चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ एप्रिल २०१९

Date : 24 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन अडचणीत :
  • मुंबई : जेट एअरवेजचे स्लॉट (मार्ग) इतर विमान कंपन्यांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे जेट एअरवेजमध्ये पैसे गुंतविण्यास एतिहाद एअरवेज, टीपीजी कॅपिटल व इंडिगो एअर या कंपन्या अनुत्सुक आहेत. परिणामी, बंद पडलेल्या जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन अडचणीत आले आहे.

  • सरकार जेटमध्ये पैसे गुंतवण्यास ते अनुत्सुक आहे. जेट एअरवेजवरील कर्ज १०,००० कोटींपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये भारतीय बँकांचे ७,३५१ कोटी व ३ विदेशी बँकांचे (माशरेक बँक- १,४०० कोटी, एचएसबीसी- ९१० कोटी व वित्तसंस्थेचे ७०० कोटी) ३,०१० कोटी आहेत. भारतीय बँकांमध्ये स्टेट बँक (१,९५८ कोटी), पंजाब नॅशनल बँक (१,७४६ कोटी), येस बँक (८६९ कोटी), आयडीबीआय (७५२ कोटी), कॅनरा बँक (७१८ कोटी), आयसीआयसीआय बँक (५४५ कोटी), बँक आॅफ इंडिया (२६६ कोटी), इंडियन ओव्हरसीज बँक (२१२ कोटी) व सिंडिकेट बँक (१८५ कोटी) यांचा समावेश आहे.

  • इंडिगो बनली सर्वात मोठी कंपनी जेट बंद पडल्यामुळे इंडिगो एअर ही भारतातील सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी बनली आहे. इंडिगोचा बाजार हिस्सा- ४६.९० टक्के आहे. त्यानंतर स्पाईस जेट- १३.६० टक्के, एअर इंडिया- १३.१० टक्के, गो एअर- ९.९० टक्के, एअर आशिया- ५.९० टक्के व विस्तारा एअरवेज- ४.२० टक्के यांचा नंबर लागतो.

पंतप्रधान मोदी फक्त ३-४ तासांची झोप घेतात, कारण :
  • आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय मुद्द्यांवर अनेक भाषणं आणि मुलाखती देताना पाहिलं आहे. पण पहिल्यांदाच मोदींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षय कुमारने केला आहे. अक्षयने मोदींची मुलाखत घेतली असून यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.

  • या मुलाखतीत अक्षयने मोदींना त्यांच्या झोपेविषयी प्रश्न विचारला. ‘तुम्ही फक्त ३ ते ४ तासच का झोपता?,’ असा प्रश्न त्याने विचारला. यावर मोदी म्हणाले, ‘मला अनेकजण हा प्रश्न विचारतात. इतकंच नव्हे तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा मला झोपेविषयी प्रश्न विचारला होता. आम्ही खूप चांगले मित्र आहोत.

  • एकमेकांशी एकेरी भाषेतच आम्ही बोलतो. इतके कमी तास झोपून तू स्वत:चं नुकसान करतोयस असं ते म्हणायचे. पण माझ्या शरीराला तशी सवयच लागली आहे. ३ ते ४ तासांत माझी झोप पूर्ण होते. इतकीच माझी झोप आहे आणि ही सवय मला खूप आधीपासून आहे.’

  • पंतप्रधान मोदींना राग येतो का, सोशल मीडियावरील मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया काय असते, विरोधी पक्षांसोबत त्यांचं नातं कसं असतं अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मनमोकळेपणाने या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत.

खास मतदानासाठी परदेशातून पुण्यात :
  • पुणे : परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांना बुद्धिमत्तेमुळे सन्मान आहे. पण, समर्थ भारत घडविण्याचा संकल्प घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीमुळे परदेशातील भारतीयांची पत उंचावली आहे. भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आम्ही केवळ मतदान करण्याच्या उद्देशातून पुण्यात आलो.. नोकरीनिमित्ताने आखाती देशात वास्तव्यास असलेल्या आणि केवळ मतदानासाठी पुण्यात आलेल्या संदेश उभे आणि योगेश आठलेकर यांनी मंगळवारी असे मनोगत व्यक्त केले.

  • पुण्यात बालपण गेलेले संदेश उभे गेल्या २५ वर्षांपासून संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी येथे वास्तव्यास आहेत. अनॉक (अबुधाबी नॅशनल ऑईल) कंपनीमध्ये ते मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. तर, कोथरूड येथील वुडलँड सोसायटी भागातील स्वरूप पार्क येथे वास्तव्यास असलेल्या आठलेकर कुटुंबातील योगेश आठलेकर गेल्या दोन दशकांपासून कुवेत येथील रिझायत ग्रुपमध्ये विक्री विभागाचे वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

  • लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच समर्थ भारताच्या घडणीमध्ये आपला खारीचा वाटा असावा या कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून केवळ मतदान करण्यासाठी हे दोघेही सपत्नीक पुण्यात आले. मंगळवारी सकाळीच मतदान करून या दोघांनीही कुटुंबीयांचा निरोप घेऊन परदेशी जाण्यासाठी पुणे सोडले. केवळ आम्हीच नाही तर अबुधाबी येथून ७५ कुटुंबीय मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी भारतामध्ये आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

  • अबुधाबी येथील महाराष्ट्र मंडळाचे ८०० मराठी कुटुंबीय सदस्य आहेत. तेथे आम्ही नुकताच हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला आणि मतदान करण्यासाठी दुसऱ्याच दिवशी पुण्याचे विमान गाठले, असे संदेश उभे यांनी सांगितले. समर्थ भारतासाठी नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर यावेत या इच्छेतून मी आणि पत्नी अरुणा, आम्ही मतदान केले.

