चालू घडामोडी - २४ जुलै २०१८

Date : 24 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रेल्वेची ९० हजार पदांसाठी भरती, ९ ऑगस्टपासून परीक्षा :
  • नवी दिल्ली: रेल्वेने सर्वात मोठी नोकरभरतीची तारीख जाहीर केली आहे. जवळपास 90 हजार पदं रेल्वेत भरली जाणार आहेत. त्यासाठी 9 ऑगस्टपासून परीक्षा घेतली जाणार आहे. रेल्वेची ही ऑनलाईन परीक्षा देशातील सर्व महानगरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 26 हजार 502 जागा भरण्यात येणार आहेत.

  • असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही पदं पहिल्या टप्प्यात भरण्यात येतील.  26 जुलैपासून कोणाची परीक्षा कोणत्या शहरात आहे याबाबतची माहिती प्रसिद्ध होईल.

  • मात्र परीक्षार्थी आपलं ई-कॉल लेटर परीक्षेपूर्वी चार दिवस आधीच डाऊनलोड करु शकतील. म्हणजेच 9 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या परीक्षेचं ई-कॉल लेटर 5 ऑगस्टपासून डाऊनलोड करता येईल.

  • रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या 89,409 पदांसाठी रेल्वेने ऑनलाईन अर्ज मागवले होते. यासाठी देशभरातून 2.37 कोटी अर्ज आले आहेत. पहिल्या टप्प्यातील असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही भरती होणार आहे. मात्र ग्रुप डी ची पदभरतीची परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

  • दरम्यान तीन टप्प्यात ही परीक्षा होणार आहे. 26 जुलैपासून Railway Recruitment Control Board च्या वेबसाईटवर परीक्षेबाबतची माहिती मिळेल. परीक्षा रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी होणार नाही.

चार वर्षांत अख्खं जगच पालथं घातलं; PM मोदी निघाले युगांडा, रवांडा, आफ्रिकेच्या दौऱ्यावर :
  • मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. रवांडा, युगांडा आणि द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर मोदी रवाना होत आहेत. 23 जुलै ते 27 जुलै असा पाच दिवसांचा मोदींचा हा दौरा आहे. रवांडा आणि युगांडा या देशाला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. त्यामुळेच, जवळपास अवघे विश्वच मोदींच्या विदेश दौऱ्यांनी पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 4 वर्षात 54 देशांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये आणखी दोन देशांचा समावेश होत आहे. रवांडा आणि युगांडा या दोन देशांच्या दौऱ्यांमुळे मोदी 56 देशांना भेट देणारे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.

  • मोदींनी गेल्या 4 वर्षातील 171 दिवस विदेशात घावले आहेत. त्यामुळे पंतप्रधान कार्यकाळातील 12 टक्के वेळ त्यांचा परदेशात गेला आहे. गेल्या 4 वर्षांत मोदींच्या या दौऱ्यावर 1484 कोटी रुपयांचा खर्च झाला असून एप्रिल 2015 च्या दौऱ्यावेळी सर्वाधिक करण्यात आला आहे.

  • त्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांना मोदींनी भेटी दिल्या होत्या. मोदींच्या 4 वर्षीय कार्यकाळात त्यांनी अमेरिकेला सर्वाधिकवेळा भेट दिली. दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या 9 वर्षातील कार्यकाळात विदेश दौऱ्यावर 642 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. मोदींच्या तुलनेत मनमोहनसिंग यांचा 9 वर्षातील विदेश दौऱ्यांचा खर्च निम्म्यापेक्षाही कमी आहे.

अॅमेझॉन अलेक्साच्या यशामागे भारतीय तरूणाचा ब्रेन :
  • अॅमेझॉनचे स्मार्ट स्पिकर अॅमेझॉन एकोबाबत आपल्यातील अनेकांनी ऐकले असेल. हा वायरलेस स्पिकर आपल्या आवाजावर काम करतो. कोणाला फोन करायचा असेल, गाणे ऐकायचे असेल किंवा अगदी क्रीकेटच्या मॅचचा स्कोअर माहित करुन घ्यायचा असेल तरी अगदी सहज एक आवाज दिल्यास हा स्पिकर आपल्यासाठी अनेक गोष्टी करतो. हे सगळे अॅमेझॉनच्या व्हर्चुअल असिस्टंट आर्टीफिशियल इंटेलिजन्स अॅमेझॉन अॅलेक्साच्या माध्यमातून होते. पण या सगळ्यामागे भारतीय तरुणाचा ब्रेन आहे याची तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल.

