चालू घडामोडी - २४ ऑगस्ट २०१८

Date : 24 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रत्येक कुटुंबाकडे २०२२ साली असेल स्वत:चे घर- मोदी :
  • जुजवा : देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात म्हणजे २०२२ साली भारतातील प्रत्येक कुटुंबाकडे स्वत:च्या मालकीचे घरअसायला हवे, असे स्वप्न मी पाहिले आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे काढले.

  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणारी घरे उत्तम दर्जाची आहेत. ती बांधण्यासाठी कोणालाही एक रुपयाचीही लाच द्यावी लागली नाही, असेही पतंप्रधान म्हणाले. या योजनेंतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या घरांच्या एक लाख लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते ई-गृहप्रवेश करून देण्यात आला.

  • या लाभार्थ्यांशी वलसाडनजीक असलेल्या जुजवा गावी आयोजिलेल्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधान पुढे म्हणाले की, गुजरातकडून मला बरेच काही शिकायला मिळाले आहे. मी स्वत: पाहिलेली स्वप्ने ठराविक मुदतीत प्रत्यक्षात आणण्याची शिकवण धडा मला या राज्यानेच दिली आहे.

  • कुटुंबावरच माझा विश्वास मोदी म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घरांचा उत्तम दर्जा पाहिल्यानंतर सरकारही अशी घरे बांधू शकते याच्यावर आता लोकांचा विश्वास बसेल. या योजनेसाठी सरकारने पैसे दिले परंतु ही घरे खऱ्या अर्थाने प्रत्येक कुटुंबाच्या निढळाच्या घामाने उभी राहिली आहेत. आपले घर कसे असावे, ते बांधण्यासाठी कोणते साहित्य वापरावे या सगळ्याचा निर्णय संबंधित कुटुंबीयांनी घेतला आहे. आमचा विश्वास कंत्राटदारांवर नव्हे, तर कुटुंबावर आहे. जेव्हा एखादे कुटुंब स्वत: आपले घर बांधते, त्यावेळी ते उत्तम प्रतीचे होणारच, याची आपणास खात्री असते.

मराठी सिनेसृष्टीतील तारा निखळला, अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन :
  • मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • विजय चव्हाण यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा दुपारी 12 वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.

  • विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे.

  • विजय चव्हाण यांचं बालपण मुंबईतील करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली.

  • विजय चव्हाण यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली. पुढे अनेक चित्रपट आणि मालिकाही केल्या. विनोदी अभिनेता म्हणून त्यांना अवघे मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांच्या गंभीर भूमिकाही गाजल्या. विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण यांना होतं.

यूपीएससी उत्तीर्ण दृष्टीहीन जयंत मंकलेच्या नियुक्तीसाठी सोमवारी महत्त्वाची बैठक :
  • नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत (सीएसई) आपल्या अंधत्वावर मात करत जयंत मंकले या विद्यार्थ्याने यश मिळवलं. मात्र त्याच्या अंधत्वामुळे त्याला डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग (डीओपीटी) ने नियुक्ती नाकारली. या दिशेने आता एक सकारात्मक पाऊल पुढे पडलं आहे. डीओपीटी मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत सोमवारी बैठक होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल.

  • एबीपी माझाने जयंत मंकलेची बातमी दाखवली होती. याची दखल घेण्यात आली आहे. जयंत मंकलेने विनय सहस्त्रबुद्धे यांचीही भेट घेतली, त्यांनी जयंतच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतुक करत लवकरच नियुक्ती मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं.

  • ''जयंतच्या नियुक्तीसाठी डीओपीटीकडून काही अडथळे आले. मात्र ते लवकरच क्लिअर केले जातील. त्याला त्याच्या मित्रांनी अनेक प्रकारे मदत केली आहे,'' असं म्हणत विनय सहस्त्रबुद्धे यांनी जयंतचं कौतुकही केलं.

रिलायन्सची केरळला तगडी मदत, अनेक राज्यांपेक्षा मोठी रक्कम :
  • मुंबई: महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून केरळला मदत पाठवली जात आहे. देशातील बडे उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. रिलायन्सने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. इतकंच नाही तर रिलायन्स फाऊंडेशन तब्बल 51 कोटी रुपयांचं आवश्यक साहित्य पाठवणार आहे.

  • रिलायन्सने देऊ केलेली ही मदत, अनेक राज्यांनी दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचंच बोलायचं झालं, तर फडणवीस सरकारने केरळसाठी 20 कोटी रुपये दिले आहेत. महाराष्ट्राची ही मदत अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे. आता रिलायन्सने त्यापेक्षा जास्त दिली आहे.

  • रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी केरळमधील जनतेप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. "केरळचे नागरिक कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे रिलायन्स फाऊंडेशन आवश्यक ती सर्व मदत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटी रुपयांची मदत देत आहोत" असं नीता अंबानी यांनी सांगितलं.

सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे नवे राज्यपाल :
  • श्रीनगर : सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी (21 ऑगस्ट) जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी सत्यपाल मलिक यांच्या नावाची घोषणा केली. याआधी एन. एन. व्होरा हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. व्होरा यांनी पाच-पाच वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.

  • कोण आहेत सत्यपाल मलिक : सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बागपतमधील गरीब कुटुंबात झाला. मेरठ कॉलेजमध्ये त्यांनी आपलं महाविद्यायीन शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला.

  • 1974 ते 1977 या काळात सत्यपाल मलिक हे उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार होते. त्यानंतर 1980-86 आणि 1986-1992 या काळात राज्यसभेवर गेले. 1989-1991 या काळात नवव्या लोकसभेत म्हणजे 1989 साली अलिगढ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. बिहार, ओदिशा या राज्यांचं राज्यपालपदही त्यांनी सांभाळलं आहे.

  • जम्मू-काश्मीरमध्ये संवेदनशील स्थिती : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या स्थिती अत्यंत संवेदनशील आहे. बकरी ईदच्या दिवशीच दहशतवाद्यांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली. शिवाय भाजपच्या एका कार्यकर्त्याचीही हत्या करण्यात आली. तसेच जमावाने दगडफेकही केली. दुसरीकडे आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडेही फडवले गेले.

दिनविशेष :

  • आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन

महत्वाच्या घटना

  • १६९०: कोलकाता शहराची स्थापना.

  • १८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.

  • १८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

  • १९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.

  • १९३६: ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.

  • १९६६: रशियाचे लुना-११ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.

  • १९६६: विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.

  • १९९१: युक्रेन सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

  • १९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

जन्म

  • १८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)

  • १८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)

  • १८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)

  • १८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)

  • १८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)

  • १९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

  • १९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.

  • १९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)

  • १९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.

  • १९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.

  • १९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)

  • १९३२: व्यासंगी साहित्यसमीक्षक रावसाहेब जाधव यांचा जन्म.

  • १९४४: ओडीसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचा जन्म. (मृत्यू: २४ जून १९९७)

  • १९४५: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक विन्स मॅकमेहन  यांचा जन्म.

  • १९४७: ब्राझीलियन लेखक पाउलो कोएलो यांचा जन्म.

मृत्यू

  • १९२५: संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८३७)

  • १९६७: कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८२)

  • १९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२)

  • २०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन. (जन्म: ३० जून १९२८)

  • २००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.