चालू घडामोडी - २४ जानेवारी २०१९

Date : 24 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रेल्वेमध्ये ४ लाख कर्मचाऱ्यांची भरती, रेल्वेमंत्र्यांची घोषणा :
  • नवी दिल्ली : देशातील बेरोजगारांसाठी एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेत कर्मचाऱ्यांची मोठी भरती करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण चार लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.

  • भारतीय रेल्वेत एक लाख 32 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. येत्या दोन वर्षात एक लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. असे मिळून दोन लाख 32 हजार त्यामुळे क व ड श्रेणीतील जागा आणि आता निघणाऱ्या जागा अशा सर्व मिळून येत्या दोन वर्षात जवळपास रेल्वेत चार लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी दिली आहे. गेल्या वर्षात रेल्वेत दीड लाख कर्मचारी भरती करण्यात आली होती.

  • दोन लाख 32 हजार नवीन जागांच्या भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 31 हजार 428 जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ही जाहिरात येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील 1 लाख जागांसाठी 2020 मध्ये मे किंवा जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्राथमिक स्तरावरील मदरशे बंद करा, वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची मागणी :
  • लखनौ : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा मुस्लिम मुलांवरील प्रभाव रोखण्यासाठी प्राथमिक स्तरावरील मदरशे बंद करावेत अशी मागणी उत्तर प्रदेशच्या शिया केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना देखील पत्र लिहिलं आहे. लहान मुलांवर कोणत्याही विचारांचा लगेच परिणाम होतो. ती रोखण्यासाठी बंदीची मागणी केली असल्याची प्रतिक्रिया रिझवी यांनी दिली आहे.

  • दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'चा (आयएस) मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम मुलांवरील प्रभाव रोखण्यासाठी देशभरातील प्राथमिक स्तरावरील मदरशे बंद करावेत,' अशी मागणी  वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्र लिहून केली आहे.

  • रिझवींनी पत्रात म्हटले आहे की,  मुस्लिम मुलांना मदरशांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर घ्यावा. लहान मुलांवर कोणत्याही विचारांचा लगेच प्रभाव निर्माण होतो. 'आयएस' या दहशतवादी संघटनेचा जगभरातील मुस्लिम मुलांवर वेगाने प्रभाव निर्माण होत आहे. देशातील मदरशे तत्काळ बंद न केल्यास जवळपास निम्मी लोकसंख्या पुढील पंधरा वर्षांत आयएसची समर्थक बनेल, असे त्यांनी म्हटले आहे.

  • आयएसचा प्रभाव वाढल्यानंतर काय होते, हे आता काश्मीरमध्ये दिसत आहे. जी मुले मदरशांमध्ये शिकतात ती इतर धर्माचा तिरस्कार करतात, त्यांच्यापासून वेगळी राहताना दिसतात. देशाच्या ग्रामीण भागातील मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये मूलतत्त्ववाद वाढत आहे. त्यामुळे देशाचे आणि मुस्लिम मुलांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मुलांना मदरशांमध्ये पाठवायचे असल्यास माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पाठवावे. तसे केल्यास देशात वाढणारा मुलतत्ववाद रोखता येईल, असे रिझवींनी म्हटले आहे. दरम्यान, रिझवी यांनी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती आणि समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा आहे, असेही म्हटले आहे.

दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी लाभ देऊ नका - बाबा रामदेव :
  • अलिगढ : दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या. शिवाय, त्यांना निवडणुकीला उभे राहण्यावरही मनाई घाला, असा सल्ला योगगुरु रामदेवबाबा यांनी लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दिला आहे. शिवाय, दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी शाळा, रुग्णालयाचा लाभ घेऊ देऊ नका तसेच नोकऱ्यांमध्ये स्थान देऊ नका, म्हणजे आपोआपच लोकसंख्या नियंत्रणात येईल, असेही रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.

  • उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. लोकसंख्या नियंत्रणाबाबत रामदेव बाबा यांनी याआधीही अशा प्रकारची विधाने केली होती.

  • पुढील पंतप्रधान कोण होणार सांगणं कठीण : बाबा रामदेव योगगुरु बाबा रामदेव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा दिला होता. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाबा रामदेव नरेंद्र मोदींची साथ द्यायला तयार नाहीत. आगामी निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचा पुनरुच्चार योगगुरु रामदेव बाबांनी नुकताच केला होता.

  • बाबा रामदेव यांच्या भूमिकेनंतर भाजपची डोकेदुखी आणखी वाढली आहे. "सध्याची राजकीय परिस्थिती काहीशी विचित्र आहे. त्यामुळे पुढील पंतप्रधान कोण होणार याबाबत आता काहीच बोलू शकत नाही. मी राजकारणावर लक्ष देत नाही. त्यामुळे मी कोणाचा विरोध किंवा समर्थन करत नाही", असं बाबा रामदेव म्हणाले होते. बाबा रामदेवांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

TikTok वापरताय....सावधान! तुमची माहिती जगभर विकतायत 'ही' अ‍ॅप :
  • नवी दिल्ली : स्मार्टफोनमध्ये बऱ्याच अ‍ॅपचा बोलबाला झाला आहे. यामध्ये TikTok, UC Browser, ShareIt ही चायनीज अ‍ॅपही आहेत. मात्र, वेळीच सावध झालेले बरे. ही अ‍ॅप खासगी माहितीचा अ‍ॅक्सेस मागतात. मात्र, या अ‍ॅपना खासगी माहिती वापरण्याची परवानगी देणे किती महागात पडू शकते? तुमचे मॅसेज, कॉन्टॅक्टपासून फोटो आणि व्हिडिओ ही अ‍ॅप त्रयस्थ कंपन्यांना विकत असतात. याचा खुलासा Arrka Consulting ने केला आहे. 

