चालू घडामोडी - २३ ऑक्टोबर २०१८

Date : 23 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अध्यात्म आणि न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम :
  • न्यूटन हा महान शास्त्रज्ञ १६४२ - १७२६ या काळात होऊन गेला. तो एक गणितज्ञ, खगोल शास्त्रज्ञ, धर्म शास्त्रज्ञ, लेखक, भौतिक शास्त्रज्ञ व नैसर्गिक तत्त्वज्ञानी म्हणून ओळखला जातो. त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधाणे साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतले. तसे प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे की आकाशात फेकलेली प्रत्येक वस्तू जमिनीवरच येऊन पडते. झाडाला लागलेली फळे पिकल्यानंतर झाडापासून वेगळी झाली की जमिनीवरच येऊन पडतात. न्यूटनने हा शोध लावण्यापूर्वी याचा प्रत्येक व्यक्तीने अनुभव घेतला होता.

  • परंतू त्यामागचे शास्त्रीय तत्व शोधणारा न्यूटन हा एकमेव अवलिया होता. त्याने गुरुत्वाकर्षणाचा जसा सिद्धांत मांडला. तसेच त्याने विश्वात असणाऱ्या गतीवर सिद्धांत मांडून अंध:कार  युगाला प्रकाशाची वाट दाखवली. नुसतीच ही वाट दाखवून तो थांबला नाही, तर त्याकाळातील अंध:कार झेलणाऱ्या मानवास अध्यात्माची ओळखही करून दिली.

  • अध्यात्म आणि न्यूटन ही जरा न पटणारी गोष्ट वाटेल. परंतू न्युटनच्या तिसऱ्या गतिविषयक नियमाने तो एक तत्त्वज्ञानी होता. अध्यामाची त्याला चांगली जाण होती, हे लक्षात येते. त्याचा हा गतिविषयक तिसरा नियम मानवी आयुष्यात किती चपखलपणे बसतो. हे लक्षात येते. काय सांगतो हा त्याचा गती विषयक तिसरा नियम? ‘प्रत्येक क्रिया बल समान परिणामांचे एकाचवेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात.’

राजस्थानमध्ये आतापर्यंत १२३ जणांना झिका व्हायरसची लागण :
  • नवी दिल्ली : राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात रविवारी झिका व्हायरसच्या आणखी सहा केस समोर आल्या आहेत. त्यामुळे झिकाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 123 वर पोहोचल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली. उपचारानंतर 123 पैकी 105 रुग्ण बरे झाल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

  • राज्य आरोग्य विभागाने तपासणी, पडताळणी आणि पहिल्या तिमाहीतील झिका प्रभावित गर्भवती महिलांसाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. वेळोवेळी या समितीकडून आरोग्य संचालकांना अहवाल सादर करण्यात येईल, असं एका आदेशात म्हटलं आहे.

  • जयपूरमधील शास्त्रीनगर भागातून झिकाचे जास्त प्रकरणं समोर आले आहेत. सरकारी पातळीवर झिका रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हा व्हायरस एडीज इजिप्टी मच्छरापांसून पसरतो, ज्यामुळे ताप, त्वचेवर सुरकुत्या, डोळ्यांना त्रास आणि शरीर, डोकेदुखीचा त्रास होतो. गर्भवती महिलांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. भारतात सर्वात अगोदर हा आजार जानेवारी 2017 मध्ये समोर आला होता. यानंतर त्याच वर्षी जुलैमध्ये तामिळनाडूत कृष्णागिरी जिल्ह्यात दुसरा रुग्ण आढळून आला होता.

  • गंभीर निगराणी आणि मच्छरांवर नियंत्रण मिळवल्यानंतर हा व्हायरस आटोक्यात आला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये झिका व्हायरस गंभीर समस्या बनत चालली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना २,५००, अधिकाऱ्यांना ५,००० बोनस :
  • मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपये आणि अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी केली. नोव्हेंबर महिन्यात पगार १ तारखेला होणार आहे. पगारवाढीतील थकबाकीची ५ हप्त्यांमधील रक्कम १ नोव्हेंबरच्या आत देण्यात येईल.

  • अधिकाºयांना १० टक्के अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. आॅक्टोबर, २०१८ पासून ही वेतनवाढ लागू होणार आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्यात २ टक्के वाढ होणार आहे. आॅक्टोबर, २०१८च्या वेतनात वाढीव महागाई भत्ता देण्यात येईल.

  • अधिकाºयांना वेतनवाढ देण्यासाठी मंत्रालयातील दोन निवृत्त अधिकाºयांची वेतन समिती स्थापन केली आहे. दोन महिन्यांत अहवाल सादर होईल. अहवाल येईपर्यंत एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात आली आहे.

  • एसटी कामगारांना दिवाळी भेट मिळावी. वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला करावे, अशी मागणी होती. दोन्ही मागण्या मान्य झाल्याने आम्ही समाधानी आहोत, असे एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी सांगितले.

‘मी टू’ प्रकरणी तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार :
  • नवी दिल्ली : ‘मी टू’ प्रकरणी याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. एस. के.कौल यांच्या पीठाने सांगितले, की याचिकेची सुनावणी सलग घेतली जाईल पण सुनावणी लगेच मात्र घेतली जाणार नाही. याचिका आम्ही बघितली असून त्यात तातडीने सुनावणी करण्यासारखे काही दिसत नाही. याचिकेत गृहमंत्रालय व  राष्ट्रीय महिला आयोग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

  • वकील एम. एल. शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, की मी टू चळवळीत ज्या महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, त्या सर्व प्रकरणांत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात यावेत. शिवाय लैंगिक छळवणुकीच्या या प्रकरणांची जलदगती न्यायालयात सुनावणी करून तक्रारदारांना अर्थसाहाय्य व सुरक्षा देण्यात यावी, राष्ट्रीय महिला आयोगाने या महिलांना कायदेशीर मदत मिळवून द्यावी. न्यायालयाने मी टू प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन गुन्हेगारी दंडसंहिता १९७४ च्या कलम १५४ अन्वये गुन्हे दाखल करावेत.

  • अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर याच्यावर २००८ मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता, तेव्हापासून भारतात मी टू चळवळ जोरात सुरू झाली असून त्यात अनू मलिक याच्यावर गायिका सोना मोहपात्रा व श्वेता पंडित यांनी अलिकडे लैंगिक छळवणुकीचे आरोप केले आहेत. 

  • सुभाष घई, विकास बहल, रजत कपूर, आलोक नाथ यांचीही नावे लैंगिक छळ प्रकरणात सामोरी आली असून तरुण पत्रकार महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांमुळे परराष्ट्र राज्य मंत्री व माजी पत्रकार एम. जे.अकबर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर प्रिया रामाणी यांच्यासह वीस महिला पत्रकारांनी आरोप केले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी अकबर हे या प्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयात जबाब नोंदवणार आहेत.

टाटा सन्सच्या सीईओंचा पगार ऐकून तुम्हीही व्हाल थक्क :
  • टाटा ग्रुपची उपकंपनी असलेल्या टाटा सन्स या कंपनीचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन आहेत. टाटा कन्सलटन्सी सर्विसेसमधून (टीसीएस) त्यांची याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा सन्समध्ये रुजू झाल्यानंतर चंद्रशेखरन यांचा पगार किती वाढला याची तुम्ही आम्ही कल्पनाही करु शकणार नाही.

  • २०१७-१८ या वर्षात त्यांचे पॅकेज जवळपास दुप्पट झाले आहे. त्यामुळे त्यांचा आताचा पगार ५५.११ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या पगारातील ८५ टक्के रक्कम त्यांना कमिशन आणि नफा म्हणून मिळते. टाटा सन्सच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळ ५६ वर्षांच्या चंद्रशेखरन यांचा पगार नक्कीच थक्क करणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

  • मीठापासून ते सॉफ्टवेअर बनविण्यापर्यंत सर्व व्यवसायात असलेल्या टाटा ग्रुपचे वार्षिक उत्पन्न १०३ अरब डॉलर इतके आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये चंद्रशेखरन यांना कंपनीचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. त्याआधी टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चंद्रशेखरन यांना ११ महिन्यांसाठी ३०.१५ कोटी पगार होता. टाटा सन्सचे आधीचे अध्यक्ष असलेल्या सायरस मिस्त्री यांच्या तुलनेत चंद्रशेखरन यांचा पगार तिपटीने जास्त आहे.

  • मिस्त्री यांना २०१६ मध्ये टाटा सन्सच्या बोर्डवरुन काढले तेव्हा त्यांचे वार्षिक पॅकेज १६ कोटी रुपये होते. मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या नफ्यानुसार आपला पगार ठरवला होता. सायरस मिस्त्री आणि त्यांचे भाऊ शापूर मिस्त्री हे कंपनीचे सर्वात मोठे शेअर होल्डर आहेत. या दोघांकडे कंपनीचे १८.४ टक्के शेअर्स आहेत. टाटा ग्रुपला सांभाळणे ही मजेची गोष्ट नाही. त्यामुळे चंद्रशेखरन यांचा पगार योग्य आहे असे मत परदेशी ब्रोकरेज फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट म्हणून काम करणाऱ्या एकाने सांगितले.

विदेशात अवैध संपती असलेल्या भारतीयांवर टाच आणणार आयकर विभाग :
  • विदेशात अवैध संपत्ती असलेल्या भारतीयांवर आयकर विभाग टाच आणण्याच्या तयारीत आहे. अवैधरित्या जमा केलेले पैसे आणि मालमत्ता गोळा केलेल्या भारतीयांविरोधात आयकर विभागाने मोहीमच उघडली आहे. अशा भारतीयांविरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

  • आयकर विभागाने त्यांच्या विदेशी समकक्ष विभागासोबत मिळून हजारो भारतीयांच्या संपत्ती आणि मालमत्तेची चौकशी सुरु केली आहे. कोणाकडे किती पैसा आला? कोणत्या मार्गाने आला? कोणी कोणती मालमत्ता खरेदी केली याची कसून चौकशी करण्यात येते आहे अशीही माहिती समोर आली आहे.

  • सीबीडीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस विभागाचे संचालक सुशील चंद्रा यांनीही ही मोहीम सुरु असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. काही प्रकरणांमध्ये व्यक्तीगत नोटीसा पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर काही प्रकरणांमध्ये करदात्यांकडून त्यांनी केलेल्या व्यवहारांचे सगळे तपशील मागवण्यात आले आहेत असेही समजते आहे.

  • यामधल्या काही प्रकरणांमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्ती आहेत असेही समजते आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना ज्या करदात्यांनी त्यांची विदेशी संपत्ती दाखवली नाही अशांच्या विरोधात कारवाई होणार आहे. त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो अशीही माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

  • काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने २०१५ मध्येच कायदा आणला आहे. नव्या कायद्यानुसार अवैध संपत्तीच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ नुसार होणार आहे असेही समजते आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

  • १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.

  • १८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

  • १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

  • १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.

जन्म 

  • १७७८: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)

  • १८७९: वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)

  • १९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)

  • १९२३: श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी२०००)

  • १९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन२०१६)

  • १९२४: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८९)

  • १९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

  • १९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.

  • १९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९९६)

  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

  • १९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८)

  • १९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

  • १९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)

  • २०१२: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.