारांनी सजवली. शेन वॉटसनच्या साथीनं ड्यू प्लेसी सलामीला मैदानात उतरला होता.

  • दुसऱ्या बाजूनं चेन्नईची आठ बाद 113 अशी घसरगुंडी उडाली. पण ड्यू प्लेसीनं एक खिंड लढवून चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला.

  • त्याआधी, या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला सात बाद 139 असं रोखून धरलं. सलामीच्या शिखर धवनला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार केन विल्यमसन अवघ्या 24 धावांवर माघारी परतला. त्यानंतरही हैदराबादची घसरगुंडी सुरू राहिली आणि त्यांची अवस्था सहा बाद 88 अशी झाली. त्या कठीण परिस्थितीत कार्लोस ब्रॅथवेटनं 29 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी उभारली. त्यामुळं हैदराबादला चेन्नईला 140 धावांचं लक्ष्य देता आलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.

  • १८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.

  • १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.

  • १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.

  • १९८४: बचेन्द्री पालने दुपारी १:०९ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

  • १९९५: जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती प्रकाशीत केली गेली.

  • १९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.

जन्म 

  • १८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)

  • १८९६: गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७७)

  • १९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)

  • १९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)

  • १९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.

  • १९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)

  • १९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)

  • १९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै१८३९)

  • १९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)

  • २०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.