  • चीनच्या फोनसोबत चीनी अ‍ॅपनी मोबाईलवर चांगलीच पसंती मिळवली आहे. मात्र ही अ‍ॅप भारतीयांची त्यांच्या कामासाठी गरजेची नसलेली माहितीही चोरत आहेत. ही चोरलेली माहिती या अ‍ॅपच्या कंपन्या परदेशी एजन्सीना विकत आहेत. या अ‍ॅपमध्ये Helo, Shareit, TikTok, UC Browser, Vigo Video, Beauty Plus, Club factory Everything, News-Dog, UC news आणि VMate यांचा समावेश आहे. ही अ‍ॅप 10 पैकी 8 मोबाईलवर इन्स्टॉल असतात. ही अ‍ॅप युजरच्या मायक्रोफोनचाही अ‍ॅक्सेस मागतात. तसेच कॅमेऱ्याचाही अ‍ॅक्सेस मागितला जातो. 

  • Arrka Consulting चे संस्थापक संदीप राव यांच्या मतानुसार जगभरातील सर्वाधिक वापरली जाणारी 50 आणि चीनची 10 अ‍ॅप युजरचा 45 टक्के जादा माहितीचा अक्सेस मागतात. ही अ‍ॅप युजरची खासगी माहिती 7 परदेशी कंपन्यांना विकत आहेत. तर TikTok गोळा केलेली माहिती चीनी टेलिकॉम कंपन्यांना पाठविली जात आहे. तर Vigo Video, Beauty Plus आणि Tencent co ही अ‍ॅप  Meitu ला युजरची माहिती पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे . युसी ब्राऊजर युजरची माहिती मूळ कंपनी अलीबाबाला पाठवत आहे. 

न्यूझीलंडचा पूर्ण संघच ठरला मॅन ऑफ द मॅच :
  • नवी दिल्ली : सामन्यात जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतो, त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जातो. पण न्यूझीलंडच्या संघाच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडली आहे की, संपूर्ण संघालाच मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला होता.

  • ही गोष्ट आहे 1995-96 सालची. न्यूझीलंडचा हा सामना वेस्टइंडीज. या दोन्ही संघांतील एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना  न्यूझीलंडने 35.5 षटकांमध्ये 158 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अंकुश कायम ठेवला.

  • त्यामुळे न्यूझीलंडला वेस्ट इंडिजच्या संघाला 154 धावांमध्ये गुंडाळले होते. या सामन्यात न्यूझीलंडच्या सर्व खेळाडूंनी जवळपास सारखेच योगदान दिले होते. त्यामुळे यावेळी न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला होता.

राष्ट्रीय पक्षांच्या निधीपैकी ५३ टक्के ‘अज्ञात’ स्रोतांकडून :
  • नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षांना २०१७-१८ या काळात मिळालेल्या निधीपैकी ५० टक्क्यांहून रक्कम ‘अज्ञात’ स्रोतांकडून मिळाली आणि त्यात निवडणूक रोखे आणि ऐच्छिक देणग्या यांद्वारे मिळालेल्या पैशांचा समावेश होता, असे असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्स (एडीआर) या सामाजिक संघटनेने म्हटले आहे.

  • सहा राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सादर केलेले प्राप्तीकर विवरणपत्र आणि देणग्यांचे तपशील यांचे विश्लेषण केल्यानंतर एडीआरने याबाबतचे निष्कर्ष बुधवारी जाहीर केले. त्यानुसार, भाजप, काँग्रेस, भाकप, बसप, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे २०१७-१८ सालातील एकूण उत्पन्न १२९३.९५ कोटी रुपये होते.

  • यापैकी या पक्षांना ‘अज्ञात’ स्त्रोतांकडून मिळालेले उत्पन्न ६८९.४४ कोटी रुपये, म्हणजे एकूण उत्पन्नाच्या ५३ टक्के होते. या रकमेपैकी निवडणूक रोख्यांमधून मिळालेली रक्कम २१५ कोटी रुपये, म्हणजे ३१ टक्के होती.

  • एकटय़ा भाजपनेच अज्ञात स्रोतांकडून ५५३.३८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे जाहीर केले. राष्ट्रीय पक्षांना अशा स्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाच्या ती ८० टक्के इतकी आहे.

  • या पक्षांना अज्ञात स्रोतांकडून मिळालेल्या रकमेपैकी ३५४.२२ कोटी रुपये किंवा ५१ टक्के रक्कम ऐच्छिक देणग्यांद्वारे (२० हजार रुपयांहून कमी) मिळाली. इतर संकीर्ण अज्ञात स्रोतांकडून मिळालेले एकूण उत्पन्न ४.५ कोटी रुपये होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश - कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.

  • १८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

  • १८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.

  • १९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.

  • १९४३: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.

  • १९६६: भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.

  • १९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

  • १९७६: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.

  • १९८४: अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

  • १९८४: कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.

जन्म 

  • १९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर२००० – मुंबई)

  • १९२४: मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)

  • १९४३: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक सुभाष घई यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९६५: दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)

  • १९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९)

  • २००५: गोवा मुक्तिसंग्राम अनुताई लिमये यांचे निधन.

  • २०११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.