चालू घडामोडी - २३ सप्टेंबर २०१८

Date : 23 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक बँक देणार ३० अब्ज डॉलरचे अर्थसाह्य :
  • वॉशिंग्टन : जागतिक बँकेने भारतासोबतच्या महत्त्वाकांक्षी पंचवार्षिक आराखड्यास मंजुरी दिली असून, त्यानुसार बँकेकडून भारताला २५ ते ३0 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मिळणार आहे. यामुळे कनिष्ठ-मध्यम उत्पन्न गटातून उच्च-मध्यम उत्पन्न देशांच्या गटात जायला मदत होईल.

  • बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बँकेने भारतासाठी ‘कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क’ला मंजुरी दिली आहे. भारताला उच्च-मध्यम उत्पन्न देश बनविण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरेल. त्याद्वारे भारताला संसाधन कार्यक्षम व एकात्मिक वृद्धी, रोजगारनिर्मिती व मनुष्यबळ भांडवल उभारणी अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील समस्यांवर मार्ग काढता येईल.

  • या आराखड्यानुसार, विविध आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून भारताला २५ ते ३0 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मिळणार आहे. या वित्तसंस्थांत आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँक (आयबीआरडी), आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ (आयएफसी) आणि बहुविध गुंतवणूक हमी संस्था (मिगा) यांचा समावेश आहे.

  • जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागप्रमुख हार्टविग शाफेर यांनी सांगितले की, सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने गेल्या दशकात सर्वाधिक लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढले आहे. भारत २०३० पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न देश बनेल.

  • पाच वर्षे एकत्र काम करू जागतिक बँकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी सांगितले की, हा भारतासोबतचा जागतिक बँकेचा पहिला भागीदारी आराखडा आहे. याअंतर्गत आम्ही पाच वर्षे एकत्र काम करू. गेल्या अनेक दशकांपासून भारताने प्राप्त केलेल्या अतुलनीय वृद्धीची जागतिक बँकेने दखल घेतली आहे. त्यानुसार, हे अर्थसाह्य देण्यात येत आहे.

‘रूदाली’ फेम दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे निधन :
  • ‘रूदाली’ सारख्या आयकॉनिक चित्रपटाच्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज रविवारी (23 सप्टेंबर 2018) निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या आणि किडनीच्या कॅन्सरने पीडित होत्या. कल्पना लाजमी यांनी आज पहाटे 4.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. कल्पना लाजमींना गत तीन वर्षांपासून किडनीच्या कॅन्सरने ग्रासले होते. गेल्या तीन महिन्यात त्यांचा हा आजार आणखीच बळावला होता. किडनीसोबतचं लिव्हरच्या विकारानेही त्यांना वेढले होते. 

  • कल्पना लाजमी यांच्या उपचारासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आर्थिक मदत केली होती. गत नोव्हेंबरमध्ये त्यांना कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले असता सलमान खान,आमिर खान, रोहित शेट्टी आणि इंडियन फिल्म्स अ‍ॅण्ड टेलिव्हीजन डायरेक्टर्स असोसिएशनने त्यांच्या उपचाराचा खर्च उचलला होता. प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांच्या त्या कन्या होत्या. तर, चित्रपट निर्माते गुरुदत्त त्यांचे मामा होते. सुप्रसिद्ध गायक भूपेन हजारिका हे कल्पना यांचे जवळचे मित्र (पार्टनर) होते.

  • कल्पना यांनी हजारिका यांच्या आयुष्यावर 'भूपेन हजारिका: अॅज आय न्यू हिम' नावाचे पुस्तकही लिहिले होते. कल्पना यांनी सहाय्यक दिग्दर्शनातून  कलाविश्वात पदार्पण केले. श्याम बेनेगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

  • कल्पना यांनी ‘एक पल', 'रुदाली', 'चिंगारी', 'दमन' यासारख्या बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याशिवाय लोहित किनारे ही टीव्ही मालिकाही दिग्दर्शित केली. रूदालीसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २००१ मध्ये आलेल्या कल्पना यांच्या दमन या चित्रपटासाठी अभिनेत्री रवीना टंडनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. २००६ मध्ये आलेला चिंगारी हा कल्पना यांचा अखेरचा सिनेमा ठरला.  

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना, फेरबदलांना शासनाची मंजुरी :
  • मुंबई  - मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-२०३४ सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ हे शासनाच्या मंजुरीने १ सप्टेंबर २०१८ पासून अंमलात आले आहे. या मंजुरीतून वगळलेल्या, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील सारभूत स्वरूपाच्या फेरबदलांबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यास शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे मुंबईतील सुनियोजित विकासाला चालना मिळेल.

  • मुंबईचा विकास आराखडा सर्व संबंधित घटकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन तयार केला असून, तो सात महिन्यांत मंजूर झाला आहे. आराखडा व नियमावली शासनाने ८ मे २०१८ रोजी मंजूर केली. हा आराखडा १ सप्टेंबर २०१८ पासून अंमलात आला.