  • झारखंडमधील रांची येथे राहणाऱ्या इंजिनिअर रोहीत प्रसाद याच्या सुपिक मेंदूमुळेच हे सगळे शक्य झाले आहे. त्याने आयआयटी रुरकी येथून आपले इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बिडला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पुढचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तो अमेरिकेतील इलिनॉईस इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे गेले.

  • याठिकाणी त्यांनी वायरलेस अॅप्लिकेशनसाठी लो बिट रेट स्पीच कोडिंग विषयावर संशोधन केले. त्यानंतर आवाज ओळखण्याच्या विषयात त्याला विशेष आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले आणि अॅलेक्सा आर्टीफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करायचे ठरवले. याठिकाणी काही काळ प्रमुख संशोधक म्हणूनही त्यांनी काम केले.

  • याबाबत सांगताना रोहीत म्हणतो, ही सर्व प्रवास माझ्यासाठी अतिशय रोमांचक होता. जर तुम्ही पाच वर्षापूर्वी एखाद्या डिव्हाईसच्या समोर उभे राहून जोरात बोलल्यावर तुम्हाला हवे ते घडेल अशी कल्पना केली असती तर ती कधीच खरी वाटली नसती.

  • मात्र तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आता ते शक्य झाले आहे. मागील वर्षी अमेरिकेतील बिझनेस मासिक असलेल्या फास्ट कंपनीने ही त्याच्या बुद्धिमत्तेची दखल घेतली आहे. २०१७ च्या टॉप १०० लोकांमध्ये त्याला ९ वे स्थान देण्यात आले आहे. तर त्याचा मित्र टोनी १० व्या क्रमांकावर आहे.

आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांचे निधन :
  • पुणे -  आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आणि मराठी लेखिका सुधा नरवणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवार (२२ जुलै)  निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. आपल्या लघुकथांबरोबरच आकाशवाणीवर त्या आपल्या आवाजासाठी देखील प्रसिद्ध होत्या.

  • राज्य पुरस्काराबरोबरच अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी आतापर्यंत त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

  • दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी ऑल इंडिया रेडीओचे प्रादेशिक केंद्र अर्थात आकाशवाणीसाठी निवेदिका म्हणून काम केले होते. त्यांच्या आवाजात अनेक वर्षे आकाशवाणीच्या सकाळी सात वाजताच्या बातम्यांचे प्रसारण होत असे.

  • तरुण वयातच त्यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली होती. प्रा. एस. आर. पारसनीस हे त्यांचे वडील होत. त्यांच्या मागे पती मुकुंद नरवणे, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या; खासदार धनंजय महाडिक यांची मागणी :
  • आरक्षणाचे जनक लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी लोकसभेत केली. लक्षवेधीमध्ये महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

  • महाडिक म्हणाले, आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचे समाजिक कार्यात मोठे योगदान आहे. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्यायासाठी प्रयत्न केले. आपल्या करवीर संस्थानातून त्यांनी देशातील पहिले आरक्षण लागू केले होते. यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंचाही भारतरत्नने सन्मान करावा अशी मागणी धनंजय महाडिकांनी संसदेत लक्षवेधी सूचनेदरम्यान केली. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

  • सामाजिक चळवळीत अग्रणी असलेले थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शाहू महाराजांना भारतरत्नने सन्मानित करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यापूर्वीच १९९०मध्ये मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.

  • आजवर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्नने ४५ जणांना गौरविण्यात आले आहे. १९५४ पासून या पुरस्काराला सुरुवात झाली. यामध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) यांना पहिल्यांदा तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना (२०१५) शेवटचे सन्मानित करण्यात आले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.

  • १८२३: चिलीमध्येे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.

  • १९११: हायराम बिंगहॅम – ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.

  • १९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.

  • १९६९: चंद्र मोहिमेनंतर अपोलो ११हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.

  • १९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.

  • १९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.

  • १९९७: बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • १९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.

  • १९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.

  • २०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.

  • २००१: टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शिखा टंडनने फ्रीस्टाइल प्रकारात १०० मी. अंतर ५९.९६ सेकंदांत पार केले.

  • २००५: लान्स आर्मस्ट्राँगने टूर-डी-फ्रान्स ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.

जन्म 

  • १७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म.

  • १८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.

  • १९११: हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म.

  • १९११: बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९६०)

  • १९२८: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा जन्म.

  • १९४५: विप्रो कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा जन्म.

मृत्यू 

  • ११२९: जपानी सम्राट शिराकावा यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १०५३)

  • १९७०: भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९७)

  • १९७४: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९१)

  • १९८०: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)

  • २०१२: सीटी स्कॅन चे शोधक रॉबर्ट लिडले यांचे निधन. (जन्म: २८ जुन १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.