चालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१८

Date : 23 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कार्लसनने विजयाची संधी गमावली :
  • चांगली सुरुवात करूनही कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे तीन वेळा जगज्जेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनला नवव्या डावातही बरोबरीवर समाधान मानावे लागले. कार्लसनला संयम न राखता आल्यामुळे अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो करुआना याला डाव बरोबरीत सोडवण्याची संधी मिळाली.

  • जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील नऊ डाव बरोबरीत सुटल्यामुळे दोघांचे प्रत्येकी ४.५ गुण झाले आहेत. आता उर्वरित तीन क्लासिकल डावांमध्ये विजय मिळवण्याचा दोघांचा प्रयत्न असेल.

  • २७ वर्षीय कार्लसनने एका दिवसाच्या विश्रांतीनंतर नवव्या लढतीसाठी अधिक तयारी केली होती. सुरुवातीलाच दमदार चाली रचत त्याने पटावर चांगली स्थिती निर्माण केली होती.

  • पण एका चुकीमुळे करुआनाला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. अखेर ५८ चालीनंतर हा डाव बरोबरीत सुटला. ‘‘विजय मिळवण्याची चांगली संधी मी दडवली. यासाठी मीच कारणीभूत आहे,’’ असे निराश झालेल्या कार्लसनने सांगितले.

भारतीय महिलांचं स्वप्न भंगलं, इंग्लंड टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत :
  • अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने केलेल्या भागीदारीच्या जोरावर, टी-२० विश्वचषकात इंग्लंडने भारतावर ८ गडी राखून मात केली आहे. अंतिम फेरीत इंग्लिश महिलांची गाठ ऑस्ट्रेलियाच्या संघाशी पडणार आहे. भारताने दिलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली होती.

  • सलामीच्या फलंदाज टॅमी बेमाँड आणि डॅनिअल वेट या लवकर माघारी परतल्या. मात्र यानंतर अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून स्किवरने ५२ तर अॅमी जोन्सने ५३ धावांची खेळी केली. भारताकडून राधा यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

  • त्याआधी इंग्लिश कर्णधार हेदर नाईटने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतीय महिलांना ११२  धावांवर रोखण्यात यश मिळवलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या हरमनप्रीत कौरचा निर्णय भारतीय सलामीवीर जोडीने काही प्रमाणात सार्थ ठरवला.

  • स्मृती मंधाना आणि तानिया भाटीया जोडीने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना माघारी परतल्यानंतर, ठराविक अंतराने तानिया भाटीयाही बाद झाली.

  • यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी केली. मात्र रॉड्रीग्ज माघारी परतल्यानंतर भारताच्या डावाला गळती लागली.

भारत-ऑस्ट्रेलिया पाच करार :
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी परस्पर सामरिक संबंध वाढविण्याबाबत व्यापक चर्चा केली आणि गुंतवणुकीला चालना देण्याबाबत परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत ऑस्ट्रेलियाशी पाच करारही केले.

  • कोविंद यांचे बुधवारी सिडनी येथे आगमन झाले. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री मॅरिस पायने आणि कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या उच्चायुक्तांनी पाच करारांवर स्वाक्षऱ्या केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

  • पहिला करार दिव्यांगांना सेवा देण्याबाबत तर दुसरा करार दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑस्ट्रेड यांच्यात करण्यात आला. तिसरा करार रांचीतील सेंट्रल माइन प्लानिंग अ‍ॅण्ड डिझाइन इन्स्टिटय़ूट आणि कॅनबेरातील कॉमनवेल्थ सायण्टिफिक अ‍ॅण्ट रीसर्च ऑर्गनायझेशन यांच्यात करण्यात आला.

  • कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठीचा चौथा करार गुंटूर येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ आणि पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात करण्यात आला. तर पाचवा करार संयुक्त पीएच.डी.बाबत दिल्लीतील इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्था आणि ब्रिस्बेनमधील क्वीन्सलॅण्ड तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात करण्यात आला.

ब्रेग्झिटोत्तर संबंधांबाबत  ब्रिटनकडून करार सादर :
  • ब्रेग्झिटनंतर अर्थात युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर उभयतांमधील संबंध नेमके कसे राखले जातील, याबाबतच्या कराराच्या मसुद्यावर गुरुवारी दोघांचे एकमत झाले. आता युरोपीय समुदायातील २७ देशांचे प्रतिनिधी रविवारी होणाऱ्या बैठकीत या कराराबाबत निर्णय घेतील.