  • नियमावलीच्या मंजुरीतून वगळलेला भाग सर्वंकष असे फेरबदल जनतेच्या हरकती - सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आले. प्रथम टप्प्यात या सारभूत स्वरूपाच्या फेरबदलांवरील प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या फेरबदलांनाही शासनाने ४ ते ५ महिन्यात मंजुरी दिली आहे.

तिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान देणार - रझा अकादमी :
  • मुंबई  - केंद्र सरकारने तिहेरी तलाकबाबत काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नूरी यांनी दिली. मुस्लीम समाजातील मौलाना व विचारवंतांची बैठक नुकतीच पार पडली, त्यामध्ये यावर चर्चा झाली.

  • सईद नूरी म्हणाले, हा अध्यादेश म्हणजे मुस्लीम समाजाच्या धार्मिक बाबतीत सरकारचा हस्तक्षेप असून, केंद्र सरकार जाणीवपूर्वक मुस्लीम समाजाच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत आहे. आम्ही याबाबत गप्प बसणार नाही, तर या अध्यादेशाला विरोध करून, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत आमचा सध्या विचारविनिमय सुरू आहे.

  • केंद्र सरकारचा हेतू स्वच्छ नसून, या अध्यादेशाच्या माध्यमातून मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोरक्षेच्या नावावर मुस्लिमांना छळण्यात येत असून, अशा प्रकारच्या घटना भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाला अशोभनीय असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

  • सातत्याने होणाऱ्या अशा घटनांमुळे भारतात एकत्र आणि आनंदाने नांदणाºया दोन समाजांमध्ये तेढ वाढत चालली आहे. संविधानाच्या विविध तरतुदींना धाब्यावर बसविले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बालमजुरी विरोधातील भारताच्या प्रयत्नांची अमेरिकेकडून प्रशंसा :
  • वॉशिंग्टन - घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७ मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली असून, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १४ देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे.

  • अमेरिकेच्या श्रम विभागाच्या वतीने शनिवारी वार्षिक ‘बालमजुरी आणि बेठबिगारी अहवाल’ जारी करण्यात आला. त्यात ही माहिती देण्यात आली. अहवालात म्हटले आहे की, यंदा अत्यंत कठोर निकष लावून जगातील १३२ देशांच्या बालमजुरी निवारणाच्या प्रयत्नांचा अभ्यास करण्यात आला आहे.

  • या निकषांचे पालन केवळ १४ देशांनीच केल्याचे दिसून आले आहे. कोलंबिया, पॅराग्वे आणि भारत यांचा त्यात समावेश आहे. ठराविक कायदेशीर आणि धोरणात्मक निकषांचा त्यात समावेश होता. अहवालानुसार घातक व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काम करण्यावर बंदी घालण्यासाठी भारत सरकारने आपल्या बालमजुरी कायद्यात सुधारणा केली आहे.

  • आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या १८२ व १३८ परिषदेने संमत केलेल्या ठरावानुसार, भारताने हे बदल केले आहेत. याशिवाय बालमजुरी रोखण्यासाठी तयार केलेल्या कायद्याची तसेच राष्ट्रीय बालमजुरी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने एक प्लॅटफॉर्म तयार केला.

  • बालमजुरी संपलेली नाही अहवाल म्हणतो की, सरकारने चांगले प्रयत्न केले असले तरी भारतातील बालमजुरी अजून संपलेली नाही. घातक स्वरूपाच्या व्यवसायात अजूनही मुलांना कामाला जुंपले जाते. बालकांना बेठबिगार म्हणूनही राबवून घेतले जाते.

जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात; पुरावे समोर :
  • नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांना मिळाले आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या सूचनेवरुन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील तीन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

  • त्यामुळेच भारतानं संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांची भेट घेणार होत्या. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर भारतानं ही भेट रद्द केली. 

  • पाकिस्तानकडून येणारे मेसेज भारतीय सुरक्षा दलांनी इंटरसेप्ट केल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. मेसेज इंटरसेप्ट करण्यात आल्यानंतरच सरकारकडून न्यूयॉर्कमधील भेट रद्द करण्यात आली.

  • तीन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी चौघांचं अपहरण केलं होतं. यामध्ये तीन पोलिसांचा समावेश होता. या तिन्ही पोलिसांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांची हत्या करण्याचे आदेश सीमेपलीकडून देण्यात आले होते, असा दावा भारतीय सुरक्षा दलांनी केला आहे. हे मेसेज भारतीय सुरक्षा यंत्रणांनी इंटरसेप्ट केले आहेत. पाकिस्तानकडून येणारे मेसेज इतके स्पष्ट होते, की त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख होता. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८४६: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

  • १८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.

  • १९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.

  • १९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.

  • १९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

जन्म

  • १९०३: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)

  • १९०८: देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)

  • १९१४: ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.

  • १९१५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.

  • १९१७: भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००६)

  • १९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)

  • १९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)

मृत्यू

  • १८५८: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १७८९)

  • १८७०: फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)

  • १८८२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८००)

  • १९३९: आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे निधन. (जन्म: ६ मे १८५६)

  • १९६४: नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८८३)

  • २००४: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १९२५)

  • २०१२: जादूगार कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल यांचे निधन.

  • २०१५: भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.