तीन न्यायाधीशांची चौकशी समिती :
  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध एका माजी महिला कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रार प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही. रामण्णा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांची एक समिती स्थापन केली. समिती स्थापन करण्याचा निर्णय ‘पूर्ण न्यायालयाने’ घेतल्याचे सूत्रांनी दि इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

  • सरन्यायाधीशांनी सेवाज्येष्ठतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्या. एस. ए. बोबडे यांना याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यास सांगितल्याचे वृत्त सोमवारी देण्यात आले होते. त्यानुसार समिती स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला आणि तो न्यायाधीशांमध्ये वितरित करण्यात आला, न्यायाधीशांनी तो मान्य केला आणि त्यानुसार हा निर्णय घेतला गेला.

  • न्या. गोगोई यांच्या घरातील कार्यालयात गेल्या वर्षी ही महिला काम करीत होती. त्यावेळी हा प्रकार घडल्याचा या महिलेचा आरोप आहे. या लैंगिक शोषणाला आपण विरोध केला असता आपल्याला काढून टाकण्यात आले आणि दिल्ली पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल असलेल्या माझ्या पती आणि दीरालाही निलंबित केले गेले, असा तिचा आरोप आहे.

  • लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये अडकवून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्सव सिंग बेन्स या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे केला होता. न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने या वकिलाला बुधवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यास तसेच त्याच्या आरोपाबाबत ठोस पुरावे देण्यास सांगितले. या महिलेने तिची बाजू मांडण्यासाठी तसेच जाहीर पत्रकार परिषद घेण्यासाठी आपल्याला दीड कोटी रुपये देण्याचे अमिष दाखवले होते, असाही बेन्स यांचा दावा आहे.

सिंधू, सायनाला विजेतेपदाची प्रतीक्षा :
  • लागोपाठ तीन स्पर्धामध्ये खेळल्यावर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आता ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल आता पुढील मोसमासाठी सज्ज झाल्या आहेत. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार असून गेल्या ५४ वर्षांत भारताला या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालता आलेली नाही. त्यामुळे सिंधू, सायना हा विजेतेपदाचा दुष्काळ संपवतील, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

  • दिनेश खन्ना यांनी १९६५ मध्ये भारताला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवून दिले होते. गेल्या वर्षी सायना आणि एच. एस. प्रणॉय यांनी कांस्यपदकाची कमाई केली होती. सायनाने २०१० आणि २०१६ मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे, तर सिंधूने २०१४च्या स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली होती.

  • अकाने यामागुची, चेन युफेई, रत्चानोक इन्थनोन त्याचबरोबर गतविजेती ताय झू यिंग या अव्वल खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधू, सायनासमोरील प्रमुख अडथळे आधीच दूर झाले आहेत. सिंधूने सिंगापूर खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारली होती. तिला पहिल्या फेरीत जपानच्या सायाका ताकाहाशी हिच्याशी लढत द्यावी लागेल. या सामन्यात विजय मिळवल्यास तिच्यासमोर पोर्नपावी चोचुवाँग हिचे आव्हान असेल. सिंधूला पुढे कोरियाच्या संग जी ह्य़ून हिचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

  • या वर्षी भारताकडून एकमेव विजेतेपद मिळवणाऱ्या सायनाला दुखापतीमुळे दोन स्पर्धाना मुकावे लागले होते. मलेशिया येथील स्पर्धेत सायनाने पुनरागमन केले होते. सातव्या मानांकित सायनाचा सलामीचा सामना चीनच्या हान यूए हिच्याशी होणार आहे.

अक्षय कुमारचे प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तरं :
  • मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचं हे नवं क्षेत्र कोणतं, याचं उत्तर मिळालं आहे. बॉलिवूडच्या खिलाडीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे.

  • अक्षय कुमारने घेतलेली नरेंद्र मोदींची मुलाखत उद्या सकाळी प्रक्षेपित केली जाणार आहे. खुद्द अक्षयने याबाबत ट्विटरवरुन माहिती देत प्रोमो शेअर केले आहेत. ही मुलाखत अराजकीय असल्याचं अक्षयने म्हटलं आहे.

  • अक्षयने पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर अक्षयच्या काही प्रश्नांवर मोदी खळखळून हसतानाही पाहायला मिळत आहेत. मुलाखतकाराच्या भूमिकेतील खिलाडीने राजकारणातील बड्या खिलाडीची घेतलेली मुलाखत तुम्ही 'एबीपी माझा'वर उद्या (बुधवार 24 एप्रिल) सकाळी नऊ वाजता पाहू शकाल.

  • अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. "आज मी जे करणार आहे, ते यापूर्वी कधीही केलेली नाही. मी याबाबत अतिशय उत्साही आणि अधीर आहे. पुढची माहिती लवकरच..." या ट्वीटनंतरच अक्षय कुमार भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

  • अक्षयने आणखी एक ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं. "मी याआधी केलेल्या  ट्वीटमुळे तुम्हा सगळ्यांची उत्सुकता ताणली गेल्याचं पाहून आनंद वाटला, पण मी निवडणूक लढवत नाही, हे इथे स्पष्ट करु इच्छितो" असं अक्षयने म्हटलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.

  • १७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.

  • १८००: जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.

  • १९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.

  • १९६८: मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.

  • १९७०: गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.

  • १९९०: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.

  • १९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.

  • २०१३: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.

जन्म 

  • १८८९: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)

  • १८९६: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९८०)

  • १९१०: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)

  • १९२९: कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००६)

  • १९४२: अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बार्बारा स्ट्रायसँड यांचा जन्म.

  • १९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४२: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९००)

  • १९६०: नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.

  • १९७२: चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८८७)

  • १९७४: देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)

  • १९९४: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २८ मे१९०३)

  • १९९९: चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.

  • २०११: आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)

  • २०१४: भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.