  • या करारानुसार व्यापक, दृढ, महत्त्वाकांक्षी आणि लवचिकतेला  वाव देणारे संबंध राखण्यास वाव मिळणार आहे, असे अधिकारी गोटातून सांगण्यात आले.

  • युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनमधील युरोपीय देशांच्या नागरिकांना ब्रिटनबाहेर पडण्यासाठी तसेच ब्रिटनच्या नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी इ.स. २०२०ची मुदत आहे. मात्र गरजेनुसार ती एक ते दोन वर्षांनी वाढविण्यावरही एकमत झाले.

  • आता ब्रेग्झिटोत्तर संबंधांबाबतच्या राजकीय कराराचा मसुदा युरोपीय समुदायातील अन्य २७ देशांना पाठविण्यात आला आहे, असे युरोपीय मंडळाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले. येत्या रविवारी ब्रुसेल्स येथे समुदायातील देशांच्या प्रतिनिधींची बैठक होत आहे. त्यावेळी या करारांबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.

  • उज्ज्वल भवितव्यासाठी ब्रेग्झिटची अंमलबजावणी सुव्यवस्थित व्हावी, अशी सर्वच ब्रिटनवासियांची इच्छा आहे. हा करार ती अपेक्षा पूर्ण करणारा असून तो तडीस नेण्याचा माझा निर्धार आहे.

आंध्र प्रदेशमधील विधानसभेची नवीन इमारत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच :
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपावर कमालीचे नाराज असून भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाही. आता नायडू यांनी विधानसभेची नवीन इमारत ही ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच बांधण्याचा निर्णय घेतला आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात उंच बांधकाम ठरणार आहे.

  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला राज्याचे दरवाजे बंद करुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता चंद्राबाबू नायडू यांनी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पेक्षा उंच इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

  • अमरावती येथे विधानसभेची नवीन इमारत बांधली जाणार असून याची उंची २५० मीटर इतकी असणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची उंची १८२ मीटर असून जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून याची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नायडू यांनी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

  • नोव्हेंबरच्या अखेरीस यासंदर्भातील निविदा काढण्यात येतील आणि यानंतर दोन वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असेल. या इमारतीत दोन गॅलरी असतील. यातील पहिली गॅलरी ही ८० मीटरवर असेल. तिथे ३०० लोकांना उभं राहता येईल. तर दुसरी गॅलरी ही २५० मीटर उंचीवर असेल. तिथे २० लोकांना थांबता येईल. या दोन्ही गॅलरीमधून अमरावतीचे विहंगमय दृष्य दिसेल.

बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला हजेरी लावणारा शिवसैनिक अयोध्येत :
  • अयोध्या : शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी एक 'बाळासाहेब प्रेमी' शिवसैनिक मोटारसायकलने प्रवास करत अयोध्येत दाखल झाला आहे. जिथे-जिथे बाळासाहेबांची सभा होत असे, तिथे-तिथे मोहन यादव उपस्थित राहत असत.

  • एका अपघातात पायाला जबर दुखापत झाल्यानंतरही निर्धारात गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांनी खंड पडू दिला नाही. आता आयोध्या दौऱ्यासाठीही गेल्या दहा दिवसांपासून बाईकने प्रवास करत ते अयोध्येत पोहोचले.

  • मोहन यादव यांच्या मुलांनाही राज आणि उद्धव ठाकरे याच नावाने ओळखलं जातं. पण प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांची जी अवस्था असते तीच मोहन यादव यांचीही आहे. कारण त्यांच्या वाट्याला आजवर पक्षाकडून केवळ उपेक्षाच आली.

  • मोहन यादव हे पुणे महापालिकेत वॉचमन म्हणून काम करत होते. पण शिवसेनेचे काम करतो म्हणून आपल्याला आणि आपल्या मुलाला कामावरुन काढून टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर छोटी-मोठी कामे करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

  • मोहन यादव यांची बाईकही भगव्या रंगाची आहे. त्यावर केशरी रंगाची फुलं लावल्याने अधिक उठाव आला आहे. बाईकवरही त्यांनी विविध घोषणा लिहिल्या आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

  • १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

  • १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

  • १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

  • १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

  • १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

  • १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

  • १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट१९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

  • १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)

  • १९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)

  • १९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)

  • १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

  • १९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.

  • १९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर१८५८)

  • १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)

  • १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)

  • १९७९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

  • १९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)

  • १९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.

  • २०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)

  • २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला  यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.